top of page
  • bilorijournal

अनुवाद एक स्थित्यंतराची प्रक्रिया: आशुतोष पोतदार

प्रश्न (बिलोरी जर्नल): अनुवादाकडे तुम्ही कसे पाहता?

उत्तर (आशुतोष पोतदार): सोप्या भाषेत, अनुवाद म्हणजे मूळ भाषेतील साहित्य लक्ष भाषेत आणणे. पण ते तेवढ्यापुरते नसते. शब्द आणि वाक्यांचा अनुवाद करण्यापलीकडे आव्हान असते ते मूळ भाषेतील - साहित्यातील चैतन्यमयी शक्यतांची पुन्हा एकदा निर्मिती करण्याचे. मूळ संहितेत अभिव्यक्त झालेला विचार, भावना, आशय आणि रूपाचा जास्तीत जास्त अवकाश पुरेपूर अनुवादित करणे. तो हुबेहूब येत नसतो. मूळ साहित्यकृतीचे वेगळ्या भाषेत- त्या भाषेशी प्रामाणिक राहून केलेले पुनर्वाचन असते. कुठवर हे पुनर्वाचन होऊ शकते ते एका बाजूला अनुवादकाच्या क्षमतेवर अवलंबून असते आणि दुसऱ्या बाजूला ते मूळ संहितेच्या अनुवादकतेवरही अवलंबून असते. एखादी साहित्यकृती अनुवादासाठी निवडताना त्यात अनुवादक त्याला दिसणारी अनुवादकता पाहत असतो . संहितेतली अनुवादाची क्षमता वर-वर दिसणाऱ्या भाषेच्या पल्याड जात असते. ती त्या संहितेतील भाषेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या दिसणाऱ्या वैशिष्टयांशी संबंधित असते. वैशिष्टये अशी असतात जी फक्त माहिती पुरवण्याशी निगडित नसतात तर त्या पलीकडच्या अभिव्यक्तीत, रिकाम्या जागांत असतात. हे जे पलीकडे जाणे आहे त्यात त्या साहित्यकृतीतील ‘अनुवाद पण’ असते असे आपण म्हणू शकतो. उत्तम अनुवादक - जो उत्तम लेखक असतो तो अशा अनुवादपणाचा (translatability) शोध घेत, त्या अनुवादपणाला भाषेत स्वतः अनुभवत, वाचकांनाही त्याचा अनुभव देत असतो.


अनुवादची प्रक्रिया मला महत्वाची वाटते. प्रक्रिया स्थित्यंतराची असते. कोणत्या संहितेचा अनुवाद करायचा याच्या निर्णयापासून अनुवादकाचा प्रवास सुरु होतो. स्वतःच्या आवडीनिवडी बरोबरच साहित्य आणि समाजसंकृतीविषयक वेगवेगळे घटक त्या निर्णयावर प्रभाव टाकत असतात. या अर्थाने, अँटन हर यांची मुलाखत घेताना द स्क्रोल मधे सायरी देबनाथ म्हणतात त्याप्रमाणे अनुवादक गुंफणकार असतो. एखाद्या भाषेतील कोणते साहित्य वेगळ्या - त्याच्या भाषेत नेण्याचे निर्णयन तो करत असतो. एखाद्या अनुवादकाचा निर्णय वाचक म्हणून आपल्याला मोहरून टाकू शकतो. म्हणजे, मराठीतील श्यामची आई किंवा अण्णा भाऊ साठे यांच्या कथा मराठीशिवाय इतर भाषेत जाण्याच्या कल्पनेनेही एखाद्याला आनंद होऊ शकतो. किंवा असेही काही साहित्य असेल की ते इतर भाषांत का जात नाही याची खंत वाटत असते तेवढ्यात आपल्याला कळते की त्याचा अनुवाद झाला आहे. तेंव्हा आपल्याला आनंद होतो. अलीकडे, कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीचा माया पंडितांनी केलेला अनुवाद वाचताना मला हे जाणवले. इथे, अनुवादाच्या माध्यमातून आपण आपल्या भाषिक समुदायाचा परीघ विस्तारत असतो. मूळ भाषेबरोबर लक्ष भाषेचाही परीघही विस्तारत असतो. साहजिकच, संस्कृतीचाही.


