परतीची वाट बेघरपणाकडे? एका दलित लघुकथेतील आधुनिकता आणि स्थलांतरण यांवर चिंतन
अंकित कवाडे
मराठी अनुवाद - अन्योक्ती वाडेकर
योगीराज वाघमारे यांच्या "बेगड" (२०१३)मध्ये, १९८०मध्ये मराठीत प्रकाशित झालेल्या याच नावाच्या त्यांच्या लघुकथांच्या मूळ संग्रहामध्ये, एका तरुण दलित माणसाचे बेघरपणाच्या भावनेचे त्याच्या वडिलांच्या दृष्टिकोनातून केलेले अनुभवात्मक वर्णन सापडते. वडिलांना निवेदक म्हणून ठेवून केलेला दृष्टिकोनातील हा बदल कथेच्या आलेख आणि नैतिक तर्कवादासाठी फार महत्वाचा आहे. या गोष्टीचा सारांश अशा प्रकारे सांगता येईल: जवळजवळ चार वर्षांनी प्रकाश औरंगाबाद शहरातून ग्रामीण मराठवाड्यातील त्याच्या गावी परततो आहे. त्याचे कुटुंब एका आठवड्याच्या त्याच्या छोट्याश्या सुट्टीत त्याच्या गावाकडच्या परतीची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे. स्थानिक सरकारी ऑफिसात चपराशी म्हणून काम करणारे त्याचे वडील, विठोबा, आपला मुलगा प्रकाशच्या स्वागतासाठी बस स्टॉपवर आले आहेत. गावी परतल्यावर प्रकाश विचित्र वागू लागतो. आता शहरात नोकरी करणारा प्रकाश आपल्या वडिलांशी बोलणे टाळू लागतो. त्याचे वडील त्याचे सगळे सामान उचलून गावाच्या वेशीच्या बाहेरच्या भागात असलेल्या त्यांच्या झोपडीकडे जाणारी लांबलचक वाट चालू लागतात.
जेव्हा प्रकाश अडखळतच घरात प्रवेश करतो तेव्हा त्याला त्यांचे शेजारी आणि बौद्धवाड्यात राहणारे इतर लोक यांचा मोठा जमाव त्याला पाहण्यासाठी आलेला दिसतो. प्रकाश त्याच्या गावातला उच्चशिक्षण घेतलेला आणि शहरात चांगल्या पगाराची नोकरी करणारा पहिलाच म्हणून. हे सगळे होत असताना त्याचे वडील याबद्दल विचार करत राहतात की प्रकाशच्या अशा विचित्र वागण्याचे, भावंडांचा, आईचा आणि इतर नातेवाईकांचा उल्लेखसुद्धा टाळण्याचे आणि ग्रामीण मराठवाड्यातल्या असह्य तापमानात त्याच्यासाठी बैलगाडीची सोय केली नाही म्हणून रागराग करण्याचे कारण काय असू शकेल.
गाव सोडून शहराकडे निघालेला चार वर्षांपूर्वीचा आपला मुलगा तो हाच यावर विठोबाचा विश्वास बसेनासा होतो. आपल्या कुटुंबाच्या गावातल्या झोपडीची अवस्था पाहून वाटणारी घृणा, लहानपणी अगदी हव्याहव्याश्या वाटणाऱ्या आईच्या हातच्या जेवणाचा अचानक वाटू लागलेला तिरस्कार, आईवडिलांनी त्याच्यासाठी मामाच्या मुलीचे, सीतेचे, त्याच्या लग्नासाठी आणलेले आणि त्याला नकोसे वाटणारे स्थळ, या सर्व गोष्टी त्याला गावात, अगदी गुदमरवून टाकतात. सामाजिक आणि राजकीय पातळीवर सक्रिय असणाऱ्या औरंगाबाद शहरातील बौद्ध धर्माची स्थिती आणि आंबेडकरांबद्दलचे प्रकाशचे विचार ऐकावेत या आशेने आलेले बौद्धवाड्यातले रहिवाशी प्रकाशला उद्धटपणे म्हणताना ऐकतात की त्याचा शहरातला बराचसा वेळ त्याच्या कामातच जातो त्यामुळे त्याला बौद्ध समुदाय आणि आंबेडकररांवर विचार वगैरे करायला वेळ नसतो, तेव्हा ते निराश होऊन परततात. विठोबा आणि अंजना (प्रकाशची आई) यांना समजतच नाही की त्यांचा मुलगा एवढा कसा काय बदलला. त्याने बालपण ज्या लोकांसोबत घालवले त्यांच्याबद्दल त्याला प्रेम आणि सहानुभूती का वाटत नाही आणि आपले गाव आणि घर यांच्याबद्दल त्याला एवढी घृणा का वाटते. आठवड्याभराच्या सुट्टीवर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आलेला प्रकाश ऑफिसमधल्या तातडीच्या कामाचे खोटे कारण सांगून दोन दिवसांतच गावाहून परत माघारी निघतो.
