मुलाखत अनुवादकांची – शांता गोखले
मराठी अनुवाद – आर्यायशोदा कुलकर्णी
बिलोरी जर्नल: तुमच्या मते, आजच्या समाजात, अनुवादकाची भूमिका काय? अनुवादाद्वारे सामाजिक घडामोडींवर प्रभाव पाडण्याची ताकद अनुवादकाकडे आहे का?
शांता गोखले: सुरुवात दुसर्या प्रश्नाच्या उत्तराने करेन, कारण त्याचं उत्तर छोटं आहे: नाही.
पण, त्याचं स्पष्टीकरण देते. सामाजिक घडामोडींवर परिणाम पाडायची जेवढी ताकद मूळ लेखकाकडे असते, तेवढीच अनुवादकाकडे असते. कुठलीही कलाकृती सामाजिक घडामोडींवर परिणाम पाडते का? ह्या प्रश्नाचं उत्तर बहुतेक कलाकार एका वाक्यात देऊ शकतील. पुरावा जेव्हा प्रमाणबद्ध आणि पडताळून पाहिलेला असतो, तेव्हाच तो पुरावा म्हणून मान्य होतो. लुईस मॅकनीस म्हणाले आहेत की, कलेचा हेतु हा गोष्टी/घटना घडवून आणणे हा विचारच मुळात चुकीचा आहे, आणि क्रियांवर होणारा कलेचा परिणाम हा थेट आणि मोजता येण्याजोगा असतो ही कल्पनाच चुकीची आहे.” कुठल्याही कलेचा परिणाम ना थेट असतो ना मोजता येण्याजोगा, त्यामुळे हा प्रश्नच इथे लागू पडत नाही.
आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर. ‘आजच्या समाजात’ ह्या शब्दप्रयोगातून असा अर्थ होतो की गतकाळातल्या समाजापेक्षा आजच्या समाजात, काही कारणाने साहित्याचं मोल कमी झालेलं आहे. पूर्वीपेक्षा आज लोकं कमी वाचन करतात असं इथे गृहीत धरलेलं आहे. तरीसुद्धा, दिवसागणिक प्रकाशित होणार्या पुस्तकांचा आकडा बघता, आणि पुस्तक प्रकाशन हा काही दानधर्माचा उपक्रम नसून व्यवसाय आहे हे बघता, उत्साही वाचक आज अस्तित्वातच नाहीत ह्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. पण तरीही, साहित्याचं मोल खरंच कमी झालेलं असेल तर अनुवादाचं मोलही अपरिहार्यपणे कमी झालं आहे. कारण, शेवटी, उत्तम साहित्य निर्मिती हाच अनुवादाचा हेतु आहे. आणि जर साहित्याचंच मोल कमी झालेलं नसेल, जे माझ्या मते झालेलं नाही, तर मग अनुवादकांची जी भूमिका होती तीच पुढे चालू राहील - एका भाषेतल्या वाचकांसाठी, जगातल्या इतर भाषांमधले उत्कृष्ट साहित्य उपलब्ध करून, जगण्याच्या नवीन वाटा मोकळ्या करत विविध संस्कृतींची अधिकाधिक ओळख करून देणे.
टीका किंवा मतभेदाचे साधन म्हणून भाषेचा वापर करता येतो असं तुम्हाला वाटतं का?
हो, नक्कीच.
बिकट परिस्थितीतच नव्हे तर बिकट परिस्थितीवरही कवींनी आपले काव्य सादर करावे हे ब्रेख्तचे प्रसिद्ध वाक्य आहे. अनेक कवी आणि लेखकांप्रमाणे, ब्रेख्त स्वत:ही, तो जगत असलेल्या भीषण परिस्थितीवर काव्य करत असे. तरीसुद्धा, महालांमध्ये राहणाऱ्यांसाठी लिहिणारे आणि महालांमध्ये राहणारे लेखक कायमच अस्तित्वात असतात हे मान्य करावे लागेल.
पण जमीनीवर भक्कमपणे उभे राहून, स्वत:ची परिस्थिती बारकाईने पाहून मग जवळच्या टेकडीवर चढून आपण तिथे कसे पोहोचलो ह्याचे निरीक्षण करणाऱ्या लेखकांचेच साहित्य त्यांच्यानंतर अनेक दशकं जिवंत राहलेले आहे. कृष्णवर्णीय अमेरिकन लेखक किंवा दलित लेखक जेव्हा उभे राहून आजूबाजूला बघतात तेव्हा त्यांना लाल रंग दिसतो तो रक्ताचा, गुलाबांचा नाही. अशा जगण्याच्या अनुभवांमधून निर्माण होणारे साहित्य किंवा नव्याने तयार होणारी संताप आणि मतभेदाची भाषा अतिशय शक्तिशाली असते.
