top of page
  • bilorijournal

मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’

मूळ लेखक – जेकब रिकमन

मराठी अनुवाद – आर्यायशोदा कुलकर्णी



रेखाचित्र - सेफी जॉर्ज


अमेरिकेतल्या एका खासगी संग्रहात एक अपूर्व आणि असामान्य असा ग्रंथसंग्रह दडलेला आहे. ग्रंथसूचीविषयक, पाठ्यविषयक आणि इतिहासात्मक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून बघता हा ग्रंथसंग्रह खरोखरच विलक्षण आहे. ह्या ग्रंथसंग्रहाचे अश्या प्रकारचे विश्लेषण करणारा पहिलाच समीक्षक असल्यामुळे, ह्या 29 खंड असलेल्या ग्रंथसंग्रहाचे मी, “मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’” असे नामकरण करत आहे. हा ग्रंथसंग्रह फक्त पुस्तक नसून एक वस्तू आहे आणि तिचा इतिहास हा तिच्याएवढाच विचित्र आणि आश्चर्यकारक आहे. 19व्या शतकाच्या शेवटी अस्तित्वात असणाऱ्या ट्रान्सअटलांटिक अँग्लो-अमेरिकन वर्गाच्या राहणीमान आणि संवेदना यांचे दर्शन घडवणारा हा ग्रंथसंग्रह, साहित्यिक कलाकृतीपेक्षा एखाद्या कात्रणांच्या वहीसारखा भासतो.

“मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’”ची सुरुवात 1873 किंवा 1874 साली झाली असे म्हणता येईल. 4थे बॅरन हॉलंड- हेनरी रिचर्ड फॉक्स आणि लेडी फॉक्स म्हणजेच ऑगस्टा मेरी ह्यांची दत्तक कन्या, लिक्टंस्टाइनची राजकुमारी मरी, हिने लंडनच्या मॅकमिलन अँड कंपनीतर्फे एक ग्रंथसंग्रह प्रकाशित केला. ‘इंग्लंडच्या सर्वात प्रचलित दिवाणखान्याचा’ एक अतिशयोक्तिपूर्ण वृत्तांत पुरविणारा हा ग्रंथसंग्रह - हॉलंड हाऊस(1). दोन खंड असलेल्या ह्या ग्रंथसंग्रहामध्ये, 1603 साली बांधलेल्या केनसिंगटन मॅनरमध्ये राहणाऱ्या सुविख्यात फॉक्स परिवारातल्या व्यक्तींचे रोजचे जीवन तसेच इंग्लंड आणि युरोपमधल्या प्रसिद्ध मंडळींबरोबरचे त्यांचे व्यवहार, ह्यांचा समावेश होता. मॅकमिलनने ह्या संग्रहाच्या 3 आवृत्या प्रकाशित केल्या आणि आजमितीला इंग्रजी भाषिक जगातल्या विविध ग्रंथालयांतून, त्याच्या जवळ जवळ 250 प्रती अस्तित्वात आहेत(2).


1880 मध्ये जॉर्ज वॅनडरबिल्ट, म्हणजेच जहाजे आणि रेल्वेच्या जगतात मोठे आणि कुख्यात अमेरिकी व्यावसायिक कॉर्नेलियस वॅनडरबिल्ट ह्यांचा नातू, आपल्या परिवारासोबत एका जेम्स मॅकहेनरीला भेटला. वॅनडरबिल्ट परिवाराच्या वार्षिक युरोप वारीचा भाग असलेली ही भेट मॅकहेनरीच्या हॉलंड इस्टेटीवर असलेल्या घरी झाली. तिथे हॉलंड हाऊसची 19 खंड असलेली एक प्रत जॉर्जने पहिली आणि आपल्या डायरीमध्ये तिचे वर्णन ‘नेत्रदीपक’(3) असे केले. कॅथरीन द ग्रेट पासून सॅम्युल कोलरिज पर्यंत, इंग्लंड आणि युरोपच्या प्रसिद्ध ऐतिहासिक आणि साहित्यिक मंडळीचे पत्रव्यवहार आणि चित्र असलेल्या त्या हजारो पानांनी, अठरा वर्षाच्या पुस्तकप्रेमी जॉर्जला मोहिनी घातली हयात शंका नाही.


वॅनडरबिल्ट परिवाराच्या न्यू यॉर्कमधल्या घरी असलेल्या ‘हॉलंड हाऊस’च्या 2 खंडाच्या मॅकमिलन आवृत्तीमध्ये, ह्या नेत्रदीपक संग्रहामध्ये होते तसे, ना लॉर्ड बायरनच्या केसांचा पुंजका होता ना तिसऱ्या जॉर्जच्या राज्याभिषेकाच्या आमंत्रणाचे तिकीट होते. वॅनडरबिल्टने ते खंड चाळताना, कुठल्याही पानाच्या सुरुवातीला वाचलं असतं:

विविध स्त्रोतांतून मिळवलेल्या माहितीमधून बनवलेली ह्या वास्तूची ऐतिहासिक वाङमयीन आणि चित्रित नोंद, नक्षीकाम फोटोग्राफ, नाजूक आणि दुर्मिळ छायाचित्रांनी सुशोभित हस्तलिखित पत्रे, स्वाक्षरीत लेख आणि संबंधित छापील मजकूरासोबत सर स्टीफन फॉक्स ह्यांच्या आयुष्याशी संबंधित तपशीलपूरक खंड, आणि राजकुमारी मरी लिक्टंस्टाइन ह्यांच्याशी संबंधित असलेल्या प्रख्यात आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचे किस्से आणि आठवणींतून सांगितलेला हॉलंड हाऊसचा इतिहास.(4)