अनुवादाच्या या संपूर्ण प्रक्रियेत, आशय आणि रुपाबरोबरच वाचकांनाही महत्व असते. भाषा आणि अभिव्यक्तीबरोबर वाचकांच्या विश्वातही अनुवादाची प्रक्रिया घडत असते. एक तर, संहितेचे अनुवाद-पण हा काही एखाद्या भाषेचा उपजत गुण असत नाही. पण तो एक विशेष गुण असू शकतो. अनुवादाद्वारे एखादी भाषा वाचकांना कशी सामोरी जाते याबद्दल आपल्याला - वाचकांना कळते. त्याआधारे वाचक त्या साहित्याशी जोडून घेत असतात. अनुवादाद्वारे वाचकाला साहित्यकृतीशी जोडण्याचे सर्जनशील कार्य अनुवाद करतो. लक्ष भाषेद्वारे मूळ साहित्य कृतीत व्यक्त झालेल्या अनुभव आणि रूपांची तो पुनर्रउजळणी करतो.


अनुवाद संपादनाकडे पाहण्याच्या तुमच्या दृष्टिकोनाबद्दल अधिक सांगू शकाल का?

अनुवादाच्या संपादकाला लोकेशन सांगायचं असत. मी कोण आहे आणि भाषेशी त्याचे काय नाते आहे याबद्दल त्याला काही म्हणायचे असते. त्याला स्वतःची ओळख सांगायची असते आणि निवडलेल्या साहित्य कृतीला आपल्या वकुबाप्रमाणे त्याला ओळख द्यायची असते. अनुवादित साहित्याचे संपादन करताना किंवा अनुवादित साहित्य प्रकाशित करण्यासाठीच्या नियतकालिकाचे संपादन करताना वाचकांसाठी सांस्कृतिक आणि भाषिक दृष्ट्या वैविध्यपूर्ण साहित्य समोर आणण्याचे काम संपादक करत असतो. संपादनाचे नियोजन आपल्या भाषेतील उत्तमोत्तम साहित्य इतर भाषेत नेण्याच्या आंतरिक इच्छेने सुरु होते. मग, शोध सुरु होतो. आधी काही वाचलेले असते ते पाहिले जाते किंवा नवीन वाचून काही ठरवायचे असते. अर्थात, संपादकाचा व्यक्ती म्हणून निर्णय असला तरी संपादनामागची व्यापक विचार-चौकट संपादन प्रक्रियेत मोठी भूमिका पार पाडत असते.


तुम्ही नुकतेच ‘द ग्रेटेस्ट मराठी स्टोरीज एव्हर टोल्ड’या नावाचं पुस्तक संपादित केलं आहे. हा संग्रह तयार करण्याची प्रक्रिया कशी होती? या अनुभवाबद्दल अधिक सांगू शकाल का?

‘द ग्रेटेस्ट मराठी स्टोरीज एव्हर टोल्ड’ या मराठी कथांच्या इंग्रजी अनुवादाच्या संपादनासाठी मला विचारलं गेलं त्यावेळेस मराठी लेखक आणि वाचक म्हणून मला भावलेल्या, विचार करायला लावणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या कथांची निवड करून कामाची सुरुवात केली. कालौघात बदलत गेलेल्या कथा साहित्याचा विचार केला पण त्याच बरोबर मानवी समाज आणि मनाचा वेगवेगळ्या अंगांनी ठाव घेणाऱ्या कथा मनात होत्या. मला अशा कथा वेगळ्या भाषेतील वाचकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या.