नामदेव ढसाळ मग म्हणतात:
पाण्यात नैराश्य आणल्यानंतर
हातघाईवर येतो जीवनमरणाचा प्रश्न
आणि मग नाही उरत लोकधून
‘आम्चा एडका उड्या मारितो मागं सरुनी धडका घेतो
ह्य लाव्हरी चिन’ म्हणायची.
डिकोलोनायझेशन/निर्वसाहतवादाच्या जागतिक दृष्टिकोनातून पाहता साहित्यिक अनुवाद कुठे मोडतो? डिकोलोनायझेशन/ निर्वसाहतवादाच्या प्रक्रियेसाठी अनुवाद हे साधन म्हणून वापरता येईल का?
ह्या प्रश्नाच्या उत्तरावर अख्खं पुस्तक लिहून होईल.
पहिल्या प्रश्नापेक्षा मी, अनुवादक म्हणून असलेल्या माझ्या अनुभवांच्या आधारे, दुसर्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छिते. साधारणतः डिकोलोनायझेशन/निर्वसाहतवाद म्हणजे राष्ट्रे वसाहतवाद्यांपासून मुक्त झाल्यानंतर तिथे नव्याने तयार होणारी सत्तेची समीकरणे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या भारतात, ब्रिटिशांचा वारसा पुरता पुसून टाकण्यासाठी त्यांच्याकडून मिळालेली रेल्वे, न्याय व्यवस्था, आधुनिकता, कादंबर्या लिहिण्याची कला, नाटक पद्धती, सिनेमा, सगळंच आपण सोडून देणं गरजेचं होतं. आपल्या दुर्दैवाने, तसं करण्यात व्यावहारिक दृष्टीने काही फायदा नव्हता. मग, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७५ वर्षांनी, जेव्हा शशी थरूर यांना ऑक्सफोर्ड यूनियन मध्ये चर्चेचे आमंत्रण मिळाले, तेव्हा त्यांनी अस्खलित इंग्रजीमध्ये बोलत, ब्रिटिशांनी निर्माण केलेले दुष्काळ, त्यांनी केलेले प्रचंड आर्थिक शोषण आणि अशा अनेक इतर गोष्टींबद्दल आवेशाने उद्गार काढले. उपस्थित ब्रिटिशांनी मान्य केलं की थरूरांनी स्वत:चे म्हणणे अतिशय चातुर्याने आणि ‘ऑक्सफोर्ड यूनियनला साजेश्या पद्धतीने’ मांडले. वसाहतकारांकडे जाऊन, त्यांचा पोशाख घालून, त्यांची भाषा बोलून आणि त्यांच्या चाली-रीतींप्रमाणे वागून मग त्यांनी आपले किती आणि कसे नुकसान केले हे म्हणणे अयोग्य आहे. ह्या सगळ्या प्रकारातलं विडंबन मला दिसतं आणि आपल्या शोषकांकडे एक बोट दाखवण्यापेक्षा, त्यांना अशा पद्धतीने आपला फायदा घेऊ दिल्याबद्दल मी चार बोटं आपल्याकडेच दाखवीन.
आपल्याकडच्या जाती व्यवस्थेने लोकांना आपल्या लोकांविरोधातच किती शोषक आणि विध्वंसक बनू दिलं आहे किंवा आपल्याकडच्या पितृसत्ताक पद्धतीमुळे समाजाच्या पन्नास टक्के असलेल्या स्त्रीवर्गावर अनेक पद्धतीने शोषण करू दिलं जातं ह्या सगळ्याकडे मी लक्ष वेधू इच्छिते. दलित आणि स्त्रियांना जात आणि लिंगभेदाच्या नियंत्रणांमधून मोकळं होण्यासाठी केलेल्या प्रत्येक आणि सर्व प्रयत्नांना माझा पाठिंबा आहे. म्हणूनच, अनुवादक म्हणून, मी उद्धव शेळकेंच्या ‘धग’ ह्या कथेचा अनुवाद केला आहे ज्यामधे एका ओबीसी समुदायातील स्त्री, जिचा नवरा तिच्या जीवावर जगतो आणि जिला नोकरीला ठेवणारे सावकार तिने त्यांच्या शेतात केलेल्या अथक कष्टांची योग्य किंमत देत नाहीत, हिची कहाणी सांगितलेली आहे.
