top of page
  • bilorijournal

मंटोंचे ‘टोबा टेक सिंह’-एक चिन्हवैज्ञानिक दृष्टीकोन

मैथिली फाटक

मराठी अनुवाद - आर्यायशोदा कुलकर्णीभारत-पाकिस्तानची फाळणी, सादत हसन मंटोंसाठी वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही पातळ्यांवर, भयावह ठरली. फाळणीच्या ह्या आघाताचा दीर्घकालीन प्रभाव मंटोंच्या लेखनातून स्पष्टपणे जाणवतो. ‘टोबा टेक सिंह’ हे मंटोंच्या भारताच्या फाळणीवर बेतलेल्या लिखाणातले एक उत्कृष्ट उदाहरण समजले जाते.

विचार करायला लावणारे आणि विश्लेषणार्थक असे कथेचे अनेक तपशील उपलब्ध आहेत, मात्र द्वैत (बायनारीस), मोडॅलिटी आणि पर्यायी व्याख्यांच्या माध्यमातून विश्लेषण करणे हा ह्या निबंधाचा हेतू आहे.

भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही गोष्ट आहे बिशन सिंहची. टोबा टेक सिंह ह्या जागेनी पछाडलेला हा इसम ‘टोबा टेक सिंह’ ह्याच नावाने ओळखला जायला लागतो. लाहोरच्या एका पागलखान्यात राहणारा, झोप उडालेला, फक्त असंबद्ध बडबड करणारा हा माणूस बाकीच्या रुग्णांबरोबर लौकरच भारतात पाठवला जाणार असतो. टोबा टेक सिंह भारतात आहे का पाकिस्तानात हे शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिशन सिंहला शेवटी उत्तर मिळते, ते रुग्णांच्या अदलाबदलीच्या ठिकाणावरच्या सेनाधिकार्‍याकडून. (ते ऐकून) तो भारतात जायला नकार देतो आणि स्वतःचं पाकिस्तानातलं गाव, टोबा टेक सिंह, सोडणंही नाकारतो. अंततः, जिथे आजचे टोबा टेक सिंह वसते, भारत आणि पाकिस्तानच्या काटेरी सीमारेषांमध्ये, ‘no man’s land’ वर, बिशन सिंह पडतो.

तथ्यातून मिथ्याकडे जाताजाता मंटोंची ही लघुकथा वाचकाच्या अविश्वासाला हळू हळू मोडत जाते. पागलखाना आणि त्यातील पात्रांच्या मानसातून, मंटो एक विचित्र पण विश्वासार्ह जग उभ करतात. कथेतील पात्रांच्या अविश्वसनियेतेमुळे त्यांची संभाषणं अनाकलनीय वाटतात आणि तरीसुद्धा त्या काळाचे वास्तव वाचकाला ह्याच विक्षिप्त संभाषणात दडलेली खोली आणि शहाणपण शोधू देते.

‘टोबा टेक सिंह’ची खरी ताकद ही की ह्या कथेतून फक्त फाळणीचा वेडेपणाच नाही तर ‘स्व’त्वाच्या कल्पनेचीही जाणीव प्रस्तुत होते. खुद्द मंटोंना पडलेल्या स्वतःच्या ओळखीच्या कोड्यामुळे कथेला आत्मचरित्राची झाक लाभते आणि हीच त्यांची तगमग कथेला वास्तवाशी घट्टपणे जोडते.

वेड्यांची ही अदलाबदली खरोखर घडली का नाही हे ज्ञात नाही पण सर्वमान्य ठरण्याइतकी ही घटना या कथेशी जोडलेली आहे. ‘टोबा टेक सिंह’मध्ये खूप प्रमुख पात्र किंवा घडामोडी नाहीत पण लघुकथेच्या माध्यमातून मंटो अल्पावधीत ताकदीने भिडणारी गोष्ट सांगतात. बिशन सिंह ह्या एकाच पात्राची कथा उलगडलेली आपण बघतो. म्हणूनच संवादाची गरज न भासता लेखक वाचकांशी सहज बोलू शकतात. उदाहरणार्थ, कथेच्या शेवटी लेखक म्हणतात—

“सगळे घाईने त्याच्याकडे धावले, आणि पंधरा वर्ष स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा असलेला (तो), जमिनीवर कोसळला. एका बाजूला, काटेरी तारांमागे भारताचे वेडे अभे होते आणि दुसऱ्या बाजूला, आणखी जास्त काटेरी तारांमागे पाकिस्तानचे वेडे उभे होते. दोहोंच्या मध्ये,एका अनामिक जमिनीच्या तुकड्यावर पडला होता टोबा टेक सिंह” (टोबा टेक सिंह).

