top of page
  • bilorijournal

ऐच्छिक

मूळ लेखिका – एलिस केनन

मराठी अनुवाद – आर्यायशोदा कुलकर्णी


“माझ्या लक्षात आलं की (एखाद्या गोष्टीबद्दलचं) ज्ञान (असणं) ही (आपल्याला) ठेंगणं भासवणारी, सर्वनाशी आणि सगळं गिळंकृत करणारी गोष्ट आहे आणि ते ज्ञान असण्याने कृतज्ञता आणि आत्यंतिक हाल या दोन्ही तुमच्या वाट्याला येतात.” – कारमेन मारिया मचादो, द रेसिडेंट.


रेखाचित्र - गौरी गुरुस्वामी

मनोरुग्णालयात काम करताना मी दोन गोष्टी शिकले--- १.कायम स्वत:जवळ एक पेन ठेवायचं आणि २.हाल सोसणं हा ज्याचा-त्याचा निर्णय असतो. मी स्वत: एका त्रासदायक मानसिक अनुभवातून गेलेली असल्यामुळे, माझ्यासारख्या इतरांना मला मदत करता येईल असं वाटलं, आणि म्हणून मी मनोरुग्णालयात काम करण्याचा निर्णय घेतला. पण तिथे काम करायला लागल्यावर, स्मृति आणि वास्तव ह्या दोन्हीमधली मेंदूत असणारी रेषा अतिशय लवचिक असते हे मला दिसून आलं. कार्मेन मारिया माचादो, त्यांच्या ‘द रेसिडेंट’ ह्या लघुकथेत, गोष्टीची जागा आणि कथाकथनाचा दृष्टिकोन वापरून स्मृति आणि वास्तवाची ही फेरफार चित्रित करतात. भावनिक यातनेतून बाहेर पडण्यासाठी स्वत:कडे आणि आपण दडवून ठेवलेल्या आठवणींकडे प्रामाणिकपणे, मोकळेपणे पाहणं कसं महत्त्वाचं असतं ह्याचा आढावा त्या घेतात.


ही कथा एका आर्टिस्ट्स रेसिडेन्स (कलाकारांचे घर)मधे घडते. कथेची निवेदिका लहानपणी ज्या ‘समर कॅम्प’ला गेलेली असते त्या कॅम्पमधल्या तळ्याच्या पलीकडच्या काठावर हे घर असतं. निवेदिकेचा संपूर्ण दृष्टीकोन पलटण्याची प्रक्रिया ह्या तळ्याच्या रूपकातून दर्शवली आहे. एखादं शेत, इमारत किंवा तत्सम चौकोनी जागेऐवजी गोल तळ्याचा वापर करून काळाचा वर्तुळाकार प्रवास दाखवण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी ह्या समर कॅम्पमधे निवेदिका स्वत:च्या लैंगिकतेचा शोध घेत असताना तिला इतर मुलांकडून छळवणूक सहन करावी लागते. तळ्याच्या रचनेमधे निवेदिकेला तिच्या प्रौढ आयुष्यातील आणि बालपणातील अनुभवांमधले साम्य दिसू लागते आणि हळूहळू त्या दोन्ही मधला फरक कमी होत होत ते अनुभव एक होतात. निवेदिकेच्या अनुभवाप्रमाणेच, दृष्टिकोनाची उलटापालट करायच्या माझ्या प्रयत्नांमधून माझा भूतकाळ आणि भविष्यकाळ एकमेकांमधे मिसळले. ज्या मनोरुग्णालयात मी रुग्ण म्हणून होते तिथेच काम करत नसले, तरी दोन्हींमधले साम्य अनेक बारीकसारिक गोष्टींमधून दिसून यायचे. रुग्णांसाठी असणार्‍या शौचालयाचं डिझाइन, तिथल्या टाइल्स आणि किंचित विचित्र दिसणारे आरसे, सगळं अगदी सारखंच होतं. मी माझ्या राऊंडस् वर असताना, ती इमारत आणि जागा माझ्या कामाची जागा म्हणून ओळखायचे; पण बाथरूम मध्ये प्रतिबंधित सामानाची तपासणी करताना मात्र त्या आरशात स्वत:चं प्रतिबिंब पहायचे. आत्ता दिसणार्‍या त्या प्रतिबिंबात आणि गतकाळातल्या प्रतिबिंबात फरक फक्त अंगातल्या कपड्यांचा होता.


