top of page
  • bilorijournal

आपलं विश्वभान वाढवायला भाषांतरं आवश्यकच असतातः गणेश विसपुते

गणेश विसपुते

मुलाखतः बिलोरी टीम



Book cover of the Marathi translation of 'My Name is Red' by Orhan Pamuk


तुमचा भाषांतराकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि अनुवाद करण्याची पद्धत याबद्दल सांगू शकाल का?


भाषा आणि तिच्या समाजाची संस्कृती या गोष्टी अभिन्न असतात. भाषांतरांचे परिणाम अनेक पातळ्यांवर असतात. वेगवेगळ्या भाषांमधील साहित्य जेव्हा एखाद्या भाषेत येतं, तेव्हा निव्वळ स्रोतभाषेतील साहित्याचा परिचय होत नाही तर, समांतर प्रतिमा, प्रतीकं, रूपबंध, उसनवारी अशा गोष्टीही लक्ष्य भाषेतल्या वाचकाशी जोडल्या जातात. आपल्याकडे ज्याला भाषांतरयुग म्हटलं जातं त्या काळात, म्हणजेच १९व्या शतकाच्या अखेरीला आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, अनेक भाषांमधून- प्रामुख्यानं इंग्रजीतून मराठीत बरंचसं साहित्य आलं. त्यातली बहुतेक रूपांतरंच म्हणावीत अशी होती. परंतु यामुळे मराठीला सुनीत, गझल, हायकू यांसारखे काव्यप्रकार समजले. निबंध, प्रवासवर्णन, कथा, नाटक आणि कादंबऱ्यांच्या भाषांतरांमधून साहित्याचे नवेच रूपबंध कळले आणि त्यातले बरेचसे मराठीचे म्हणून पुढे रुजले. आपल्याकडेही साने गुरुजी, दुर्गा भागवतांपासून दिलीप चित्रे, विंदा करंदीकरांपर्यंत अनेक ज्येष्ठ लेखकांनी जाणिवपूर्वक भाषांतरं केलेली आहेत. दुसरीकडे अरुण कोलटकरसारख्या कवीचा परिचय त्यांच्या इंग्रजी भाषांतरांमुळे पश्चिमेतल्या लोकांना होऊ शकला. एक किस्सा सांगतो. शहाजहांनचा मुलगा दारा शुकोहनं ५२ उपनिषदांचं भाषांतर -‘सिरीं-ए-अकबर’ (महान गूढ) या नावानं फारसी भाषेत केलं होतं. तो स्वतः संस्कृतचा चांगला जाणकार होता. हे भाषांतर आँकतिल द्युपेराँ नावाच्या एका फ्रेंच प्रवाशाच्या हातात पडलं. १८०१ साली त्यानं त्याचं त्याला जमेल तसं पुन्हा फ्रेंचमध्ये भाषांतर केलं आणि नऊ वर्षांनी ते शोपेनहावरच्या पाहाण्यात आलं तेव्हा तो आनंदानं वेडा झाला. अशा रीतीनं भारतीय साहित्याचा परिचय जगाला व्हायला सुरुवात झाली.


थोडक्यात आपल्या मातृभाषेशिवाय आपल्याला फार कमी भाषा ज्ञात असतात, पण भाषांतरांमुळे विविध भौगोलिक अवकाशातल्या, वेगवेगळ्या काळातल्या आणि समकालीन अशा संस्कृतींचा परिचय भाषांतरांमधून शक्य होतो. माणूस म्हणून आपलं विश्वभान वाढवायला भाषांतरं आवश्यकच असतात. भाषांतराचा उद्देशच एका भाषेतून दुसऱ्या भाषेत विचारांतली मूल्यं आणि सौंदर्यात्मक मूल्यं वाहून नेणं हा असतो.


आता जी मी भाषांतरं करतो त्याबद्दल थोडं सांगतो. अर्थात मी सलगपणे सतत फक्त भाषांतरंच करतो असं नाही. मी मुळात कवी असलो आणि गद्यही लिहित असलो तरी त्याही आधी मी वाचक आहे. भारतीय भाषांमधलं आणि जागतिक साहित्यातलं निवडक आणि चांगलं साहित्य मिळवून मी वाचण्याचा प्रयत्न करीत असतो. अर्थात, यात मला माझ्याहीपेक्षा जास्त वाचणारे चौकस मित्र आहेत, ते पुस्तकं सुचवत असतात. वाचता-वाचतासुद्धा तुम्हाला त्यातूनच नव्या वाटा, आणि निखिलेश चित्रे म्हणतो तसं, पुस्तकांच्या आडवाटाही दिसत जातात. या वाचनातून थोडंफार आकलन होतं. पहिल्यांदा आपल्याला वाचक म्हणून ती संहिता आवडलेली पाहिजे. दुसरं म्हणजे, हे जे भाषांतर आपण करत आहोत त्यानं आपल्या भाषेला काही उपयोग होणार आहे का, त्यात काही वाढ होईल अशी तत्त्वं आहेत का हाही विचार असतो. मुळात मी मला आवडलेल्या पुस्तकांची अगर संहितांचीच भाषांतरं करतो. व्यावसायिकरित्या कमिशन केली जातात, तशी कामं मी घेतलेली नाहीत. त्यामुळे भाषांतराचा निर्णय हा माझा असतो. एकदा का निर्णय झाला की मग ते पुस्तक पुन्हा पुन्हा वाचतो, ते कोणत्या भाषेतलं आहे, कोणत्या काळातलं, कोणत्या संदर्भातलं आहे हे पाहून त्याप्रमाणे संदर्भपुस्तकं, वेगवेगळे कोशही आसपास ठेवलेले असतात. एखादं पुस्तक नीट समजून घ्यायचं असेल तर त्याचं भाषांतर करायला पाहिजे असं म्हटलं जातं. त्याचं कारण हे आहे, की मग तुम्हाला त्या लेखकाशी, त्यानं लिहिलेल्या भाषेशी, संवेदनशीलतेशी एकरूप होण्याची गरज असते. त्यानं लिहिलेल्या संहितेत बौद्धिक आणि भावनिक गुंतवणूक आणि त्याचबरोबर समांतरपणे आपल्या भाषेतली त्याच ताकतीची संहिता धूसरपणे मनात निर्माण करीत जाणं हा पहिला टप्पा असतो. ज्या भाषेतून भाषांतर केलं जाणार आहे त्या भाषेतल्या संस्कृतीचं भान, तिथले सांस्कृतिक संदर्भ आणि संकेत (त्या भाषेची व्याकरणव्यवस्था समजून घेऊन) भाषांतरकाराला आपल्या भाषेच्या आणि संस्कृतीच्या संदर्भात पुनर्रचित करायचे असतात. भाषांतर हे त्यामुळे सांस्कृतिक-राजकीय-सामाजिक अशा अनेक पातळ्या असलेलं गंभीर काम असतं. त्याचबरोबर भाषांतरात प्रामाणिकता आणि वाचनीयता या दोन गोष्टी राखणंही नितांत गरजेचं असतं. प्रामाणिकता म्हणजे मूळ संहितेच्या कक्षेबाहेर न जाण्याची आटोकाट काळजी घेणं. केवळ चूष म्हणून किंवा सौंदर्यासाठी पदरची भर न घालणं. पण वाचनीयतेची कसोटी इतकीही लांबवू नये की ते भाषांतरच न वाटता लक्ष्य भाषेतली स्वतंत्र कृतीच वाटावी. ते भाषांतर आहे हेसुद्धा वाचकाला सतत वाटत राहिले पाहिजे याची काळजी घेणं ही भाषांतरकाराची खरी कसोटी असते. मला काही वेळा वाचक सांगतात, तुम्ही भाषांतरित केलेली कादंबरी इतकी सहज आणि वाचनीय आहे की मराठीच वाटते, तेव्हा मी संकोचून जातो. आणि 'धन्यवाद' म्हणतो.