विठोबा आणि अंजना मग त्याला राहण्याची गळ घालत नाहीत. प्रकाशचे सामान डोक्यावर वाहताना विठोबाला कळून चुकते की प्रकाशचे शिक्षण आणि त्याची नोकरी म्हणजे पोळ्याच्या उत्सवात बैलाच्या शिंगांना लावलेल्या रंगासारखे आहेत—काही दिवस त्या रंगामुळे शिंगे सोन्यासारखी चमकतात पण मग काही दिवसांनी रंग निघाला की शिंगांचा खरा पोत आणि रंग उघडा पडतो. विठोबाला उमगते की चांगले शिक्षण आणि औरंगाबादसारख्या शहरात चांगल्या पगाराची नोकरी असूनसुद्धा आपले पालक, नातेवाईक आणि आपला समाज यांच्याप्रती प्रकाशला काडीचीही जबाबदारीची जाणीव किंवा सहानुभूती नाही. विठोबा शेवटी कबूल करतो की आपले गावचे घर सोडून जाणाऱ्या मुलाला निरोप देण्यासाठी त्याच्याबरोबर चालत नसून आपण पाटलाचा, पोळ्यासाठी शिंगे रंगवलेला एखादा बैल उगाचच कुठेतरी हाकून घेऊन जात आहोत..
ओघवत्या भाषेत लिहिलेली आणि सर्वसाधारण ग्रामीण भूदृष्यांचे आणि विशेषतः बौद्धवाड्यात दिसून येणाऱ्या “अस्पृश्य” वस्तीचे अनेकस्तरीय वर्णन करणारी ही गोष्ट मुख्यत्वे आधुनिक होत चाललेल्या जाती-समाजातल्या एका बाप आणि मुलाच्या नात्याची गोष्ट आहे. त्यातला बाप हा निवेदक असून १९७०च्या दशकातील ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या सामाजिक-आर्थिक बदलांतून हे नाते उलगडत जाताना दिसते. या गोष्टीतल्या बाप-मुलाच्या नात्याच्या धमनीत असणारा विषय—वेगवेगळ्या पिढ्यांमधला आर्थिक आणि सामाजिक प्रवाहीपणा—हा काही या गोष्टीचा सर्वात रंगतदार पैलू नाही. वेगवेगळ्या पिढ्यांमधील स्थलांतरण, आधुनिक शिक्षण आणि रोजगाराच्या संदर्भातले त्याचे परिणाम हा मराठीत दलित लेखकांनी लिहिलेल्या अनेक आत्मचरित्रांचा विषय आहे. उदाहरणार्थ, नरेंद्र जाधव यांचे ‘आमचा बाप आन् आम्ही’ (१९९३) आणि दया पवार यांची ‘बलुतं’ (१९७८) ही कादंबरी. या गोष्टी, बव्हंशी ज्यांचे ‘आगमन’ झाले आहे, मग ते कुठच्याही संदर्भात असो, त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिल्या गेल्या आहेत. अशा लोकांना निरपवादपणे आधुनिक शिक्षण आणि फक्त शहरी भागात मिळू शकेल असा रोजगार हेच ‘भले’ असे वाटत असते. जाधवांच्या आत्मचरित्राने मराठी साहित्यातल्या ‘आदर्श बापा’चा स्मरणोत्सव साजरा केला; त्यासोबत महाराष्ट्रातील एका दलित कुटुंबातल्या अनेक पिढ्यांच्याबाबतीत, आधुनिक शिक्षण आणि शहरी स्थलांतरण यांचे मुक्ततेच्या संदर्भातले महत्व सांगणारे एक कथानक गुंफले. तर पवारांच्या ‘बलुतं'ने एका पुरोगामित्वाच्या प्रभावाखाली असलेल्या दलित युवकाने ग्रामीण जीवनातले दास्य आणि मुंबईसारख्या शहराची भरडून टाकणारी यांत्रिकता या दोन्हींवर प्रकाश टाकण्याचे महत्वाचे काम कसे केले त्याचा स्मरणसोहळा उभारला. २०व्या शतकाच्या उत्तरार्धातील जातिव्यवस्थेच्या बदलणाऱ्या भौतिक अवस्थांसंदर्भात केलेली ही दोन्ही वर्णने महाराष्ट्रातील शहरी-ग्रामीण स्थलांतरणाचा अत्यंत महत्वाचा असा अनुभवात्मक कार्यकारणभाव दर्शवतात.
