top of page
  • bilorijournal

वसाहतीतल्या सैनिकांचे स्मरण: पहिल्या महायुद्धाच्या स्मरणोत्सवातील असमानता आणि ‘सिपॉय’ काव्याची हाक

मूळ लेखक – झॅक डीविट

मराठी अनुवाद – आर्यायशोदा कुलकर्णी



रेखाचित्र - सेफी जॉर्ज


२२ एप्रिल २०२१ रोजी, ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्ससमोर बोलताना, कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्स समितीच्या (सी.डब्ल्यू.जी.सी) प्रतिनिधीने पहिल्या महायुद्धाच्या स्मरणोत्सवाशी संबंधित नवीन माहिती उघडकीस आल्याचे सांगितले. सी.डब्ल्यू.जी.सीने ह्या वर्षाच्या सुरुवातीला प्रकाशित केलेल्या “रीपोर्ट ऑफ द स्पेशल कमिटी टू रिव्ह्यू हिस्टॉरिकल इनइक्वालिटीस् इन कोमेमोरेशन” ह्या अहवालात नमूद केले की “१,१६,००० मृतांचे (प्रामुख्याने, पूर्व अफ्रिकन आणि इजिप्शिअन सैनिक, पण इतरही) – कदाचित ३,५०,०००इतके – पहिल्या महायुद्धानंतर नावाने अधिकृत स्मरण केले गेलेले नाही किंवा (त्यांना) पूर्णपणे वगळले गेले आहे” (हे आणि बर्क २०२१, ६). बऱ्याच ठिकाणी, ह्या सैनिकांचे अधिकृत दफन केले गेले नाही; त्याऐवजी हजारो सैनिकांच्या स्मरणार्थ एकत्रित स्मारके बांधली गेली (हे आणि बर्क २०२१, १५). अहवालाचा दावा आहे की तत्कालीन इम्पीरियल वॉर ग्रेव्स कमिशन (आय.डब्ल्यू.जी.सी) ने पहिल्या महायुद्धात मृत सैनिकांसाठीच्या दफन नियम आणि तत्वांकडे सातत्याने दुर्लक्ष केले: “युरोपेतर धर्म आणि दफन परंपरांकडे बघण्याचे समकालीन दृष्टिकोन आणि एखाद्या व्यक्ति किंवा गटाच्या गृहीत धरलेल्या ‘सभ्यते’ वर मृत्यू पश्च्यात होणारे स्मरण अवलंबून होते” (हे आणि बर्क २०२१, ६). थोडक्यात सांगायचे तर, ब्रिटिश साम्राज्यासाठी लढणाऱ्या आणि मरण पावलेल्या अफ्रिकेतल्या आणि भारतातल्या वसाहतीतून आलेल्या सैनिकांबद्दल असलेल्या वर्णद्वेषी पूर्वग्रहातून ह्या सैनिकांच्या दफनात असमानता केली गेली किंवा त्यांचे दफन विधी घडलेच नाहीत. हाऊस ऑफ कॉमन्स समोर बोलताना, सी.डब्ल्यू.जी.सी च्या प्रतिनिधीने वचन दिले की घडलेल्या चुकांमधून बोध घेऊन ह्या पुढे, पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या सर्व जाती-धर्माच्या सैनिकांचे योग्य आणि समान स्मरण करण्याचा प्रयत्न केला जाईल.


स्मरणकार्यात दिसणार्‍या वर्णद्वेषातून, आपण युद्धातल्या मृतांचे, विशेषतः ब्रिटिश साम्राज्यासाठी भयावह युद्धांमध्ये लढणाऱ्या वसाहतीतून आलेल्या सैनिकांचे, स्मरण कसे करतो हे पाहायची संधी मिळते. वसाहतीतून आलेल्या सैनिकांच्या अनुभवांच्या साहित्याचा अभाव आणि त्यामुळे, असलेल्या असमानतेत पडणार्‍या भरीबद्दल बोलून, मी स्मरणोत्सवाची आपली व्याख्या अधिक व्यापक करू इच्छितो. तसे करण्यासाठी, सद्य परिस्थितीत स्मरणोत्सवात असलेल्या समस्या मांडून त्यानंतर पहिल्या महायुद्धातल्या भारतीय लेखन आणि ध्वनिमुद्रणांवर केलेल्या अभ्यासाची ओळख मी करून देईन. ह्या निबंधामार्फत, मी पहिल्या महायुद्धात लढलेल्या गौरवर्णेतर सैनिकांच्या स्मरणात, स्मरणोत्सवाच्या मानकांमुळे असमानता घडू शकते हे दाखवू इच्छितो. आणि म्हणूनच, त्यांच्या साहित्याचा आणि कवितांचा अभ्यास करून २०व्या शतकातल्या वसाहतवादाच्या इतिहासाची अधिक संपूर्ण, आणि कदाचित ‘डीकोलोनीयल’ (निर्वसाहतवादी) ओळख होईल असे मला वाटते.