आता प्रक्रियेचं उदाहरण म्हणून मी 'माय नेम इज रेड' या कादंबरीच्या भाषांतराबाबत थोडं विस्तारानं सांगतो. मी भाषांतराचे किमान तीन खर्डे करतोच. ‘माय नेम इज रेड’ ही कादंबरी मला आवडली याचं कारण म्हणजे मला व्यक्तिशः लघुचित्रकलेच्या इतिहासात, मध्ययुगीन युरोपाच्या-आशियाच्या इतिहासात रस आहे. तो इतिहास भूगोलासह समजून घेणं, भाषा-संस्कृती परस्परांत कशा झिरपत गेल्या हे पाहाणं मला रोचक वाटत आलं आहे. त्यात पामुकनं या कादंबरीसाठी निवडलेली शैली अरेबिन नाईट्ससारख्या गोष्टीतून गोष्ट उकलणाऱ्या शैलीसारखी होती. दुसरं म्हणजे यातलं वातावरण मला कुठेतरी परिचित वाटत होतं. प्रत्यक्षात जेव्हा भाषांतर करायला घेतलं तेव्हा पुन्हा ती वाचताना मात्र भाषांतराआधी आपल्याला बरीच पूर्वतयारी करावी लागणार हे लक्षात आलं. ही सगळी तयारी स्वतःसाठीच करायची होती.


सुरुवातीला भारतीय आणि फारसी लघुचित्रकलेच्या इतिहासाविषयीचं एक लहानसं पुस्तक मिळवून वाचलं. फारसी कलापरंपरा, त्यातले चित्रकार, फारसी चित्रकलेवर मंगोल शैलीचा त्या काळात पडलेला प्रभाव यावरची पुस्तकं मिळवली. गुलाम मोहंमद शेख या ज्येष्ठ चित्रकारानं लिहिलेलं भारतीय लघुचित्रशैलीच्या इतिहासाबद्दलचं लेखन वाचायला मिळालं. सगळ्यात मोठी आणि मोलाची मदत म्हणजे माझा फारसी मित्र अली रेझा मोरादी यानं मला फारसी लघुचित्रशैलीतल्या चित्रांचे सुंदर कॅटलॉग्ज दिले, त्यांची माहिती दिली. 'रेड'मध्ये निझामी, फिरदौसी, इब्न क़य्यीम-अल-झेव्विय अशा तत्कालीन अनेक मोठ्या कवींचे-लेखकांचे उल्लेख त्यांच्या पुस्तकांच्या नावांसह येतात. अली रेझा मोरादीकडून अनेक संदर्भांची उकल करवून घेता आली. त्यानं फारसीतील महान कवी हाफिझच्या कवितांचा जाडजूड संग्रह दिला. या सगळ्या संदर्भांपलीकडे जाऊन इस्तान्बूल या समृद्ध शहराचं अंतरंग जाणून घेण्यासाठी इस्तान्बूलविषयीच्या सचित्र माहितीपुस्तकाबरोबरच पामुकच्या ‘इस्तान्बूलः मेमरीज़ अँड द सिटी’ अशा पुस्तकांमुळे काळ, अवकाश आणि भूगोल या मितींनी ‘माय नेम इज रेड’ अधिक समजायला मदत होत होती.


भाषांतरादरम्यान विरंगुळा म्हणून वाचनासाठी जी पुस्तकं मी आसपास ठेवली होती ती बाबरनामा, अकबराची पत्रं, यु. म. पठाणांचं ‘मराठी बखरीतील फारसीचे स्वरुप’, अल्-बेरुनीचा भारत, तुर्कस्तानबद्दलचं भौगोलिक सांस्कृतिक इतिहास सांगणारं एखादं पुस्तक, तैमूरलंगाची माहिती असं वाचन असं करत होतो. पामुकच्या मूळ पुस्तकातले संदर्भ कुराणच्या मराठी प्रतीत शोधता-शोधता कुराण वाचून झालं.


भाषांतराच्या दरम्यान आणखीही अडचणी होत्या, एकतर सोळाव्या शतकातल्या कथानकाचा संदर्भ होता, त्यामुळे इंग्रजी भाषांतरात जरी ‘बॉटल’ असं लिहिलेलं असलं तरी मराठीत त्याचं बाटली असं भाषांतर करता येणार नव्हतं. मराठीत काही शब्दांना प्रतिशब्दच नसण्याची स्वाभाविक अडचण होती. मराठीत चांगल्या शब्दार्थकोशांचा आणि चांगल्या पर्यायकोशांचाही तुटवडा आहे. खाद्यपदार्थ, पेहराव वगैरे शब्दांच्या बाबतीत काही एक तडजोड करता येते पण चित्रकलाविधेतील विशिष्ट शाखांमधील कलावंतांसाठी मराठीत प्रतिशब्द सापडणं कठीण जातं आपल्याकडे चित्रकार असा एक शब्द आहे. तोच आपण पेंटर, आर्टिस्ट, इल्युमिनेटर, गिल्डर, इलस्ट्रेटर, मिनिएचरिस्ट अशासारख्या अनेक इंग्रजी शब्दांसाठी वापरतो. पण भाषांतरात नेमकेपणालाही महत्व असतं. त्यामुळे भाषेत आधीच आहेत असे वाटणारे नवे शब्द या पुस्तकापुरते का होईना चलनात आणायचं ठरवलं. त्यामुळे गिल्डर म्हणजे सुवर्णवर्खानं चित्र काढणारा तो वर्खचित्रकार, इल्युमिनेटर म्हणजे नक्षीचित्रकार, मिनिएचरीस्टसाठी लघुचित्रकार, बाईंडरसाठी ग्रंथबांधणीकार, इलस्ट्रेटरसाठी रेखाचित्रकार अशी योजना करावी लागली. हे काही नवे शब्द घडवणं नव्हतं, तर उपलब्ध असलेल्या शब्दांमधून भाषांतर करण्याची कोशीस होती. कधी कधी आपलं कौशल्य दाखवायचीही संधी येते. ती जपून वापरता आली पाहिजे. उदा. ‘हिज इंटलेक्ट वॉज हिज वेल्थ’ अशा वाक्याचा मी ‘त्याची बुद्धी हीच त्याची मत्ता होती’ असा करून स्वतःपुरती गंमत केली होती. काही ठिकाणी मी अडलो की मग दोन-तीन दिवस थांबत असे. विष्णू खरे, अली रेझा मोरादी, भारतभूषण तिवारी या स्नेह्यांना वेळी-अवेळी फोन करून मी एकप्रकारे छळत होतो.

