top of page
  • bilorijournal

तलवारी, ताकद आणि तबाही: कल्की आणि अमिश यांनी लिहिलेल्या स्त्रियांचे तुलनात्मक विश्लेषण

मूळ लेखिका - जयश्री श्रीधर

मराठी अनुवाद – आर्यायशोदा कुलकर्णी आणि सई पवार


कल्की कृष्णमूर्ती यांनी लिहिलेली पोनियिन सेल्वन (1950 च्या दशकातील तमिळ ऐतिहासिक काल्पनिक मालिका) व अमिश त्रिपाठी लिखित द शिवा ट्रायलॉजी आणि राम चंद्र मालिका या पुस्तकांमधील स्त्री पात्रं कशा पद्धतीने रेखाटली गेली आहेत याचा परामर्श खालील वैयक्तिक निबंधात घेतलेला आहे. समकालीन भारतीय लेखकांनी केलेल्या ऐतिहासिक-पौराणिक महाकाव्यांच्या आधुनिक इंग्रजी सादरीकरणात स्त्री पात्रांसाठी जी एक विरोधाभासी नजर (Gaze) दिसते त्याबद्दल मला कुतूहल आहे. तसेच ह्या पुस्तकांतून दिसणार्‍या पीळदार, तलवार चालवणारी, मर्दानगीचा गौरव करणार्‍या स्त्रीपात्रांसारखी व्यंगचित्रे न बनता, कथानकात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या कल्कीच्या स्त्री पात्रांचेही मी विश्लेषण करू इच्छिते.

लॉकडाऊन दरम्यान, कल्की कृष्णमूर्ती (१) ह्यांची पोनियिन सेल्वन ही तमिळमधील पाच भागांची ऐतिहासिक नाट्यमय कादंबरी मी आणि माझ्या आईने वाचायला घेतली. वेळ घालवण्याचा प्रयत्न म्हणून सुरू झालेले हे वाचन, हळूहळू झोपतानाच्या गोष्टींनी भरलेल्या उबदार बालपणाची प्रकर्षाने आठवण करून देऊ लागले. दहाव्या शतकातील चोल साम्राज्याच्या२ अरुलमोळी वर्मन (राजराजा चोल I) (२) आणि त्याच्या सत्तेवर येण्याच्या प्रवासाची कथा ही मालिका सांगते. अम्मा जसजशी एकेक जाडजूड खंड वाचून दाखवू लागली, तसतसं कल्कीच्या कथेत चपखल बसवलेल्या, बारकाईने केलेल्या वर्णनात्मक लेखनातून स्पष्टपणे निर्माण झालेल्या प्रतिमा माझ्या मनात फिरू लागल्या. गुप्तहेर, योद्धा, राजकन्या, मोठे प्रवास, राजघराण्यातील मृत्यूची भविष्यवाणी करणारे धूमकेतू, गाणी आणि कविता यांनी भरलेली ही पुस्तके सुरमय अशा तमिळ गद्य शैलीत लिहिलेली आहेत. भविष्य सांगणाऱ्यांपासून ते फूलं विकणाऱ्यांपर्यंत आणि लोहारांपासून ते भिक्खूंपर्यंत अशा पैलूदार पात्रांमधून, लेखक एक विस्तृत जग विणतात. या विस्तीर्ण महाकाव्यामध्ये कथेतला काळ जणू जिवंत होतो आणि कथेतली प्रमुख पात्र ज्या राजवाडे, महामार्ग, विश्रामगृहे, मठ, गुहा, जहाजे आणि नदी-बेटांमध्ये प्रवास करतात आणि जगतात, वाचक त्यांच्या प्रेमात पडतो.