सगळ्यात पहिल्यांदा आपण युरोप मधील स्मरणोत्सवाची पद्धत बघूया. ब्रिटिश सी.डब्ल्यू.जी.सी ने तयार केलेल्या दफन भूमी ह्या एकसारखेपण, पारगम्यता आणि समानतेच्या मानकांवर बांधलेल्या असतात. ही मानके ज्या कागदपत्रात मांडलेली आहेत, त्यात त्यांचे महत्व दिलेले आहे आणि त्याचबरोबर म्हटले आहे की, “युद्धातल्या मृतकांना, पद वा धर्म न पाहता, समान वागणूक दिली गेली पाहिजे” (स्मिथ आणि कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्स २०२०, ६). ह्या मानकांचा परिणाम अतिशय चित्तवेधक आहे: गुलाब आणि सुंदर हिरव्या गवताने वेढलेल्या, पांढरे क्रॉस किंवा एकसारखे थडग्यावरचे दगड असलेल्या रांगांवर रांगा असलेल्या दफन भूमी असे दृश्य हेच महायुद्धाच्या सांस्कृतिक स्मृतीचे प्रतीक आहे. ह्या दफन भूमी शांत आणि अतिशय सुंदर दिसतात आणि अंतिम विश्रांतीची जागा म्हणून मृतांच्या स्मृतींना आणि त्यांच्या आप्तांना, योग्य तो मान देतात. दफनभूमींच्या अशा एकसमान रचनेतून युद्धाच्या एकत्रित शोकांतिकेचे स्मरण घडते.


पण, दफन भूमींचे हे सौंदर्य, शिस्त आणि एकसारखेपण, युद्धाच्या भयानक अनुभवाला दडवून टाकतात. युद्ध हे अर्थातच शांत नसते; पहिले महायुद्ध ज्यांनी अनुभवले त्या सगळ्यांच्याच मनावर त्याचा परिणाम खोलवर रूतला. ह्या आघाताचा भार प्रामुख्याने पुरुषांनी उचलला, पण नर्स म्हणून काम करणाऱ्या आणि घरं सांभाळणाऱ्या बायकांनी आणि युद्ध काळात मोठ्या झालेल्या लहान मुलांनीही त्या काळाचा ताण अनुभवला. युद्धाने मृत्यूची व्याख्या बदलली कारण भराभर वाढणारा मृतांचा आकडा फक्त लढणाऱ्या सैनिकांचा नव्हता, तर दारूगोळ्याच्या स्फोटात गायब झालेल्यांचा आणि ‘नो-मॅन’स्-लँड’ च्या चिखलात बुडालेल्यांचाही होता. ‘शेलशॉक’ अर्थात पोस्ट ट्राउमटीक स्ट्रेस सिनड्रोम (पी.टी.एस.डी) मुळे, जिवंत परत आलेल्या सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. दृश्य आणि कलंकित असे अपंगत्व, आधुनिक समाजाच्या आयुष्याचा भाग बनले. पॉल फसेल ह्या परिस्थितीचे अतिशय योग्य वर्णन करताना म्हणतात, "ही स्मशाने अतिशय सुंदर आहेत आणि त्याबरोबरच विचित्रही; गुलाबांनी सजलेली, एक निर्विवाद उपरोधिक शांतता पसरवणारी” (फसेल २०००, ७६). ह्या स्मशानभूमींना त्यांच्यात दडलेल्या स्मृतींचे भान नसते, कदाचित मुद्दामहून असलेले हे अज्ञान आहे असे वाटते आणि ही जाणीव अस्वस्थ करणारी आहे.


अशा प्रकारे स्मरणोत्सवात एक प्रकारचा उपरोधाभास आहे. सैनिक रांगेत उभा राहून प्रशिक्षण घेतो, समान कपडे घालतो, समान पदावर वावरतो, समान अन्न खातो आणि समान राष्ट्रासाठी मरण स्वीकारतो. पण रणभूमीवर ही समान बांधणी मोडून पडते. तोच सैनिक जमिनीवर लोळण घेतो, खड्ड्यांमध्ये लपतो, दोघा-तिघांच्या गटात विखुरतो आणि आजूबाजूला पडणार्‍या बॉम्बच्या आवाजात मृत्यूची वाट बघतो. युद्धाचा अनुभव गोंधळवणारा आणि अनपेक्षित होता. युद्धभूमीवर मरून पडणारे सैनिक कित्येक दिवस तसेच पडायचे, कधी अर्धवट दफन केलेले, कामचलाऊ क्रॉस खूण म्हणून लावलेल्या अवस्थेत. युद्ध संपल्यानंतरच खऱ्या अर्थाने त्यांचे सैनिक म्हणून अंत्यसंस्कार केले गेले आणि स्मशानभूमीत पुन्हा एकदा ते रांगांमध्ये उभे राहिले. सैनिकांचे आयुष्य हे अराजकाचे कदाचित सर्वोत्तम उदाहरण आहे आणि आय.डब्ल्यू.जी.सी, आणि त्यानंतरच्या समित्यांनी केलेले स्मरणोत्सवाचे काम हे एका अर्थाने लष्करातली शिस्त पुन्हा स्थापन करण्याचा प्रयत्न आहे.