कविता आणि गद्य यांच्या अनुवादाची प्रक्रिया कशी भिन्न ठरते? हिंदी / उर्दू / इंग्रजी यांसारख्या वेगवेगळ्या भाषांमधून अनुवाद करताना तुम्ही वेगळ्या पद्धती आणि प्रक्रिया वापरता का? जर हो, तर कोणत्या घटकांमुळे त्या वेगळ्या ठरतात? या पद्धतींमधील फरक का महत्वाचे आहेत? भाषांतर/अनुवाद करताना भाषांतरकाराच्या भावना/ मत त्या लिखाणात झिरपू न देण्यासाठी काय करावे?


भाषांतराच्या प्रक्रियेपेक्षाही इथं कोणत्या साहित्यप्रकाराचं तुम्ही भाषांतर करत आहात हे महत्त्वाचं असतं. कविता हा साहित्यप्रकार इतर कोणत्याही साहित्यप्रकारांपेक्षा व्यक्तिविशिष्ट आणि आत्मनिष्ठ आहे. कवीच्या विशिष्ट संवेदनशील व्यक्तित्वातून तो जी भाषा वापरतो, त्यातून कवितेचं रूप घडत असतं. भाषेच्या प्रचलित अर्थाशी ती सहसा विद्रोह करू पाहात असते. त्यामुळे भाषा हे कवितेचं साधन असलं तरी ती बाधाही असते. त्यामुळे कवीला भाषा ही कायम अपुरी वाटते. प्रमाणभाषेच्या कसोट्या वापरल्या तर अनेकदा कवितेतल्या ओळींचे अर्थ हरवून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे आत्यंतिक संवेदनशीलतेनं कवितेच्या भाषेला समजून घेणं आवश्यक असतं. विशेषतः भाषांतर करतांना ही काळजी घ्यावी लागते. प्रमाण भाषेतील संकेत आणि कवितेच्या भाषेतील संकेत यातली दरी जेवढी कमी तेवढी ती कविता भाषांतराला सोपी जाते. सगळ्याच कवितांबाबत अर्थात हाच एक नियम लावता येत नाही. काही कवितांची सरळ सुलभ भाषांतरंही प्रभावी ठरतात ती मुळातल्या कवितेच्या तशा रूपांमुळे. दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांनी तुकारामाच्या, ज्ञानेश्वरांच्या आणि अरुण कोलटकरांनी जनाबाईंचं काव्य इंग्रजीत भाषांतरित केलेलं आहे. स्वतंत्र कविता म्हणून ते नेमका अर्थ पोहचवणारं आहे. पण मराठीतली लय आणि सौंदर्य इंग्रजी वाचकांना कसं कळणार? या मर्यादा राहतात. विंदा करंदीकरांनी शेक्सपिअरचं किंग लिअर हे नाटक भाषांतरित करतांना त्यातल्या काव्याचा सखोल विचार केला होता. आधुनिक आणि समकालीन भारतीय आणि जागतिक कवितेच्या दर नव्या भाषांतरांसाठी प्रत्येक भाषांतरकाराला आपले स्वतंत्र पेच असतात आणि त्याप्रमाणे व्यूह रचावे लागतात.


प्रमाण भाषेतील संकेत आणि कथात्मक साहित्यातल्या भाषेतील संकेत यांच्यात त्यामानानं अंतर कमी असतं. हे एक आव्हान सोडलं तरी इतर आव्हानं असतातच. कारण प्रत्येक भाषेतील व्याकरण व्यवस्था वेगळी असते. त्यामुळे भाषांतर करताना दोन्ही भाषेतील व्याकरण आणि चिन्हव्यवस्था याचं भान नीट असलं पाहिजे. इंग्रजीतील वाक्यरचना, संयुक्त वाक्यं, उपवाक्यं आणि बोधाच्या पातळीवर स्रोतभाषेत त्याचं आकलन यांचा क्रम नीट लागला नाही तर गोंधळ होऊ शकतो. अर्थाचे अनर्थ होण्याचा धोका असतो. तुर्की भाषेत विरामचिन्हांशिवायची मोठाली वाक्यं असतात. ती पान-पान, दोन-दोन पानभर चालतात असं पामुकची भाषांतरकर्ती मॉरीन फ्रीली हिनं लिहून ठेवलेलं आहे. विरामचिन्हंच नाहीत, तिथं मग वाचून त्याप्रमाणे अर्थनिर्णयन करण्याची जबाबदारी भाषांतर करणाऱ्यावर येते. लक्ष्य भाषेच्या व्याकरणव्यवस्थेनुसार मग त्याची लहान लहान वाक्यं आणि विरामचिन्हं घालून (ती शैली म्हणून वापरली नसल्यास) अर्थविस्तार करता येतो.

थोड्याफार फरकानं हेच हिंदी भाषेबद्दल किंवा उर्दूबद्दल म्हणता येईल. शिवाय यात अधिकचं आव्हान म्हणजे वरवर साम्य वाटेलसे वाक्प्रचार किंवा म्हणी असतात, पण त्या त्या भाषेतील त्यांचा उपयोग आणि चलन हे वेगळं असू शकतं. ती काळजीही कसोशीनं घ्यावी लागते.

एखाद्या पुस्तकाचं भाषांतर करतांना स्वाभाविकच भाषांतरकर्ता त्याच्याशी एकरूप होत गेलेला असतो. आपल्या भाषेत ती संहिता नव्यानं लिहिताना ते जणू पुनर्सर्जन आहे असंही वाटतं. ते एका अर्थानं खरं असलं आणि भाषांतरित संहिता लक्ष्य भाषेतली वाटावी इतकी अतिशय वाचनीय झालेली असली तरी, प्रामाणिक भाषांतराची एक कसोटी हीसुद्धा असते की पदरचं काहीही न घालता भाषांतरकर्त्यानं आपल्याबाजूनं संहितेला अधिक खुलवण्यासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी भर घालू नये. एकरूप राहूनही तटस्थ राहाण्याची ही कसरत करावी लागतेच. वाचकाला त्याच्या भाषेत भाषांतरित संहिता वाचतांना ती वाचनीय वाटावीच, पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचकाला वाचतांना हे भान सतत असलं पाहिजे की तो एक भाषांतरित संहिता वाचत आहे. ही खबरदारी भाषांतरव्यवहारातल्या नैतिकतेसाठीही मला आवश्यक वाटत आलेली आहे.


स्वतः कवी आहे म्हणून असेल, पण व्यक्तिशः मला गद्यापेक्षा पद्याचं भाषांतर करायला अधिक आवडतं. कवितांची पुस्तकं-माझ्या हाताशी कायम असतात. काहीच वाचायला हाताशी नसेल तेव्हा मी वेगवेगळे कोश चाळत बसतो. एवढ्या वर्षांत तो माझा आवडता चाळा झालेला आहे.


द्विभाषिकता / बहुभाषिकता याविषयी तुमचा स्वतःचा अनुभव कसा होता? जगाकडे बघण्याच्या दृष्टीकोनावर त्याचा कसा प्रभाव पडतो? आपल्या निबंधात, तुम्ही तुमच्या बालपणातील भिन्न साहित्यिक प्रभावांचा (जसे की ओवी, शायरी इ.) उल्लेख करता. या वैविध्यपूर्ण साहित्यिक परंपरांचा लेखक आणि भाषांतरकार म्हणून तुमच्या कामावर कसा प्रभाव पडला हे सांगू शकाल का?