आज शिक्षणातून आपण सर्वजण इंग्रजी भाषेला अधिकाधिक सामोरे जात आहोत. अशा काळात, आपण आपल्याच भाषेपासून दूर जात आहोत काय अशी शंका मनात येत राहते. उदाहरणार्थ, ज्यांची मुले लहान आहेत असे पालक मला सांगत असतात की मराठीत इतकं छान आणि समृद्ध साहित्य आहे पण आमच्या पाल्याला त्याची ओळख नाही. वाचक म्हणून त्या पालकांनी मराठी उत्तमोत्तम साहित्य वाचलेले असते पण त्यांच्या पाल्याला मात्र त्याची ओळखही नसते. अशी खंत ते व्यक्त करताना दिसतात. एखाद्याने कोणत्या भाषेचा वापर करायचा हा ज्याचा-त्याचा प्रश्न. तसेच ती व्यक्ती ज्या भवतालात राहते त्या संदर्भातला भाषेच्या वापराचा मुद्दा असतो. व्यक्ती आणि समाजाच्या भाषावापराचे स्वातंत्र्य मान्य करत, आपण जाणतो त्या भाषेतील उत्तम साहित्य दुसऱ्या भाषेत जावे ही इच्छा आणि तळमळ आपल्याला वेगवेगळे मार्ग दाखवत असते. अनुवादित साहित्याचे संपादन हा एक मार्ग असतो. तो मी ‘द ग्रेटेस्ट मराठी स्टोरीज एव्हर टोल्ड’ च्या संपादनाच्या निमित्ताने स्विकारला. एक प्रकारे, (मराठी)भाषेपासून आणि त्याद्वारे या भाषेतील अभिव्यक्तीच्या रुपांपासून दूर जाणे याला मला सामोरे जायचे होते. हे करण्यासाठी इंग्रजी भाषेचा आधार घेणे हे एखाद्यासाठी न पटणारे असू शकते. पण, माझ्या कुवतीप्रमाणे, मराठी कथन साहित्यातील वैविध्यपूर्ण परंपरेची ओळख मला निवडक कथांच्या इंग्रजी अनुवादातून करून द्यायची होती. काही अंशी तो प्रयत्न यशस्वी झाला असे मला वाटते. कारण, पुस्तक उपलब्ध झाले तसतसे ते आता वेगवेगळ्या भाषांतील वाचकांपर्यंत जात आहे. अगदी तरुण- शाळा कॉलेज मध्ये जाणाऱ्या मराठी वाचकांपर्यंत ते जात आहे. आजकाल मला असेही वाचक भेटतात जे त्यातील कथा आपल्या मुलाबाळांना, कुटूंबियांना वाचून दाखवतात. महत्वाचे म्हणजे, निवडक गोष्टी वाचून मराठीत अजून काय लिहिले जातेय याबद्दलची उत्सुकता ते दाखवतात. अनुवादाद्वारे भाषा आणि साहित्याचा संस्कृतीशी जो अनेक स्तरीय संवाद घडतो तो मला महत्वाचा वाटतो. या पुस्तकाच्या संपादनाच्या प्रक्रियेत लहानपणापासून मी वाचत असलेल्या कथांकडे मला नव्याने पाहता आले. तसेच, नव्याने लिहिल्या जाणाऱ्या कथांची ओळख झाली. महत्वाचे म्हणजे, कथेच्या अनुवादकांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली. विशेषकरून, शांता गोखलेंच्या अनुवाद प्रक्रियेबद्दल समजून घेता आले आणि त्यातून मला स्वतःला शिकता आलं. असं जाणवलं की वेगवेगळ्या लेखन प्रक्रियांना वेगवेगळे काढता येणे अवघड असते. त्या एकमेकांना पूरक असतात, हातात हात घालून चालत असतात. कधी कधी असे होत असते की आपण जे काही स्वतंत्रपणे सर्जनशील लेखन करत असतो ते स्वतःलाच आवडत नसते किंवा कधी आपला अभ्यास कमी पडतोय असे जाणवत असते तेंव्हा अनुवाद-प्रक्रिया आणि अनुवादित साहित्य बरंच काही शिकवून जात असते.
तुमच्या मते, आजच्या समाजात, अनुवादकाची भूमिका काय आहे? अनुवादाद्वारे सामाजिक घडामोडींवर प्रभाव पाडण्याची ताकद अनुवादकाकडे आहे का?