हे महाकाव्य संपवल्यावर मागे वळून पाहताना मला एक गोष्ट जाणवली. आपल्याला समकालीन भारतीय लेखकांच्या ऐतिहासिक-पौराणिक महाकाव्यांच्या आधुनिक सादरि‍करणामध्ये जी स्त्री पात्रांची जणू व्यंगचित्रेच आढळतात तशी तलवारी चालवणारी, मर्दानगी गाजवणारी नसूनही येथील स्त्री पात्रं कथानकात निर्णायक होती. हे मला फार भावले. ही मालिका 1950 च्या दशकात एका पुरुषाने लिहिलेली असूनही, कुंथवई देवी (चोल राजकुमारी), नंदिनी (एक प्रतिस्पर्धी राणी), पुंकुळाली (एक बोटवाली) आणि वनथी (राजकन्येची मैत्रिण) यांसारखी पात्रं पुरुषांवर अवलंबून असणारी, एक-आयामी स्त्री पात्रं नाहीत हे मला विलक्षण वाटले. कथानकाची सर्व सूत्रं स्त्रीपात्रांच्या हातात असतात, आणि मोहिनी, कावा, व्यावहारिकता, बुद्धिमत्ता या त्यांच्या सगळ्या गुणांचा त्या पुरेपूर वापर करतात. त्या राजकीयदृष्ट्या सक्रिय, स्वतंत्र विचार करणार्‍या आहेत आणि त्यांची ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना बाहुबलाची गरज नाही. अमीश त्रिपाठी (३) यांच्या मालिकेतील स्त्री पात्रांच्या रचनेत नेमकी हीच समज दिसत नाही.


शिवा ट्रिलॉजी असो किंवा राम चंद्र मालिका असो, त्या ‘पुरुषासारख्या लढल्या' म्हणून या पुस्तकांमधील नायिकांना इतर पुरुषांकडून सतत प्रमाणित केले जाताना दिसते. "एक स्त्री असूनही तू तलवार काही फार वाईट चालवत नाहीस,” (अमीश 54) अशा करूणाजनक कौतुकाने नायिकांना सतत पुरस्कृत केलं जातं आणि पुरुष पात्रांच्या कामुक नजरेचा विषय बनवलं जातं: "आनंदमयीच्या हालचाली इतक्या अचूक होत्या की पर्वतेश्वराला तिचे लक्ष्य दिसलेच नाही. तिच्या हालचालींकडे कौतुकाने पाहत तो जागीच उभा राहिला. आश्चर्याने त्याने आ वासला. जेव्हा उत्तंक आणि भगीरथानी वाजवलेल्या टाळ्या त्याला ऐकू आल्या तेव्हा तो लक्ष्याकडे वळला. प्रत्येक सूरा लक्ष्याच्या बरोबर मध्यावर लागला होता. उत्कृष्ट." (अमीश 161)


हे पुरुष अनेकदा स्त्रियांना द्वंद्वयुद्धासाठी आव्हान देतात. आपल्याला काहीही सिद्ध करायचं नाही असा दावा करत त्या स्त्रिया विनम्रपणे त्या आव्हानाला नकार देतात. या सततच्या विनंत्या म्हणजे पुरुषी अंहकाराला चालना देण्याचं निमित्त नाहीतर एक प्रकारच्या प्रेम याचना असतात. म्हणूनच त्या स्त्रियांना या आगाऊपणाला नकार देताना पाहून आश्वस्त वाटतं.


एका स्त्रीचे स्थान

पोनियिन सेल्वन मधल्या माझ्या आवडीच्या अनेक प्रसंगांमधला एक म्हणजे जेव्हा पुंकुळाली, एक बोटवाली, आणि सेंथानमुदन, एक फुलवाला, एका कामगिरी निमित्त तंजाई नावाच्या शहराकडे निघालेले असतात (कल्की, अध्याय २०). रस्त्याने चालता चालता, त्याच्या विनंतीनुसार, ती त्याला तलवारबाजीची शिकवण देते. हे दोघं समवयीन आहेत. लेखक इथे पुंकुळालीच्या काटक बांध्यावर किंवा खंबीर हालचालींवर लक्ष केंद्रित न करता, ते दोघं करत असलेल्या प्रवासाच्या समर्पकतेची माहिती देतात. ह्या दोन लिंगांमधलं नातं पूर्वापार चालत आलेल्या भूमिकांवर बेतलेलं नसून, कौशल्य आणि स्वभावांवर बेतलेलं आहे. पोनियिन सेल्वन मधल्या बायकांची ताकद प्रासंगिक आहे. दहा मीटर अंतरातल्या प्रत्येक पुरुष पात्राला उत्तेजित करण्यासाठी तीचं अस्तित्व नाही.