सुरुवातीला सांगितलं तसं महाराष्ट्रातल्या लहान गावातल्या किंवा निमशहरी भागातल्या कोणत्याही व्यक्तीच्या बालपणी हा वारसा उपलब्ध होता. त्याप्रमाणे भारूडं, कीर्तनं, मेळ्यांतली गाणी, आईच्या ओव्या, गावातले मुशायरे अशा अनेक गोष्टी सांस्कृतिक समजूत संपन्न करायला साहाय्यकारी होत्याच. मराठी साहित्याच्या हजार वर्षांच्या इतिहासातले टप्पे पाहिले तर माझ्यासारख्या वाचकाला, ज्याचा जन्म विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला आणि या गोष्टी तिथं तोवर जोमानं चालू होत्या, त्या सगळ्या साहित्यप्रकारांशी जोडून घेता येतं. अर्थात हे मी सगळं कुतुहलानं, उत्सुकतेनं आणि डोळसपणे पाहात-अनुभवत वाढत होतो. आज मी एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात जगत असलो तरी त्यामुळे मी या मागच्या हजार वर्षांच्या परंपरेशी, त्यातल्या संचिताशी जैविकरित्या जोडलेला आहे याचं भान मला असतं. ते कविता लिहितांनाही असतं. ते तुम्हाला आश्वस्त करतं, आणि संपन्नही. एकप्रकारे आपण रूटेड आहोत असं समाधान देणारं असतं.


तुमच्या मते, आजच्या समाजात भाषांतरकार/अनुवादकाची भूमिका काय आहे?


भाषांतरकाराची आजच्याच समाजात नव्हे तर कोणत्याही काळात कळीची भूमिका आहे. कारण बेबेलच्या टॉवरच्या गोष्टीतल्यासारखे आपण जगभरातल्या विविध भौगोलिक भागांत, अनेक भाषांमध्ये विखुरलेले आहोत. महाराष्ट्रात भाषांतरयुगाच्या काळात जे काम झालं ते मराठी भाषेसाठी ऐतिहासिक असंच काम आहे. प्रत्येक काळात त्याचं स्वरूप बदलेल, पण त्याचा मूळ उद्देश तोच राहणार आहे. परंतु, त्याही पलीकडे प्रत्येक भाषेच्या संस्कृतीच्या इतिहासानं ज्ञानाचं संचित निर्माण केलेलं असतं. त्यात त्या-त्या संस्कृतीतले मानवी व्यवहार व त्यांच्या जगण्याच्या वैविध्यपूर्ण रीती भाषेत प्रतिबिंबित झालेल्या असतात. त्या भाषिक संस्कृतीची ओळखच त्यातून होते. माणूस म्हणून अधिक प्रगल्भ करण्यासाठी आपल्याला आपल्या कुतुहलाचा परीघ विस्तारणं गरजेचं असतं. हे कुतुहल आपल्याला विविध भौगोलिक भागातल्या संस्कृतीतल्या भाषांतरित पुस्तकांतून शमवणं हे सुलभ होतं. आज जगभरातल्या ३००० भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असं युनेस्कोचा अहवाल सांगतो. भारतातील १९१ भाषाही याच मार्गावर आहेत. या असंख्य भाषांच्या डोळ्यांनी इतिहास आणि वर्तमानात पाहिलेलं, जगून-अनुभवून घेतलेलं मानवी जगणं समजून समृद्ध होण्याचा एक मार्ग भाषांतरातून जातो. त्यासाठीसुद्धा भाषा आणि भाषांतरविषयक उपक्रम हे आपल्या सामाजिक जगण्यात प्राथम्यक्रमावर असले पाहिजेत. साहित्य हे नेहमीच वंचितांच्या, शोषितांच्या बाजूचं आणि मानवी मूल्यांचा उदघोष करणारं असतं. तसं ते असलं पाहिजे कारण लिहिण्याची ती प्राथमिक अट आहे. जगभर आपण पाहातो की युद्धं, दडपशाही आणि अमानुष हिंसाचाराच्या घटना घडत असतात, तेव्हा त्या त्या भागातले संवेदनशील आणि सजग लेखक-कवी त्याविरुद्ध आवाज उठवत असतात. तुर्कस्तानात पत्रकर्तीला तिनं चित्र काढलं अन् कविता लिहिली म्हणून तुरुंगात टाकलं जातं, ओरहान पामुकवर त्याच्या देशाचं सरकारच खटला भरतं, अरब स्प्रिंग हा युवकांचा उठाव मध्यपूर्वेत होतो, पॅलेस्टिनींवर अनन्वित अत्याचार होतात तेव्हा त्यांचे उद्गार जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये पोहचतात आणि तेथील लोकांना मानवी प्रतिसादाच्या आधारावर समर्थन मिळतं, पाठिंबा मिळतो, 'हे असं चालणार नाही' असा दबाव वाढतो- तो कशामुळे? तर भाषांतरांतून हेही मोठ्या प्रमाणावर होत असतं. हे सगळं व्यापक भान भाषांतरकर्म नेकीनं करणाऱ्या प्रत्येकानं ठेवलं पाहिजे.


विरोध किंवा विद्रोहाचे एक साधन म्हणून भाषा कशी वापरली जाऊ शकते?


मानवी संवादाचे प्राथमिक माध्यमच भाषा हे असल्यानं अर्थातच ते विद्रोहाचं मोठं साधनही आहे. आपल्याकडे ज्ञानेश्वरांनी त्याचं मोठं उदाहरण भगवतगीतेचं भाषांतर ज्ञानेश्वरीतून करून घालून दिलेलं आहे. मराठी भाषेच्या संदर्भात ही ज्ञानेश्वरांची राजकीय कृतीच होती. एका अर्थानं त्यांनी सांस्कृतिक किंवा भाषिक वर्चस्वाशी (hegemony) लढा देण्यासाठी ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली होती.

धर्म हे शोषणाचं हत्यारही असतं. हे ख्रिश्चॅनिटीतही दिसतं. तिकडं तर बायबलच्या अनेक भाषांतरकारांचे खून झालेले आहेत. बायबलच्या भाषांतराचा इतिहास अतिशय रक्तरंजित आहे. युरोपात चर्च जेव्हा सर्वसत्ताधारी होतं त्याकाळात पोपची सत्ता भ्रष्टाचारानं आणि आपमतलबानं लडबडलेली होती. बायबल केवळ लॅटिनमध्येच उपलब्ध होतं. बायबल सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावं असं वायक्लिफ नावाच्या एक धर्मोपदेशकाचं मत होतं. तेव्हा चौदाव्या शतकात, १३९१मध्ये जेव्हा जॉन वायक्लिफनं बायबलचं इंग्रजीत भाषांतर केलं. त्यावरून पोपनं त्याच्यावर खटला केला. त्याचा छळ केला. एवढंच नाही, तर त्याचं निधन झाल्यावर चाळीसेक वर्षांनी त्याच्या थडग्यातून त्याच्या अस्थी बाहेर काढून जाळाव्यात आणि स्विफ्ट नदीत टाकून द्याव्यात असं पोप मार्टिन यानं फर्मावलं होतं. पुढेही अनेक ठिकाणी बायबलच्या भाषांतरकारांच्या हत्या होत राहिल्या. नंतर मात्र ख्रिश्चॅनिटीच्या प्रसारासाठी बायबलची स्थानिक भाषांमध्ये भाषांतरं करणं हा मिशनऱ्यांचा एक उपक्रमच बनला.


दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपात आणि इतरत्रही जे भरपूर साहित्य लिहिलं गेलं, त्यातून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळत राहिलेली आहे. आजही आपल्याला बर्टोल्ट ब्रेख्त, पाब्लो नेरुदा, मेहमूद दरवेश, नाझिम हिकमत, फैझ अहमद फैझ वगैरेंच्या कविता प्रेरक वाटतात. कारण तत्कालीन परिस्थितीला समांतर वर्तमानात तशी परिस्थिती उद्भवल्यावर हे काव्य प्रेरणा देत असतं.

विसाव्या शतकाच्या मध्याला इटली, जर्मनी, स्पेन आणि पोर्तुगालमध्ये भाषांतर हे अतिशय हुशारीने सांस्कृतिक कर्म म्हणून पार पाडलं गेलं होतं. त्याच्या धोरणांनी लोकसमूहाची वैचारिक परिवर्तनाविषयीची धारणा दिग्दर्शित केली. याविषयी एक चांगलं पुस्तकच माझ्या पाहाण्यात आलेलं आहे. तत्कालीन प्रकाशकांची आत्मचरित्रं, संस्थात्मक दाब, संहितांच्या निवडी यांचा ऐतिहासिक संदर्भात चिकित्सक अभ्यास करून 'ट्रान्सलेशन अन्डर फाशिझम' हे पुस्तक ख्रिस्टोफर रुन्ड्ल आणि केट ष्टूर्ज यांनी लिहिलेलं आहे. त्यातून दडपशाही आणि दमनशाहीच्या काळात कशाप्रकारे सांस्कृतिक देवाणघेवाण झाली याविषयीची अंतर्दृष्टी मिळते. भाषांतरविद्येच्या अभ्यासकांना आणि या काळातल्या इतिहासकारांनाही हे पुस्तक रोचक वाटू शकेल.


अलीकडे भारतात सीएएविरुद्ध मोठी आंदोलनं झाली. त्याकाळात उत्तरेत आणि पश्चिम बंगालात 'हम कागज़ नहीं दिखाएंगे' हा नारा गाजला होता. असममधल्या 'मिया पोएट्री' आंदोलनातल्या अनेकांच्या कवितांनी आपले डोळे उघडले. पॅलेस्टिनी कवींच्या कवितांची भाषांतरं मराठीत झाली. मरम अल् मसरी आणि नाजवान दरवेश या अरबी कवींची नावं आपल्या परिचयाची झाली ती भाषांतरांतूनच. त्यामुळे विद्रोह आणि विरोधाचं हे मोठं साधन आहे हे मान्य करावं लागतं.


निर्वसाहतीकरणाच्या विचारविश्वामध्ये साहित्यिक भाषांतर/अनुवादाची भूमिका काय आहे असे तुम्हाला वाटतं?


थोडं व्यापकपणे आपल्याला असं म्हणता येतं की इतिहासात दक्षिण गोलार्धावर उत्तरेकडच्या भागानं अन्याय केलेला आहे. फ्रेंचांनी आफ्रिकेत वसाहती केल्या आणि तिथल्या स्थानिक भाषा नष्ट झाल्या. तिथल्या लहान लहान देशांवर फ्रेंच ही भाषा लादली गेली. उत्पादनाच्या बाबतीतही त्यांना पूर्णतः परावलंबी करून टाकलं. इंग्रजांच्या वसाहती पाहिल्या तर तिथंही शोषणाचा मोठा इतिहास दिसतो. भाषांच्या बाबतीतलं हे अमानुष वर्तन समजणारे काही विचारक आणि लेखक आहेत. त्यांनी ते जोरकसपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. न्गुगी वा थिआंगोसारख्या लेखकानं याची केवळ सैद्धांतिक मांडणीच केली नाही, तर 'मी यापुढे इंग्रजीत लिहिणार नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गिकुयु भाषा शिकून घ्या, किंवा तितून भाषांतरित करवून घ्या' ही भूमिका घेतली. आपल्याकडे नेमाडे मराठीचा आग्रह धरतात, मुलांना मराठी शाळेत किंवा स्थानिक भाषेच्या शाळेत शिकवा म्हणतात, तेव्हा त्यांनाही निर्वसाहतीकरणाचंच तत्त्व अभिप्रेत असतं. मुळात इंग्रजीबाहेरचं खूप मोठं मोठं जग आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. मुद्दा सांस्कृतिक वर्चस्वानं, वरवंट्यानं सपाटीकरणाविरुद्धचा आहे.


आधीही वेगळ्या रूपांमध्ये, पण भरपूर भाषांतरं होत होती. प्राचीन काळापासून भारताशी जगभरातल्या अनेक देशांचा व्यापार होताच. तेव्हा परस्परांशी संवादासाठी भाषांतराच्या काहीएक युक्त्या आणि पद्धती त्याकाळी शोधलेल्या असणार. कारण वेगवेगळ्या भाषांतून एकमेकांशी संवाद व्हावा लागतो तरच आर्थिक-सामाजिक व्यवहार घडतो. त्यासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक आदानप्रदानही घडत असतं. म्हणूनच आज घडीला आपण बघतो की जगात जेवढे धर्म आहेत त्या सर्व धर्मांचे उपासक भारतात दिसतात. दोन हजारापेक्षा जास्त जिवंत भाषा येथे बोलल्या जातात आणि विविध जाती-वंश-धर्म एकत्र नांदताना या भूमीवर आपण बघतो. आता भाषांतराकडे जर आपण वळलो, तर भाषांतर ही दोन वेगळ्या समुदायांतील लोक एकमेकांना भेटतात तेव्हा घडणारी अपरिहार्य प्रक्रिया असते. त्या अर्थाने भारत या भूमीवर ज्याअर्थी हजारो वर्षं विविध प्रदेशांत - भागात विविध प्रकारचे लोक येत गेले, विसावत गेले, स्थलांतरित झाले, स्थिर झाले किंवा परत गेले त्याअर्थी इथे भारताबाहेरच्या भाषांतले शब्द येऊन इथल्या भाषांमध्ये मिसळले असणार आणि भारतातले शब्द बाहेर गेले असणार. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा, की भारत म्हणजे काय याची आज जी व्याख्या आपण करतो ही दर काही शतकांनी बदलत आलेली व्याख्या आहे. कारण भौगोलिक नकाशेही बदलत गेलेले आहेत. परस्परांवरच्या प्रभावांमुळे भाषाही बदलत गेलेल्या आहेत.