निवेदिकेचा दृष्टिकोन वापरून माचादो भूतकाळ आणि सद्य स्थितीत जा-ये करतात. जशी गोष्ट पुढे सरकते तशी निवेदिका घडत असलेल्या गोष्टींमधे आठवणींबद्दल बोलायला लागते आणि आठवणी आणि सत्य परिस्थितीमधील भिन्नता गायब व्हायला लागते. ह्या सरमिसळीतून निवेदिकेच्या मनातल्या विचारांच्या प्रवाहात होणार्‍या गुंतागुंतीत वाचकही अडकतात आणि गोंधळून जाऊ शकतात. गोष्ट पुढे सरकते आणि हळूहळू माचादो अवस्थांतराशिवायच एका काळातून दुसर्‍या काळात शिरतात. जेव्हा निवेदिकेच्या सद्य व्यक्तिमत्वात तिच्या लहानपणचे व्यक्तिमत्व मिसळते तेव्हा तिला भासणारी घुसमट, शारीरिक आणि मानसिक, मला अगदी ओळखीची वाटली. मनोरुग्णालयात काम करताना मी अनेकांना भेटले, जणू ती माझीच विविध रूपं होती पण भावनिक आणि शारीरिक कलहाची स्मृति ही सर्वाधिक त्रासदायक होती. तसं मोठं किंवा विशेष असं काही घडलंही नव्हतं, गच्च भरलेल्या बादलीत पडणार्‍या आणि बादलीतलं पाणी ओसंडून व्हायला लावणाऱ्या शेवटच्या थेंबासारखं होतं ते. मी माझ्या राऊंडस् करत असताना एक रुग्ण येरझाऱ्या घालता घालता, “मला निघायचंय, डॉक्टरांना भेटायचयं, मला निघायचयं...” असं सतत म्हणत होता. एक राऊंड संपवून आले की बारीकसारीक काहीतरी काम उरकायचं आणि पुन्हा राऊंडवर जायचं. पण तसं करतानाही, मी रुग्ण म्हणून मनोरुग्णालयात असताना जाणवणारी, चित्त कंपवणारी, स्वतःमधेच कोंडल्याची भावना मला जाणवायला लागली. माझ्या सहकाऱ्याने त्या रूग्णाला, "अजून एकदाच डॅाक्टरांशी बोलता येईल" असं सांगितल्याचं मला आठवतं. जेव्हा डॅाक्टर त्यांच्या ॲाफिसमधून बाहेर आले, तेव्हा त्यांना मी हाच निरोप दिल्याचंही मला आठवतं. पण नंतर त्यांनी माझ्या सहकाऱ्याला, “त्या मुलीला रीडायरेक्ट (पुनर्निदेशित) करण्याची गरज आहे” असं सांगितलेलं मला ऐकू आलं. ‘रीडायरेक्ट’ हा शब्द सहसा रुग्णांबद्दल बोलताना वापरला जातो. मी तो शब्द माझ्या संदर्भात ऐकला आणि त्या क्षणात माझा भूतकाळ आणि वर्तमानकाळ एकमेकांवर येउन आदळले.


मी माझी शेवटची राऊंड पूर्ण करत असताना माझे अश्रू धरून ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. राऊंड संपल्यावर स्वतःला शांत करायला ब्रेक रूममधे गेले. परत आले तेव्हा त्या पेशंटनी मला विचारलं, “मला कोणीतरी मदत करता का..?” त्याला कशासाठी मदत हवी आहे हे माला लक्षात आलं नाही, पण तिथे काम करायला सुरुवात केल्यापासून मी उच्चारलेले सगळ्यात खरे शब्द माझ्या तोंडून बाहेर पडले----“मला शक्य नाही.”

त्यांनी मला सगळं ठीक आहे ना असं विचारलं. आपल्या भावनांचा बांध फुटू न देण्याचा महत प्रयत्न करत असलेल्या कोणालाही हा प्रश्न विचारला की जे होतं तेच झालं, आणि मी ढसाढसा रडू लागले. धाप लागलेल्या अवस्थेत, रडत रडत मी बाथरूममधे होते खरी, पण वेळ आणि काळाच्या कुठल्यातरी बंद पोकळीत अडकले होते. मी आरशात बघितलं, डोळ्यांच्या नसा सुजल्या होत्या आणि चेहरा भाजल्यागत लाल झाला होता. गेल्या दहा महिन्यांमधे पहिल्यांदाच आरशात माझे अंतरमन प्रतिबिंबीत झालेले दिसले.