मंटोंच्या फाळणीबद्दलच्या भावना ते वाचकांपर्यंत ‘वेड्यां’च्या असंबद्ध बडबडीतून पोचवतात आणि त्या भावना उमजायला ह्या बडबडीतला अर्थ समजून घ्यायची गरज भासत नाही: “Uper the gur gur the annexe the bay dhyana the mung the dal of the Pakistan and India dur fittey moun” (Toba Tek Singh). शब्दांच्या अर्थापेक्षा त्यांचे आवाज आणि सूर वापरून मंटो चपखलपणे वाचकांपर्यंत भावना पोचवतात. घडणाऱ्या घटनांवर भाष्य न करता किंवा त्यांच्या राजकीयतेचा उल्लेख न करता, फाळणी दरम्यानच्या सर्वसामान्य माणसांच्या अनुभवांची ओळख मंटो आपल्याला करून देतात. कथेतून हे स्पष्टपणे जाणवते की मंटोंची पात्र मुद्दामहून फाळणीबद्दल बोलत नाहीत आणि त्यांच्या असंबद्ध बडबडीतून मंटोंच्या भीती आणि निशब्दपणाचे दर्शन घडते.

जोडीनी जाणाऱ्या काही संकल्पना लेखक वापरतात आणि त्याच संकल्पनांना आव्हानही देतात. भारत-पाकिस्तान ह्या संकल्पनेला हिंदू-मुस्लिम, किंवा कथेच्या दृष्टीकोनातून हिंदू-इतर, ह्या संकल्पनेची जोड मिळते. कथेच्या प्रवाहात ह्या संकल्पना ‘भारत’ किंवा ‘पाकिस्तान’ ह्या जागांपेक्षा त्या नावांना प्राधान्य देताना दिसतात आणि लांबलेल्या फाळणीमुळे ह्या जागांचे प्रतिनिधित्व काय हाही प्रश्न पडतो. पागलखाना आणि त्यातले वेडे उरलेल्या जगापासून इतके अलिप्त आहेत की त्यांच्या दृष्टीने भारतापासून वेगळे असे पाकिस्तानचे अस्तित्वच शंकास्पद आहे. पागलखान्यातल्या रहिवाश्यांचा साधेभोळेपणा आणि पाकिस्तान कुठे आहे हे समजण्याची असमर्थता, भारत-पाकिस्तान ह्या संकल्पनेलाच आव्हान देते. उदाहरणार्थ,

“सगळ्यांना एवढेच माहिती होते की कैद-ए-आजम नावाच्या एका माणसानी मुसलमानांसाठी म्हणून पाकिस्तान नावाचे एक वेगळे राष्ट्र स्थापन केले होते. पण तिथला पत्ता कोणालाच ठाऊक नव्हता. प्रश्न हा होता की, सध्या ते भारतात आहेत का पाकिस्तानात. (ते) भारतात असते तर मग पाकिस्तान कुठे आहे? आणि (ते) जर पाकिस्तानात असते तर थोडे दिवसांपूर्वीपर्यंत भारतात कसे होते? अचानकपणे ते पाकिस्तानात कसे आले?” (टोबा टेक सिंह).

“‘जमिनदार’ नावाचे जहाल दैनिक वाचणाऱ्या एका मुस्लिम वेड्याला जेव्हा पाकिस्तान काय आहे, असे विचारले गेले तेव्हा क्षणभर विचार करून तो म्हणाला, “एवढही माहिती नाही? धार धार वस्तरे बनवण्यासाठी प्रसिद्ध असे भारतातले ठिकाण (आहे).” मिळालेले उत्तर पटल्यामुळे, त्या मित्रानी पुढे काही विचारले नाही” (टोबा टेक सिंह).

कथेच्या पलीकडे घडणाऱ्या घटनांच्या ह्या अज्ञानामुळेच पागलखान्यातल्या वेड्यांना आजूबाजूच्या गोष्टी स्वतःच्या हिशोबानी समजून घेण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ, “बऱ्याच वेड्यांचा ह्या अदलाबदलीला जोरदार विरोध होता. एका अनोळखी जागेवर आपल्याला जबरदस्तीने का नेले जात आहे हेच त्यांना लक्षात येत नव्हते” (टोबा टेक सिंह). तत्कालीन राष्ट्रवादातला खुळचटपणा, मंटो, वेड्यांच्या हातून घडणाऱ्या देशप्रेमाच्या प्रदर्शनांमधून रंगवतात. उदाहरणार्थ, “अंघोळ करता करता एक दिवस, एक वेडा, “पाकिस्तान जिंदाबाद!” अस इतक्या जोरात ओरडला की तो घसरला आणि जमिनीवर आदळून बेशुद्ध पडला” (टोबा टेक सिंह). हे वेडे स्वतःला कधी मुहम्मद अली जिन्ना म्हणवून घेतात, कधी मास्तर तारा सिंह तर कधी खुद्द देवही. पागलखान्यात अश्या घोषणाबाजीला मिळणारी मान्यता तिथे असणाऱ्या ‘स्वत्वाच्या’ अभावाचा पुरावा ठरते. स्वतःला ह्या मोठ्या माणसांची नावे देऊन कथेतील वेडे, ‘नाव’ आणि ‘व्यक्ती’ (‘चिन्ह’ आणि ‘चिन्हांकित’) ह्या दोहोंना वेगळे करतात आणि त्यातूनच ही नावे म्हणजे केवळ मोठे पण पूर्णपणे आभासी शिक्के आहेत हे दाखवून देतात.

