top of page
  • bilorijournal

​कविता अशी अनुभवावी


मोहिनी पिटके


कविता हा शब्दच एका संमोहित करणाऱ्या अनुभवाचे स्मरण करून देणारा आहे. कवितेचे वाचन हा मग भाषिक अनुभव न ठरता आपल्या पुढच्या कित्येक क्षणांसाठीचे पांथेय बनून जाते. पण मूळात कविता म्हणजे तरी काय हे साऱ्याच वाचकांनी जिज्ञासूपणे जाणून घ्यावे. कविता हा सर्वश्रेष्ठ साहित्यप्रकार मानला गेला ते काय सबळ कारणांशिवाय? कविता कवीच्या अंतर्मनातून येते, साक्षात्कारासारखी अवतरते, अचानक उमलून येते, सायासाविना येते. सहजसुंदर उद्गार बनून येते. साऱ्या मानवजातीच्या दुःखाला मुखदित करते तीच खरी कविता! प्रदेश साकल्याचा व्यापते तीच खरी कविता! कवी Lowell म्हणतो,

“And I believed the poets;

it is they

Who utter wisdom from the central deep

And, listening to the inner

flow of the things

speak to the age out of

eternity.” (Lowell, 1896)


हे उद्गार साऱ्याच सर्जक कलावंताला लागू पडतात. चांगली कविता तीच जी मनाचा तळठाव शोधते. एकाच वेळी आनंद देते आणि एक दुखरा सल ठेवून जाते. कवितेत भवतालाची निरीक्षणे असतात, अनुभवकथन असते, प्रसंग चित्रण असते, गूढगुंजनही असते. माणसाच्या आयुष्यातील दुःखाची अपरिहार्यता अधोरेखित करणाऱ्याही कविता असतात. उदा.

“अमुचा प्याला दुःखाचा।

डोळे मिटुनी प्यायाचा।

पिता बुडाशी गाळ दिसे

ज्याअनुभव हे नाव असे” (केशवसुत)

किंवा

“देवे दिलेल्या जमिनीत

आम्ही सरणार्थ आलो”(खानोलकर)


कवीच्या मनातील अंतःसंगीत शब्दरूप घेते. कवी आपले अनुभव आणि निरीक्षणे यांना कल्पनाशक्तीच्या जोरावर एक साजिरे, सौंदर्यपूर्ण रूप देतो. काव्यात्मता देतो. कविता वाचताना या साऱ्या गोष्टी थोड्या अंशाने का होईना रसिकाने जाणून घ्याव्यात. अर्थ-सौंदर्यापेक्षा शब्दांकडे, पोकळ अर्थाने भरलेल्या, वापरून गुळगुळीत झालेल्या प्रतिमांकडे साहजिकच वाचक आकृष्ट होतो. त्यातही प्रेमभावना आणि निसर्ग यांच्याविषयी लिहिलेल्या कविता हा तोचतोचपणा हमखास आढळतो. कवितेचे बाह्यरूप अधिक प्रवाही ठरते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळतो, आणि मग तशाच कवितांचे उदंड पीक येते.


कविता लिहिताना कवीची मनोभाषा, मनोवस्था कशी होते ह्याचा आपण कधीच विचार करत नाही. मनाच्या अस्वस्थतेतून कविता शब्दरूप घेते. ती बऱ्याच वेळा सूचक असते. Indirectness हे चांगल्या कवितेचे लक्षण आहे. ती सारेच सांगून टाकत नाही. वाचकांसाठीही काही समजावून घ्यायचे राखलेले असते. दोन ओळींमध्ये वाचणे म्हणतात ते हेच! हे दोन ओळींमधले समजून घेणे ही तर आस्वादकतेची पहिली पायरी आहे.

“दुःख तुझे दुःख तुझे

वेदनेस काय कमी?

सुटकेचा भास पुरा

जाईल ते जाईन मी”

या इंदिराबाईंच्या ओळी (Pāṭaṇakar, 2002) हेच सांगतात आपल्याला!