उदाहरणार्थ, गावातल्या समाजात बहुतेक दलित जे जाती-आधारित काबाडकष्ट गुलामासारखे करत, ते करण्याच्या सक्तीचा अभाव हा वर उल्लेखलेल्या आत्मचरित्रांच्या लेखकांना निरपवादपणे एक मोठा सामाजिक आणि व्यक्तिगत लाभ वाटतो. या वर्णनांमध्ये अधोरेखित केलेला आणि त्यांच्या मुळाशी असलेला प्रभाव हा यश, भरभराट, प्रगती यांची गोष्ट सांगतो. ते ग्रामीण भारतातच राहिले असते तर त्यांचे आयुष्य जसे असते त्या तुलनेत ही गोष्ट वेगळी असली तरी अशा प्रकारचे आयुष्य जगण्यासाठी जो कडवा संघर्ष करावा लागतो तो या वर्णनांमध्ये सर्वात महत्वाचा प्रभावी असा घटक असतो.
वाघमारेंची लघुकथा या वर्णनांपेक्षा वेगळी आहे कारण ती स्थलांतरणाची आणि प्रवाहीपणाची गोष्ट मुलाच्या नव्हे तर त्याच्या बापाच्या दृष्टिकोनातून सांगते. म्हणजे ज्याचे ‘आगमन’ झाले आहे त्याच्या दृष्टिकोनातून नव्हे तर जे ‘मागे राहिले आहेत’ त्यांच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट उलगडते. म्हणूनच, चार वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर गावच्या बसस्टॉपवर आपल्या मुलाच्या स्वागतासाठी आलेल्या बापाच्या भावभावनांचे असे प्रभावी चित्रण आपल्याला पाहायला मिळते. त्या चार वर्षांत प्रकाशने आधुनिकतेच्या अनुषंगाने जे बदल अनुभवलेले असतात ते विठोबा आणि अंजना यांनी अनुभवलेले नसतात. त्यांच्याकडे यशाची किंवा प्रगतीची सांगण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. त्यांचा ऊर अभिमानाने भरून येतो तो त्यांच्या मुलाकडे पाहून; त्यांना स्वतःच्या दशेची कोणतीही पर्वा नाही. त्यांनी आपल्याला मुलाला शहरात पाठवण्याची दाखवलेली हुशारी आणि त्याला शिक्षण मिळावे म्हणून केलेला त्याग सफल झालेला असतो आणि म्हणून आपला मुलगा काही काळासाठी गावात परतणार या वार्तेने ते खूश असतात. पण, प्रकाशचे वागणे पाहून त्यांना वाटते की शहरात राहून आपला मुलगा आपल्यापासून दुरावलाय आणि त्याला आपल्याबद्दल दया किंवा सहानुभूती अजिबात नाही. प्रकाशला त्यांच्याबद्दल प्रेमच वाटत नाही. उलट, त्याला त्यांच्या आयुष्याची, चालीरीतींची, त्यांच्या अन्नाची, वागण्याची आणि त्यांना वाटणाऱ्या चिंतेची घृणा वाटते. त्याच्यासाठी या सर्व गोष्टी ग्रामीण जीवनाच्या निदर्शक आहेत, आणि शहरातल्या आयुष्यात त्याला आता या गोष्टींपासून स्थायी स्वरूपाची मुक्ती मिळाली आहे.