त्याचबरोबर जिला तिच्या कुचकामी नवऱ्याने एक कंगाल विधवा म्हणून मागे सोडले असते, जिला आपल्या दोन मुलांची काळजी घ्यायची असते, आणि तरीही अशा अवघड परिस्थितीतून सिनेजगतात प्रवेश करून जी नाव कमावते अशी दुर्गा खोटे, ह्या हुशार आणि धाडसी बाईच्या आत्मचरित्राचा मी अनुवाद केला.
‘स्मृतिचित्रे’ ह्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात राहणार्या एका स्त्रीच्या आत्मचरित्राचा अनुवादही मी केला आहे. विक्षिप्त पण तरीही प्रतिभासंपन्न नवऱ्याबरोबर संसार करणाऱ्या, त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बुद्धिमत्तेवर प्रेम आणि त्याचा आदर करणाऱ्या ह्या स्त्रीने त्याला तिच्या आवडीनिवडींकडे मात्र दुर्लक्ष करू दिलं नाही. निरक्षर असूनही तिने पुढे जाऊन मराठी साहित्यातलं हे उत्कृष्ट लेखन केलं.
शेवटी, मी दोन साहित्यकृतींचे, दोन्ही प्रख्यात लेखकांचे, अनुवाद करायला नकार दिलेला आहे कारण त्यातील एकाचा जातीवादी दृष्टिकोन होता आणि दुसरे एका लेखिकेने लिहिलेले असूनही त्या लेखनात इतर कोणत्या पुरुषाने लिहिल्याप्रमाणे लज्जास्पद लिंगभेदाचा समावेश होता यामुळे.
भारतीयांनी भारतीयांच्या मनांवर बिंबवलेल्या वसाहतवादाशी लढा देण्यासाठी निवड आणि नकार ही माझी शस्त्र आहेत.
अनुवादाकडे पाहण्याच्या तुमच्या दृष्टिकोनाबद्दल आणि तुमच्या अनुवादाच्या पद्धतीबद्दल थोडी माहिती द्याल का? काही विशिष्ट तत्व किंवा नियमांचे अनुसरण करता का?
सत्तरच्या दशकात, मी अनुवाद करायला सुरुवात केली तेव्हा भारतात तरी अनुवादाचे विशेष असे कुठले सिद्धांत किंवा महाविद्यालयांमधून अनुवाद शिकवणारे विभागही नव्हते, किमान भारतात तरी नव्हते. विशिष्ट सिद्धांत वापरून केलेला अनुवाद मी सर्वप्रथम नव्वदच्या दशकाच्या शेवटी वाचला. हे मला थोडं विचित्र वाटलं, कारण सिद्धांत हे व्यवहारावर बेतलेले असावेत आणि पुढे त्यांचा विकास एकत्रितपणे व्हावा असं मला वाटतं. असो, एका प्रकाशकाने, लघुकथांचा एक अनुवाद मी काहीतरी करून वाचवावा ह्या बेताने मला पाठवला होता. मी स्पष्ट नकार दिला कारण तसं करणं अतिशय अनैतिक होतं. पण वसाहतवादी आणि वसाहतींमधील सत्तासंबंध समानतेच्या जवळ आणण्याच्या हेतुने केलेल्या त्या अनुवादाची गुणवत्ता पाहून मला धक्काच बसला. सौम्यपणे सांगायचं तर तो वाचण्याजोगा नव्हता.
अनुवादाचे सिद्धांत प्रचलित होईपर्यंत माझी स्वतःची अनुवादाची पद्धत जमलेली होती; आणि तिच्यात काही बदल झालेला असेल तर तो माझ्या विकसित होणार्या दृष्टीकोनामुळे आणि काम करताना मिळालेल्या धड्यांमुळे घडलेला आहे. काल्पनिक कथा असो, नाटके आसो, निबंध असो किंवा आत्मचरित्र असो, मी कायमच मला स्वतःला आवडलेल्या व भावलेल्या साहित्याचा अनुवाद करत आले आहे; त्यामुळे वाचकांनासुद्धा ते साहित्य तितकंच आवडावं हाच माझा हेतु असतो. ‘व्हाय ट्रान्सलेशन मॅटरस्’ (अनुवाद का महत्वाचा आहे) मध्ये इडीथ ग्रोस्मन म्हणतात की, अनुवादकाचे परमोच्च ध्येय हे असते की तिचे वाचक हे ‘मूळ वाचकांच्या भावनिक आणि कलात्मक अनुभवाला समांतर आणि अनुरूप अशा रीतीने साहित्य अनुभवतील’.. मी ह्या वाक्यात थोडा बदल करून म्हणेन की, वाचकांचा अनुभव हा ‘मूळ साहित्याच्या माझ्या भावनिक आणि कलात्मक अनुभवाशी अनुरूप असा असावा’. कारण त्या मूळ लेखनाला, इतर मूळ वाचकांनी माझ्याप्रमाणेच प्रतिसाद दिला असेल हे मी गृहीत धरू शकत नाही.