निर्वसाहतीकरणाचा विचार करायचा झाला तर काळाच्या प्रदीर्घ रेषेवरचा एक लहानसा दोनशे वर्षांचा तुकडा फक्त विचारात घ्यावा लागतो. या काळात जे मोठं मंथन झालं त्यात इंग्रजीची न पुसली जाणाऱ्या प्रभुत्त्वाची छाप वसाहतवादानं सोडली. आजही त्या मानसिकतेमुळे भारतीय भाषांत लिखाण करणार्‍या प्रत्येक कवी आणि लेखकाला अपरिहार्यपणे आपलं लिखाण इंग्रजीमध्ये भाषांतरित करून घेतल्याशिवाय भारतातल्या भारतातले राष्ट्रीय सन्मान सुद्धा मिळू शकत नाहीत असं वाटतं. कारण भारतातलं भाषावैविध्य आणि भाषासमृद्धी हीच आज भारतीय भाषांच्या इंग्रजीवरील परावलंबनानाची एक मोठी कळ होऊन बसली आहे. मग निर्वसाहतीकरण करायचं तर काय करायचं? तर आपल्याला कर्तव्य म्हणून मोठ्या प्रमाणात इतर भारतीय भाषा शिकणं हे अग्रक्रमाने करावं लागेल. तोपर्यंत खऱ्या अर्थाने निर्वसाहतीकरण हा दूरचा टप्पा आहे. मात्र दरम्यान वारंवार परिषदा-कार्यशाळा-चर्चासत्रांतून बहुभाषी लेखक कवी विचारवंत यांना एकत्र आणणं, एकमेकांच्या भाषा आणि त्यातल्या संज्ञा परिभाषा परस्परांच्या भाषांमध्ये जाणं हे चालू ठेवावं लागेल. जानपद साहित्य ही संज्ञा आपण वापरतो. तो शब्द रवींद्रनाथ टागोरांनी हा शब्द वापरलेला होता. असं घडायला पाहिजे. इंग्रजी हा मध्यस्त म्हणून काढून टाकण्यापर्यंतचा संवाद आपण भारतीयांनी तरी वाढवला पाहिजे. त्यासाठी दुतर्फा-चौतर्फा भाषांतरंही करत राहावी लागणार आहेत.


एका भारतीय प्रादेशिक भाषेतून दुसर्‍या प्रादेशिक भाषेत अनुवाद करण्याचे राजकीय परिणाम काय आहेत? तत्कालीन सामाजिक/राजकीय परिस्थितीचा अशा अनुवादावर काय परिणाम होतो?


सत्तेच्या नजीक जी भाषा असते ती सर्वसामान्यांपर्यंत विविध कारणांनी झिरपत जाते. आपल्याला आज हे भारताच्या संदर्भात हिंदीबद्दल म्हणता येईल. हिंदी एक समृद्ध भाषा आहे आणि तित मोठं साहित्यभांडार आहे. पण म्हणून केवळ हिंदीमधूनच प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरं होत राहाणं हे निरोगी नाही. साहित्य अकादेमी तरूण लेखकांना प्रवासवृत्ती देते. त्यातले बहुतेक मराठी लाभधारक लेखक पाहिले तर ते उठसूठ मध्यप्रदेशात किंवा उत्तरेत जाऊन चार-दोन हिंदी लेखकांशी गप्पा मारून परत येतात. का? कारण हिंदी येतेच हा एक समज. दुसरं, त्यात गांभीर्यानं काही करायचं हा मुळात उद्देशच नसतो. इतक्या वर्षांत एखाद्या तरूण लेखकानं ट्रॅव्हल फेलोशिप मिळाल्यानंतर अमुक एका राज्यात जाऊन, त्या भाषेचा अभ्यास करून नंतर त्यावर एखादा चांगला मोनोग्राफ तरी लिहिला आहे का याबद्दल मला शंका आहे. एक गाडी काढून दोस्तमंडळींबरोबर भोपाळ-इंदोर-जबलपूरपर्यंत सहल करत धमाल करून यायची एवढाच त्यात हेतू असतो. हिंदीवाल्यांनाही आपली भाषांतरं इतरांनी करावीत असं वाटत असतं, मात्र ते दुसऱ्या भाषेतल्या एखाद्या लेखकाचा शोध घेऊन त्याचं आपणहून हिंदीत भाषांतर करतील हे क्वचितच घडतं. हा भाषेच्या वर्चस्वाच्या वृत्तीचा गंड आहे. असमी, नागा, संथाळ, तेलुगू, तमिळ, मल्याळम, डोगरी अशा भाषांमधून भाषांतर करणारे आणि अभ्यासक जाणिवपूर्वक तयार करणं हा खरा राजकीय अजेंडा असला पाहिजे. भारतातलं भाषांचं सौंदर्य त्यांच्या वैविध्यात आहे. त्या त्या भाषांमधील संचित ज्ञान काही अंशी भाषांतरित होऊ शकलं तरच आपण भारतीयता या संज्ञेचं माहात्म्य समजून घेऊ शकू. साने गुरुजींनी तुरुंगात असताना विविध भारतीय भाषांमधलं साहित्य मराठीत आणण्याचा प्रयत्न केला. मामा देवगिरीकर, भागवतांनी बंगालीमधून त्याकाळी भाषांतरं केली. त्यामागे ही आंतरभारतीचीच प्रेरणा होती.


परस्पर आदानप्रदान हे आवश्यक असतंच. त्याचमुळे आपल्याला मिया पोएट्रीची ओळख झाली, १९९२च्या बाबरी मशिदीच्या पाडण्यानंतर उत्तरेत मोठ्या प्रमाणावर जी कविता लिहिली गेली, तिचा परिचय झाला. विशेषतः अशांततेच्या काळात भारतीयांनी हातात हात घालून उभं राहायचं असेल तर भाषांतर हा त्यातला मोठा दुवा ठरू शकतो.


साहित्यिक भाषांतरकार/अनुवादक म्हणून तुमची सुरुवात कशी झाली?/ भाषांतरकार बनण्यास तुम्हाला कशाने प्रेरित केले?


वयाच्या विशीतच मी वाचण्यात बुडलेलो होतो. तेव्हा सार्वजनिक लायब्रऱ्यांतून, जुन्या पुस्तकांच्या दुकानांमधून आणि शिक्षकांकडून सतत पुस्तकं मिळवत होतो. शिकतानाच लहान-मोठी कामं करीत जे पैसे मिळत त्यातले बरेच पुस्तकं विकत घेण्यात खर्च करीत असे. मोठ्या भावामुळे मला 'धर्मयुग' आणि 'सारिका' वगैरे हिंदी वाङ्मयीन नियतकालिकं वाचायचीही सवय लागली होती. रशियन भाषांतरित साहित्यही तेव्हा स्वस्तात उपलब्ध असे, त्यामुळे तेही वाचनात येत होतं. हे करता - करता एका अर्थानं भाषाही शिकत होतो. तुम्ही-आम्ही जी मराठी बोलतो ती भाषा काही आमच्या कुटुंबात बोलली जाणारी मराठी नव्हती. गावाकडून शहरात आलेल्या, निमशहरी भागातल्या अनेकांच्या बाबतीत असाच अनुभव असतो. आमच्या कुटुंबात बोलली जाणारी भाषा वर्‍हाडी-खानदेशी-मराठवाडी-उर्दूमिश्रित अशी निजामीतली भाषा होती. असं म्हणतात, की माणसाच्या मुलाला जन्मापासूनच भाषांतराची सवय होते. ‘इन द बिगिनिंग, वॉज द वर्ड’ असं बायबलचं पहिलं वाक्य आहे. पण त्याआधी ध्वनी असतो, ध्वनीच्या आधी भावना असतात आणि भावनांच्याही आधी विकार असतात. ‘भूक लागली’ किंवा ‘मला जास्त चोंबाळू नको,’ असं कोणतीही भाषा माहीत नसलेलं मूल त्याच्या भाषेतून त्याला काय म्हणायचं ते सांगत असतंच. आपण समूहाबाहेरच्या मोठ्या समुदायात वावरताना एक सामायिक भाषा वापरत असतोच. मागच्या वर्षी निधन झालेले, भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे श्रेष्ठ अभ्यासक जॉर्ज ष्टायनर यांनी म्हटलं आहे की, "भाषांतर हे सर्व मानवी संवादाच्या केंद्राशी असतंच. सगळ्या प्रकारचं संप्रेषण हे भाषांतराचंच एक रूप आहे. समजून घेणं-अर्थाचा अन्वय लागणं म्हणजे भाषांतर. भाषेतल्या भाषेतही आपण नेहमीच भाषांतर करून किंवा अर्थ विशद करून सांगतांना आपल्याकडे वेगळ्या भाषांऐवजी लिखित आणि बोलीभाषांच्या एकत्वाचा एक विस्तृत वर्णपटच असतो."