1880 साली वॅनडरबिल्टने पाहिलेला हा ग्रंथसंग्रह अपूर्ण होता कारण ‘सर स्टीफन फॉक्स ह्यांच्या आयुष्याशी संबंधित तपशीलपूरक’ असे 10 खंड, मूळच्या 19 खंडांमध्ये सामील व्हायचे होते. खरंतर, ते 10 खंड पूर्ण व्हायला 1891 उजाडले आणि तोपर्यंत, दिवाळखोर झालेला आणि नावलौकिक गमावलेला मॅकहेनरी निधन पावला होता आणि हॉलंड हाऊस च्या ह्या ग्रंथसंग्रहाची मालकी जॉर्ज डब्ल्यू. वॅनडरबिल्टकडे होती. 1891 पासून, अॅशव्हील नॉर्थ कॅरोलिना इथल्या बिल्टमोर हाऊसमध्ये, वॅनडरबिल्टच्या स्वगृही, आजच्या बिल्टमोर कंपनी संग्रहात, हा ग्रंथसंग्रह ठेवला गेला आहे.


ग्रंथकोष आणि पाठ्यविषयक अभ्यास तसेच 19व्या शतकातल्या इंग्लंड आणि अमेरिकेचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या इतिहासकारांसाठी साहित्यिक संशोधनाचे नवे मार्ग मोकळे व्हावेत, ह्या हेतूने मी, ‘मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’’ चे हे टिकात्मक मूल्यांकन करत आहे. साहित्यिक टीकेच्या विविध पद्धती, कला आणि पुस्तकांचा इतिहास, अँग्लो-अमेरिकन इतिहास, कथाकथनाची विविध रुपे, सांस्कृतिक आणि ग्रंथकोषविषयक अभ्यास पद्धती ह्या विविध पैलूंचा मध्यबिंदू म्हणजेच हा अनोखा, पण अप्रसिद्ध ग्रंथसंग्रह आहे. माझ्या ह्या मूल्यांकनामार्फत, अंततः, मी एक असा शब्दकोष तयार करू इच्छितो की ज्याच्या मदतीने ह्या ग्रंथसंग्रहाचा अधिक बारकाईने अभ्यास केला जाईल.


‘हे नेमके आहे काय? त्याचा ऐतिहासिक उद्देश काय? त्याच्या इतिहासबद्दल ते काय माहिती पुरवते?’ ह्या ग्रंथसंग्रहरूपी वस्तूचा अभ्यास करताना पडणाऱ्या अश्या काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे मानस घेऊन मी हा लेख लिहित आहे. त्या दृष्टीने लेखाचे दोन भाग आहेत: पहिला, हा ग्रंथसंग्रह निर्माण होण्याची प्रक्रिया सांगत त्याच्या वेगवेगळ्या घटकांचे कार्य स्पष्ट करणे आणि त्यातून दुसऱ्या भागात प्रवेश करत, एका विशिष्ट कालखंडातल्या विशिष्ट अँग्लो-अमेरिकन वर्गाच्या गुणविशेषांचे प्रदर्शन घडवणे.


ह्या ग्रंथासंग्रहाकडे एक वस्तू म्हणून पाहणे जास्त सोपे आहे. फक्त बिल्टमोर कंपनीच्या संग्रहातच ही वस्तू पाहायला मिळते, आणि एका बैठकीत, एकामागोमाग एक वाचण्यासारखे हे खंड नाहीत हेही पटकन लक्षात येते. सगळ्या 29 खंडांची बांधणी मोरोक्कन लेदरमध्ये केलेली आहे आणि पृष्ठभागावर छापलेली अक्षरे नक्षीकामाने सजवलेली आहेत. जडशीळ आणि मोठ्या (प्रत्येक पुस्तक 12 ½” × 16 3/8” आहे) अश्या ह्या पुस्तकांवरून हे नक्की दिसून येते की ह्या ग्रंथसंग्रहाचे दृश्य स्वरूप आतल्या माजकुरेवढेच महत्वाचे आणि प्रदर्शनीय होते. कुठलाही खंड घेऊन चाळायला सुरुवात केली तर त्यात राजकुमारी मरीच्या लिखाणापेक्षा अनेक दुर्लभ अश्या ‘मेझोटींट’ पैकी एखादा किंवा युरोपच्या अनेक ऐतिहासिक व्यक्तींपैकी एकाच्या स्वाक्षरीत पत्र नक्की सापडेल. लिखाणातून पुस्तकातली गोष्ट पुढे सरकते पण बरोबर जोडलेल्या नानाविध चीजवस्तू आणि चित्रांना जास्त महत्व दिले गेले आहे हे प्रकर्षाने जाणवते. मजकुरात ऑलिवर क्रॉमवेलचा उल्लेख झाला की त्यानंतर लगेचच ‘लॉर्ड प्रोटेक्टर’ ही उपाधी असलेल्या क्रॉमवेल बद्दलची छापिल कात्रणे आणि माहिती येते (हॉलंड हाऊस हे त्या काळात झालेल्या सिव्हिल वॉर/ नागरी युद्धामधले मध्यवर्ती घराणे होते). राजकुमारी मरीच्या ह्या कथनात उल्लेख झालेल्या प्रत्येक व्यक्ती किंवा जागेचे वर्णन अशाच प्रकारे केलेले आहे.