लेखक - अनुवादक म्हणून आपण स्वतःची ओळख शोधत असतो. स्वतःच्या ओळखीसाठी घेतलेला शोध त्यामध्ये असतो. स्वतःच्या भाषेचा शोध. स्वतःच्या भाषेच्या माध्यमातून घेतलेला शोध. अनुवादाच्या माध्यमातून आपण स्व-त्वाचा विस्तार करत असतो. त्याचबरोबर दोन भाषांद्वारे संस्कृतींचाही विस्तार होत असतो. समृद्ध आणि व्यापक अशा संस्कृतीत आपण भर घालत असतो. दिलीप चित्रें, शांता गोखले, माया पंडित, जेरी पिंटो, निशिकांत ठकार, चंद्रकांत पाटील, बळवंत जेऊरकर, सचिन केतकर, प्रफुल्ल शिलेदार, गणेश विसपुते अशा साहित्यिकांनी जे जे काही साहित्य अनुवादित केले आहे त्याने साहित्यात मोलाची भर पडत आली आहे. आणि वेगवेगळ्या भाषांतील साहित्याची व्याप्ती वाढत आली आहे. मराठी पुरते बोलायचे तर, एखाद्या भाषेतील साहित्य-कृती मराठीत आणली जाते त्यावेळेस इथे आपण काही बदलाच्या शक्यता निर्माण करत होत असतात. मराठी वाचक म्हणून मला बरंच शिकण्यासारखं असतं. शिवाय, नवा वाचक वर्गही तयार होत असतो.


विरोध किंवा विद्रोहाचे एक साधन म्हणून भाषा वापरली जाऊ शकते असं तुम्हाला वाटतं का?

एक तर, भाषा मला फक्त साधन वाटत नाही. त्यात एक कथन विश्व, सौंदर्य तत्त्वही असतं. अनुवाद अशी गुंतागुंतीची प्रक्रिया असते जी अनुवादकाबरोबर सुरु होते. अनुवादकाचे हेतू आणि वाचकांचे हेतू वेगवेगळे असू शकतात. मी अलीकडे शिल्पा गुप्ता या दृश्य-माध्यमातील कलाकाराची ‘फॉर इन युअर टंग, आय कॅनॉट फिट : एन्काउंटर्स विथ प्रीझन’ हे शिल्पा गुप्ता आणि सलील त्रिपाठी यांनी सह-संपादित केलेल्या पुस्तकात प्रकाशित झालेली मुलाखत ‘हाकारा’साठी मराठीत अनुवादित केली तेंव्हा मला वाटले की कवी-कलाकारांचे आवाज दडपले जातात त्याबद्दलची चर्चा मराठी वाचणाऱ्या माझ्या मित्र-मैत्रिणीत व्हावी. मुलाखत वाचून उत्सुकतेपोटी ‘फॉर इन युवर टंग’ हे पुस्तक मराठी वाचक पाहतील. त्यात ‘विद्रोह’ असेलच असे नाही. पण समाजाला, व्यक्तीला प्रश्न विचारण्याची, अस्वस्थ करण्याची ताकद असते. असे अनुवाद मला महत्वाचे वाटतात. शिल्पा गुप्तांचे कलाकार असणे यामध्ये त्यांच्या भाषेबरोबर संस्कृती आणि कलाविषयक विविध घटक असतात. त्याद्वारे, प्रत्येक जण आपापला मार्ग शोधात असतो. आपण अनुवादासाठी एखादी संहिता निवडतो ती निवडच आपली ‘भूमिका’ असते. मग ती भूमिका त्या परीने ‘विरोधा’ची असू शकते. अजून एक उदाहरण म्हणजे माया पंडितांनी केलेला कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीचा अनुवाद. विकासाच्या भ्रामक कल्पना आणि राजकारणातून जंगलातून राहणाऱ्या आदिवासी आणि स्थानिकांचे होणाऱ्या विस्थापनाबद्दलचे भेदक असे कथन ‘रिंगाण’ मांडते. वेगवेगळ्या चळवळीशी सक्रियतेने निगडित माया पंडितांचा अनुवाद म्हणजे, स्थानिकाला गिळंकृत करणाऱ्या व्यापक आणि गुंतागुंतीच्या व्यवस्थेत अनुवादाद्वारे केलेला हस्तक्षेप आहे आणि तो आजच्या अस्वस्थतेच्या काळात महत्वाचा ठरतो. जंगलाशी, पशु-पक्षांशी, झाडा-फुलांशी आणि मातीशी जोडल्या गेलेल्या व्यक्ती, समाज आणि संस्कृतीचा आवाज अनुवाद-कृतीतून ऐकू येऊ शकतो हे यातून दिसून येते. असे आवाज, अनुवाद वाचणाऱ्या मराठी शिवायच्या समाजापर्यंत पोहोचले तर नव्या विचारांची मालिका तयार होण्याच्या शक्यता निर्माण होऊ शकतात.