युद्धाच्या भयावह अनुभवाची आठवण म्हणून तयार केलेल्या ह्या स्मरणार्थ स्मशानभूमींना त्या आराजकाची काहीच ओळख नाही असे जाणवते. सैनिकांच्या बलिदानाचे प्रतीक होऊ पाहणाऱ्या ह्या जागा त्या अनाकलनीय घटनेला एकसंधपणा आणायचा प्रयत्न करतात असे वाटते. असे असल्यामुळेच कदाचित, हयात सैनिकांच्या अशा पद्धतीने केलेल्या स्मारकांबद्दल मिश्र भावना होत्या: “जसजसे युद्धाचे चित्र पालटले, युद्धभूमी पर्यंतचा प्रवास सुकर झाला आणि पश्चिम तटावरती भेट द्यायचे प्रमुख ठिकाण स्मशानभूमी होऊ लागले, तसे माजी सैनिकांना ते स्वत:चे युद्ध हरल्याची भावना जाणवू लागली. सरत्या काळामुळे, भावनात्मकतेमुळे, अश्लीलतेमुळे आणि अज्ञानामुळे युद्ध भ्रष्ट होत होते” (एकस्टाईन्स २०१४, ३२२). सरकारच्या स्मरणोत्सवाच्या कार्यातून, स्मशानभूमीच्या त्या शांत सौंदर्यातून दर्शविले जाणारे बलिदान हे कित्येक सैनिकांना ‘राजा आणि राष्ट्र’ यांसाठी केलेले बलिदान वाटले नव्हते. सुरुवातीला आय.डब्ल्यू.जी.सी ने आणि आता सी.डब्ल्यू.जी.सी ने केलेले स्मरणोत्सवाचे प्रयत्न, घडून गेलेल्या भयानक इतिहासाचे स्मरण करण्यासाठी नसून एक एकसंधता आणणारे कथानक तयार करण्यासाठी असल्यासारखे वाटतात.


हे प्रयत्न प्रश्नार्थक आहेत कारण पहिल्या महायुद्धाचा अनुभव - आणि, अर्थातच मानवी अनुभव – एकसंध नक्कीच नाहीत. महायुद्धात लाखो लोकांचा सहभाग होता – सैनिक म्हणून, मजूर म्हणून आणि कैदी म्हणूनही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हे युद्ध वसाहतवादी राष्ट्रांनी लढलेले होते ज्यांनी लढण्यासाठी आणि काम करण्यासाठी 4 दशलक्ष गौरवर्णेतर लोक स्वत: आणले. हे लोक चीन, भारतीय उपखंड, अल्जेरिया आणि टूनीसीया आणि तेव्हाचे फ्रेंच इंडोचायना या भागांमधून आणलेले होते (दास २०१८, २६). एकसंधता असलेल्या ह्या स्मशानभूमींमध्ये, बऱ्याचदा वसाहतींमधून आलेल्या, त्यांच्यावर मालकी गाजवणाऱ्या अधिपतींसाठी बलिदान देणार्‍या ह्या सैनिकांच्या स्मरणार्थ काहीच नसते. जरी सी.डब्ल्यू.जी.सी ने हे वैविध्य सांभाळून स्मरणोत्सवाचे प्रयत्न केले तरी पहिल्या महायुद्धाच्या इतिहासाच्या दृष्टीने ते कमीच पडतील असे मला वाटते.