ह्या भरगच्च ग्रंथांना आणि त्यात असलेल्या सगळ्या चीजवस्तूंना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, पुरवलेल्या अनुक्रमणिकेकडे मी वळलो. अनुक्रमणिकेत सापडणाऱ्या काही मनोरंजक चीजवस्तूंमध्ये, लॉर्ड बायरनच्या केसांचा पुंजका, कॅथरीन द ग्रेट ने लिहिले पत्र (इंग्रजी अनुवादासह मूळ रशियनमधले), सर निकोलसने लिहिलेला राजकुमार रूपर्ट आणि पहिल्या चार्ल्समध्ये झालेला पत्रव्यवहार (ज्यात स्वतः राजाने लिहिलेला ताजा कलम आहे) आणि नेपोलियनच्या हस्ताक्षरातील पत्रे आहेत. (ज्यावेळी राजकुमारी मरीने हा ग्रंथसंग्रह तयार केला तेव्हा, हॉलंड हाऊस ही ‘व्हिग’ गढी होती आणि बोनापार्टला समर्थन देणाऱ्या इंग्लंडच्या वरच्या वर्गातले शेवटचे कूळ होते.)(5) “मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’” चाळत असताना समोर येणाऱ्या अनेकानेक चीजवस्तू बघता, हा ग्रंथसंग्रह म्हणजे एखादा विश्वकोष आहे असे वाटते; पण जसजसे आपण त्यात गुंतत जातो तसे लक्षात येते की विश्वकोष बनवण्याचा हेतू नसून, जितक्या जास्त दुर्मिळ आणि अद्वितीय वस्तू गोळा करता येतील तितक्या करण्याचा हा एक प्रयत्न आहे. प्रत्येक पानावर लिहिलेल्या मजकुराला मजबूत करण्याचे काम, ह्या पूरक चीजवस्तू करतात. थोडक्यात सांगायचे तर “मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’”चा उद्देश इतिहासाची नोंदवही होणे नाही तर घडलेल्या इतिहासाचे एक जिवंत रूप उभे करणे हा आहे.


एकुणात, ह्या वस्तूला स्वतःचे ऐतिहासिक महत्त्व आणि इतिहासाशी असलेल्या नात्याचे महत्त्व ह्या दोन्ही गोष्टींची चांगली जाणीव असल्याचे दिसते. उत्तर आधुनिकतावादाच्या दृष्टिकोनातून घडून गेलेल्या घडामोडींचा पुनरुच्चार करण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने इतिहास संशोधन करणारा हा ग्रंथसंग्रह आद्य-आधुनिकतावादाचे(‘प्रोटो-मॉडर्नीझम’चे) उदाहरण म्हणता येईल. ‘इतिहास हा शेवटी सगळ्यात सक्रिय आणि शक्तिशाली माणसाच्या मालकीचा असतो’ हे नीत्शेचे इतिहास संशोधनावरचे वाक्य मनात येते. ही अशी वस्तू आहे जिला तिच्यामध्ये जमवलेल्या नानाविध चीजवस्तू, कात्रणे, चित्रं आणि फोटोंमधून उत्पन्न होणाऱ्या चित्तवेधक आणि रहस्यमय भावनांमध्ये जास्त रस आहे. 19व्या शतकाच्या सुरुवातीला हॉलंड हाऊसचे रहिवासी, व्हिग इतिहासाचे(6) प्रमुख प्रवक्ते म्हणून ओळखले जायचे आणि म्हणूनच ‘ऐतिहासिक तथ्या’ पेक्षा ‘इतिहास’ हाच ह्या ग्रंथसंग्रहचा मूळ विषय असणे हा उपरोधाभास आहे. असे असताना, वाचकाला माहिती पुरवण्यापेक्षाही प्रभावित करणे ह्या उद्देशाने तयार झालेली ही वस्तू, स्वतःच्या निर्मितीसंबंधी काहीच सांगत नाही. तिच्या निर्मितीचा अंदाज लावण्यासाठी टीकाकाराच्या नव्हे तर एका संग्रहकाच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.


बिल्टमोर कंपनी संग्रहातल्या आणि इतर काही ऐतिहासिक दस्तावेजांमधून मिळवलेल्या महितीनुसार तीन प्रमुख व्यक्तींकडे ह्या ग्रंथसंग्रहाच्या निर्मितीचे श्रेय जाते. जेम्स मॅकहेनरी, रेल्वेचे व्यावसायिक अंदाज काढणारा आयरीश-अमेरिकन; फ्रांसिस हार्वे, ब्रिटिश पुस्तक निर्माता आणि दुर्लभ छापील लिखाणांचा व्यापारी; आणि स्वतःची वेगळी जीवनशैली तयार करण्यात रमलेला जॉर्ज डब्ल्यू. वॅनडरबिल्ट, अमेरिकी व्यावसायिक कॉर्नेलियस वॅनडरबिल्ट ह्यांचा नातू. ह्या तीन व्यक्तींची चरित्र अभ्यासण्यात मला रस नाही. पण 19व्या शतकाच्या उत्तरार्धातल्या अँग्लो-अमेरिकन समाजाच्या सांस्कृतिक आणि वैचारिक वातावरणाचा अभ्यास ह्या तिघांच्या आयुष्यातून करण्यात मला रस आहे.

“मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’” हे जेम्स मॅकहेनरीच्या छंदातून निर्माण झालेले कष्टाचे फळ होते. 1862 साली त्याने पश्चिम लंडन मधल्या हॉलंड इस्टेटच्या अॅडीसन रोडवर जागा विकत घेतली.(7)


युरोपमधल्या राणी इसाबेला आणि तिसऱ्या नेपोलियन सारख्या प्रख्यात व्यक्तींशी संबंध असेलेल्या मॅकहेनरीला आपली प्रतिष्ठा आणि समृद्धी दाखवायची आवड होती. त्या हिशोबाने पाहता, नुकत्याच विधवा झालेल्या लेडी हॉलंड राहत असलेल्या प्रचलित हॉलंड इस्टेटवरची ही जागा मॅकहेनरीसाठी अगदी परिपूर्ण ठरली. ‘ओक लॉज’ नाव असलेल्या त्याच्या ‘सुंदर सदना’साठी ही जागा अतिशय योग्य होती(8). 1889 साली जॉर्ज वॅनडरबिल्टला लिहिलेल्या पत्रात मॅकहेनरी, लेडी हॉलंडचे ’30 वर्षाचे सौजन्य असलेली एक चांगली मैत्रीण’ असे वर्णन करतो. मॅकहेनरीने हॉलंड इस्टेटवर राहायला सुरुवात केल्यावर लगेचच लेडी हॉलंडशी एक सख्य तयार केलं होतं हे ह्या पत्रावरनं लक्षात येते(9). फॉक्स परिवराशी असलेल्या जवळीकीमुळे मॅकहेनरी आणि राजकुमारी मरी ह्यांची भेट, हॉलंड हाऊस 1873-74 मध्ये प्रकाशित व्हायच्या आधी झाली असण्याची शक्यता आहे.