तुमच्या मते अनुवादित लेखन हे ‘चांगले’ कधी ठरते? तुमच्या मते, अशा अनुवादाचा मुख्य उद्देश काय आहे?

अनुवाद चांगला वा वाईट असे म्हणण्याऐवजी सौंदर्यानुभव आणि रिलेट करण्याच्या अनुभवाच्या आधारे मी त्याकडे पाहू इच्छितो. हा अनुभव, आशय किंवा रूप किंवा इतर कोणत्याही घटकांविषयी असू शकेल. अनुवाद हा संहितेतील सौंदर्य घटकांचा आणि कलेचाही असतो. उत्तम साहित्यिक कलाकृती हेतुपुरस्सर अप्रत्यक्ष असते. त्यातला अप्रत्यक्ष पणा अनुवादातून झिरपत असतो. झिरपणे वेगवेगळ्या क्षेत्रात, कलाप्रकारात आणि सामाजिक रूपात पसरलेले असते. बऱ्याच वेळा, या सर्वांच्या सीमारेषा दाखवताही येणार नाहीत. साहित्य कलाकृती ज्या-ज्या क्षेत्रात पोहोचत असते त्या सर्व क्षेत्रांचा अनुवाद होईलच असे नाही. पण, मग जास्तीतजास्त क्षेत्रांचा - भाषेच्या आणि सौंदर्य तत्वाच्या अंगाने अनुवाद करण्याचे काम उत्तम अनुवादक करत असतो. स्रोत भाषेतील अनेकार्थता आणि संदिग्धता समजून घेऊन अप्रत्यक्ष संवादाच्या शक्यता लक्ष भाषेत संक्रमित होत असतात. यातून वेगळा वाचक त्या साहित्यकृतीशी आपले नाते निर्माण करू शकतो, चर्चा करू शकतो, खंडन मंडन करू शकतो. मूळ कृतीतील एकच एक अनुभव वा अभिव्यक्ती संक्रमित करण्याऐवजी त्यातील विविध महत्वाची क्षेत्रे तो अनुवादित करत असतो. ही क्षेत्रे अर्थातच मूळ साहित्यकृतीतून आकार घेत असतात. काही असले तरी मूळ संहितेतील भाषा आणि अभिव्यक्तीबरोबर अनुवादक स्वतःला सोडत असतो. तिथे स्वतःला तो सरेंडर करत आपल्या स्वतःच्या निर्मितीक्षम प्रक्रियेतून संहितेच्या गाभ्यातले वाचकांपर्यंत आणत असतो. उदयन वाजपेयींच्या काही कवितांचा प्रफुल्ल शिलेदार यांनी ‘हाकारा’साठी अनुवाद केला होता, उदयन वाजपेयींच्या कविता मराठीत अनुवादित केल्या आहेत. असं वाटतं की शिलेदार वाजपेयींच्या कवितेबरोबर, त्यातील शब्दांबरोबर जसे स्वतःला जाऊ देतात तसा त्यांचा मराठी अनुवाद येतो. त्यांना कवितेतली लय, तालही ऐकू येत असावं असं वाटतं. अशावेळी, पूर्णविराम आणि अर्धविरामही सोबतीला असतात. त्यांचेही अनुवाद होत जातात. अशावेळी आपल्याला वाटते की अनुवाद ‘चांगला’ झाला आहे.


अनुवादाच्या आणि अनुवाद संपदनाच्या प्रक्रियेमध्ये मूळ लेखकाचा काही सहभाग असतो का? तुम्ही मूळ लेखकांशी संवाद साधता का? त्यांचे दृष्टीकोन आणि मते यांचा तुमच्या प्रक्रियेवर प्रभाव पडतो का?