दूसरा एक प्रसंग: जिला राजकुमार ‘समुद्रकुमारी’ (समुद्राची कन्या/ राजकन्या)(४) ह्या नावानी हाक मारतो अशी, पुंकुळाली, तिची छोटी होडी घेऊन जेव्हा श्रीलंका आणि भारतातल्या वादळी समुद्रावर जाते तेव्हा तिला राजकुमार अरूलमोळी वर्मन आणि त्याचा सेवक वंथियथेवन सापडतात. त्यांचं जहाज बुडालेलं असतं आणि ते लाकडाच्या ओंडक्यांना धरून, जीव मुठीत धरून, तरंगत असतात. पुंकुळालीचं गाणं ऐकू येऊन वंथियथेवन ओरडतो, “अरे ती आली! वाचलो रे आपण!” (५) (कल्की, ४२४)


द शिवा ट्रायलॉजी मध्ये असलेली कृतज्ञतेची लांबलचक कबुली किंवा आयुष्यभराचं देणं असण्याचे संवाद पोनियिन सेल्वनमधे नाहीत; किंबहुना ह्या प्रसंगावर येऊन दुसरं पुस्तक संपतं. पुंकुळाली त्या दोघांचा जीव वाचवते. तिच्या जागी असलेल्या इतर कोणीही जे केलं असतं तेच पुंकुळाली करते असं अतिशय सहजपणे समोर येतं. तिला ना देवत्व दिलं गेलयं ना तातडीनी कोणी तिच्या प्रेमात पडताना दाखवलेलं आहे.


उफळत्या समुद्रावर स्वार होणारी आणि विजा-चक्रीवादळांमध्ये टेकड्यांवर जाऊन चिंब भिजणारी, उत्साही अशी पुंकुळाली असली, तर बोलण्यात तरबेज आणि नीतिशास्त्रात निपुण कुंथवई ही चतुर आणि चाणाक्ष अशी राज्यकर्ती आहे. कारस्थानं, दगाबाजी आणि लोकांना (फक्त पुरुषांनाच नाही) तिच्या मनासारखं वागायला लावण्याची कला असणारी ‘खलनायिका’ नंदिनी वाचकांवर आपला वचक निर्माण करते. मंदाकिनी देवी तिच्या पूर्वीच्या प्रियकरासाठी म्हणजेच वृद्ध राजासाठी, खंजीरासमोर धावते. वंदीयथेवन ह्या तिच्या प्रियकरावर असलेला खूनाचा आळ, मणिमेकलाई स्वत:वर घेते. ह्या महाकाव्यात अगणित वेळा स्त्रिया पुरुषांना ‘वाचवतात’ पण त्यांना ‘पुरुषी’ किंवा ‘नायक’ म्हणून मिरवलं जात नाही. ‘त्याग हा स्त्रीचा सर्वोच्च सद्गुण असतो’ हा प्रसिद्ध समज कल्की अतिशय कौशल्याने टाळतात. ह्या सगळ्या स्त्रियांना त्या कोणाला आणि का वाचवतायेत ह्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे सर्वस्वी त्यांचे आहेत आणि त्यांनी केलेल्या त्यागांमागची कारणे तर्कशुद्ध आहे. त्यांच्यात रामानंद सागर ह्यांच्या रामायण किंवा इतर माध्यमातून प्रसिद्ध केलेला जन्मजात परोपकाराची स्त्रीभावना नाही.


कथेतली ही प्रमुख स्त्री पात्रं कल्कींना इतक्या उत्तम पद्धतीने का आणि कशी कळली? अमीश ह्यांच्या पुस्तकांमधल्या एकाच साच्यातून निघाल्यासारख्या वाटणाऱ्या सीता, सती, आनंदमई आणि काली ह्यांच्या तुलनेत त्यांची व्यक्तिमत्व इतकी भिन्न कशी झाली?


तलवारीपेक्षा श्रेष्ठ

तसं बघता, शारीरिक ताकद असलेली स्त्री पात्रं असण्यात काही वावगं नसलं तरी अमीश ह्यांच्या स्त्री पात्रांच्या हाताळणीतून असं सुचवलं जातं की फक्त उत्तम युद्ध करता येणार्‍या बायकांनाच पुरुष मान देतात. ही पात्र दोनच वर्गात मोडतात, एक नाजूक आणि दुबळी किंवा ताकदवान आणि मादक. जर ते पात्र कथेत महत्त्वाची भूमिका पार पाडणार असेल तर ती स्त्री उत्तम योद्धा असली पाहिजे, आणि त्याच वेळी देखणीही (ही पात्र अगडबंब आणि अंहकारी पुरुषांशी मारामारी करून जिंकतानाचे एक दोन प्रसंग जोडले की झालं. जागरुकतेचा विजय असो!). अमीश ह्यांच्या लेखनात, पुरुषी नजरेतून स्त्री पात्रांमधलं बायकीपण टाळत, सामान्य स्त्रियांपेक्षा ह्या स्त्रिया कशा आणि किती वेगळ्या आहेत हे दाखवण्यावर जास्त भर दिला जातो. असं असतानाच ह्या पुस्तकांमधून दिसणार्‍या अनेक लिंगभेदी पुरुष पात्रांबद्दल काहीच समालोचन किंवा टीका आढळत नाही. त्यामुळे ही पुरुष पात्रं वापरून, अमीश पुरुषी नजरेचा उपहासात्मकपणे वापर करत आहेत असं वाटण्याची थोडीही शक्यता नाही हे सिद्ध होतं. सीता आणि सती ही दोन्ही पात्र आवडण्याजोगी असली तरी ती शेवटी एका पुरुषाच्या कल्पनेतल्या ‘ताकदवान’ स्त्रीची व्याख्या आहे ह्यात शंका नाही.