जून 1875 मध्ये, मॅकहेनरीने फ्रांसिस हार्वेकडून हॉलंड हाऊस च्या मूळच्या 19 खंडांपैकी पहिल्या 12 खंडांच्या सचित्रित आवृत्त्या मिळवल्या(10). 1872 ते 1875 मध्ये मॅकहेनरी आणि हार्वे दोघांनी किमान 7 वेगवेगळ्या खाजगी साहित्यिक प्रकल्पांवर एकत्र काम केलेले असल्यामुळे, मॅकहेनरीचे ‘हॉलंड हाऊस’ साठी हार्वेकडे जाणे आश्चर्याचे नव्हते. मात्र त्या 7 प्रकल्पांपेक्षा ‘हॉलंड हाऊस’च्या ह्या रुपाचा दर्जा नक्कीच अधिक व्यापक होता. दुर्लभ आणि दुर्मिळ लिखाण आणि चित्र मिळवण्याचे हार्वेचे कसब बघता, “मॅकहेनरी-हार्वे ‘हॉलंड हाऊस’” मधल्या सगळ्या चित्रांची जबाबदारी मॅकहेनरीने हार्वेकडे सोपवली, किंबहुना मजकुरासंबंधीची जेवढी मिळतील तेवढी चित्र आणि लेख मिळवण्याची मोकळीक मॅकहेनरीने हार्वेला दिली. ग्रंथसंग्रहात सापडणारी विविध हस्तलिखिते आणि पत्र मिळवण्यासाठी मात्र, दोघांनी मिळून काम केले(11). हा ग्रंथसंग्रह बनवण्यात मॅकहेनरीचा सक्रिय सहभाग होता हे लक्षात येते. विविध स्त्रोतांमधून माहिती जमवून बनवलेल्या साहित्यिक कृतींचे खरे निर्माता कोण हे ठरवणे कधीकधी अवघड जाते. मात्र “मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’”च्या निर्मितीत मॅकहेनरी फक्त प्रायोजक नव्हता तर त्याने मोलाचा भाग सांभाळला हयात शंका नाही(12).


मॅकहेनरीच्या हॉलंड हाऊसशी संबंधित व्यक्तींबरोबर असलेल्या ओळखीची पोचपावती म्हणजे हा ग्रंथसंग्रह आहे. हा ग्रंथसंग्रह तयार करण्यामागे, त्या ओळखींची माहिती देऊन, स्वतःच्या एका विशिष्ट प्रतिष्ठेची नोंद समाजासमोर आणण्याचा मॅकहेनरीचा हेतू असावा. राजकुमारी मरीने मूळ हॉलंड हाऊस ह्याच हेतुने तयार केले असावे. मॅकहेनरी आणि हार्वेला आपल्या कामाच्या ऐतिहासिक महत्वावर भक्कम विश्वास होता म्हणून त्यांनी 1882 मध्ये, 19 खंडांचे “मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’” प्रकाशित झाल्यानंतर तब्बल 5 वर्षांनी, ह्या ग्रंथसंग्रहाच्या आणखी 25 प्रती छापल्या. फिलाडेल्फियाच्या द पब्लिक लेजर ह्या वृतपत्राच्या मालकाला, जॉर्ज डब्लयू, चाइल्डस्ला लिहिल्या पत्रात मॅकहेनरीने लिहिले आहे की त्याच्या ‘सचित्र ‘हॉलंड हाऊस’च्या आवृत्तीमध्ये असलेला मजकूरामुळे (हा ग्रंथसंग्रह) नावावरून वाटतो त्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे.’(13) असे असतानाच ह्या ग्रंथसंग्रहाची एक ‘स्टेटस सिंबॉल’ म्हणूनही ओळख होती. मॅकहेनरीने हार्वेला कामाचा मोबदला म्हणून 1410 पाउंड, ज्याची किंमत आजच्या काळात 100,000 पाउंडपेक्षाही जास्त, दिले होते(14).


मग ही महाग आणि लक्षणीय अशी वस्तू जॉर्ज वॅनडरबिल्ट ह्या तिऱ्हाइताकडे का आली? मॅकहेनरीची दिवाळखोरी जाहीर झाल्यानंतर पण तो मरायच्या आधी, त्याने वॅनडरबिल्टला हा ग्रंथसंग्रह विकला. येणाऱ्या दिवळखोरीच्या कार्यवाहित हा ग्रंथसंग्रह हरवू नये म्हणून आणि त्याच्या सावकारांना भूल देण्याच्या उद्देशाने मॅकहेनरीने हे पाऊल उचलले(15). वॅनडरबिल्टच का? ह्या प्रश्नाचे सोपे उत्तर असे की हा ग्रंथसंग्रह मिळवण्यात वॅनडरबिल्टला रस होता आणि त्यासाठी तो लागेल ती किंमत द्यायला तयार होता. पण मॅकहेनरीचे ग्रंथसंग्रहाशी असलेले भावनिक नाते विसरून चालणार नाही. त्या नात्यामुळेच कदाचित, मॅकहेनरीला वॅनडरबिल्टमध्ये त्या ग्रंथसंग्रहाचा योग्य मालक दिसला.