प्रत्येक कवितेला आपला असा एक चेहरा असतो त्याकडे पाहता पाहता तिच्या अंतरंगात कसे शिरायचे हे आपल्याला सरावानेच उमगू शकेल. कवितानिर्मितीची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. आपण समीक्षक नाही आहोत, आपण रसिक, सुजाण वाचक आहोत ही भूमिका मनात ठेवून जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. सुप्रसिद्ध कवयित्री आसावरीताई काकडे म्हणतात की कविता ही द्विज असते. तिचा प्रथम जन्म होतो कवीच्या मनात, आणि रसिकांच्या मनात तिचा जो अर्थ उलगडतो तो तिचा दुसरा जन्म. कविता कागदावर उमटते ती एक चर्या, एक रूपबंध घेऊन! तिच्या ओळी, तिची कमी-अधिक लांबी, टिंब, पॅाजेस इत्यादी गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. असावारीताई त्यांना कवितेचे ‘हावभाव’ म्हणतात. ते समजून घ्यायला हवेत. कवितेत अनेकार्थ सूचनक्षमता असते. म्हणूनच आसावरी काकडे लिहितात,

“शब्दांचे बोट धरून निघालेल्या

प्रत्येकाला

लागू नये एकाच अर्थाचे गाव

कवितेला तर नाहीच

कवितेखालीही नसावे कुणाचे नाव”


व्यावहारिकतेसाठी जरी त्या कवितेवर कवीची नाममुद्रा असली तरी त्यातला आशय मग फक्त त्या कवीचा राहत नाही. तो सार्वकालिक, सर्वव्यापी होतो. खरी श्रेष्ठ कविता वैयक्तिकतेचा परीघ केव्हा ओलांडते हे खुद्द कवीच्याही लक्षात येत नाही. मग सहजीच “मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे” (केशवसुत) असे कवी उद्गारतो. वाचकाकडूनही तेच अपेक्षित आहे. त्यासाठी वाचकाजवळ हवी सहृदयता. कवितेत व्यक्त झालेल्या विचार, भावना, अनुभूती यांच्याशी त्याला नाते जोडता यायला हवे.


अनेक कवितांतून निसर्गाची विविध रूपे चित्रित केलेली असतात. केवळ ‘पाऊस’ हा विषय आठवला की आपल्याला पावसाची ठराविक गीते आठवतात. साध्या सोप्या कविता आठवल्या तर त्यात चूक काहीच नाही. पण त्याबरोबरच ‘सरीवर सरी आल्या ग’ किंवा ‘गडद निळे गडद निळे’ (बोरकर) किंवा ‘पाऊस कधीचा पडतो’ किंवा ‘नको नको रे पावसा’ (इंदिरा संत) अशा कविता आपल्याला आठवणे ही आपली काव्यवृत्ती अधिक व्यामिश्र झाल्याची खूण आहे. नलेश पाटील यांचा ‘निसर्गभानाच्या कविता अनुभवणे’ हा अतिशय दुर्मिळ आनंदाचा ठेवा आहे. समुद्र, सकाळ-संध्याकाळ, झाडे, पक्षी अशा विषयांवर असंख्य कवींनी कविता लिहिलेल्या आहेत. रसिक वाचकाने थोडा तुलनात्मक अभ्यास करायला शिकले पाहिजे. म्हणजे आपल्याला काळानुसार चिंतनशील कविता म्हणजे काय हे उमगायला लागेल. कवी लिहिताना आपल्या अनुभवाबरोबरच पूर्व-संस्कार, चिंतन, अभ्यास या घटकांचा प्रभाव घेऊन येतो.


खरे तर कवितेचा बोलविता धनी कोण? देव, समाज, संस्कृती? की प्रतिभा! काय नाव देणे या driving forceला! पाडगावकरांची एक ओळ आठवते,

“सोहळ्यात सौंदर्याच्या

तुला पाहु दे रे.”