कल्कींच्या कथांमधल्या निःसंकोचपणे आणि मुद्दामहून पुरुषांना भुरळ घालून कामाला लावणाऱ्या स्वावलंबी, खंबीर स्त्रिया कुठे गेल्या? त्या, ज्या स्वत:च्या नीतिमत्ता आणि चातुर्याच्या हिंमतीवर कायम शत्रूच्या एक पाऊल पुढे असणार्‍या? नेमकं उदाहरण म्हणून द्यायला ओळखीचं एखादं पात्र माझ्याकडे नाही. पण ही पात्र मला आथिना ह्या ग्रीक युद्ध देवतेची आठवण करून देतात. तिच्यात आणि त्यांच्यात असलेल्या तर्कशुद्ध विचार शक्ती, शहाणपणा आणि नीतीशास्त्राचे असलेले ज्ञान ह्या समान गुणांचा अमीश ह्यांच्या पात्रांमध्ये दिसणारा अभाव अगदी दु:खद आहे. अमीश ह्यांच्या कथांमध्ये सगळे महत्त्वाचे निर्णय पुरुषांच्या हातात दिलेले आहेत. नव्याने प्रस्तुत केलेल्या ह्या कथांमधून जुन्या कल्पनांचा खरोखरच पाडाव केला गेला आहे? का सत्तेच्या समि‍करणांवर सतत भाष्य करणार्‍या आजच्या जगात समाज मान्य ठरण्याचा हा एक कमजोर प्रयत्न आहे? बाहुबलाला ताकद मानण्याची चूक करणं, तसं बघायला गेलं, तर अगदीच सहज शक्य आहे.


अमीश ह्यांच्या स्त्री पात्रांकडे ताकद आहे पण निर्णयक्षमता नाही. सीतेचं पात्र आजच्या वाचकांच्या आवडीचं करण्यासाठी तिला ‘मिथिलेची लढवैय्या राजकुमारी’ म्हणून प्रस्तुत करणं हा एकच पर्याय आहे का? एखाद्या पात्राचं कथेतलं महत्व हे त्याच्या बाहुबलाशी जोडलेलं आहे असा इथे मतितार्थ आहे. जे द्वयित मोडायला ही कथा निर्माण झाली त्यात अमीशचे लेखन स्वत:च अडकते. थोड्या सूक्ष्म हाताळणीतून, कथेला दिशा देणारी सगळीच पात्र सतत बाहुबलाचे प्रदर्शन करतात असं कदाचित वाटलं नसतं. कल्की ह्यांच्या स्त्री पात्रांच्या हाताळणीमुळे त्या स्त्रिया उसन्या अवसाना शिवाय धाडसी, भांडखोर नसूनही दुराग्रही वाटतात आणि त्या स्वसामर्थ्यावर निर्णय घेऊ शकतात. एखादं स्त्री पात्र तयार करताना त्याला बायकीपण देणं हे खराब नाही हे कल्कींना माहिती आहे. ते पात्र सौम्य स्वभावाच्या वनथीचं असू शकतं, जी वेळोवेळी बेहोश होते; पण त्याचवेळी प्रधान मंत्र्यांकडून जीवाला धोका असला तरीही ती फरार राजकुमाराच्या ठिकाणाचे गुपित न उलगडता खंबीर राहते. किंवा ते पात्र प्रेमविव्हल माणिमेकलाईचंही असू शकतं जी तिच्या प्रियकरावर असलेला आळ न डळमळता स्वत:वर घेते. अशी पात्रं आकर्षक, नाजूक, दयाळू, संवेदनशील असे स्त्रीत्वाचे समाजमान्य गुण धारण करूनही प्रचंड महत्व आणि प्रभाव असणारी असू शकतात.