या गोष्टीचा अधिक स्पष्ट अशा संकल्पनेच्या स्वरूपात विचार करायचा झाला तर असे म्हटले जाऊ शकते की जिथे प्रकाशने आपले आख्खे लहानपण घालवले आणि जिथे त्याचे आईवडील सध्या राहतात त्या गावात प्रकाशला ‘बेघरपणा’ जाणवतो. वाघमारेंच्या कथनात प्रकाशचा आवाज मूक असला तरी आपल्या आईवडिलांच्या गावी परतल्यावर प्रकाशला जो तिरस्कार वाटतो त्याच्या मुळाशी असलेले शहरी आयुष्याचे काही पैलू आपल्याला जाणवतातच. ग्रामीण मराठवाड्यात अनुभवाला येणाऱ्या असह्य उकाड्याबद्दल प्रकाशचा राग आणि चिडचिड ही गावी परतल्यानंतर ग्रामीण जीवनाशी झालेली त्याची पहिली तिरस्करणीय ओळख म्हणून आधीच उल्लेखली गेली आहे. अशा असह्य उकाड्यात घरापर्यंत चालत जावे लागल्यामुळे, ग्रामीण मराठवाड्यात प्रवासाची आधुनिक साधने नाहीत या गोष्टीचा राग प्रकाश उद्धटपणे आपल्या वडिलांवर काढतो. गोष्टीत पुढे, औरंगाबादमधील आपल्या एका सहकारी (बहुधा पुरोगामी आणि सुशिक्षित) स्त्रीशी असलेले प्रकाशचे प्रेमप्रकरण हे त्याला आपल्या पालकांनी सुचवलेल्या लग्नासाठीच्या स्थळाबद्दल, गावातल्याच आपल्या मामेबहिणीबद्दल -‘सीते’बद्दल - त्याला किळस वाटते यामागचे मोठे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. विठोबा आणि अंजना सतत विचार करत राहतात की प्रकाश इतका कसा काय बदलला आणि त्याला लहानपणी इतक्या प्रिय असलेल्या गावातल्या आयुष्याची आता त्याला एवढी चीड का येते. याचे उत्तर हे आहे की गावातल्या जगण्यापेक्षा शहरातले जगणे कसे वरचढ आहे हे त्याला कळलेले असते आणि म्हणून त्याला आपल्या लहानपणाबद्दल किंवा आपल्या गावाबद्दल अजिबात ओढ वाटत नाही.
एखाद्या गोष्टीची जी ओढ माणसाला वाटत असते त्याचा प्रभाव समजून घ्यायचा असेल तर न भरून निघणारी एक कमतरता, एक पोकळी, हा एक खूप महत्वाचा घटक असतो. कारण भूतकाळाबद्दल वाटणारी ओढ ही बालपणीच्या काळाबद्दल वाटणाऱ्या ओढीसारखी असते. प्रौढपणी त्याची आठवण मनात दरवळत राहत असते आणि लहानपणीच्या निरागसतेकडे परतण्याची इच्छा ही एक अशी इच्छा असते जी पूर्ण होणे शक्य नसते. आणि ही इच्छा थोडीफार पूर्ण करून घेण्याचा एक मार्ग असतो जिथे आपण आपले बालपण घालवले त्या जागेत पुन्हा जाणे. उदाहरणार्थ, बालपणीचे आपले घर. परंतु, दोन्ही जागांमधला सोयीस्करपणा, ऐषोआराम आणि विशेष सवलती यामधला फरक प्रकाशसारख्या माणसासाठी एवढा मोठा असतो की आपल्या बालपणीच्या घरी परतण्याची इच्छासुद्धा त्याच्या मनात येत नाही. ज्यांची पिढीजात किंवा बालपणीची घरे गावांत किंवा शहर आणि नगरांत असतात त्या शहरात राहणाऱ्या आणि सुशिक्षित उच्चजातीय लोकांना त्या घरांबद्दल एक स्पष्ट ओढ वाटत असते कारण त्यांचे आधीचे घर आणि सध्याचे घर यांच्यातला सवलती आणि आरामदायीपणा या दृष्टिकोनातून असलेला फरक तितका ठळक नसतो जितका तो दलितांच्या बाबतीत असतो. त्यांना आपल्या गावच्या आणि शहरातल्या अशा दोन्ही घरी कल्पनेतसुद्धा आणि प्रत्यक्षातसुद्धा ‘आपल्याच घरी’ असल्यासारखे वाटते.