इथे कवीने सौंदर्याचा संबंध त्या निर्मिती करणाऱ्या सर्वश्रेष्ठ ईश्वराशी जोडला आहे का? सौंदर्यचा असा तात्विकतेशी, अध्यात्माशी संबंध जोडायला हवा का? अखेर कवितेतील सौंदर्य या संकल्पनेचा अर्थविस्तार कसा करणार? इथे सुंदर म्हणजे उथळ अर्थाने, बाह्यरूपाने सुंदर असे नव्हे! ‘Beauty truth, Truth beauty’ असे John Keats म्हणतो (Strachan, 2003). ते ह्याच अर्थाने. खरा कवी सौंदर्याकडून सत्याकडे जातो. सत्याचा शोध कधीच संपत नाही. तो अप्रतिहतपणे चालूच असतो. ज्येष्ठ पण अलक्षित कवी म. म. देशपांडे यांच्या अतिशय अर्थपूर्ण ओळी आठवतात,

“सारा अंधारच प्यावा

अशी लागावी तहान

एका सध्या सत्यासाठी

देता यावे पंचप्राण” (Deshpande, 1965)

म्हणूनच वाचकाला कवितेतले आत्मभान, विश्वभान आणि तत्त्वज्ञान यांचा अन्योन्य संबंध उलगडणे आवश्यक ठरते.


स्त्रीसौंदर्याचे वर्णन करणाऱ्या अनेक कविता आपल्याला आठवतील. त्यात उठून दिसते बोरकरांची—

“केशी तुझिया फुले उगवतील

तुला कशाला वेणी!

चांदण्यास शिणगार कशाला

बसशील तेथे लेणी” (Borkar, 1982)

आणि याचबरोबर मिश्किलीची झाक असणारा विंदांचा ‘साठीचा गज़ल’ ही आठवतो.


सामान्य लेखक बाह्य वर्णनात रमतो आणि सामान्य वाचकही! परंतु शब्दांकडून भावनेकडे आणि त्यातूनच स्फुरलेल्या चिंतनाकडे आपला प्रवास व्हावयाचा असेल, तर वाचकाच्या अंतर्मनाची दारे उघडी हवीत. उदाहरणेच द्यायची तर ‘झाड’ या साध्या विषयावर अनेक कवींना कविता लिहिल्या आहेत. वाचकांनीच ठरवायचे आहे की कुठल्या कवितेतला काव्याशय अधिक सखोल आहे ते!


शांता शेळके यांची 'झाड' ही कविता म्हणते,

“हे एक झाड आहे: ह्याचे माझे नाते

वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते

मला आवडतो याच्या फुलांचा वास

वासामधून उमटणारे जाणीव ओले भास

कधीतरी एक दिवशी मीच झाड होईन

पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन” (Shelake, 1988)


तर बोरकरांचे झाड पाहा,

“झाड माझे वेडेपिसे, उन्ही जळताना हसे

रुसे धो धो पावसात, चांदण्यात मुसमुसे”


पु. शि. रेगे ह्यांचे झाड तर लाखमोली! त्यांची प्रतिभाशक्ती—

“एक आहे झाड माझे

राठ ज्याच्या जीर्ण शाखा

साठिषण्मासी परंतू

लाख येती ज्या शलाका.

झाड माझे लाखमोली

लाल ज्याला फक्त पाने,

नेणता ये एक त्याला

शुभ्र काही जीवघेणे.” (Rege, 1975)


हे ‘शुभ्र काही जीवघेणे’ रसिकमनाला संमोहित करते. लौकिक जगाचा विसर पडतो. आणि एका वेगळ्या अनुभूतीची प्रचीती येते.


प्रेम ही माणसाच्या मनातील चिरंतन भावना! सदा अमलात असणारी! किती किती कंठातून ह्या प्रेमाची गाणी झरली, पण मनापासून आठवते ती अनिलांची ‘आणीबाणी’ (Pāṭaṇakara, 2002), पु. शि. रेगे यांची ‘अर्थ,’

“आणि बसल्यावर । तिचा हात हातात घेताना

अंतर कधी मोजू नकोस.