पश्चिमेतल्या महायुद्धाच्या स्मृति बऱ्याच अंशी ह्या शुभ्र पांढर्‍या दगडांनी बनलेल्या स्मशानभूमिंनी तयार केलेल्या असल्या तरीही त्या काळात तयार झालेल्या साहित्य, काव्य आणि कादंबर्‍यांचा प्रभाव त्या स्मृति जिवंत करण्यासाठी कारणीभूत आहे. कित्येक साहित्यिक आणि सांस्कृतिक अभ्यासकांचे असे मत आहे की आधुनिक पाश्चिमात्य संस्कृतीचा आणि विचारधारांचा उगम पहिल्या महायुद्धात आहे; तेव्हा घडलेले अघटित हे अनेक अमूर्त कला चळवळी आणि ज्वलंत तत्त्वज्ञानाचे मूळ होते. सैनिकांच्या लिखाणातील उपरोधाभासाची शैली ही त्या काळाची सूचक होती आणि हीच शैली लवकरच काफका, जोइस आणि वूल्फ ह्या आधुनिक पाश्चिमात्य लेखकांनी उचलली असे पॉल फसेल सांगतात (फसेल २०००, २४); आणि अनेट बेकर ह्यांचे मते, “पहिले महायुद्ध हे अतिवास्तववादाचे जनक नसले तरी ती चळवळ सुरू करण्यासाठीचे उत्प्रेरक नक्कीच होते” (बेकर २०००, ७१). पहिल्या महायुद्धाच्या नंतर आणि पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या मधल्या काळात लिहिल्या गेलेल्या कादंबर्‍या, कविता आणि आठवणी ह्या खऱ्या अनुभवांवरून घडलेल्या होत्या आणि त्यातून साम्राज्यशाहीचे भयावह स्वरूप, यांत्रिक युद्धनीतीची अर्थशून्यता आणि वसाहतवादामध्ये लपलेले अमानविकरण समोर आले. कदाचित, रॉबर्ट ग्रेव्स, सिगफ्रीड ससून, विलफ्रेड ओवेन आणि इतरांचे हे लेखन सैनिकाच्या खऱ्या अनुभवाचे स्मरण म्हणून अधिक साजेसे आहे. तसे बघता हे लेखन, आय.डब्ल्यू.जी.सीच्या स्मरण कार्याच्या विरोधात नव्हते पण त्यात दाखवलेले खडे वास्तव, नैराश्य आणि अभियांत्रिकी युद्धाच्या क्रूर उपरोधाभासात एक वेगळी, अधिक प्रामाणिक, जाणीव होती.


जर स्मशानभूमी ह्या व्याक्तिविशिष्ट बलिदानाचे प्रतीक असतील तर समकालीन साहित्य आणि कलाकृती ह्या त्यावेळच्या जिवंत अनुभवांचे स्मरण ठेवतात. लांबवरच्या सरकारी स्मारकांमध्ये (जी ऐतिहासिकदृष्ट्या प्रचाराचा हेतु साध्य करतात (फसेल २०००, ७६; दास २०१८, ३४) युद्धाचा इतिहास आणि आठवणी ठेवण्यापेक्षा साहित्य, काव्य आणि आठवणींचे वाचन केल्यावर त्या सैनिकांच्या आयुष्याशी आपण जोडले जातो आणि स्मशानातल्या स्तब्ध एकसंधतेपेक्षा, ते लेखन एक जिवंत आठवण बनते.


ह्या साहित्यिक स्मरणात, वसाहतीतल्या सैनिकाकडे मात्र, दुर्लक्ष केले जाते. त्यांच्या युद्धाच्या अनुभवाला आणि त्याला दिलेल्या साहित्यिक प्रतिसादाला पाश्चिमात्य अभ्यासक आणि जनतेने पूर्णपणे वगळले आहे. युद्धात लढलेल्या वसाहतीतून आलेल्या सैनिकांचा आकडा मोठा असूनही पहिल्या महायुद्धाची सांस्कृतिक आणि साहित्यिक ओळख ही प्रामुख्याने गोरी आणि पाश्चिमात्य आहे. आपण जर ह्या सैनिकांचे स्मरण समान पद्धतीने करणार असलो तर समान दफन अधिकारांबरोबरच, वसाहतीतून आलेल्या सैनिकांच्या साहित्याला, काव्यांना आणि अनुभवांनाही मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे.


सुदैवाने, नव्याने केलेल्या पहिल्या महायुद्धाच्या अभ्यासात, वसाहतीतून आलेल्या सैनिकांच्या लिखित आणि दृकश्राव्य साहित्याचा शोध लागला आहे. मेसोपोटेमिया, मेडीटरेनीयन आणि फ्रांस मध्ये लढलेल्या भारतीय ‘सिपॉय’ सैनिकांचे अनुभव सांगणार्‍या साहित्याकडे इथे मी लक्ष्य वेधू इच्छितो. इतिहासकार संतनू दास त्यांच्या, इंडिया, एमपायर, अँड द फर्स्ट वर्ल्ड वॉर कल्चर: रायटिंगस, इमेजेस अँड सोंग्स ह्या पुस्तकात, युरोपीय सैनिकांपेक्षा असलेले त्यांचे वेगळेपण दाखवण्यासाठी ‘सिपॉय’ असे नामकरण केलेल्या, भारतीय सैनिकांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक अनुभवांबद्दल सविस्तरपणे लिहितात. ब्रिटिश वसाहत म्हणून भारतातून आलेले जवळ जवळ ९,००,००० सैनिक पहिले महायुद्ध लढले. पण ह्या सैनिकांमध्ये भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व असमान होते: “(ब्रिटीशांना) ‘लढाईसाठी साजेश्या’ वाटणाऱ्या जातींमधूनच जास्त सैनिक निवडले गेले. ह्या सिद्धांतानुसार जे लोकं निवडले गेले ते उत्तर आणि मध्य भारत, वायव्य सीमेजवळचा प्रांत आणि नेपाळ अश्या अतिशय सीमित भौगोलिक आणि जातीय क्षेत्रातून आलेले होते” (दास २०१८, १४). जाती, निष्ठा, मरदानी आणि लढवैयेगिरीच्या भ्रामक संकल्पनांवर विश्वास ठेवून ब्रिटिशांनी ही निवड केली (दास २०१८, १५). “पठाण, डोगरा, जाट, गढवाली, गुरखा आणि शीख [..] हे शेवटी लढाईसाठी सर्वोत्तम ठरवले गेले” (दास २०१८, १४). “पहिल्या महायुद्धाच्या स्मृतीच्या युरोपीय कथानकात आणि भारतीय राष्ट्रवादी इतिहासाच्या मध्ये असणार्‍या ‘नो-मॅन’स्-लँड’ मध्ये भटकण्याचे दुर्दैव असलेल्या” ह्या सैनिकांचे अनुभव आणि आठवणी दास त्यांच्या पुस्तकात साठवून ठेवायचा प्रयत्न करतात (दास २०१८, १६). सिपॉय अनुभवांच्या ह्या संग्रहातून आपल्याला शिकण्यासारखे बरेच आहे. त्यांचे साहित्यिक आणि सांस्कृतिक अनुभव जमवण्यासाठी दास “अफवा, गप्पा-गोष्टी, आठवणी, फोटो, चित्र, ध्वनिफिती, गाणी, कविता आणि कल्पनात्मक साहित्याचा” वापर करतात (दास २०१८, २३). मा‍झ्या दृष्टीने, ह्या सगळ्या स्त्रोतातून एक प्रकारचे सांस्कृतिक स्मरण घडते कारण युद्धाचा वैयक्तिक अनुभव सांगताना, ते अनुभव एकाच वेळी दोन्ही- वसाहतीतले नागरिक आणि सैनिक, असलेल्यांचे आहेत हे दिसते.