आपण इथे लक्षात घ्यायची गोष्ट आहे ती म्हणजे वाघमारेंच्या लघुकथेत प्रकाश जेव्हा गावी परततो तेव्हा त्याला जाणवणारी बेघरपणाची भावना. गावातल्या अधिकारीवर्गाने ज्याच्या काबाडकष्टांचा पुरेपूर वापर करून घेतलेला असतो, त्या विठोबाला अशी बेघरपणाची कोणतीही भावना जाणवत नसते. त्याला गावातल्या आपल्या घराकडे पाहून कुठल्याच प्रकारचे असमाधान वाटत नसते. प्रकाशच्या दृष्टिकोनातून जर विठोबाची गोष्ट सांगितली गेली असती तर ती यशाची आणि परिस्थितीवर मात केल्याची गोष्ट म्हणून पुढे आली असती. परंतु, वाघमारेंना त्यांची लघुकथा ही काही ठरावीक ‘पांढरपेशी’ दलितांची असंवेदनशीलता आणि उथळपणा यांचे चित्रण करणारी, त्यांचा मालकीविषयी हव्यास बाळगणारा व्यक्तिस्वातंत्र्यवाद आणि जातीविरोधी संघर्षात कुठल्याही सामाजिक आणि राजकीय बांधिलकीचा अभाव यांचा धिक्कार करणारी अशी हवी होती.
आपल्या आधीच्या चर्चेतून हे स्पष्ट होते की या लघुकथेतल्या प्रकाशकडे दलितांच्या त्या पिढीतली एक काल्पनिक व्यक्ती म्हणून पाहिले जाऊ शकते ज्यांना जातिव्यवस्थेने निर्माण केलेले काबाडकष्ट करण्याचे ओझे बाळगावे लागले नाही. विठोबाच्या माध्यमातून आपल्याला, त्याला त्याच्या पुरोगामी आणि सुशिक्षित मुलात दिसून आलेला प्रेमाचा आणि सहानुभूतीचा अभाव दिसून येतो. असे असले तरी, या गोष्टीच्या अंताकडे, त्यांचे नाते एक प्रकारच्या आत्मसंतुष्टतेकडे येऊन धसाला लागते.
दोघांनाही आपण आपल्या घरी असल्याची चाहूल वेगवेगळ्या ठिकाणी लागते, एकाला गावात तर दुसऱ्याला शहरात. मुलगा शहरातल्या आपल्या घरी परततो तर बाप गावातच राहतो. महत्वाचे म्हणजे, कथेत, विठोबा आणि अंजना आपल्या मुलासोबत शहरात स्थायिक होण्याची कोणतीही इच्छा व्यक्त करत नाहीत.