काळाची एक भलतीच

सवय आहे

पुन्हा मागे फिरण्याची

केवळ दूर मावळतीकडे पाहा

ढगांच्या सावल्याही रंगीत झालेल्या

दिसतील

काही विचारू नकोस, सांगू नकोस

खाली किसलेली वाळू आहे

तिच्यातूनही बोटे फिरू देत

इथून आता साऱ्या प्रश्नांना

अर्थ आहे.”


ही सारी उदाहरणे आपल्याला हेच सांगतात की सौंदर्याचा खरा अर्थ बाह्यस्वरूपात नसतो. Wordsworthसारखा प्रतिभावंत सोनेरी ‘daffodils’ पाहून मंत्रमुग्ध होतो. ती सुंदर फुले त्याच्या स्मृतीतही स्थान पटकावतात. केवळ त्याच्या डोळ्यांनाच आनंद देतात असे नाही, तर एका अनिर्वचनीय आत्मिक आनंदाचे देणे त्याला देऊन जातात—

“They flash upon the

inward eye

which is the bliss

of solitude.” (Wordsworth, 2013)


अधिकाधिक वाचनानंतरच कवितेतल्या अशा जागा आपल्याला सापडू शकतात. कविता आकलनातही यत्ता असतात. इथे आपण स्वतःलाच विकसित करत जायला हवे. कधीकधी एखादी कविता का आवडली किंवा का आवडली नाही हे आपल्याला योग्य शब्दात मांडता येणारही नाही. परंतु गाण्यातल्या एखाद्या जागेसाठी आपल्या तोंडून नकळत वाहवा जातेच ना! तसेच ह्या कवितांमधील जागांचे आहे. अखेर साहित्य म्हणजे नुसती निरीक्षणे किंवा अनुभव नव्हेत, त्याला चिंतनाचीही जोड आवश्यक असते. कवीची जीवनदृष्टी तयार व्हावी लागते. हे सारे त्याच्या लिखाणात यथावकाश प्रतिबिंबित होते. पण कविता म्हणजे तत्त्वचिंतन नव्हे तर जगण्याचा सूचक शब्दात सांगितलेला अर्थ. कवी उमगलेले सत्य वाचकांबरोबर share करतो. त्याला वाटणारे ह्या जगाचे, निसर्गाचे आकर्षण, अलौकिकाची ओढ ह्याविषयी तो मोकळेपणाने बोलतो. कारण कवी हा दोन जागांचा रहिवासी असतो. पद्मा गोळे ह्यांची ‘आकाशवेडी’ ही कविता या संदर्भात लक्षणीय ठरावी.

“किती उंच जाईन पोचेन किंवा

संपेल हे आयु अर्ध्यावरी

आकाशयात्रीस न खेद त्याचा

निळी जाहली जी सबाह्यांतरी!” (Gole, 1968)


किंवा इंदिरा संतांची ‘झोका’ ही कविता,

“झोका चढतो उंच उंच

पाय पोचती मेघवरती

इंद्राच्या डोहावरती

लाल पाखरे पाण्या येती

झोका चढतो उंच उंच

मला थांबता थांबवेना,

गुंजेएवढे माझे घर

त्याची ओळख आवडेना” (1990)


मर्ढेकरांसारखा युगप्रवर्तक कवीही आधुनिक जीवनातली कुरुपता, सरहीनता, शूद्रता, व्यक्तीजीवनातील आणि समूहजीवनातील अंतर्विरोध, विसंगती — सारे सारे स्पष्ट शब्दात प्रतिमांद्वारे प्रकट करतो, तरीही लिहून जातो, “अजून येतो वास फुलांना!” (Rajadhyaksha, 1991)


कवी अशी आयुष्यावरची अविचल श्रद्धा शब्दबद्ध करतो!

“अजूनही कोणी निळ्या डफावर

विजेची थाप हणून उद्गारतो,

तू जगशील, तुम्ही जगाल!”