पाश्चिमात्य अभ्यासकांनी महायुद्धाच्या साहित्यिक अभ्यासात सातत्याने दुर्लक्ष केलेल्या भारतीय सैनिकांच्या पत्रांमधल्या काव्याची, दास आणि त्यांच्यासारखे इतर अभ्यासक, बारकाईने दखल घेतात. ज्या पद्धतीने मौखिक परंपरा साहित्यिकदृष्ट्या न अभ्यासता सांस्कृतिक म्हणून अभ्यासली गेली आहे, त्याचे प्रकारे वसाहतीतून आलेल्या कमी शिकलेल्या किंवा अशिक्षित सैनिकांची पत्रही खालच्या दर्जाची समजली गेली आहेत. पण आता परिस्थिती सुधारत आहे. ह्या पत्रांमध्ये असणार्‍या उपमा आणि रुपकांच्या वापरामुळे, संस्कृत महाकाव्य आणि दंतकथांच्या संदर्भांमुळे हे लेखन अभ्यासण्यासारखे आहे हयात शंका नाही आणि ह्या साहित्याचा अभ्यास करून युरोपीय दृष्टिकोनातून केलेल्या साहित्यिक विश्लेषणाला फाटा मिळतो. दास, ह्या लेखनातून, विशेषतः अशिक्षित सिपॉयचा, त्याच्या संस्कृती आणि जागेच्या ज्ञानावर बेतलेला अनुभव सांगतात (दास २०१८, २१३). पाश्चिमात्य अभ्यासकांनी ह्या अशिक्षित लोकांचे, आणि मुख्य म्हणजे वसाहतीतल्या दडपलेल्या लोकांचे लेखन, म्हणून त्यांचे अनुभव आणि लेखन कला नाकारले.


इस्पितळातून पाठवलेल्या पत्रातली ही पुढची कविता, भारतीय सिपॉयच्या साहित्यिक अनुभवाचे कदाचित सगळ्यात प्रामाणिक वर्णन करते:

जेव्हा रघुकुळाच्या प्रभूने (हे) ऐकले तेव्हा तो म्हणाला, ‘नियतीचे हे लिखित

कोण पुसणार?’

जेव्हा हनुमान आपले पाऊल डोंगरावर ठेवतो

(तेव्हा) डोंगर भुईसपाट होतो

राक्षसांची ही सेना विरघळून जाते

प्रभू रामाच्या बाणासमोर जसा रात्रीचा अंध:कार गायब होतो

उगवत्या सूर्यासमोर

इथे जे घडलं ते मी तुला कसं सांगू? वर्णन करायला

शब्द नाहीत.

जेव्हा विमान आकाशात झेपावतं

(तेव्हा) जुलैतल्या पावसासारखा गोळ्यांचा वर्षाव होतो.

जेव्हा बॉम्ब फुटतात, सगळे ओरडतात, ‘जय श्री राम’

एक बॉम्ब पडतो आणि खूप सारे मरतात जखमी होतात,

आणि कित्येक सारे हरवून जातात

सगळे जल्लोष करताना जर्मन सैनिकांना म्हणतात, ‘शाब्बास!’