अनुवादाची माझी पद्धत अशी आहे-- सगळ्यात पहिल्यांदा, आधी काही वेळा वाचून झालेले असले तरीसुद्धा मी मूळ लेखन पुन्हा एकदा वाचते. कारण आधी ते वाचकाच्या भूमिकेतून पाहिलेले असते. आता अनुवादकाच्या भूमिकेतून पाहताना त्या मराठी लेखनाचा इंग्रजी बाज ऐकू येतो आणि खाच खळगे दिसतात. असा ऐकू येणारा इंग्रजी बाज माझ्यासाठी महत्त्वाची पहिली पायरी असतो.
अनुवादाचा पहिला मसुदा हा मूळ अर्थाचे प्रतिपादन करण्याचा प्रयत्न असतो, ज्यामध्ये विशिष्ट शब्द आणि वाक्प्रचार कंसामध्ये पर्याय देऊन धावत्या नजरेतून लिहिलेले असतात. इथे विचारविनिमय करायला थांबायचं नाही. लेखनाचा ‘फ्लो’ बरोबर जमणं इथे महत्त्वाचं असतं. पहिला मसुदा तयार झाला की, मूळ लेखन बाजूला ठेवून मी लिहिलेला अनुवाद वाचते. आता बारीक-सारीक गोष्टींवर विचारमंथन करून घेतलेले निर्णय जवळजवळ पक्के करायचे. लेखनाचा टोन किंवा लय जमत नाही असं वाटलं, तर मी संपूर्ण परिच्छेदही कधीकधी बदलते. मग हा दुसरा मसुदा मी थोडा वेळ बाजूला ठेवते. म्हणूनच इतरांच्या वेळेच्या मर्यादेप्रमाणे करायचे काम मी स्वीकारत नाही. एक-दोन आठवड्यांनी, ताज्या दमानी मी दुसर्या मसुद्याकडे पाहते. आता शेवटचा मसुदा तयार करताना, मी मूळ लेखन समोर ठेऊन अनुवादाचे अंतिम संपादन करते. मूळ लेखनातल्या छोट्यातल्या छोट्या अर्थापासून मी स्वत:ला कधीही बाजूला सरू दिलेले नाहीये.
मात्र ही पद्धत मी माझ्या सगळ्यात नव्या अनुवादासाठी वापरलेली नाही. त्याऐवजी एस. व्ही. केतकरांच्या ‘ब्राह्मणकन्या’ ह्या लेखनाचे मी स्वैर भाषांतर केले आहे. भक्कम अशी सामाजिक प्रेरणा केतकरांना प्रभावित करते. त्यांच्याकडे सांगण्यासाठी ताकदीची कथा आहे. पण काही ठिकाणी, कादंबरी लिहताना लागणारे कथाकथनाचे कौशल्य त्यांच्याकडे कमी पडते. काळजीपूर्वक लिखाण करणारे लेखक तर ते नाहीत. एकच गोष्ट ते पुन्हापुन्हा सांगण्याचा त्यांचा कल आहे. शेवटी, ते आत्ममग्न होऊन विषयांतर करत राहतात. जर माझ्या वाचकांनासुद्धा त्यांचं लेखन तितकच अवडायला हवं असेल जितकं ते मला आवडलेलं, तर मला काही संकल्पनांची व काही ठिकाणी गोष्टीच्या भागांची पुनर्रचना करण्याची मुभा स्वत:ला द्यावी लागणार होती. त्या संकल्पना एरवी शाब्दिक रचनेत हरवल्या असत्या. संपादन करून त्या अधिक पिळदार व तीक्ष्ण करता आल्या. जर डॉ. केतकरांनी हेतुपूर्वक ही गोष्ट अशा ओबडधोबड पद्धतीने लिहिलेली असती, तर मी हे बदल केले नसते. अगदी तंतोतंत ह्याच शब्दात नाही, पण कुंदेरा म्हणतात की, त्यांच्या लेखनाची रखरखीत/ओबडधोबड शैली ही त्यांनी जाणीवपूर्वक राखलेली आहे आणि एखाद्या अनुवादकानी ती सौम्य करण्याचा प्रयत्न करू नये असं त्यांना वाटतं.