मग्रूर आणि शस्त्र चालवणाऱ्या स्त्री पात्रांपेक्षा, अशी वैशिष्ठ्यपूर्ण स्त्रीत्वाबरोबर मनोधैर्य असणारी स्त्री पात्र मला जास्त भावतात. पुरुषांसारखं आक्रमकपणे वागण्याची गरज नसणाऱ्या स्त्रियांच्या दैनंदिन धैर्याचं आणि त्यांच्या चिकाटीचं इथे दर्शन घडतं. त्यांच्यामध्ये रात्ररात्र जागून अभ्यास करणाऱ्या त्या शांत मुलीची महत्वाकांक्षा आहे, सोबत असलेल्या पुरुषाकडे दिलेलं जेवणाचं बिल मागून घेणार्‍या त्या बाईचा संयम आहे आणि तसच तिच्यावर अन्याय करणाऱ्या पुरुषावर सूड उगवण्यासाठीच्या अचूक क्षणाची वाट पाहणाऱ्या त्या बाईची अथक सोशीकताही आहे. कल्कींच्या लेखनात हेच गुण, मोठ्या प्रमाणावर, राष्ट्रीय पातळीवर समोर येतात.


पुनःप्रस्तुति आणि समर्पकतेबद्दल

कल्कींच्या स्त्रियांना जशी स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत तशीच त्यांच्या पुरुष पात्रांनाही आहेत. ही पात्र त्यांच्या आजूबाजूच्या स्त्रियांना अडल्या हाताने आदर देत नाहीत किंवा त्यांच्यावर उगाचच प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षावही करत नाहीत. कथेतल्या स्त्री पात्रांचे असलेले स्थान म्हणजे त्यांच्यावर केलेली कृपा आहे असं ही पुरुष पात्रं सतत सुचवत नाहीत. मागे वळून पाहताना, पुरुषांनी केलेल्या मूल्यमापनातून समोर येणार्‍या अदृश्य मेहरबानीचा ह्या लेखनातला अभाव उन्हाळ्यातल्या एका गार वाऱ्याच्या झुळुकेसारखा मला वाटला. आणि त्या स्त्री पात्रांच्या गोष्टींमधून असणारी सखोलता आणि त्यांच्या हाताळणीतून त्यांना मिळालेली प्रतिष्ठा अतिशय आशादायक वाटली.


पोनियिन सेल्वन सर्वात प्रथम ऑक्टोबर १९५० मध्ये प्रकाशित झालं आणि मग कल्कींच्या आठवडी नियतकालिकेतून प्रसिद्ध केलं गेलं. सात दशक उलटून सुद्धा हे लेखन म्हणजे आजही तितक्याच आवडीने वाचली जाणारी, समर्पक अशी साहित्यकृती आहे. पण समकालीन भारतीय लेखकांचे इंग्रजी ऐतिहासिक-काल्पनिक लेखन वाचणाऱ्या वाढत्या शहरी वाचकांकडून जरा दुर्लक्षित होणारेही आहे ह्याचे दु:ख आहे. आपल्या बहुभाषी देशाला एकत्र बांधणाऱ्या वसाहतवादी इंग्रजीत हे महाकाव्य प्रसिद्ध नाही हे कदाचित त्याचं कारण असावं. तसं असलं तरी अनुवाद करूनही आजच्या कथाकथनाच्या शैलीत हे लेखन कसं वाटेल ह्याबद्दल मला शंका आहे. सध्याच्या काळातल्या, ‘पुरुषी’ गुणांमुळे मिळवलेल्या योग्यतेच्या भरवशावर राहणार्‍या, सपक स्त्री पात्रांमधून महिला सक्षमीकरण करणाऱ्या पुस्तकांच्या साच्यात पोनियिन सेल्वन बसेल का?