नेत्रदीपक दृश्य असतं सारं [..] (अज्ञात, दास 2018, 214)


इतिहासाने ‘अज्ञात’ घोषित केलेल्या व्यक्तीच्या ह्या काव्यात, एक विरोधाभासी दृश्य उभे केलेले आहे ज्यात एका ‘भव्य पौराणिक’ जगाची तुलना घडणार्‍या ‘स्पष्ट वास्तवा’शी केलेली आहे (दास २०१८, २१५). वसाहतीतून आलेल्या कित्येक लेखकांनी युद्धाला दिलेल्या कलात्मक प्रतिसादासाठी रामायण आणि महाभारताचे संदर्भ वापरले आहेत. अशा प्रकारच्या लेखनातून वसाहतीतून आलेल्या सैनिकांची साहित्यिक स्मृति समोर येते आणि ह्या साहित्याचा अभ्यास करणे म्हणजे त्यांना एका अर्थाने मान देणे आहे असे मला वाटते.


एक पत्रात सापडलेल्या ह्या कवितेला ‘साहित्य’ म्हणण्यात काहीच चुकीचे नाही. अशा साध्या वस्तूला- मानवतेच्या सर्वात निरूपद्रवी अवशेषांना- सांस्कृतिक आणि साहित्यिक प्रतिष्ठा मिळणे कदाचित अधिक महत्त्वाचे आहे, असे दास ह्यांचे म्हणणे आहे. भारतीय सैनिकांवर मौखिक परंपरेच्या प्रभावाचा ते जास्त अभ्यास करतात. त्यांच्या मते, १९व्या शतकाच्या शेवटी भारतात झालेल्या मौखिक परंपरेच्या प्रसाराशिवाय, वर दिलेली कविता जन्माला आलीच नसती. सुरुवातीच्या काही जर्मन ध्वनिफितींमध्ये ह्याच मौखिक संस्कृतींचे काही संदर्भ त्यांना सापडतात : त्याच्या ध्वनिफितीमध्ये, माल सिंह, पंजाब प्रांताच्या बोलायच्या पारंपरिक पद्धतीचा वापर करत स्वत:च्या आयुष्याचे तृतीय-पुरुषात वर्णन करतो (दास २०१८, ६). ऐतिहासिकदृष्ट्या गोऱ्या, साहित्यिक शैलीतल्या आठवणींनी नाही तर एका वसाहतीतल्या नागरिकाच्या, सैनिकाच्या, आठवणींनी ही ध्वनिफीत भरलेली आहे. लिखित साहित्याला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व त्या काळातल्या गाण्यांना आणि ‘वॉइस रेकॉर्डिंगस’ना आहे. उदाहरण म्हणून दास, भारतीय कैद्यांचा मृत्यू दर १६.८% असलेल्या एका छावणीत, एका कैदयाने सांगितलेली ‘थंडीनी कुडकुडत मेलेल्या एका पोपटाच्या’ गोष्टीबद्दल बोलतात (दास २०१८, २३०). जर्मन सैनिकांनी भारतीयांच्या गोष्टी आणि भाषांचा अभ्यास करण्यामागे ह्या ‘आदिम’ लोकांबद्दल माहिती मिळवणे हा हेतु होता. त्यातून निर्माण झालेली ही संग्रहित माहिती, आजच्या अभ्यासकाला मात्र, वसाहतीतून आलेल्या लोकांची संस्कृती समजून घेण्याची संधी देते. जेव्हा आपण हे दृकश्राव्य साहित्य बघतो तेव्हा पाश्चिमात्य लेखकांच्या काव्यात दिसणारे दुख दिसते, पण त्याला सिपॉयच्या संस्कृतीची आणि कलात्मकतेची विलक्षण छटा असल्याचे जाणवते.


पहिले महायुद्ध हे “सांस्कृतिक गाठीभेटींच्या आणि गुंतागुंतीच्या संकल्पना बदलण्याचा निर्णायक टप्पा होता” ह्या दास ह्यांच्या दाव्याला ह्या काव्यामुळे पुष्टी मिळते (दास २०१८, ३१). विमान आणि आकाशातून पडणार्‍या गोळ्यांची महाकाव्यांशी केलेली तुलना, ध्वनिफितींतल्या गोष्टींमधून दिसणारे वैयक्तिक अनुभव आणि सांस्कृतिक जागरूकता- हयातून युद्धाच्या भीतीदायक परिस्थितीला आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या लोकांच्या जगाला समजू पहाणारे सिपॉय दिसतात. ‘कोलोनियल कॉनशसनेस’ (वसाहतीची जाणीव) ची सुरुवातही ह्या लिखाणातून दिसते: युद्धातल्या सिपॉयंच्या सहभागाने त्यांना “ब्रिटिश सामराज्याच्या मुळाशी असलेल्या वर्णद्वेषाचे आणि दुहेरी वागणुकीचे” दर्शन घडवले (दास २०१८, ३१२). फ्रांस मध्ये असताना वाटलेल्या ‘स्वर्गसुखा’चे वर्णन करणारी, सिपॉयांनी लिहिलेली काही पत्र वाचणे, वसाहतीतल्या भारताच्या भयानक परिस्थितीची जाणीव होण्यासाठी पुरेसे आहे (ओमीसी १९९९, १५६). युद्धभूमीवर आणि भारतात तयार झालेल्या अनेक ‘डीकोलोनियल’ कथांनी वसाहतवादाच्या असमानतेला आणि सैनिकांच्या वैविध्यपूर्ण अनुभवांना प्रोत्साहन दिले (दास २०१८, ३११-१२). स्मरणोत्सवाबद्दल बोलताना कदाचित ह्या इतिहासाबद्दल बोलणे जास्त बरोबर आहे कारण वसाहतीतून आलेल्या सैनिकांचे अनुभव लक्षात ठेवणे म्हणजे त्यांना निर्माण करणाऱ्या वसाहतवादाला लक्षात ठेवणे आहे. त्याही पलीकडे जाऊन ह्या सैनिकांच्या लिखाणाचा अभ्यास करून, महायुद्धाचा वसाहतवादी इतिहास आणि त्याचा सध्या चालू असलेल्या ‘डिकोलोनायझेशन’ च्या चळवळीवर होणार परिणाम, अधिक स्पष्टपणे समजू शकेल.