लेखकाचा हेतु इथे महत्त्वाचा आहे. वारंवार येणारी विधाने किंवा लांबलचक विषयांतर यांची अपेक्षा लॉरेन्स स्टर्न, ज्यांना आपण काय करतो आहोत हे खात्रीपूर्वक ठाऊक आहे, यांच्यासारख्या लेखका व्यतिरिक्त इतर कोणाकडूनही केली जाऊ शकत नाही. डॉ. केतकर हे लॉरेन्स स्टर्न नाहीत. म्हणून कुंदेरांनी ज्याला वर्ज्य मानले आहे, ती गोष्ट मी इथे केलेली आहे.
फिक्शन/कल्पित/काल्पनिक लेखन, नॉन-फिक्शन/वास्तवावर आधारित लेखन आणि कविता यांचा अनुवाद करताना तुम्ही वेगवेगळ्या पद्धती वापरता का?
हो, अर्थातच.
मूळ लेखनामधली पात्र, घटना, अघटित गोष्टी, प्रसंग, भावना, तत्त्वज्ञान यांचा- थोडक्यात सांगायचे झाले तर लेखनामधल्या अख्ख्या जगाचाच, आपल्या कल्पनाशक्तीने अर्थ लावून ते पुन्हा नव्याने व्यक्त करण्याची अपेक्षा फिक्शन/कल्पित लेखन अनुवादकाकडून करते. नॉन-फिक्शन किंवा वास्तवावर बेतलेले लिखाण स्वत:चं ‘म्हणणं’ स्पष्टपणे सांगतं. नॉन-फिक्शनचा अनुवाद करताना मूळ लेखनाचं ‘म्हणणं’ काय आहे एवढंच समजून घेणे एवढ्यापुरती अनुवादकाची कल्पनाशक्तीची गरज असते. तिथे अनुवादकाला स्वत:चा अर्थ लावण्याची मुभा नसते. एखाद्या नॉन-फिक्शन किंवा वास्तवावर बेतलेल्या लिखाणाचा विषय काय आहे ह्याचं स्पष्ट उत्तर मिळू शकतं. पण एखाद्या लेखिकेला तिच्या कादंबरीचा विषय काय आहे हे विचारले तर तिला लगेच उत्तर देता येत नाही.
तसेच नाटकाचा अनुवाद करताना एका भाषेतील बोली दुसर्या भाषेत पोचवण्याकडे लेखिकेला बारीक लक्ष द्यावे लागते. तिथे अनुवादही मूळ नाटकाएवढाच दर्जेदार आणि प्रस्तुत करण्याजोगा असावा लागतो. नाटककाराने आपल्या लिखाणात वापरलेली भाषेची बोली आणि ताल बरोबर पकडून ती परक्या भाषेत नव्याने निर्माण करण्याचा भार अनुवादकाच्या खांद्यांवर असतो.
काव्य हा अनुवादाच्या दृष्टीने सर्वात अवघड असा साहित्य प्रकार आहे. त्यामुळे मूळ कलाकृतीचा अर्थ आणि स्वर तिथे सर्वाधिक हरवतो. काव्य हे संदिग्धता, रचना, रूपकं, चित्र आणि चिन्हांनी बनलेले असते. सम-सांस्कृतिक परिस्थितीत, उदाहरणार्थ, दोन युरोपीय किंवा दोन भारतीय भाषांमध्ये घडणारे अनुवाद इथे जास्त चांगल्या दर्जाचे होऊ शकतात. कवितांचा अनुवाद करण्यासाठी कवी असणं गरजेचं असतं असं माझं ठाम मत आहे. कारण, इथे खरे आव्हान हे एका कवितेच्या जागी नवीन कविता निर्माण करणे हे असते. मी स्वतः कवी नसल्यामुळे मी फार कवितांचे अनुवाद केलेले नाहीत.
अनुवादाच्या प्रक्रियेमध्ये मूळ लेखकाचा काही सहभाग असतो का? तुम्ही मूळ लेखकांशी संवाद साधता का? त्यांचे दृष्टीकोन आणि मते यांचा तुमच्या प्रक्रियेवर प्रभाव पडतो का?