वाघमारेंनी प्रकाशला उदासीन मध्यमवर्गीय नागरिकाचा एक प्रातिनिधिक नमुना म्हणून पेश केले आहे. तो शहरात स्थलांतर केल्यावर आपल्या माणसांशी झालेला भावनिक दुरावा आणि अर्थपूर्ण सामाजिक आणि राजकीय बांधिलकीपासून त्याने काढलेला पळ याबाबत अजिबात चिंतित नाही. आधुनिक शहरी जीवनाने प्रकाशला त्या अनुषंगाने येणाऱ्या भौतिक सोयीसुविधा दिल्या असल्या, आणि महत्वाचे म्हणजे गावात अशा सुखसुविधांचे नसणे याचे तो अजिबात उदात्तीकरण करत नसला, तरीही त्याच्या आईवडिलांना असणारी भावनिक आधाराची गरज तो समजून घेऊ शकला नाही आणि तिला प्रतिसादही देऊ शकला नाही. त्याची आपल्या आईवडिलांप्रती एकच एक प्रतिक्रिया होती आणि ती म्हणजे पळ काढणे. विठोबाचा प्रकाशच्या बाबतीत जो अपेक्षाभंग होतो तो प्रकाशच्या सुशिक्षित असूनही उदासीन असण्याच्या बाबतीतला अपेक्षाभंग म्हणून पाहिला जायला हवा. याच उदासीनतेमुळे तो त्याच्या कुटुंबासाठी आणि गावातल्या समाजासाठी एक भावनिकदृष्ट्या बेपरवा असा एक तिऱ्हाईत माणूस बनून जातो. असे असले तरी अधिक स्पष्ट राजकीय संज्ञेत म्हणायचे तर प्रकाशची त्याच्या कुटुंबाप्रती जी काही अभिमुखता आहे ती पुरोगामित्वामधल्या आपल्या व्यक्तिगत ‘आगमना’ची व्याप्ती त्याच्या सामूहिक आविष्कारापर्यंत पोहोचवण्यातल्या अपयशाची एक गोष्ट आहे. असा एक सामूहिक आविष्कार ज्यामध्ये जाती-आधारित गुलामगिरीतून, जोखडातून सगळ्यांनाच मुक्ती मिळू शकते. इथे पुरोगामित्व म्हणजे फक्त औरंगाबादमधल्या शहरी जीवनाच्या भौतिक अवस्था असा अर्थ घेतला आहे. त्याच्या उलट प्रकाशच्या आईवडिलांचे गाव अगदी ठळकपणे वेगळे दाखवले गेले आहे. प्रकाशच्या विशिष्ट अशा उदासीनतेचे चित्रण करण्यामागे वाघमारेंचा हेतू असा दिसून येतो की भांडवलशाहीवादी पुरोगामित्व आणि वस्तूंच्या मालकीबद्दल हव्यास बाळगणारा व्यक्तिस्वातंत्र्यवाद यांचे शहरात राहणाऱ्या लोकांच्या जगण्यावर आणि विचारांवर होणारे प्रतिगामी परिणाम दाखवून द्यावेत. अशा व्यक्ती शहरातल्या आणि त्यापलीकडच्या माणसांवरही कसा नकारात्मक प्रभाव टाकतात आणि असे असूनही त्याची भावनिकदृष्ट्या कोणतीही जबाबदारी कशी झटकून टाकतात हा या परिणामांचा एक नमुना म्हणून समोर येतो.
तरी, या गोष्टीच्या कथनात विठोबाही घराच्या ओढीची कुठली लक्षणे दाखवत नाही. त्याची आधुनिकतेच्या बाबतीत जी काही अभिमुखता आहे त्याचा कस लागतो जेव्हा तो आपल्या मुलाचे उदासीन वागणे पाहतो. आपण मुलाला उच्चशिक्षणासाठी शहरात पाठवले याचा त्याला कधीच पश्चात्ताप वाटत नाही कारण प्रकाशला शहरात चांगल्या पगाराची, प्रतिष्ठित सरकारी नोकरी आहे यातच तो खूश असतो. आणि तरीही आधुनिक शिक्षण आणि रोजगार यांच्या मुक्ती मिळवून देणाऱ्या सामर्थ्याच्या मर्यादांची त्याला चांगलीच जाणीवदेखील आहे. हे आधुनिक शिक्षण आणि रोजगार त्याच्या मुलात प्रेमाची भावना ना वृद्धिंगत करू शकले ना ती थोपवून धरू शकले. किंवा सामूहिक म्हणजेच सामाजिक मुक्तीच्या राजकीय संभावनांबाबतसुद्धा या शिक्षणाने किंवा नोकरीने त्याचे प्रबोधन केले नाही. बौद्ध परंपरेमध्ये बोधिसत्त्वाने जसे समाजाच्या मुक्तीसाठी आणि प्रबोधनासाठी आपले व्यक्तिगत “आगमन” रोखले तसा प्रकाशचा कोणताही हेतू दिसत नाही. अशा शक्यतेचा विचारदेखील प्रकाशच्या मनात नाहीये आणि म्हणून त्याचे उदासीन असणे हे वाघमारेंनी या कथेत काल्पनिकीकरणाची विषयवस्तू बनवलेले दिसते.