वसाहतीतून आलेल्या सैनिकांच्या स्मरणोत्सवाचा मुद्दा घेऊन मी ह्या निबंधाची सुरुवात केली होती. आता शेवटापर्यंत पोचताना माझे मत आहे की समान स्मरण हे समान दफन अधिकारांपलीकडे जाते. प्रत्येक सैनिकाचे, त्याच्या नाव आणि धार्मिक श्रद्धेनुसार स्मरण व्हावे ही अपेक्षा असली तरी वसाहतीतून आलेल्या सैनिकांच्या साहित्यिक अनुभवांचे स्मरण ह्या संपूर्ण प्रक्रियेत कुठेच दिसत नाही. परिणामी, वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या ह्या सैनिकांमधले फरक आणि त्यातून आलेल्या सांस्कृतिक जागरुकतेला आपण विसरून जातो. आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ह्या वैविध्यातून जन्माला आलेल्या वसाहतीतल्या जाणि‍वेलाही आपण विसरतो.


तसे पाहता, स्मरणोत्सव हे एक प्रकारचे अलंकारिक कृत्य आहे - कारण नसताना लढलेल्या युद्धाचे एक सकारात्मक कथानक तयार करू इच्छिणाऱ्या सरकारने केलेले असो, वैयक्तिक अनुभवांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तयार केलेले जीवनचरित्र असो वा कैदी असलेल्या वसाहतीतल्या सैनिकाने सांगितलेल्या कुडकुडणाऱ्या पोपटाची गोष्ट असो. युद्धाची समान स्मृति निर्माण करण्यासाठी, वसाहतीतल्या सैनिकांची आठवण ठेवण्यासाठी, त्यांनी तयार केलेल्या साहित्यालाही तितकाच मान दिला पाहिजे जितका आत्तापर्यंत पाश्चिमात्य सैनिकांच्या साहित्याला दिला गेला आहे. भारतीय सिपॉयांच्या पत्र, काव्य आणि ध्वनिफितींना पुढे आणून आपण कदाचित पहिल्या महायुद्धाच्या इतिहासाचे, एकसंधता आणणाऱ्या अलंकारिक पद्धतींना बळी न पडता, स्मरण करू शकतो.


आपली युद्धाची स्मृति अधिक व्यापक होण्याची गरज आहे. असमान दफन हा अर्धाच मुद्दा आहे: इराक मध्ये बळी पडलेल्या जवळ जवळ ४०,००० सिपॉयांचे एक स्मारक बांधून स्मरण केले गेल (हे आणि बर्क २०२१, १५). युरोपीय सैनिकांना व्यक्तिशः दफन केले गेले पण भारतीय आणि इतर वसाहतीतून आलेल्या सैनिकांना मात्र एकत्र दफन केले गेले. स्मशानभूमींचे अस्तित्व युरोपीय सैनिकांना वायफळ वाटून त्यांनी स्वत:च्या दु:खाचे स्मरण करण्याच्या विविध वाटा शोधल्या तसेच वसाहतीतून आलेल्या सैनिकांनाही त्यांच्या आठवणी आणि दु:खाला समोर आणायची संधी मिळणे गरजेचे आहे. आठवण ही स्मशानभूमीतून दिसणार्‍या स्मृतींनी तयार होत नाही हे आपण बघितले.


फोनोग्राफ कडे बघून, भवन सिंह म्हणाला,

जेव्हा एकजण मरतो,

(तेव्हा) तो कायमचा भटकत राहतो

आणि असाच भूत बनून जातो.

तो आत्मा असतो भटकणारा.

ते भटकणे असते हवे सारखे.

म्हणूनच तो भूत असतो हवे सारखा

तो कुठेही जाऊ शकतो. (सिंह, दास 2108, 231).