जीवित लेखकांच्या कलाकृतींपैकी मी अनुवाद केलेली अशी फक्त नाटकंच आहेत. उरलेल्या सगळ्या अनुवादांचे मूळ लेखक आता हयात नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रश्न उद्भवत नाही. यापूर्वी माझ्या नाटकांच्या अनुवादाचे पहिले मसुदे मी थेट नाटककारांना पाठवलेले आहेत; आणि त्यांनी ते तसेच, कुठलेही बदल न करता, पुढे थेट प्रकाशकांकडे पाठवले आहेत.
मकरंद साठेंच्या ‘अच्युत आठवले आणि आठवण’चा अनुवाद हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता. आधी चौकशी किंवा चर्चा करण्याची मला गरज वाटली नव्हती, पण अनुवादाचा शब्द अन् शब्द एकत्र बसून ठरवावा ही मकरंदची इच्छा होती. अनुवादाच्या दृष्टीने मला अनुरूप वाटलेल्या शब्दांच्या ऐवजी त्याला, मूळ शब्दांना तंतोतंत बसतील असेच शब्द हवे होते. मराठीतलं त्याचं लेखन इंग्रजीमध्ये जसंच्या तसं पोचवता येत नव्हतं हे त्याला स्विकारायला अवघड गेलं.
जेरी पिंटोच्या ‘एम अँड द बिग हूम’चा मराठी अनुवाद करताना, एकत्र बसून प्रत्येक शब्दाबद्दल चर्चा व्हावी असं मलाही त्याच्याइतकच वाटलं होतं. मूळ आणि अनुवादीत, अशा दोन्ही संस्कृतींमध्ये अनुवादक गुंतलेला असायाला हवा. जेरीच्या कादंबरीचा रोमन कॅथोलिक भाग माझ्या ओळखीचा आहे, पण पोर्तुगिज भाग माझ्या ओळखीचा नाही. एकत्र बसून बारकाईने अनुवाद तपासल्याचा खरोखर फायदा झाला, कारण अनुवादात एके ठिकाणी झालेली चूक लक्षात आली.
तुमच्या मते, अनुवादाचा मुख्य उद्देश काय? तुमच्या दृष्टीने अधिक महत्व कशाला आहे - मूळ लेखनाशी जास्तीत जास्त साधर्म्य ठेवणे का अनुवादित लेखनाला स्वतंत्र कलाकृती समजून अभिनव लेखनाचा दर्जा देणे?
अनुवाद वाचताना वाचकांना त्याला अभिनव लेखनाचा दर्जा देणं भाग असतं कारण मूळ लेखन वाचण्याचा त्यांना पर्याय नसतो. कादंबरीकार-अनुवादक टिम पार्क्स ह्यांनी अनुवादकांसाठी लेखकाच्या हक्कांची मागणी केली आहे. ‘व्हाय ट्रांसलेटरस् डिसर्व्ह सम क्रेडिट (अनुवादक अधिक मान्यतेला का पात्र असतात)’ ह्या नावाच्या लेखात ते विचारतात, ‘तुम्हाला आवडणारे मिलन कुंडेरा कोणी लिहिले? उत्तर: मायकल हेनरी हाइम. आणि एवढे चलाख वाटणारे ओरहान पमूक? उत्तर: मॉरीन फ्रीली. किंवा कल्पक व अभ्यासू असे रोबर्टो कालासो? त्याचं उत्तर, मी.’ जोपर्यंत अनुवाद हा एक अभिनव लेखन प्रकार म्हणून आपल्या पायावर खंबीरपणे उभा राहत नाही, तोपर्यंत तो आपला मुख्य हेतु-- चित्तवेधक कलाकृतींना भाषेचे अडथळे कौशल्याने पार करून देणे, हा साध्य होऊ शकत नाही.
अनुवाद करताना त्याचा अपेक्षित वाचकवर्ग कोणता आहे हे गृहीत धरून मग अनुवाद करता का? अनुवादित लेखन मूळ लेखनापेक्षा अधिक सहजतेने वाचकांपर्यंत पोहोचावे हा हेतु ठेवून अनुवाद करता का?