जाधव (१९९३) आणि पवार (१९७८) यांच्या आधी उल्लेख केलेल्या आत्मचरित्रांच्या तुलनेत, जी त्यांच्या ग्रामीण-शहरी स्थलांतरणाच्या कथनात जातिव्यवस्थेच्या अमानुष पैलूंवर पुरेशी आणि महत्वाची सामाजिक टीका करतात, वाघमारेंचे काल्पनिकीकरण केलेले वर्णन जाणीवपूर्वकच, त्यांच्या कथेत उल्लेखलेल्या दोन्ही पिढ्यांकडून, अशा प्रकारचे टीकात्मक अवलोकन टाळते. त्यामुळे, वाघमारेंचे कथन वाचकाला कोणत्याही सोप्या “पर्याया”च्या मदतीविना सोडून देते आणि म्हणून ही गोष्ट एका तटस्थ आत्मसंतुष्टतेच्या समेवर संपते. विठोबा, अंजना किंवा प्रकाश यांच्यापैकी कोणीही वाचकांसाठी ‘आदर्श’ म्हणून उभे केलेले नाहीत. या कथनातून सादर केली जाते ती मराठवाड्यातील आधुनिकीकरण आणि स्थलांतराच्या प्रक्रियेत दिसून येणाऱ्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उभे करण्याची प्रेरणा. त्यामुळे या कथेतली पात्रे वेगळी ठरतात. ग्रामीण आणि शहरी जीवनावर होणाऱ्या जातिव्यवस्थेच्या परिणामांबाबत ही पात्रे कोणतीही समीक्षणात्मक जाणीव दाखवत नाहीत.
शब्दार्थसूची
बौद्धवाडा: जिथे पूर्वीचे “अपृश्य” किंवा नव-बौद्ध राहतात तो महाराष्ट्रातील गावातला विलग केलेला भाग.
दलित: हिंदू समाजात प्रचलित असलेल्या जातीच्या अप्रशस्त अशा नावांऐवजी, पूर्वीचे अस्पृश्य लोक स्वतःला संबोधण्यासाठी वापरतात ते नाव.
या नावाचा उल्लेख ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणात आढळून येतो आणि १९७० च्या दशकात महाराष्ट्रात ‘दलित पँथर्स’ नावाच्या लढाऊ संघटनेच्या उदयानंतर या नावाचा वापर अधिक लोकप्रिय झाला.
मराठवाडा: महाराष्ट्रातील प्रमुख भूभागांपैकी एक. याच्या पूर्वेला विदर्भ आणि पश्चिमेला खानदेश आणि कोकण आहेत. औरंगाबाद हे या भागातील सर्वात मोठे शहर आहे.
पाटील: आडनावाच्या रूपात सुद्धा दिसून येणारे महाराष्ट्रातील गावातल्या म्होरक्याला संबोधणारे एक (आड)नाव.
पोळा: शेती आणि संबंधित प्रक्रियांमध्ये महत्वाचा भाग असल्यामुळे बैल आणि वळू यांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करणारा, महाराष्ट्रात आणि शेजारच्या राज्यांत साजरा केला जाणारा एक ग्रामीण उत्सव.
हातकणगलेकर, एम. डी. १९८५. द मराठी सीन: नॉस्टॅलजिया व्ही. रिफॉर्म.” इंडियन लिटरेचर २८ (६): १०४-११.
कानडे, विश्वास आर. १९७२. “द लिटररी सीन इन मराठी इन १९७१.” इंडियन लिटरेचर १५ (४): ७४-८३.
किंबहुणे, आर. एस. १९९९. “अ नोट ऑन कंटेंपररी शॉर्ट स्टोरी इन मराठी.” इंडियन लिटरेचर ४३ (६): १७-२३.
अंकित कवाडे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ‘सेंटर फॅार पोलिटिकल स्टडीस्’ मध्ये एम.फिल्. करत आहे.
नीत्च आणि बाबासाहेब आंबेडकरांचा ‘मनुस्मृति’ चा अभ्यास हा त्याच्या शोध प्रबंधाचा विषय आहे. राजकीय तत्वज्ञान आणि दलित अभ्यासाच्या संशोधनात त्याला रूची आहे.