पाश्चिमात्य ‘यंग अडल्ट’ ह्या शैलीतल्या लेखनातून समोर येणारी स्त्री पात्र, ताकदवान आणि स्वतंत्र अशी असतात (द हंगर गेम्स, द मॉर्टल इन्स्ट्रूमेंट्स, द इन्फर्नल डिव्हायसेस, डायव्हरजंट, पर्सी जॅकसन, द हीरोस् ऑफ ऑलिंपस, मॅग्नस चेस) आणि त्याचा प्रभाव समकालीन भारतीय लेखनात दिसून येतो. ह्या स्त्री पात्रांमधल्या गुणांना त्यांच्या कथानकाची आणि व्यक्तिमत्वाची साथ असते. भारतीय इतिहासात वर्षानुवर्ष स्त्रियांच्या आजूबाजूला असलेल्या पुरुषांनी दाबलेल्या कथा नव्या दृष्टिकोनातून समोर आणण्याचा प्रयत्न अमीश सारखे लेखक करत आहेत. पण तसं करताना, स्त्री आणि पुरुष पात्रांना समपातळीवर आणण्यापेक्षा ते ह्या स्त्री पात्रांना ‘लढवैय्या’ किंवा ‘योद्धा’अशा पातळीवर उंचावताना दिसतात.


आजच्या समकालीन भारतीय लेखकांकडून केली जाणारी ही पुन:प्रस्तुति किती काळ समर्पक राहील? का पुरुषांनी पुरुषांच्या दृष्टिकोनातून सांगितलेल्या स्त्रियांच्या गोष्टींचं उदाहरण म्हणून हे सांगीतलं जाईल? अम्मा सोबत पोनियिन सेल्वन वाचल्यामुळे माझ्या मातृभाषेतल्या साहित्याशी माझी नव्याने ओळख झाली आणि अनेक छान संभाषणं (आणि फॅनगर्ल सेशनस् ही) व्हायला प्रेरणा मिळाली. पण १९५०सारख्या जुन्या काळीसुद्धा लोकं अतिशय प्रगल्भ स्त्री पात्र लिहित होती आणि ही पात्र सध्याच्या भडक स्त्रीवादी धारणांऐवजी अतिशय तरल आणि पैलूदार पद्धतीने हाताळलेली होती हेही मला समजलं. आजच्या जगात, जिथे एखाद्या व्यक्तिकडे बघण्याच्या ‘नजरे’ची गणितं बदलण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत तिथे, तिच्या प्रिय साम्राज्यावर येणार्‍या अनोळखी संकटांना सामोरी जाणारी कल्कींची कुंथवई स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी राहील ह्यावर माझा विश्वास आहे. पण अमीश ह्यांची सीता? मला शंका वाटते.


रेखाचित्र - गौरी गुरुस्वामी


संदर्भ ग्रंथ

कल्की कृष्णमूर्ती ह्यांचे पोनियिन सेल्वन

अमीश त्रिपाठी ह्यांचे द शिवा ट्रायलॉजी आणि द राम चंद्र सीरीझ


संदर्भ

त्रिपाठी, अमीश . द इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा. अध्याय ३. वेस्टलँड प्रेस, २०११. पान १६१

त्रिपाठी, अमीश . द सीक्रेट ऑफ द नागास्. अध्याय १०. वेस्टलँड प्रेस, २०११. पान १६१

कृष्णमूर्ती, कल्की. मणिमाकूदम. अध्याय २०. पोनियिन सेल्वन, पुस्तक ४. ई-बुक आवृत्ती. कल्की अॅप, २०१३.

कृष्णमूर्ती, कल्की. सुझलकातरू. अध्याय ५३. पोनियिन सेल्वन, पुस्तक २ .वनथी पथीप्पगम, १९८४.

सागर, रामानंद. रामायण. रामानंद सागर आर्टस्. १९८७-१९८८.

कॉलीन्स, सूझॅन. द हंगर गेम्स ट्रायलॉजी. स्कोलॅस्टिक, २०१४.

क्लेर, कसँड्रा. द मॉर्टल इन्स्ट्रूमेंट्स सीरीझ. मार्गारेट के मॅकएलडेरी बुक्स, २००७.

क्लेर, कसँड्रा. द ईंफर्नल डिव्हायसेस ट्रायलॉजी. मार्गारेट के मॅकएलडेरी बुक्स, २०१०.

रॉथ, वेरोनीका. डायव्हरजंट ट्रायलॉजी. हारपर कॉलीन्स, २०११.

रीओर्डन, रीक. पर्सी जॅकसन अँड द ऑलिंपियन्स सीरीझ. हायपेरीयन, २००६.

रीओर्डन, रीक आणि जॉन रॉको. हीरोस् ऑफ ऑलिंपस: द कंप्लीट सीरीझ. डिझ्नी-हायपेरीयन, २०१४.