वाचक म्हणून अशा कवितांकडे आपण वळायला हवे. काही प्रयोगशील कवी नवनवे प्रयोग करतात. त्याचाही आस्वाद आपण घ्यायला हवा.

केशवसुत, तांबे, बोरकर, विंदा, इंदिरा संत यांच्याबरोबरच वेगळ्या अनवट वाटांनी जाणारे खानोलकर आणि ग्रेस यांच्या कवितांकडेही वळायला हवे. त्यांच्या कवितांमधील अर्थ शोधतांना केवढी दमणूक होते आणि केवढी तरतरीही येते. खानोलकर लिहितात ‘दोन मी’ ह्या कवितेत,

“मैफिलीला तो नि मी दोघेही जातो धावुनी;

ऐकतो मी सूर, तो अन् दूरचे घंटाध्वनी”

किंवा

“संपूर्ण मी तरु की आहे नगण्य पर्ण

सांगेल राख माझी गेल्यावरी जळून” (Khānolakar, 1992)

— सकस कविता अशी असते. ती life-blood of a master spirit असते. वाचकाने या गोष्टी कायमच स्मरणात ठेवाव्यात. ठेवाव्यात म्हणजे आपोआप त्यांच्या प्रगल्भतेला अनेक पैलू पडतील.


‘कविता अशी असावी। जी वाचता कळावी’ हे सार्वत्रिक सत्य होऊ शकत नाही. प्रतिभेच्या पंखांच्या बळावर आकाश ते धरती आणि धरती ते आकाश अशा येरझारा घालणाऱ्या कवीचा हा प्रवास जेवढा सुंदर तेवढाच अवघड. ‘सतारीचे बोल’सारखी मैलाचा दगड ठरलेल्या classic कविता आठवा. नैराश्याच्या गर्तेत कोसळणार्‍या सामान्य माणसाला प्रथमतः सतारीचे बोल ही ‘खुशालचंदाची पिरपिर’ वाटते. पण त्या सूरांची जादू त्याच्या मनाची भावावस्था पार बदलून टाकते आणि त्याचे मन विशालतेकडे वाटचाल करते. ‘तो मज गमले विभूति माझी। स्फुरत पसरली विश्वामाजि’ श्रेष्ठ कवितेचे हेच बलस्थान असते. ‘जपानी रमलाची रात्र’ सारखी शृंगारपूर्ण, ऐंद्रिय संवेदनांची कविता लिहिणारे बोरकर शेवटी म्हणतात,

“आलिंगन - चुंबनाविना हे मीलन अपुले झाले ग

पहा, पाहा, परसात हरीच्या रुमडाला सुम आले ग” (Borakar, 1972)


शब्दांमागच्या भावना आणि चिंतन उमगणे हीच उत्तम आस्वादकतेची खूण आहे. उगमापाशी व्यक्तीसापेक्ष असणारी कविता साऱ्या जनसमूहाची होते. हाच खरा काव्यबोध! काही कविता मात्र अर्थाच्या अनेक पातळ्यांवर वावरतात. कवी अनिल, ना. घ. देशपांडे, म. म. देशपांडे, कवी ‘बी,’ भा. रा. तांबे यांच्या कवितांत William Empson याने मांडलेली ‘Seven types of ambiguity’ची (2016) संकल्पना कार्यरत झालेली दिसते.


अभिवाचन, नाट्यरूपांतर, संगीताची जोड दिलेले कवितांचे कार्यक्रम यामुळे ही कवितेची आस्वादकता अधिक सुलभ होते. विंदा, पाडगांवकर, बापट, पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांच्यासारख्या दिग्गजांनी याबाबतीत मोलाचे काम करून ठेवले आहे. काही कवितांचे नाट्यरूपांतर हे रंगमंचावर आले आहे.