अनुवाद ही स्वतंत्र प्रक्रिया असते. मूळ भाषेतील काही न समजलेल्या बाबी आणि लेखक उपलब्ध असेल तर ते शक्य असते. मला वाटते ते अनुवादक स्वतःचे अर्थनिर्णयन करायला समर्थ असतो.


तुमच्या दृष्टीने अधिक महत्व कशाला आहे - मूळ लेखनाशी जास्तीत जास्त साधर्म्य ठेवणे का अनुवादित लेखनाला स्वतंत्र कलाकृती समजून अभिनव लेखनाचा दर्जा देणे?

एक तर अनुवाद हा मूळ लेखनाच्या पायावर उभारलेली नव्या अभिव्यक्तीची निर्मिती असते. नवी म्हणजे मूळ रूपाशी वा आशयाशी प्रतारणा इतकं ते सरधोपट नसतं. मूळ भाषेचे ज्ञान असणे जितके महत्वाचे असते तितकेच महत्वाचे असते मूळ भाषेतील संस्कृतीचे ज्ञान असणे. त्या अर्थाने, अनुवादक द्वैभाषीक आणि द्वैसांस्कृतिक असावा लागतो. उत्तम अनुवादक मूळ भाषेच्या तळाशी जाऊन विविध आशय आणि रूपांचा ठाव घेणारा असतो तसेच मूळ संहितेतील संस्कृतीचे खोलवर जाऊन आकलन करून घेणारा असतो. याचा अर्थ असा नाही की अनुवादक अकॅडेमिक भाषेतील संशोधक असावा. उदाहरणार्थ, भक्ती परंपरेतील काव्याचे/अभंगांचे भाषांतर करताना साहित्याचे ऐतिहासिक परिप्रेक्षातील आकलन महत्वाचे असते. प्रामाणिक राहतानाच त्यातले सर्जन तत्व लक्ष भाषेत येताना ती स्वतंत्र कलाकृती म्हणून वाचण्याच्या शक्यता असतात.


सध्या, ग्लोबल साऊथ (दक्षिण गोलार्धातील देश) मधून आलेले अनेक लेखक आपल्या इंग्रजी लेखनात त्यांची मातृभाषा कुठलेही स्पष्टीकरण, अनुवाद अथवा इटालिसायझेशन न देता समाविष्ट करून स्वत:ची द्विभाषिक ओळख प्रस्थापित करत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर एखाद्या द्विभाषिक साहित्यकृतीच्या अनुवादाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता?

अनुवादामध्ये भाषा कशा तऱ्हेने आणायची ते तो अनुवादक ठरवेल. आंतराराष्ट्रीय स्तरावर अनुवाद आणि अनुवादकांना जी ओळख प्राप्त होत आहे ते महत्वाचे आहे. त्यात, एखाद्या भाषेला स्वतंत्र ओळख मिळणे ही महत्वाची घडामोड. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या भाषांकडे बघण्यात वाढ होत आहे ते आनंद देणारे आहे. त्यामध्ये, त्या त्या भाषेची आपली एक ओळख आहे जी विशिष्ट शब्दांतून आणि अभिव्यक्तींतून येत असते. त्यांचा समावेश लक्ष भाषेत व्हायला हवा. अर्थात, हे होण्यासाठी त्या भाषेत ते शब्द रुळले पाहिजेत. यासाठी, जास्तीत-जास्त अनुवाद होणे महत्वाचे ठरते. हे झाले इंग्रजी आणि इतर भाषांतील नात्यांमध्ये. अर्थातच, काहीच भाषा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतायत कारण त्या भाषांत उपलब्ध असणारे अनुवादक. इंग्रजी भाषेचे अनुवादाची भाषा म्हणून जे महत्व आहे ते वाढत आहे. पण, त्याशिवायच्या दोन भाषांमध्ये जे अनुवाद व्हायला हवेत त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. द्विभाषिक ओळखीच्या प्रक्रियेत इंग्रजीशिवायच्या दोन भारतीय भाषांमधील नाते कसे असेल याचा वेगळा विचार आपल्याला करता येईल.