औरंगाबाद या शहरात जन्मापासून सुरुवातीची दोन-तीन दशकं मी घालवली. हा काळ माझ्यासाठी खूपच उपकारक होता असं मला वाटत राहिलं आहे. हे शहर गेली अनेक शतकं बहुसांस्कृतिकतेचं एक उत्तम उदाहरण बनून राहिलं आहे. अशा धर्म-जाती आणि वर्गांच्या काटछेदांवर उभं राहाण्याचे फायदे असतात. गावातल्या ज्या जुन्या भागात आम्ही राहायचो, तिथं माझे मित्र वेगवेगळ्या भाषा बोलणारे होते. त्यांच्या मातृभाषा उर्दू, हिन्दी, गुजराती, सिंधी, पंजाबी अशा होत्या. रमझानच्या महिन्यात पहाटे आम्ही झोपेत फकिरांची गाणी ऐकत होतो. शेजारच्या वैष्णवांच्या मंदिरात दरवर्षी उत्तरेतून लोक येत आणि रामलीला-कृष्णलीलेची नाटकं करीत. त्यांचे ते रंगीत निळे-गुलाबी चेहरे बघणं कुतुहलाचं होतंच पण त्यांची भाषाही मोहवणारी असे. सार्वजनिक ठिकाणी मुशायरे होत असत. त्यात बडे-बडे उर्दू कवी ऐकायला मिळत. या वातावरणात माझी हिन्दी-ऊर्दूतल्या साहित्याशी ओळख होत होती. विशीत असल्यापासून या भाषांमधील आवडलेल्या गद्यांची आणि कवितांची भाषांतरं मी करून पाहात होतो. त्याच वेळी कॉलेजला असतांना रविवार पुरवण्यांसाठी रेखाटणं-सजावटीची कामंही करत होतो. आठवड्यातून तीन दिवस रात्री जावं लागे आणि त्याचे बरे पैसे मिळत. तेव्हा अनेकदा कुणाला ज्ञानपीठ मिळालं, मोठा पुरस्कार मिळाला किंवा महत्त्वाची घटना घडली तेव्हा त्या त्या लेखकाबद्दलचा मजकूरही घाईनं त्या आठवड्यात प्रसिद्ध करायचा असे. अशा वेळी सुरुवातीला नड भागवण्यासाठी मी हिंदीतल्या कथा-कवितांची भाषांतरं केली. त्या-त्या वेळी लेखकांवर स्फुटं लिहून दिली. पुढे ते काही काळ नियमितच झालं होतं. भाषांतरं छापायला सुरुवात अशी झाली. त्यालाही पस्तीसहून जास्त वर्षं उलटली.



तुमची आवडती मराठीत अनुवादित झालेली पुस्तकं कोणती व का?


अगदी फार ताण न देता काही नावं आठवायची झाल्यास मला दा. न. शिखरे यांनी सर्व्हान्तिसच्या डॉन क्विक्झोटचं केलेलं भाषांतर मला अतिशय आवडलेलं आहे. एक तर ते पुस्तक मी भाषांतरातच पहिल्यांदा वाचलं होतं आणि दुसरं म्हणजे शिखरेंच्या भाषेत मुळातला उपरोध त्यांनी इतका चांगला आणला आहे की ती मराठीतली स्वतंत्र शैली म्हणून कुणाही गद्यलेखकानं अंगिकारावी. अरेबियन नाईट्सचं गौरी देशपांडे यांनी केलेलं सोळा खंडांतलं 'एक हजार रात्री आणि एक रात्र' हेही मला अत्यंत आवडलेलं भाषांतर आहे. कारण त्यापूर्वी मी चिपळूणकरांनी केलेलं 'अरबी भाषेतल्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी' वाचलं होतं. ते वाईट रूपांतर होतं. चिपळूणकर धर्माभिमानी असल्यानं त्यांना 'यवनी' नावं आणि संदर्भच गाळून टाकायचे होते. शिवाय त्यातली अतिशय बोल्ड अशी लैंगिक वर्णनं आणि शब्द त्यांच्या रूपांतरात दूरपर्यंत कुठेही नव्हते. मात्र गौरी देशपांडेंनी बर्टनचं हे क्लासिक मुळाबरहुकून वर्णनांना कुठेही न बिचकता अतिशय उत्तमरित्या केलेलं आहे. त्यातली भाषा मूळ संहितेला पेलणारी आहे. मुख्य म्हणजे हे एवढं अवाढव्य काम त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी केलं हे नक्कीच स्पृहणीय होतं. तिसरं पुस्तक म्हणजे शेक्सपिअरच्या 'किंग लिअर'चं विंदा करंदीकरांनी केलेलं भाषांतर. शेक्सपिअरच्या नाटकांमध्ये ब्लँक व्हर्स या छंदाचा भरपूर वापर आहे. विंदांनी आएम्बिक पेन्टॅमीटर या पद्यबंधातील छंदाला समांतर असलेला चतुष्खंडी मुक्तछंद मराठीत आणला. त्याविषयी विस्तृत प्रास्ताविकात ब्लॅंक व्हर्स, आएम्बिक मीटर आणि शेक्सपिअरच्या भाषेविषयी तपशिलानं लिहिलेलं आहे. मुळातल्या ओळींनुसार भाषांतर करताना आपणच तयार केलेल्या छंदाची बंधनं पाळत, त्यातलं काव्यही अबाधित राहील याची काळजी घेत त्यांनी भाषांतर केलं आहे. तिसऱ्या अंकातील प्रवेशात लिअर आणि विदुषक यांच्यातील संवाद हा भाषांतराचा उत्तम नमूना आहे. त्या संवादात लिअरच्या स्वगतात असलेल्या ध्वनींचं महत्त्व ओळखून करंदीकरांनी भाषांतरात त्याप्रमाणे आघात असलेले ध्वनी वापरलेले आहेत.