मॅकहेनरीला असे वाटण्याचे कारण समजण्यासाठीचा संदर्भ इथे पुरवणे गरजेचे आहे. 19व्या शतकात झालेल्या अमेरिकन उद्योगजताच्या वाढीतून समृद्ध झालेल्या अनेकांपैकी, वॅनडरबिल्ट परिवार एक होता. पण, कॉर्नेलियस वॅनडरबिल्ट ह्यांचा नातू म्हणून मिळालेल्या पिढीजात संपत्तीचा वापर, जॉर्ज वॅनडरबिल्टने वेगळ्या पद्धतीने केला आणि अमेरिकेच्या ‘सोनेरी युगा’तून निर्माण झालेल्या श्रीमंत वारसदारांपेक्षा स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले. बिल्टमोर कंपनीसाठी काम करणाऱ्या इतिहासकारांनी जॉर्ज वॅनडरबिल्टचे, शंभरावे वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्राच्या (अमेरिका) सांस्कृतिक जडणघडणीवर प्रभाव पाडण्यात भाग घेऊ इच्छिणारे स्वपुरस्कृत ‘मेडीचीयन’ व्यक्तिमत्व, असे वर्णन केले आहे. जुन्या काळातल्या इटलीतल्या फ्लोरेंस शहरात राहणाऱ्या ‘मेडीची’ परिवाराप्रमाणे, जॉर्जने सामान्य लोकांचे प्रेम आणि आदर मिळवण्यासाठी अनेक सेवाभावी उपक्रम राबवले. मॅनहॅटनमधल्या सुरुवातीच्या सामुदायिक ग्रंथालयांपैकी एक असलेले जॅकसन स्क्वेअर लायब्ररीचे बांधकाम तसेच अॅशव्हील, नॉर्थ कॅरोलिना इथल्या कृष्णवर्णीय समाजासाठी बांधलेले सार्वजनिक केंद्र हे त्यातलेच काही होते(16). वॅनडरबिल्ट पुस्तकप्रेमी आणि विविध कलांचा आश्रयदाता होता आणि ‘ग्रोलियर क्लब’ नावाच्या न्यू यॉर्क पुस्तकप्रेमी मंडळाच्या संस्थापकांपैकी एक होता. 1889 ते 1896मध्ये पश्चिम नॉर्थ कॅरोलिना इथे, पारंपरिक पद्धतीने बांधलेले बिल्टमोर हाऊस, वॅनडरबिल्टच्या सौंदऱ्यवादाच्या संकल्पनेचा सर्वोत्तम नमुना समजले जाते. बिल्टमोर हाऊस हे आज अमेरिकेतले सर्वात मोठे खाजगी घर आहे. न्यू यॉर्क आणि न्यू इंग्लंड राज्यांच्या बाहेर असणाऱ्या, अमेरिकेच्या ‘सुवर्ण युगा’चे नेत्रदीपक दर्शन घडवणाऱ्या, शेवटच्या उदाहरणांपैकी ते एक आहे.


बिल्टमोर हाऊसमधल्या एक खोलीचे, बँक्वेट हॉलचे, बिल्टमोर कंपनीच्या एका इतिहासकाराने केलेले वर्णन इथे देऊ इच्छितो. ह्या वर्णनातून, विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वस्तूंचे केलेले जतन आणि त्यामागचा हेतू स्पष्ट करण्याचा माझा प्रयत्न आहे – (ह्या बँक्वेट हॉलमध्ये) विंटर गार्डनमधून आत प्रवेश केल्या केल्या, इंग्लंडच्या प्रसिद्ध हॅडन हॉल किंवा हार्डविक हॉलशी असलेले साधर्म्य लगेचच जाणवते. मध्ययुगीन किंवा रेनेसांस शैलीतल्या इंग्लीश घरातून असलेले सोन्या-चांदीने सजवलेले, राहत्या परिवाराचे ध्वज आणि चिन्ह असलेले, मोठे दालन हे प्रामुख्याने तिथल्या ‘लॉर्ड’च्या विधी आणि शिष्टाचारासाठी असायचे. बिल्टमोर बँक्वेट हॉलचे रूप अगदी तसेच आहे पण त्यामागे शिष्टाचाराचे नव्हे तर इतिहासाचे दर्शन घडवणे, हा हेतू आहे. वॅनडरबिल्ट घराणे युरोपीय राजघराण्यांच्या व्याख्येत बसणारे नव्हते तरीही जॉर्ज वॅनडरबिल्टने स्वतः घराण्याचे विशेष चिन्ह बनवून घेतले होते आणि ह्या बँक्वेट हॉलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कोरून घेतले होते. कोलंबसने अमेरिकेत ब्रिटिश वसाहत तयार करते वेळी अस्तित्वात असलेल्या युरोपीय राज्यांचे निशाण आणि अमेरिकेच्या 13 वसाहतींचे झेंडे संपूर्ण छताभोवती माळलेले होते. व्हीनस आणि मार्सचे प्रेमप्रकरण हा विषय विविध पद्धतीने हॉलमध्ये दाखवला गेला आहे: आधी, उत्तर-दक्षिण असणाऱ्या भिंतींवर लावलेल्या 16व्या शतकातल्या टेपेस्ट्रींवर आणि नंतर, पूर्व-पश्चिम जाणाऱ्या हॉलच्या भिंतींच्या वरच्या भागातल्या कार्ल बिटर ह्या व्हीएनीज शिल्पकाराने बनवलेल्या ‘फ्रिझ’वर. वॅगनरच्या ‘टॅनहौसर’ ह्या ओपेराला केलेले हे मनमोकळे वंदन होते (हॉलच्या वरती असलेल्या ऑर्गन चेंबरच्या खोलीत वॅगनरचे नाव कोरलेले आहे)(17).- अश्या रीतीने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वस्तू जतन करण्याबद्दल काय म्हणावे?