वेडा-शहाणा ही आणखी एक जोडीनी जाणारी संकल्पना कथेत येते.

पागलखान्याच्या पार्श्वभूमीवर कथेची पात्र ‘वेडी’ किंवा शहाणी ठरतात. पण, फाळणीच्या पार्श्वभूमीवर पागलखान्यातला वेडेपणा हा बाहेरच्या जगातल्या वेडेपणाचे प्रतिबिंब मात्र आहे हे वाचकांना सहजपणे लक्षात येते. गमतीचा भाग असा की काही ठिकाणी, कथेतले वेडे बाहेरच्या ‘शहाण्यां’पेक्षा जास्त शहाणे वाटतात. उदाहरणार्थ,

“भारत-पाकिस्तान-पाकिस्तान-भारत ह्या जंजाळाने भंजाळलेला एक वेडा, एक दिवस केर काढता काढता झाडावर चढून बसला आणि त्याने फांदीवर बसून झाडाखालच्या सगळ्यांना भारत-पाकिस्तान बद्दल सलग दोन तास प्रश्न विचारून हैराण केले. पागलखान्याच्या पहारेकऱ्यांनी त्याला खाली उतरायला सांगितले तेव्हा तो अजून वर चढला आणि म्हणाला, “मला न भारतात राहायचं न पाकिस्तानात. मी माझ घर ह्या झाडावरच बांधणार.”” (टोबा टेक सिंह).

कथेत वेडा-शहाणा ह्या संकल्पनेला कधी स्पष्टपणे दाखवले आहे तर कधी त्या भूमिकांची अदलाबदली केली आहे आणि त्यातूनच वाचकांच्या मनात ह्या संकल्पनेबद्दलच प्रश्न उभे राहतात. पागलखान्यातल्या ‘वेड्यां’ना बाहेरच्या घटनांचा मागमूसही नसल्यामुळे, फाळणीच्या गाजावाजाने गडबडलेल्या सामान्य जनतेपेक्षा, ह्या वेड्यांनी तर्कशुद्ध विचार करण्याची जास्त शक्यता संभवते.

फाळणीनंतरच्या पाकिस्तानात कथा घडते मात्र ‘टोबा टेक सिंह’मध्ये चितारलेले वेड हे संपूर्ण भारत-पाकिस्तान फाळणीवरच भाष्य करणारे आहे. लेखकाच्या आपल्या वाचकांकडून असलेल्या अपेक्षांवर ही कथा जगते आणि त्या अपेक्षांशिवाय कथेला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो.

‘टोबा टेक सिंह’ विनोदी पद्धतीने क्लेशाचे दर्शन घडवते. फाळणीकडे बघण्याचा एक महत्वाचा दृष्टीकोन ह्या कथेत आहे. चिन्हवैज्ञानिक नजरेने ह्या कथेकडे पाहिल्यावर दिसणाऱ्या लिखाणातील नाजूक छटा आणि बारकावे कथेला अधिक परिपक्व बनवतात.
शब्दकोष

चिन्हविज्ञान (Semiotics): चिन्ह आणि चिन्हांच्या वापराचा अभ्यास

चिन्हांकित (Signified): स्वरूपापेक्षा वेगळा चिन्हाचा अर्थ

चिन्ह (Signifier): अर्थापेक्षा वेगळे चिन्हाचे स्वरूप (उदा. आवाज, शब्द, चित्र)

प्रतिनिधित्व (Representamen): एखादे वस्तुदर्शक चिन्ह


ग्रंथकोष

कोब्ले पॉल, आणि जान्स्झ लीटा. “इंट्रोड्यूसिंग सेमियोटिक्स”. अॅलन अँड अनविन, 1999

डॅलिरिंपल विलियम. “द ब्लडी लेगसी ऑफ द इंडियन पार्टिशन”. द न्यू यॉरकर. ९ जुलै २०१९ www.newyorker.com/magazine/2015/06/29/the-great-divide-books-dalrymple.

मंटो सदत हसन. “टोबा टेक सिंह”. ऑनलाईन २०२० www.sacw.net/partition/tobateksingh.html

मंटो सदत हसन. “मॉटल्ड डॉनः फिफ्टी स्केचेस अँड स्टोरीस ऑफ पार्टिशन”. पेंग्विन बुक्स इंडिया. १९९७

मंटो सदत हसन. “बॉम्बे स्टोरीस”. व्हिनटेज. २०१४

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनची (NID) विद्यार्थिनी, मैथिली, सध्या चित्रपटशास्त्र शिकत आहे. समकालीन कथानकांची तिची आवड, ती कला, लेखन आणि व्हिडिओच्या माध्यमातून प्रस्तुत करते. प्रसिध्द कथानकांना वेगळ्या दृष्टीकोनातून पाहून त्यांचा शोध घेणे हे तिच्या कामाचे उद्दिष्ट आहे.

Comments


bottom of page