श्रेष्ठ कविता समकालीनाचा संदर्भ घेऊन वावरते. पण त्याच वेळी ती कालातीत असते. कवितेचा आनंद घेताना ही बाब नेहमीच ध्यानात ठेवली पाहिजे. म्हणजे सद्यस्थितीत जे गद्यात्मक आणि प्रतिक्रियात्मक कवितांचे उदंड पीक निघते आहे, त्याला विलक्षण वाचकच नीरक्षीर न्याय लावू शकेल. सवंगतेचा उदो-उदो थांबला पाहिजे.


कवीकडे प्रतिभा, व्युत्पन्नता आणि अभ्यास हवा. वाचकानेही उत्तम, सकस साहित्यावर आपल्या अभिरुचीचे भरण-पोषण केले तर तो दाद देताना विचार करेल. काव्यगुणांचे महत्त्व जाणून वाचकाने अथकपणे इतरांना पटवून द्यावे. जेणेकरून रसिकता वाढीस लागेल आणि श्रेष्ठ दर्जाचे काव्य लिहिले जाईल. कविता लेखनातील यांत्रिकता वाढत आहे की काय अशी शंका येते. जाणकार रसिक आणि उत्तम काव्य हे परस्परावलंबी आहे.


आपल्या प्रतिभेला उद्देशून कवींनी ज्या कविता लिहिल्या आहेत त्याचा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही. खानोलकरांची

“ती येते आणिक जाते

येताना कधी कळ्या आणते

आणि जाताना फुले मागते”

विंदांचे मनाच्या मनोऱ्यात शुभ्र कबुतर, इंदिराबाईंचा निळा पारवा, ना. घ. देशपांडे यांची 'बकुळफुला कधीची तुला धुंडतें वनात,' भा. रा. तांब्यांची 'मधुघट' अशा एकाहूनेक सरस कविता आपल्या प्रतिसादाची वाट पाहताहेत.


आधुनिक काळातही सौमित्र, दासू वैद्य, नलेश पाटील, अरुण म्हात्रे, अनुराधा पाटील यांच्या कविता रूपबंध आणि आशयद्रव्य ह्या दोन्ही बाजूंनी सरस आहेत. अगदी नव्या पिढीत मातीशी नाते जोडलेल्या भावसंपन्न कवयित्री कल्पना दुधाळ, पूजा भडांगे, 'माझ्या इवल्या हस्ताक्षरातून कबीर मीरा झिरपतील का थेंबभर' अशी आस लागलेले संजय चौधरी, व्रतस्थपणे आशयसंपन्न आणि वृत्तबद्ध कविता लिहिणारे संतोष वाटपाडे, काळोखाच्याही कविता असतात असे सांगणारे नामदेव कोळी, रावसाहेब कुवर, असे अनेक तरुण कवी उत्तम दर्जाची काव्यनिर्मिती करत आहेत. त्याचा आस्वाद आपण घ्यायला हवा.


खानोलकर (आरती प्रभू) लिहितात

“ही निकामी आढ्यता का

दाद द्या अन् शुद्ध व्हा

सूर आम्ही चोरतो का

चोरता का वाहवा

चांदणे पाण्यातले की वेचता येईल ही

आणि काळोखात पारा ये धरू चिमटीतही

ना परंतू सूर कोणा लाविता ये दीपसा

सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा”


प्रतिभा हे वरदान आहे का शाप? प्रतिभेचे लेणे आणि देणे असते जीवघेणे! सारे आयुष्य पणाला लागते. रसिकानेही आपल्या संवेदनशीलतेला व्यासंगाची, वैचारिक चिंतनाची जोड दिली पाहिजे. मग समोरच्या कवितेचे अवकाश कसा उजळून निघते. आणि आपल्या अंतस्थ जाणीवांची श्रीमंती अपरंपार वाढते, प्रगल्भ रसिकता अधिकाधिक आशयसंपन्न आणि चिंतनशील कवितेला जन्म देते.


शब्द म्हणजे नुसते शब्द नसतात. अर्थाची अनेकार्थी वलये निर्माण करणारी आणि कवितेबरोबरच माणसाची अभिरुची संपन्न करणारी एक बहुआयामी शक्ती आहे.