अश्या प्रकारे मौल्यवान वस्तू जमवून त्यांच्यामार्फत स्वतःचे समाजातले (उच्च) स्थान मिरवणे, हे नवीन नाही. 19व्या शतकात जुन्या शैलीतले बांधकाम असलेली घरे बांधण्यातही नवीन काहीच नाही (न्यूपोर्ट, ऱ्होड आयलंडला एक चक्कर मारलेली पुरते). बिल्टमोर इतिहासकारांनी वर्णन केलेले हे जतन आणि जमवलेल्या सर्व वस्तूंचे प्रदर्शन करण्याच्या पद्धतीतून, असे वाटते की वॅनडरबिल्ट, ‘इतिहासा’कडे एक वस्तू म्हणून बघायचा आणि ह्या मिळवलेल्या, वडिलोपार्जित वस्तूचे तिला साजेसे प्रदर्शन केले पाहिजे असा त्याचा विश्वास होता. बँक्वेट हॉलप्रमाणेच, बिल्टमोर हाऊसचे ग्रंथालयही जुन्या शैलीतल्या वेगवेगळ्या कलाकृतींनी सजलेले आहे. बरोक शैलीतल्या इटालियन चित्रकार जिओवानि पेलेग्रीनीने काढलेल्या ‘फ्रेस्को’ने ह्या खोलीचे छत सजले आहे; 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या इंग्लीश ‘रिवायवलीझम्’ पद्धतीने बनवलेले फर्निचर आहे आणि फ्रेंच ‘नियोक्लासिझम्’ पद्धतीची शिल्प आणि मूर्ती आहेत. संपूर्ण बांधकाम झाल्यावर ह्या ग्रंथालयात सुमारे 20,000 पुस्तके होती, ज्यातील जवळजवळ सगळी अजूनही तिथेच ठेवलेली आहेत (18). बिल्टमोर हाऊसचे बांधकाम सुरू व्हायच्या आधीच मॅकहेनरीला त्याची माहिती होती आणि 1889 मध्ये वॅनडरबिल्टला लिहिलेल्या एक पत्रात त्याने लिहिले होते की - “मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’”, बिल्टमोर ग्रंथालयाचा भाग होण्याच्या दर्जाचे नक्की आहे. त्यावेळी बिल्टमोर ग्रंथालयाचे बांधकाम आणि “मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’” च्या खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरू होती.(19)


“मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’”च्या निर्मितीमागचे ‘प्रोटो-मॉडर्निझम्’चे तर्क बिल्टमोर हाऊसच्या बांधकामामागेही होते असे मला वाटते. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य असलेल्या वस्तूंचे केलेले जतन आणि दिखाऊपणे केलेले प्रदर्शन हे ह्या तर्कात प्रभाव पाडण्याचे काम करते. “मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’”च्या अशा प्रभाविपणामुळेच वॅनडरबिल्टला ते आकर्षक वाटले आणि मॅकहेनरीने त्याला ते दिले. ह्या घडामोडींचा ऐतिहासिक मागोवा अधिक बारकाईने घेण्याची गरज आहे; पण थोडक्यात सांगायचे तर, मॅकहेनरी आणि वॅनडरबिल्ट ह्या दोघांमध्ये फार साम्य नव्हते पण ते दोघंही एका अशा उभरत्या, आंतरराष्ट्रीय, श्रीमंत (राजघराण्याशी संबंध किंवा खानदानी उच्चकुलीन नसलेल्या) वर्गाचे प्रतिनिधी होते जे स्वतःला इतिहासाचे वारसदार म्हणून पहायचे. इतिहासाकडे एक वस्तू म्हणून पाहणे आणि ह्या वस्तूला वारसाहक्क समजून विविध कलाकृतींमधून प्रदर्शित करण्याची वृत्ती इथे दिसते(20). एका परीने, “मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’” हे छोट्या प्रमाणावर जॉर्ज वॅनडरबिल्टच्या आयुष्याचे चीज आहे. (कदाचित असे म्हणणे म्हणजे ‘सुवर्ण युगा’तल्या अजून एका निर्मितीचे जास्त उदारपणे कौतुक करणे आहे का?)


“मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’” हे साध्या भाषेत बोलायचे तर एखाद्या कात्रणवहीपेक्षा वेगळे नाही, कारण मॅकहेनरीने राजकुमारी मरीच्या हॉलंड हाऊसच्या स्वरूपातच हा ग्रंथसंग्रह तयार केला आणि त्याच्या दृष्टीने महत्वाच्या, त्याच्या जवळच्या ऐतिहासिक व्यक्तिंशीसंबंधित वस्तूंचे प्रदर्शन करण्यासाठी त्याचा मापदंड म्हणून वापर केला. ह्या ऐतिहासिक व्यक्तींचे महत्व होते कारण मॅकहेनरीच्या दृष्टीने तो ह्या व्यक्तींच्या सामाजिक स्थानाचा खरा वारसदार होता आणि त्यातल्या काहींच्या अस्तित्वावर त्याचा प्रभावही होता(21). पण बाकीच्या ऐतिहासिक कात्रणवह्यांच्या तुलनेत ह्याचे मूल्य समान आहे का?(22) हा ग्रंथसंग्रह एक सर्जनशील (की फक्त शौक म्हणून बनवलेली) कलाकृती आहे का? सर्जनशील असली तरी तिचे ‘साहित्यिक’ मूल्य काय? ह्यापलीकडे जाऊन विचार करता, ह्या प्रकारची कलात्मक अभिव्यक्ती बिल्टमोर हाऊस किंवा “मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’” सोडून अजून कुठे दिसते? जर “मॅकहेनरी- हार्वे ‘हॉलंड हाऊस’” हे खरोखरच सर्जनशील काम आहे असे मानले तर एखाद्याच्या आयुष्याला त्याच सर्जनशीलतेचे फळ, जसे वॅनडरबिल्टच्या बाबतीत घडले तसे, म्हणता येईल का? तसे असेल तर अजून कोणाच्या बाबतीत हे सत्य आहे?