कदाचित, ह्या कविता आणि लेख- जर्मन संग्रहात असलेले किंवा पत्रांमधून सापडणारे- वसाहतींमधल्या युद्धाच्या आठवणी अजून इथेच आहेत असे सुचवत असतील. पहिल्या महायुद्धातील कित्येक भुते अजूनही भटकत आहेत, एखाद्या श्वासासारखी किंवा एखाद्या गाण्यासारखी. दुर्लक्ष केलेल्या, स्मरण न केलेल्या किंवा त्यांच्या गोष्टी आणि कविता सांगितल्या न गेलेल्या लोकांची ही भुते असू शकतात. कुठल्याही ‘डिकोलोनियल’ (निर्वसाहतवादी) स्मरणोत्सवाच्या प्रयत्नात ह्याची दखल घेतली गेली पाहिजे. म्हणूनच, सी.डब्ल्यू.जी.सी ने हाती घेतलेल्या, पहिल्या महायुद्धात लढलेल्या वसाहतीतून आलेल्या सैनिकांच्या बलिदानाची माहिती देण्याच्या सामाजिक प्रबोधनाच्या कार्याला (हे आणि बर्क २०२१, ५१) त्या काळातल्या साहित्यिक कार्याची जोड मिळाली तर अधिक चांगले होईल आणि त्याच वेळी आपण ‘साहित्य’ कशाला म्हणतो ह्याची व्याख्याही अधिक व्यापक होऊ शकेल. भवन सिंहच्या कवितेकडे आपण गांभीर्याने पाहीले पाहिजे: आपल्या आजूबाजूला सगळीकडे मृतात्मे आहेत, त्यांच्या गोष्टी, त्यांचे आत्मे, वाऱ्यावर भटकणारे, आपल्याला साद घालणारे, आणि त्यांचे विलक्षण, काव्यात्मक आणि शोकपूर्ण म्हणणे ऐकायला सांगणारे. ह्या आठवणींना उजाळा देऊनच आपण त्यांचे खरे आणि समान स्मरण करू शकू.



उद्धृत साहित्य

  • बेक्कर, अनेट. “द आवॉंट-गार्ड, मॅडनेस अँड द ग्रेट वॉर.” जर्नल ऑफ कंटेंपररी हिस्टरी, वॉल. 35, नं. 1, 2000, पान 71-84.

  • दास, संतनु. 2018. इंडिया, एमपायर अँड द फर्स्ट वर्ल्ड वॉर कल्चर: रायटिंगस, इमेजेस अँड सॉंग्स. केंब्रिज, युके ; न्यू यॉर्क, युएसए ; पोर्ट मेलबर्न, ऑस्ट्रेलिया ; न्यू दिल्ली, इंडिया: केंब्रिज यूनिवर्सिटी प्रेस.

  • एकस्टाईन्स, मोड्रीस. 2014. “मेमरी अँड द ग्रेट वॉर.” इन द ऑक्सफोर्ड इलस्ट्रेटेड हिस्टरी ऑफ द फर्स्ट वर्ल्ड वॉर: न्यू एडिशन, एडिटेडबाय हयू स्ट्रेकन, 2 री आवृत्ती, 317-29. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस.

  • फसेल, पॉल. 2000. द ग्रेट वर अँड मॉडर्न मेमरी. प्रथम आवृत्ती. न्यू यॉर्क: ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस.

  • हे, जॉर्ज, आणि जॉन बर्क. 2021. “रीपोर्ट ऑफ द स्पेशल कमिटी टू रिव्ह्यू हिस्टॉरीकल इनइक्वालिटीस् इन कोमेमोरेशन.” मेडनहेड, ग्रेट ब्रिटन: कॉमनवेल्थ वॉर ग्रेवस् कमिशन.

  • ओमीसी, देवीड, एडिटेड. 1999. इंडियन वॉईसेस ऑफ द ग्रेट वॉर: सोल्जर्स लेटरस्, 1914-18. लंडन, ग्रेट ब्रिटन: मॅकमिलन प्रेस लि.

  • स्मिथ, काइली, आणि कॉमनवेल्थ वॉर ग्रेवस्. 2020. “कोमेमोरेशन पॉलिसी: हाऊ वी कोमेमोरेट वॉर डेड.” कॉमनवेल्थ वॉर ग्रेवस्.

क्वेस्ट यूनिवर्सिटीतून विविध विषयांचे शिक्षण घेताना, झॅक डीवीटला ऐतिहासिक साहित्याचे वाचन आणि त्यातून नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण झाली. येत्या वर्षापासून तो यूनिवर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या मास्टर ऑफ आर्ट्स इन इंग्लिश ह्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहे. कॅनडा आणि अमेरिकेत वसवल्यागेलेल्या वसाहतींच्या संदर्भाने इतिहास, जागा आणि वाचन ह्यांचे नाते अभ्यासण्यात त्याला रस आहे.

bottom of page