बिलोरी जर्नल हे संशोधन निबंधांचे मराठी आणि इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचा प्रयत्न करते. संशोधनपर लेखनाचे भाषांतर करण्याबद्दल तुम्ही कोणत्या टिपा देऊ शकता?

संशोधनासाठी केलेल्या लेखनाचा अनुवाद करण्याची परंपरा आहे. एखाद्या भाषेत चिंतन-मननासाठी मान्यता पावलेला तसेच आजूबाजूला प्रचलित असलेल्या डिस्कोर्स दुसऱ्या, वेगळ्या भाषेत जाण्याने त्या भाषेत नवीन विचाराची पेरणी आणि मांडणी होऊ शकते. तसेच, तिथे प्रचलित असलेल्या विचारांनाही बळकटी मिळू शकते. अर्थात, अशा अनुवादाचे स्वरूप बहुतांश अकॅडेमिक असते. अशावेळी, बिलोरी जर्नल, हाकारा किंवा खेळ , माय मावशी आणि इतर नियतकालिकातून प्रकाशित होणाऱ्या अशा अनुवादित साहित्यातून त्या-त्या डिस्कोर्स मधील शब्दसंपदा आणि तो डिस्कोर्स वेगळ्या सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीत रुळायला मदत होऊ शकते.नाटक आणि सादरीकरण (performance) याबद्दलही तुम्ही लेखन केले आहे. अनुवादात ‘performance’ला स्थान आहे का? या दोघांमध्ये कशा प्रकारचं नातं आहे?

नाटकांचे अनुवाद करताना अनुवादक नाटक-कर्ता ही असतो, असू शकतो. काही जण नाटकाचा अनुवाद करतात आणि इतर कुणीतरी ते नाटक बसवते. बऱ्याच वेळा, सादरीकरणाच्या गरजेतून नाटक अनुवादित केले जाते. नाटकात काम करणाऱ्या संचाबरोबर अनुवादाबद्दल चर्चा होते, तालीमही होते आणि ते नाटक उभे राहते. दोन्ही परिस्थितीत, अनुवादकाला त्याच्या मूळ लेखकाप्रमाणे ती मूळ संहिता ‘दिसते’. अनुवादित नाटक सादर करायचे का नाही या निर्णया आधी त्या संहितेतील नाट्यात्मकता अपील होत असते. त्या अनुवादाचा प्रयोग होत असेल तर अनुवादक नाट्यदिग्दर्शक आणि त्याच्या चमूबरोबर संगत-सोबत करतो आणि एका सर्जनशील आणि व्यावहारिक प्रक्रियेतून तो अनुवाद करण्याच्या प्रक्रियेत सामील होऊ शकतो. मग अनुवादित संहितेतील भाषेचे उच्चरण, शब्दांचे आवाज, लहेजा वैगेरे बाबी समोर ठेऊन, मूळ संहितेशी नाते ठेवत अनुवाद पूर्ण होतो. इथे अनुवादकाला मूळ संहितेतील शब्दांचे आवाज कसे ऐकू येतात, दोन किंवा अधिक संवादातील रंगसूचनांची नाट्यमयता वगेरे, समजून घेत संहिता वेगळ्या भाषेत आणावी लागते. यातून, मूळ भाषेकडे तसेच स्वतःच्या भाषेकडे नाट्यमयतेतून पाहायला मिळते.

 

डॉ आशुतोष पोतदार थिएटर आणि परफॉर्मन्स स्टडीज विभागात साहित्य आणि नाटकाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. इंग्रजी आणि मराठीतील त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्याने निर्वसाहतवादी नाटक, कथा सिद्धांत आणि नाटक अभ्यास आणि गेल्या काही वर्षांत, संग्रहण आणि कार्यप्रदर्शन यांच्यातील संबंधांचा शोध लावला आहे. डॉ पोतदार हे अनेक एकांकिका आणि नाटके, कविता, लघुकथा आणि अनुवादांचे पुरस्कार विजेते मराठी लेखक आहेत. त्यांनी आतापर्यंत सांगितलेल्या ग्रेटेस्ट मराठी स्टोरीजचा एक खंड संपादित केला आहे.Comments


bottom of page