अनेक प्रश्न विचारून आणि कदाचित एकाचेही उत्तर न देता, मी माझा निष्कर्ष समोर ठेवला आहे असे मला वाटते: ही हॉलंड हाऊसची अनोखी मॅकहेनरी- हार्वे आवृत्ती खरोखर अभ्यासण्याजोगी आहे. ह्या अभ्यासातून आपल्याला 19व्या शतकातच्या शेवटाच्या अँग्लो-अमेरिकन समाजाच्या सांस्कृतिक आणि वैचारिक वातावरणाचा अंदाज येईल आणि पाठ्य आणि पुस्तकांच्या अंतरंगाचे दर्शन घडेल.




(1) लिंडा केली ह्यांच्या हॉलंड हाऊस: अ हिस्टरी ऑफ लंडन’स् मोस्ट सेलिब्रेटेड सलोन (लंडन: टाउरिस, 2013) ह्या पुस्तकाचे शीर्षक बघा.


(2) मला, यु.के, यु.एस, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयरलॅंड, फ्रांस, नेदरलँड्स, न्यू झीलंड, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि लिक्टंस्टाइन ह्या देशांमधल्या ग्रंथालयांतून 3 आवृत्या 2 खंडांमध्ये समाविष्ट असलेल्या 246 प्रती सापडल्या आहेत. तिसरी आवृत्ती एकाच खंडात असल्याची एक नोंद आहे. खाजगी ग्रंथालयातून अजून माहिती नसलेल्या प्रती असतील ह्याची मला खात्री आहे.


(3) जॉर्ज डब्ल्यू. वॅनडरबिल्ट, ‘1880 ट्रॅवल जर्नल’, 15 मे 1880, 7, बिल्टमोर संग्रह , अॅशव्हील, नॉर्थ कॅरोलिना.


(4) प्रिन्सेस मरी एच. एन. लिक्टंस्टाइन, द हिस्टरी ऑफ हॉलंड हाऊस.. कलेक्टेड अँड अरेंज्ड फॉर जेम्स मॅकहेनरी इएसक्यु बाय फ्रांसिस हार्वे, वॉल.1, स. 1875-1882, बीएच8-24853, बिल्टमोर आरकाईवस्


(5) विल बोवर्स. “द मेनी रूम्स ऑफ हॉलंड हाऊस” इन री-इव्हॅल्यूएटिंग द लिटरेरी कोटेरि 1580-1830, इडीएस. विल बोवर्स अँड हॅना लिया कृमे (लंडन: मॅकमिलन), 164, ‘Lady Holland was a strong admirer of Napoleon long after it was fashionable to be one.’


(6) बोवर्स पाहणे


(7) ‘द हॉलंड इस्टेट: टू 1874’, सर्वे ऑफ लंडन: वॉल्यूम 37, नॉर्दन केनसिंगटन मध्ये, एडी. एफ एच डब्लयू शेपर्ड (लंडन: लंडन काऊंटि काऊंसिल, 1973), 101-126 ब्रिटिश हिस्ट्री ऑनलाइन


(8) द अँग्लो-अमेरिकन टाइम्स, ‘द लेट जेम्स मॅकहेनरी’, 3 जुलै 1891 आणि द सन, ‘ओबीच्युअरी’, 27 मे 1891


(9) मॅकहेनरी कडून वॅनडरबिल्टशी झालेला पत्रव्यवहार, 25 सप्टेंबर 1889, 3.9/4, बी1, एफ1, बिल्टमोर संग्रह


(10) हार्वेकडून वॅनडरबिल्ट, 7 जून 1892, 3.8/1, एफ16, बिल्टमोर संग्रह


(11) मॅकहेनरी कडून वॅनडरबिल्ट, 28 सप्टेंबर 1889, 3.914 बी1, एफ1, बिल्टमोर संग्रह, 1889 सालच्या एक पत्रव्यवहारात तयार होणाऱ्या 10 खंडांमधल्या मजकुराबद्दल चर्चा करतात: मॅकहेनरी ‘हॉलंड हाऊस संदर्भात नवीन काही मजकूर सापडल्याने आणि पुढच्या खंडांमध्ये त्यांचा समावेश करण्यासाठी’ उत्साहित होता.


(12) ‘विविध स्त्रोतांमधून माहिती जमवून बनवलेल्या साहित्यिक कृती’ म्हणजे ‘grangerizations’, अधिक माहितीसाठी पहा, जिल गेज, ‘विथ डेफ्ट नाईफ अँड पेस्ट: द एक्स्ट्रा-इलस्ट्रेटेड बूक्स ऑफ जॉन एम. विंग’: अ जर्नल ऑफ रेर बूक्स, मॅन्यूस्क्रीप्टस्, अँड कल्चरल हेरिटेज, 9:1. बाकी ‘grangerizations’शी तुलना करून बघता येईल.


