top of page
  • bilorijournal

​लिखिताच्या परे: लोककलेतून कथाकथन

आसमानी कुमार

अनुवाद - आर्यायशोदा कुलकर्णी



बरेचसे ललित लेखन आजही लिखित स्वरुपात प्रस्तुत करण्याचा अट्टाहास केला जातो. वसाहतवादाने मागे सोडलेल्या इंग्रजीसारख्या खुणांनी उभारलेले अडथळे अनुवादाच्या सहाय्याने पार करताना आपण कलेला सहज विसरून जातो. फक्त प्रातिनिधिक कलाच नव्हे, तर संवादाची, कथाकथनाची कला. भारताच्या संदर्भातून ह्या कलेत लोककलेचे स्थान दुर्लक्षून चालणार नाही. कला जगतात प्रत्येक कलेला अनुसरून विशिष्ट व्याख्या प्रचलित असतात आणि त्याप्रमाणे, ज्यात्या जमातींशी जोडलेली लोककला हा त्यांचा एक अविभाज्य आणि चिरंतन भाग आहेत, असे मानले जाते (चॅटर्जी, २०१६). औद्योगिकीकरणानंतरच्या काळात, वास्तववादावर टीका म्हणून आधुनिकतावादाचा उगम झाला (शोहत आणि स्टॅम, २००२). विविध विषयांचे वास्तववादी चित्रण करणे गरजेचे राहिले नाही आणि अभिनव कलाप्रयोगांमधून उभरत्या सामाजिक वास्तवाचे दर्शन घडू लागले. ह्याच दरम्यान लोककला मात्र जुनकट आणि परकी म्हणून मागे टाकण्यात आली. परिणामी, लोककलेची श्रीमंती, कथाकथनाची अनोखी किमया, अंगभूत लवचिकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भावना व्यक्त करण्याची क्षमता, सगळ्याचाच विसर पडला.

चॅटर्जी म्हणतात तसे लोककलेला जुनकट आणि पुरातन समजून त्यातले अव्यक्त सामर्थ्य दुर्लक्षिले जाते. पण ज्यांचे लक्ष असते, त्यांना ते दिसते. असेच एक उदाहरण आहे, तारा बुक्स ही प्रकाशन संस्था. तारा बुक्स, भारतातल्या विविध प्रांतांमधल्या लोककलाकारांच्या सहकार्याने उपेक्षित कला आणि वाङ्मय मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करत आहेत. गेल्या पंचवीस वर्षात त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत पण भज्जू श्याम ह्या प्रसिद्ध गोंड लोककलाकाराचे ‘द लंडन जंगल बूक’ हे पुस्तक ह्या लेखाचा केंद्रबिंदू आहे. लंडनच्या इस्लिंगटनमध्ये ‘मसाला झोन’ नावाच्या उंची भारतीय रेस्टॉरंटसाठी म्युरल काढायला गेलेल्या लेखकाच्या नजरेतून दिसणारे दृश्य प्रवासवर्णन म्हणजे हे पुस्तक. कथेतील अनेक विलक्षण गोष्टींपैकी एक म्हणजे कथेचे नाव. वेरीयर एल्विन नावाच्या माणसाने गोंड जमातीच्या अभ्यासात मोठा हातभार लावला (श्याम, इ). रुड्यार्ड किप्लिंगचे ‘द जंगल बूक’ आणि वेरीयरने केलेल्या जंगलात राहणाऱ्या ह्या लोकांच्या अभ्यासात विलक्षण साम्य आहे असे मानले जाते. भज्जू श्याम ह्यांनी आपल्या पुस्तकाचे नाव ठरवताना एल्विन आणि ह्याच काल्पनिक वृतांतातून प्रेरणा घेतली! आता वेरीयरच्या मात्रुभूमिची सफर करण्याची श्यामना उत्सुकता होती.

युरोपेतर देशांमध्ये सापडणाऱ्या दृश्य कलासंस्कृतींना समजून घेऊन आधुनिकतावाद आणि उत्तर आधुनिकतावादाच्या व्याख्या बदलण्याची गरज आहे असे शोहत आणि स्टॅमचे मत आहे. वास्तववादाला विरोध दर्शवणाऱ्या कलाकृती जगभरातल्या बर्याच संस्कृतींमध्ये पूर्वीपासून अस्तित्वात आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. ह्या संकल्पेनेला ते ‘अर्केइक-पोस्टमॉडर्न’ असे म्हणतात. ‘मृछ्कटीका’, ‘विक्रमोर्वाषीय’ आणि ‘मेघदूत’ ही शास्त्रीय संस्कृत नाटके ह्या संकल्पनेची उदाहरणे आहेत कारण हिंदू संस्कृतीतल्या विविध कल्पना प्रस्तुत करताना पात्र आणि कथानकापेक्षा, भावनांच्या वापरावर ह्या नाटकांमधून जास्त भर दिलेला दिसतो. पाश्चिमात्य संस्कृतीत घडलेल्या अमूलाग्र बदलांमुळे आधुनिकतावाद आणि उत्तर आधुनिकतावादाच्या व्याख्या बदलत गेल्या आणि म्हणूनच थोडक्यात सांगायचे तर आधुनिकतावादाची टीका ही पश्चिमेनी केलेली पश्चिमेची टीका आहे (शोहत आणि स्टॅम).