“शब्दस्वरपुष्पांचे अक्षर झुबके

क्रौंच मिथुनाच्या वेळेचे आर्त

तुमच्या वृंदावनात आणून टाकणारी पाखरं” (सदानंद रेगे)


संदर्भसूची

लोवेल, जेम्स रसेल. द कंप्लीट पोएटिकल वर्क्स ऑफ जेम्स रसेल लोवेल. ह्यूटन, मिफ्लिन, 1896.

स्ट्रॅचन, जॉन आर., एड. राउटलेज लिटररी सोर्सबूक ऑन द पोएंस ऑफ जॉन कीट्स. सायकॉलजी प्रेस, 2003.

देशपांडे, एम. एम. वनंफुलं. भारत, मौज प्रकाशन गृह, 1965.

बोरकर, बाळकृष्ण भगवंत. अनुरागिनी. भारत, सुरेशा एजन्सि, 1982.

शेलके, शांता. गॉडन. एन. पी., मेहता पब्लिशिंग हाऊस, 1988.

रेगे, पुरुषोत्तम शिवरामा आणि पाटील, गंगाधर. पु. शि. रेगे येक यांच्या निवडक कविता. भारत, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, 1975.

पानसे, मुरलीधर गजानन. भाषा : अंतःसूत्र आणि व्यावहार. भारत, महाराष्ट्र साहित्य परिषद, 1969.

वर्ड्सवर्थ, विल्यम. डेल्फी कम्प्लीट वर्क्स ऑफ विल्यम वर्ड्सवर्थ (सचित्र). एन.पी., डेल्फी क्लासिक्स, 2013.

गोळे, पद्मावती विष्णू. आकाशवेडी. भारत, मौज प्रकाशन गृह, 1968.

गाणी मनातली, गळ्यातली. भारत, साहित्य प्रसार केंद्र, 1990.

खांडेकर, व्ही.एस. अजुन येतो वास फुलांना. एन.पी., मेहता पब्लिशिंग हाऊस, 2014.

खनोलाकर, चिंतामणि त्र्यंबक, आणि घवी, रावेंद्र. निवेदक चि. त्र्य. खानोलाकर. भारत, साहित्य अकादमी, 1992.

बोरकर, बाळकृष्ण भगवंत. आनंदभैरवी. भारत, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, 1973.

एम्पसन, विल्यम. सेवेन टाइप्स ऑफ अँम्बिग्युइटी (अस्पष्टतेचे सात प्रकार). युनायटेड किंगडम, रीड बुक्स लिमिटेड, 2016.

पाटणकर, वसंत. स्वातंत्र्योत्तर मराठी कविता, 1945 ते 1960. भारत, साहित्य अकादमी, 2002.

राजाध्यक्ष, विजया मंगेश. मर्ढेकरांची कविता, स्वरूप आणि संदर्भ. भारत, मौज प्रकाशन गृह, 1991.टिपणी : या निबंधातल्या सर्व कवितांचे कच्चे अनुवाद/भाषांतर बिलोरी जर्नलने केलेले आहे आणि ते इतर कोणाचेही कॉपीराइट असलेले भाषांतर नाही.

मोहिनी पिटके तीस वर्षांहूनही अधिक काळ महाविद्यालयीन अध्यापनकार्य करत आहेत. अभ्यासविषय इंग्रजी पण मराठी, संस्कृत आणि उर्दू या भाषांचाही लळा. अनेक वृत्तपत्रे आणि मासिकांतून प्रसंगोपात लिखाण. साहित्यविषयक उपक्रमांचे आयोजन आणि सहभाग. मनाचे अवकाश भरुन टाकणारी मर्मबंधातली ठेव म्हणजे कविता. मराठी आणि उर्दूत कवितालेखन . कवितांच्या अनुवादातही रस. फेसबुकवरील नव्या-जुन्या इंग्रजी साहित्याच्या पुनर्विलोकनाला वाहिलेल्या E-Lit-E या ग्रूपची संस्थापक आणि ॲड्मिन्.

Comments


bottom of page