रीओर्डन, रीक. मॅगनस चेस अँड द गॉडस् ऑफ अॅस्गार्ड सीरीझ. डिझ्नी-हायपेरीयन, २०१५. टेक्स्ट.

कृष्णमूर्ती, कल्की. मणिमाकूदम. अध्याय २४. पोनियिन सेल्वन, पुस्तक ४. ई-बुक आवृत्ती. कल्की अॅप, २०१३.


टिपा:

  1. रामस्वामी कृष्णमूर्ती (१८९९ – १९५४), ‘कल्की’ ह्या टोपण नावाने प्रसिद्ध असे भारतीय लेखक, पत्रकार, कवी, समीक्षक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे कार्यकर्ते होते. १९४१ मध्ये टी. सदासिवन ह्यांच्या बरोबर त्यांनी ‘कल्की’ नावाचे एक मासिक स्थापन केले. कल्कींच्या साहित्यकृतींमध्ये १२० हून अधिक लघुकथा, १० लघु कादंबर्‍या, ५ कादंबर्‍या, ३ ऐतिहासिक प्रणयकथा, संपादकीय आणि राजकीय लेख आणि अनेक सिनेमा आणि संगीत संबंधी समालोचनांचा समावेश आहे.

  2. चोल राजघराणे हे दक्षिण भारतातले एक थॅलॅसोक्रॅटिक (प्रामुख्याने समुद्र आणि समुद्री मार्गाने ज्या राज्याचा विस्तार झाला आहे असे) साम्राज्य होते. जागतिक इतिहासातील दीर्घ काळ राज्य केलेल्या राजघराण्यांपैकी चोल साम्राज्य एक आहे. राजराज १ (राज्यकाल इ.स ९८५ – इ.स १०१४) मूळ नाव अरूलमोळी वर्मन, हा त्याच्या राज्य काळातला सर्वात शक्तिशाली सम्राट होता. चोल साम्राज्याचे दक्षिण भारतात आणि हिंद महासागरातले वर्चस्व स्थापन करण्यासाठी आणि चोल साम्राज्याच्या राजधानी, तंजावुर येथे प्रसिद्ध बृहडेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी तो ओळखला जातो. पंड्या राष्ट्र (दक्षिण तमिळनाडू), चेर राष्ट्र (मध्य केरळ आणि पश्चिम तमिळनाडू) आणि उत्तर श्रीलंकेपर्यंत त्याच्या साम्राज्याच्या व्याप होता. लक्षद्वीप बेटं आणि मालदिव द्वि‍पांचा भाग असलेले थिलाधूंमदुलू बेटही त्याने काबीज केलेले होते. दक्षिण कर्नाटकच्या पश्चिम गंग राज्यकर्त्यांविरूद्ध तसेच चालुक्यांविरुद्ध चालवलेल्या स्वार्‍यांमुळे चोल साम्राज्याचा विस्तार तुंगभद्रा नदीच्या काठापर्यंत पोचलेला होता. पूर्व किनार्‍यावर त्याने वेंगीसाठी (गोदावरी मुलुख) चालुक्यांशी लढा दिला.

  3. अमीश त्रिपाठी (जन्म १९७४) हे त्यांच्या ‘शिवा ट्रायलॉजी’ आणि ‘राम चंद्र’ मालिकेसाठी प्रसिद्ध असलेले भारतीय लेखक आहेत. २०१० पासून भारतीय उपखंडात त्यांच्या पुस्तकांच्या ५.५ दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.

  4. अनुवाद माझा.

  5. अनुवाद माझा.


 

जयश्री श्रीधर नॅशनल इंस्टिटयूट ऑफ डिझाइन, अहमदाबाद येथे फिल्म आणि व्हिडियो कम्युनिकेशन शिकते. ती गेली आठ वर्ष हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असून, तिने अनेक कार्यक्रमांमध्ये आपली कला पेश केलेली आहे. चित्रपटांचा अभ्यास, सिनॅसथेशिया, भारतीय शास्त्रीय संगीत आणि सामाजिक भाषाशास्त्र ह्या विषयांमध्ये संशोधन करण्यात तिला स्वारस्य आहे. रियाझ करत नसेल तर ती एखाद्या पुस्तकाच्या कपाटापाशी किंवा तिला नको तेवढ्या गोष्टी कश्या आवडतात ह्याबद्दल टिपणी करताना सापडेल.bottom of page