(13) ड्रेक्सेल यूनिवर्सिटी मध्ये ठेवलेल्या लिस्ट ऑफ पोर्ट्रेटस् च्या सुरुवातिला हे पत्र आहे. ही प्रत चाइल्डस् ने स्वतः ड्रेक्सेलला दान दिली होती, ह्याची पुस्तकात मागच्या बाजूला नोंद आहे. (ड्रेक्सेल युनि. ग्रंथसंग्रहलायचा रेफ्रेन्स नंबर आहे 914.2 क्युएच26 2914) ह्या बरोबर ग्रंथसंग्रहाचे बिल्टमोर संग्रहात 2 प्रती, येल यूनिवर्सिटीमध्ये 1 प्रत, न्यू यॉर्क सिटि पब्लिक ग्रंथालयात 1 प्रत आणि ऑक्सफोर्ड च्या बोडलेयॅन मध्ये 1 प्रत आहे.


(14) नोट 10 मधल्या, हार्वेनी वॅनडरबिल्टला 7 जून 1892 मध्ये लिहिल्या पत्रात ह्या रकमेचा उल्लेख आहे.


(15) 27 मे 1891 च्या फिलाडेल्फिया टाइम्स मधल्या मृत्युलेखात मॅकहेनरी हा ‘पैसे उधळणारा’ होता असे नमूद केलेले आहे. 30 एप्रिल 1895ला बरचम अँड को च्या वकील आणि वॅनडरबिल्टमध्ये झालेल्या पत्रव्यवहारत त्यांच्या एक ग्राहकाचा उल्लेख आहे ज्याने मॅकहेनरीला पैसे उसने दिले होते आणि त्या बदल्यात मॅकहेनरीच्या मृत्यूनंतर ‘द हिस्टरी ऑफ हॉलंड हाऊस, 19 खंड’ त्याला मिळणे अपेक्षित होते.


(16) वॅनडरबिल्ट हा मेडीचींसारखा होता ह्याचा उल्लेख, पहा एलन रिकमन, ‘द अमेरिकन रेंनेसांस अॅट बिल्टमोर इस्टेट: जॉर्ज वॅनडरबिल्ट अॅज कलेक्टर’ (अप्रकाशित), ˜2000, बिल्टमोर कंपनी


(17) नोट 16चाच संदर्भ


(18) बिल्टमोर कंपनी म्युझीयम सर्विसेस, कंप्लीट लिस्ट ऑफ जीडब्लयूवी’स् बूक्स, इलेक्ट्रोनिक, बिल्टमोर कंपनी


(19) मॅकहेनरी आणि वॅनडरबिल्टमध्ये झालेला पत्रव्यवहार, 4 जानेवारी 1889, 3.8/1 बी1, एफ16, बिल्टमोर संग्रह


(20) इतिहासकार म्हणून बघताना ह्या वृत्तीचा अधिक विचार करणे बरोबर वाटते. ‘प्रोटो-मॉडर्नीझम’चे हे मूळ तिसऱ्या लॉर्ड आणि लेडी हॉलंडने रुजवले असे म्हणता येईल. त्या काळात हॉलंड हाऊसशी संबंधित लोकं ही एक सांस्कृतिक समूहाचे होते. हा समूह प्रामुख्याने युरोपीय होता ‘एक सामाजिक इशारा’ आणि वैचारिक स्त्रोत म्हणून काम करायचा. (विल बोवर्स, ‘द मेनी रूम्स ऑफ हॉलंड हाऊस’, 159, 174.) ह्या समूहात, व्हीग इतिहासात आणि मॅकहेनरी-वॅनडरबिल्ट च्या ‘प्रोटो-मॉडर्नीझम’ मध्ये काय समानता आहे हे इथे विचारणे संभवते.


(21) स्पेनची राणी इसाबेलाला राज्यकर्ती म्हणून पुन्हा निवडून देण्याचा प्रयत्न स्वतः मॅकहेनरीने केला आणि तिसऱ्या नेपोलीयनला फ्रांसमधून हद्दपार करण्यात मॅकहेनरी ने भाग घेतला असे द सन (27 मे 1891) मध्ये लिहिल्या मृत्युलेखात नोंद आहे.


(22) ‘लेखना’च्या अपारंपरिक पद्धतींच्या संदर्भात हा प्रश्न उपस्थित होतो. अमेरिकन कात्रणवह्यांच्या एलन गार्वेनी केलेल्या अभ्यासातून हे निदर्शनास आले की कात्रणवह्या तयार करणारे लोकं हे ‘तुलनेने निर्बल’ असतात आणि म्हणूनच ‘स्वतःच्या लेखनातून जगासमोर येत नाहीत.’ हयातून खाजगी वस्तूंच्या मूल्याबद्दल आणि त्यांच्या संग्रहाबद्दल अनेक रंजक प्रश्न निर्माण होतात. एलन ग्रूबर गार्वे, रायटींग विथ सीझरस्: अमेरिकन स्क्रॅपबूक्स फ्रॉम द सिव्हिल वॉर टू द हारलेम रेंनीसांस (ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस, 2012), 4




जेक रिकमन सध्या लंडनच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ लॉ’ येथे कायदा या विषयामध्ये डिप्लोमा पदवी घेत आहेत. यापूर्वी त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजी आणि अमेरिकन अभ्यासशास्त्रात पदव्युत्तर अभ्यास केला आहे आणि न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्सविल येथील सारा लॉरेन्स कॉलेजमधूनकला शाखेमध्ये पदवी प्राप्त केलीआहे. हॉलंड हाऊसच्या मॅकहेनरी-हार्वे आवृत्तीवर त्यांचा संशोधन प्रकल्प हा १९व्या शतकातील ग्रंथसंपत्तीबाबतच्या त्यांच्या अभ्यासाच्या व्यापक आवडीचा भाग आहे. त्यांचा २०व्या शतकातील अमेरिकन साहित्यावर, आणि खासकरून थॉमस पिंचॉनयांवर, बराच अभ्यास आहे.


bottom of page