या शिवाय मला जयप्रकाश सावंतांनी केलेली सगळी भाषांतरं आवडतात. निशिकांत ठकारांनी विनोद कुमार शुक्ल यांच्या 'भिंतीत एक खिंडकी राहायची' आणि 'नोकराचा सदरा' या कादंबऱ्यांची भाषांतरंही मला आवडलेली आहेत. प्रफुल्ल शिलेदारांनी केलेलं विनोद कुमार शुक्लंच्या कवितांचं 'जास्तीचे नाही' हे भाषांतरही मला आवडलेले आहे. भा. ल. भोळे यांनी जुझे सारामागो याच्या 'ब्लाईंडनेस'चं भाषांतरही उत्तम आहे. जीएंनी केलेली कॉनरॅड रिक्टरच्या पुस्तकांची भाषांतरंही वाचनीय आहेत. अरविंद गोखल्यांनी भारतीय कथाकारांच्या कथा भाषांतरित करून एक संग्रह केला होता. 'कथाकार' या नावानं. ते भाषांतर मला आवडलं होतं. श्री बा जोशींनी मंटोसह काही लेखकांच्या उर्दू कथा मराठीत आणल्या होत्या. अशी बरीच चांगली भाषांतरं सांगता येतील.


तुमची आवडती (विदेशी भाषांमधील) भाषांतरित पुस्तके कोणती?


विशीत असतांना माझं जे वाचन होतं, त्यात मुख्यतः रशियनमधून मोठ्या प्रमाणात जी भाषांतरं होत होती, त्यातल्या अनेक पुस्तकांनी माझ्यावर मोठा परिणाम केलेला आहे. पुढे फ्रेंच भाषेचा मी पदविका अभ्यासक्रम केला पण त्याचा उपयोग फ्रेंच भाषांतरातले तपशील कळण्यापुरताच राहिला. पण युरोपिअन, लॅटिन अमेरिकन साहित्य हे सगळं मी भाषांतरातूनच वाचलेलं आहे. ओरहान पामुकची भाषांतरकर्ती मॉरीन फ्रीली हिनं भाषांतरित केलेली स्नो, ब्लॅक बुक, इस्तान्बूल ही पुस्तकं मला आवडलेली आहेत. मूळ कठीण वाक्यरचना आणि दीर्घ वाक्यांची ती सुटसुटीत इंग्रजी भाषांतर करते. दुसरा भाषांतरकार जिओवान्नी पॉन्तिएरो. यानं सारोमागोची पुस्तकं इंग्रजीत केली. ब्लाईंडनेस ही कादंबरी करतांना तो आजारी होता. औषधं घेतली तरी जीव वाचेल, पण दृष्टी जाईल ही शक्यता होती. औषधं न घेता दृष्टी काही काळ राहिली असती पण जगण्याची खातरी नव्हती. त्यानं दुसरा पर्याय स्वीकारला. ब्लाईंडनेसचं भाषांतर पूर्ण केलं आणि त्याचं नंतर निधन झालं. हे मला थोर वाटतं.


लेखक म्हणून तुम्हाला काय अधिक आवडते – कविता की गद्य? आणि का?


मी कवी आहे म्हणून हे म्हणत नाही, पण मला स्वतःला कविता हा साहित्यप्रकार अधिक आवडतो. म्हणजे तो मी गद्यापेक्षा थोडा अधिक वर ठेवतो. मला सतत आसपास कवितांची पुस्तकं हवी असतात. कविता तुम्हाला जगणं सत्वांशानं पोहचवतात.


तुम्ही लेखक आणि भाषांतरकार याबरोबरच चित्रकारही आहात. तुम्हाला व्यक्त होताना भाषा आणि चित्रकला या दोन माध्यमांमध्ये काय फरक जाणवतात? हे फरक का महत्वाचे आहेत?


सगळ्या ललितकलांमध्ये काहीतरी धागा असतोच. चित्रात जसे सात रंग असतात, छटा असतात, तसंच संगीतात सात स्वर असतात, श्रुती असतात. विनोद कुमार शुक्ल यांचं एक वाक्य आहे. ते लेखकाच्या कामाचं सार सांगतं. ते म्हणतात, "मैं दृश्यों में सोचता हूं, और फिर उसे शब्दों में पकडने की कोशिश करता हूं।". जगणं समग्रतेनं समजून घेण्यासाठी कुतुहलाचा पट जमेल तितका व्यापक करता आला पाहिजे. वेगवेगळ्या विधा समजून घेता आल्या पाहिजेत. आमचे चित्रकलेचे शाळेतले एक शिक्षक म्हणायचे, "तुम्हाला रेषा इतकी हुकमी रेखता यायला पाहिजे की पुढे नांगर धरतांना किंवा स्क्रू विशिष्ट कोनातून पिळतांनाही तुमच्यात ती सवय येते.'' अरूण खोपकरांनी एका भाषणात राजा वज्र आणि मार्कंडेय ऋषीची गोष्ट सांगितली होती. ती पुन्हा इथं सांगतो. वज्राला त्याच्या उपासना दैवताची मूर्ती घडवायची होती आणि त्यासाठी शिल्पकला साध्य व्हावी म्हणून तो मार्कंडेयाकडे गेला. तेव्हा ऋषी त्याला म्हणाले, 'पण तुला आधी आकारांचं आकलन व्हायला पाहिजे, तर तू चित्रकला शिक.' चित्रकला शिकून झाल्यावर मग ते म्हणाले, 'ते ठीक आहे पण तुला नादतत्व कळायला हवं, तर संगीत शिक,' नंतर त्यांनी त्याला लय समजून घेण्यासाठी नृत्य शिकायला सांगितलं. असं करता करता त्यानं अनेक कला शिकून घेतल्या आणि अखेरीस शिल्पकला शिकण्यासाठी त्याला फारसे प्रयास करावे लागलेच नाहीत. त्यामुळे लेखकानं हजार डोळ्यांनी, वेगवेगळ्या कोनांनी पहायला शिकलं पाहिजे. तरच जगणं समग्रतेनं समजायला- थोडी थोडी का होईना - मदत होते.



गणेश विसपुतेहे मराठीतील कवी, भाषांतरकार, संपादक व चित्रकार आहेत. सिनार (१९८२), धुवांधार गाजलेल्या रस्त्यांच्या मधोमध (१९९९) आणि आवाज नष्ट होत नाहीत (२०१०) हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या कवितांची हिंदी, कन्नड व इंग्रजीत भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत. हिंदी, उर्दू व इंग्रजीमधील साहित्याची ते मराठी भाषांतरे करतात. ओरहान पामुक यांची ‘माय नेम इज रेड’, कृष्ण कुमार यांचे ‘शासन, समाज आणि शिक्षण’ तसेच उदय प्रकाश यांची ‘पिवळ्याधम्मक छत्रीतील मुलगी’ या लघुकादंबरी यांचा त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केला आहे. विविध नियतकालिकांतून ते गेली ३५ वर्षं कविता, संस्कृती, कला, चित्रपट अशा विषयांवर लेखन करतात. बिर्ला अकॅडेमी, कोलकत्ता व पुणे येथे त्यांच्या चित्रांची स्वतंत्र प्रदर्शने झाली आहेत. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार (१९९२), अनंत काणेकर पुरस्कार (२००१), कवी केशवसुत पुरस्कार (२०१२), ओरहान पामुक यांच्या ‘माय नेम इज रेड’ या कादंबरीच्या अनुवादासाठी बाळकृष्णशास्त्री जांभेकर पुरस्कार (२०१५) असे प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.



コメント


bottom of page