इथे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, कला आणि साहित्याकडे बघण्याच्या आपल्या दृष्टीकोनावर अजूनही पाश्चिमात्य प्रभाव आहे. पण लोककला ह्या दृष्टीकोनाला एका वेगळी बाजू दाखवू शकते. भारताच्या संदर्भात, ती बाजू आहे उपेक्षित आणि मुख्य प्रवाहापासून वगळलेल्या समाजाची. लोककला (त्यामुळे) पुरातन आणि आदिम मानली जाते हे चॅटर्जींच्या लक्षात आले. भज्जू श्याम ह्यांचे पुस्तक ह्या समजांना आव्हान देते आणि परस्पर सुसंवादातून घडणाऱ्या गोंड कलेतल्या अभिनव प्रयोगांचे दर्शन घडवते.

गोंड प्रतीकांबरोबरच (उदा. प्राण्यांचा वापर) ‘बिग बेन’ किंवा ‘किंग्स क्रॉस’च्या सबवेची पाटी अश्या ‘लंडन’करांना लक्ष्यात येणाऱ्या प्रतीकांचा वापर, श्याम ह्यांच्या पुस्तकाला अधिक रुचकर बनवतो. लोककला हा एक अपरिहार्य संकर आहे ज्या वाटे नवनवीन प्रेक्षकांशी संवाद साधणे शक्य होते हे चॅटर्जींचे वाक्य श्याम सिद्ध करून दाखवतात.

गीता वूल्फ आणि सिरीश राव, ह्या पुस्तकाचे सहनिर्माते सांगतात की, ह्या पुस्तकाने लंडनला ‘जंगली’ बनवले आणि किप्लिंगच्या भारतातल्या वन्यजीवानाच्या वृतांताचा उपरोधाभास जगासमोर मांडला. श्याम ह्यांच्या चित्रांमधून हे सहजपणे दिसते. प्रत्येक चित्रात पारंपारिक गोंड संकल्पना लेखकाच्या अनुभवांना सामावून, कथानकाला शोभतील अश्या पद्धतीने वापरल्या आहेत. पूर्वीची गोंड कला ही फक्त अरण्यकथांपुर्तीच मर्यादित होती, पण आजची गोंड कला त्या अरण्यकथांना सामावून पारंपारिक चिन्ह वापरून जगण्याचे नवे अर्थ शोधताना दिसते. प्रस्थापित आणि नवीन माध्यमातून येणाऱ्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी चॅटर्जी ‘अनुवादा’चा वापर करतात. नव्याने होणाऱ्या प्रभावातूनच लोककला नवीन आवडीनिवडींनूसार बदलते आणि त्यातूनच पारंपारिकतेत घट्ट रोवून स्वतःची वेगळी जागा निर्माण करते. तसेच वर्षानुवर्ष टिकलेल्या चित्रसंग्रहाची जाणीव राखून, नवीन चिन्ह आणि संकल्पना त्यात जोडून, जुन्या आणि नव्याचे सहास्तित्व मान्य करते. लंडनच्या चिन्हांचा वापर हा त्या दिशेनी टाकलेले एक पाऊल आहे. श्याम ह्यांच्या पुस्तकातून श्रेष्ठत्वाची भावना नाही तर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दलचे कुतूहल जाणवते आणि त्या अनोळखी जगाचे वर्णन स्वतःच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न दिसतो.

‘जंगली’ नक्की कोण हे ठरवण्याचा दृष्टीकोन पालटून टाकल्यामुळे पुस्तक अधिकच रंजक होते. ‘परकीय’, पाश्चिमात्य प्रगत संस्कृतीच्या विरोधात असलेला देश, असे मानून गोऱ्यांनी भारताचा अभ्यास केला. त्यापलीकडे जाऊन त्यांनी भारतीय समाज सभ्य आणि असभ्य असाही विभागला. जेव्हा भारतीय समाजशास्त्रज्ञ स्वतःच्या देशातले समाज अभ्यासू लागले तेव्हा परिस्थिती बदलू लागली. तरीही, शास्त्रज्ञ आणि अभ्यासला जाणारा समाज ह्यांच्यात जातीय तफावत होती. त्यातूनही पाश्चिमात्य प्रशिक्षणपद्धतीत शिकलेल्या ह्या शास्त्राज्ञांमुळे त्या समाजांना ‘परकीय’ समजणे चालूच राहिले. ह्या पार्श्वभूमीवर, भज्जू श्याम फक्त पश्चिमेच्या दृष्टीने ‘परके’ नाही तर भारतीय दृष्टिकोनातूनही ‘परके’ ठरतात. असे असूनही, लंडनसारख्या मोठ्या, प्रगतीचे प्रतीक असलेल्या शहराबद्दलचे त्यांचे अनुभव आणि निरीक्षणे जगासमोर येतात. गोष्ट सांगणारा कोण हे कोण ठरवणार ह्या कल्पेनाला दिलेले आव्हान म्हणजे हे पुस्तक. गेली कित्येक वर्षे आपले मत मांडण्यासाठी, ते लोकांपर्यंत पोचवण्यासाठी इंग्रजीचा वापर अनिवार्य होता आणि आजही प्रादेशिक साहित्याची तीच परिस्थिती आहे.