निव्वळ पैसे कमावण्याच्या हेतुने केलेले लेखन सोडले तर, मूळ लेखक त्यांचा वाचकवर्ग गृहीत धरून लेखन करतात का? अपेक्षित वाचकवर्ग गृहीत धरून कुठले अभिनव लेखन घडते? लेखक त्यांच्या लिखाणाला आपला वाचकवर्ग आपणहून शोधायची मुभा देतात. मूळ लेखकाच्या हेतुशी कटिबद्ध राहण्यासाठी अनुवादकही तसेच करतात.
पण, असं असूनही, मी जेव्हा ‘श्यामची आई’ ह्या पुस्तकाचा अनुवाद केला, तेव्हा मला सध्याच्या तरुण पिढीची जाण ठेवणं गरजेचं होतं. साने गुरुजींनी कथा लिहिल्या त्या काळातली मुलं जास्त भावुक आणि धार्मिक/सदाचरणी होती. समुदायात राहण्याची आणि घरातल्या मोठ्यांना आदर देऊन त्यांचं म्हणणं ऐकण्याची शिकवण त्यावेळच्या मुलांना दिली जायची. आजचे इंग्रजी भाषेचे तरुण वाचक हे प्रामुख्याने शहरात वाढलेली मुले असतात ज्यांच्या वाचनातून समुदाय किंवा वडिलमाणसे असे संदर्भ येत नाहीत. लहान आणि मोठ्या पडद्यांवर सतत दिसणारी हिंसा पाहूनपाहून त्यांच्यातला भावुकपणा कमी झाला आहे. मी करत असलेला अनुवाद माझ्या वाचकांना आवडावा आणि कौतुकास्पद वाटावा हा मी आधी व्यक्त केलेला हेतु साध्य करण्यासाठी, मूळ लेखन हे तरुण पिढीच्या आवडीनिवडींशी आणि भाषेशी जोडलं जातानाही त्यातले कथनातले मुद्दे आणि भावनिक मुद्दे तसेच संस्कृतिक गुंतागुंती जपल्या जाव्यात ह्याकडे लक्ष देणं भाग होतं. मूळ लेखनातला जडपणा थोडा कमी करून, आणि माझी भाषा जरा गतिमान आणि उत्साही करून मी ही तारेवरची कसरत पार केली.
दुसर्या प्रश्नाचं उत्तर द्यायच झालं तर, अनुवादित भाषा आणि तिची मूळ संस्कृती याबद्दल मला जर पुरेशी माहिती असेल तर अनुवादित लेखन वाचकांपर्यंत अधिक सहजतेनं पोहोचवण्यासाठी विशेष श्रम घ्यावे लागत नाहीत. ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड प्रत्येक ठिकाणी विशिष्ट प्रकारची इंग्रजी भाषा बोलतात. त्यांना एकमेकांची इंग्रजी भाषा वाचायला अवघड जात नाही. मी ब्रिटिश इंग्रजीत लिहिते कारण ती माझ्या हातची भाषा आहे. माझे अनुवादही ह्याच इंग्रजीमध्ये असतात. त्यामुळे, इंग्रजी वाचता येणार्या कोणालाही मी केलेला अनुवाद सहजपणे वाचता येऊ शकतो असे मी गृहीत धरते.
मी नुकतंच एक नाटक अनुवादित केले. हे नाटक प्रेक्षकांना सहजपणे समजेल अशा हेतुने आधी एकदा अनुवादित केलं गेलेलं होतं. म्हणूनच अनुवादामध्ये, नाटकातील एका प्रवेशामध्ये असलेल्या अंताक्षरीमधली मराठी भक्तिगीतं ही फक्त देवांच्या नावांचा जप असलेली प्रार्थना म्हणून समोर आली. वाचकवर्गापर्यंत अनुवाद सहजतेने पोचतो का? हा प्रश्न फक्त भारतीय अनुवादकांनाच (किंवा कदाचित सगळ्याच युरोपेतर, अमेरिकेतर अनुवादकांना) विचारला जातो कारण इथे खरा वाचकवर्ग भारतातला असण्याची शक्यता जास्त असूनही तो प्रामुख्याने ब्रिटन किंवा अमेरिकेतला आहे असे गृहीत धरले जाते.
तुमच्या मते अनुवादित लेखन हे ‘चांगले’ कधी ठरते?
चांगल्या अनुवादातून मूळ लेखकाचे म्हणणे दिसले पाहिजे आणि ते वाचनीय असले पाहिजे.
पुस्तकाच्या ऐवजी नाटकाचा अनुवाद करताना तुमच्या अनुवादाच्या पद्धतीत काय बदल घडतात?