‘द लंडन जंगल बूक’ खास आहे कारण हे पुस्तक म्हणजे प्रादेशिक साहित्यच नव्हे तर प्रादेशिक कलेचा अनुवाद आहे. आज लोककलेचे अस्तित्व संग्रहालयातून आणि कलादालानातून सापडणारे एवढेच मर्यादित राहिले नाही. सृजनशील लोककला जन्माला येऊ पाहते आहे आणि अस्तित्वात असलेली बंधनं तोडून बहरत आहे. आपण आपल्या कथाकथनाच्या आणि साहित्याच्या संकुचित संकल्पना मागे सोडून, ह्या अभिनव कलेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

लोककला, पाश्चिमात्य सांस्कृतिक श्रेष्ठत्वाला तोड देऊन आजूबाजूच्या इतर लोककलांना, जगाला, स्वतहात सामावून घेऊ शकते आणि म्हणूनच लोककला हे कथाकथनाचे महत्वाचे माध्यम ठरते. ‘दस्तकार’सारख्या संस्था लोककलेच्या ह्याच गुणधर्माचे उत्तम उदाहरण आहेत. आज लोककलेचा अर्थ प्रादेशिक संदर्भांपूरता मर्यादित राहिला नाही. वेगवेगळ्या स्वरुपात लोककला आपल्या समोर येते आहे आणि हे बदल लक्षात घेतलल्यावरच, रंगछटा, ठिपके आणि रेषांमधून व्यक्त होणाऱ्या ह्या लोककलेचा इतिहास, सध्याचे तिचे जागतिक स्वरूप आणि भविष्यातील कथाकथनाची क्षमता समजून घेणे शक्य आहे.























































ग्रंथकोष

चॅटर्जी रोमा. “स्पिकिंग विथ पिक्चर्स: फोक आर्ट अँड द नरेटीव्ह ट्रॅडिशन इन इंडिया”. रटलज नवी दिल्ली. २०१६

एम. “द लंडन जंगल बूक, ब्रेन पिकिंग्स”.

https://www.brainpickings.org/2014/06/20/london-jungle-books-bhajju-shyam-tara-books/#:~:text=Titled%20as%20both%20an%20homage,journeyed%20from%20his%20native%20India

शोहत एला आणि स्टॅम रॉबर्ट. “द विजुअल कल्चर रीडर. नरेटीव्हाजिंग विजुअल कल्चर. इंट्रो निकोलस मिर्झोएफ (एडी.) (पीपी. २७-४७). रटलज लंडन. २००२

श्याम भज्जू, वूल्फ गीता आणि राव सिरीश. “द लंडन जंगल बूक”. तारा बूक्स इंडिया. २०१८

चित्रे

Fig 1. Shyam, B, et al. (2018). Leaving my world behind [Gond art]. In The London Jungle Book. Copyright Tara Books Pvt Ltd, Chennai, India (www.tarabooks.com).

Fig 2. Shyam, B, et al. (2018). Journey of the mind [Gond art]. In The London Jungle Book. Copyright Tara Books Pvt Ltd, Chennai, India (www.tarabooks.com).


Fig 3. Shyam, B, et al. (2018). The Miracle of flight [Gond art]. In The London Jungle Book. Copyright Tara Books Pvt Ltd, Chennai, India (www.tarabooks.com).


Fig 4. Shyam, B, et al. (2018). Watermarks on the sky [Gond art]. In The London Jungle Book. Copyright Tara Books Pvt Ltd, Chennai, India (www.tarabooks.com).


Fig 5. Shyam, B, et al. (2018). The king of the underworld [Gond art]. In The London Jungle Book. Copyright Tara Books Pvt Ltd, Chennai, India (www.tarabooks.com).


Fig 6. Shyam, B, et al. (2018). Loyal friend number 30 [Gond art]. In The London Jungle Book. Copyright Tara Books Pvt Ltd, Chennai, India (www.tarabooks.com).


Fig 7. Shyam, B, et al. (2018). What am I eating? [Gond art]. In The London Jungle Book. Copyright Tara Books Pvt Ltd, Chennai, India (www.tarabooks.com).


Fig 8. Shyam, B, et al. (2018). When two times meet [Gond art]. In The London Jungle Book. Copyright Tara Books Pvt Ltd, Chennai, India (www.tarabooks.com).



आसमानी कुमार सध्या समाजशास्त्रामध्ये एम्.ए करत आहे. आठवणीतल्या आणि आठवणीतून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये तिला रुची आहे. पुढे जाऊन अधिक लेखन करण्याची आणि मौखिक इतिहासातून बाजूला सारलेल्या कथानकांकडे लक्ष देण्याचे काम करण्याची तिची इच्छा आहे.

Comments


bottom of page