विशिष्ट हेल किंवा बोलीभाषेतले संवाद अनुवादित करताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात?
तुमच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे काय --- मूळ लेखनाशी साम्य राखणे का अपेक्षित श्रोतृवर्गाला डोळ्यासमोर ठेवून, त्यांना संवादातल्या भावना अधिक सहजपणे समजतील अश्या पद्धतीने बदल करणे?
नाटकांच्या अनुवादात हेल किंवा बोलीभाषेचा अनुवाद होत नाही किंवा तो करण्याचा प्रयत्नही करू नये. फिक्शन किंवा नॉन-फिक्शनच्या वाचकाला लिखाणातले बारकावे समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ असतो, पण नाटक बघणाऱ्या प्रेक्षकांना घडणार्या घटना तत्क्षणी समजणं गरजेचं असतं. एखाद्या वेळेला, मूळ नाटकच समजायला अवघड असतं. सुरुवातीची ‘अब्सरडिस्ट’ नाटकं प्रेक्षकांना भांबावून सोडायची. पण जसजशी प्रेक्षकांना ह्या नाटकांची वेगळी भाषा कळू लागली तसतशी ही नाटकही समजू लागली. प्रायोगिक मराठी नाटकांमध्ये अनुकरणाची अतिशयोक्ती असलेले प्रयोगही घडले पण ते यशस्वी झाले नाहीत. नाटकांमध्ये, कॉस्च्युम/पोशाख आणि सेट प्रेक्षकांना त्या मूळ नाटकाच्या अनोख्या दुनियेत नेण्याची जबाबदारी उचलतात. अनुवादकाची जबाबदारी असते नाटकातल्या पात्रांना वास्तविक बनवून त्यांचे संवाद विश्वासनीय बनवणे.
‘मूळ लेखनातल्या/संवादातल्या भावना’ म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न एखाद्या कार्यशाळेत विचारायला हवा जिथे प्रश्न विचारणाऱ्याला काय म्हणायचे आहे हे प्रत्यक्ष बघून कळू शकतं. अपेक्षित श्रोतृवर्ग आणि अपेक्षित वाचकवर्ग ह्या दोन्हीही तितक्याच अवास्तविक संकल्पना आहेत. नाटकाचे तिकीट कोण विकत घेईल, नाटक कोणाला आवडेल आणि कोणाला आवडणार नाही हे कोणालाही नक्की माहिती नसतं. निर्माते तिकीट विक्रीवरून नाटकाचं यश किंवा अपयश ठरवतात.
सध्या, दक्षिण ग्लोबल साऊथ (दक्षिण गोलार्धातील देश) मधून आलेले अनेक लेखक आपल्या इंग्रजी लेखनात त्यांची मातृभाषा कुठलेही स्पष्टीकरण, अनुवाद अथवा इटालिसायझेशन न देता समाविष्ट करून स्वत:ची द्विभाषिक ओळख प्रस्थापित करत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर एखाद्या द्विभाषिक साहित्यकृतीचा अनुवाद तुम्ही कशा पद्धतीने करता?
अशा प्रकारे लेखन करणारे लेखक फक्त ग्लोबल साऊथपुरते सीमित नाहीयेत. दक्षिण अमेरिका, क्यूबा यांसारख्या देशांतून अमेरिकेला स्थलांतरित झालेले अनेक लेखक ह्या पद्धतीचे लेखन करत आहेत. अमेरिकन इंग्रजीमध्ये यीडीशची सरमिसळपूर्वीच झालेली आहे. स्थलांतरित लेखकांना त्यांच्या लेखनात स्वतःला अधिक मोकळेपणाने व्यक्त करण्याची इच्छा असते. स्वत:च्या मातृभाषेतील शब्द आणि वाक्प्रचार त्यांच्या लेखनात वापरून त्यांना आपण कोण आहोत हे व्यक्त करता येते. इंग्रजी भाषिक पाश्चिमात्य लेखकांच्या लिखाणाचा मी अनुवाद करत नाही. भारतीय लेखकांनी केलेले इंग्रजी लेखन आणि अर्थातच मराठी साहित्याचा अनुवाद करण्याकडे माझा कल आहे. आत्ता पॅनडेमीकच्या काळात पी.जी. वूडहाऊसनी लिहिलेल्या तीन कथांचा मराठीत अनुवाद करण्याचा योग आला. वूडहाऊसच्या बाबतीत द्विभाषिकतेचा प्रश्नच उत्पन्न झाला नाही.
Comments