त्या भावनेचं अतिशय चपखल वर्णन निवेदिकेनी कॅम्पमधे असताना आणि तळ्याकाठी राहताना तिला आलेल्या तापाबद्दल बोलताना केलंय. तापामुळे अशक्त आणि असहाय्य अशा परिस्थितीत ती अनेक दिवस झोपून असते. लहानपणी कॅम्पमधे असताना आलेल्या अशाच तापाची तिला आठवण होते. तिच्या अंगावर उठलेले बारीक पुरळ आणि सेफ्टी पिननी फोडलेल्या एक-एक फोडातून तिच्या पायावर रक्ताची धार गळताना तिला आठवते.


“माझं थरथरतं शरीर उचलून मी बाथरूममधे पोचले आणि आरशात बघितलं तेव्हा ज्या (व्यक्ति)ला शोधत होते ती व्यक्ति सापडली” (माचादो 214). दु:खद आणि जाचक आठवणींमधे आयुष्य घालवण्याचा निर्णय हा खरंतर स्वत:ला जाणून घेण्याचा एक प्रयत्न असतो. जखमेला सेफ्टी पिन लावून, त्यातील पस काढून त्यावर खपली धरुन ती जखम भरून निघते, जखमेच्या जागी नवीन कांती निर्माण होते, पण त्याआधीची पहिली पायरी म्हणजे स्वतःला समजून घेणे ही असते. निवेदिकेबरोबर राहणार्‍या इतर कलाकारांमधला एक जण आर्टिस्ट्स रेसिडेन्समधून पळून जातो तेव्हा त्यांच्यातला एक चित्रकार म्हणतो, “या भूमिकेसाठी प्रत्येकजण बनलेला नाही” (माचादो 214). लहानपणी ऐकलेलं ते वाक्य पुन्हा एकदा ऐकून निवेदिका दचकते आणि टेबल पासून मागे सरकून उरलेल्या कलाकारांना सांगते, “घाबरू नका. मला भीती नाही. आता भीती नाही. ह्यापुढे मी घाबरणार नाही.” (माचादो 215). कॅम्पमधे असताना तिला कोंडल्यासारख्या वाटणाऱ्या भावनेला उद्देशून उद्गारलेले हे शब्द आहेत. स्वत:ला जाणून घेण्याची भीती आणि त्यातून निर्माण होणारी मुद्दामहून स्वत:कडे आणि त्या आठवणींकडे बघण्याची भीती निवेदिकेला जाणवते. पण, जर आपण ह्या आठवणी आणि अनुभवांच्या जखमांकडे लक्ष दिलं नाही तर त्या जखमांना स्वच्छ करण्याची आणि बरं करण्याची संधी आपण गमावतो.


मोडलेल्या आणि कोंडलेल्या अवस्थेत स्वत:ला घेऊन, त्या दिवशी मी घरी आले. गाडीतून उतरले आणि दार धाडकन आपटताना मला एकदम ते वाक्य आठवलं, “या भूमिकेसाठी प्रत्येकजण बनलेला नाही” (माचादो 214). त्या क्षणापर्यंत माझ्या हे लक्षातच आलं नव्हतं की मी सरळ निघून जाऊ शकते. ह्या दुष्टचक्रात अडकून राहण्याचा निर्णय आपला असतो हे लक्षात यायला मला, आणि त्या निवेदिकेला, खूप वेळ लागला. मला ते मनोरुग्णालयातलं काम करायची सक्ती नाहीये हे माझ्या डोक्यातून निघून गेलं होतं. दुसर्‍याच दिवशी मी राजिनामा दिला.


भावनिक दु:खाबद्दल मी ऐकलेला सर्वोत्तम उपदेश देऊन माचादो गोष्ट संपवतात. “मी माझ्या आयुष्यात अनेक लोकं पहिली आहेत. पण नव्या जोमाने वाढण्यासाठी आपल्या फांद्या छाटलेले असे नशीबवान मला क्वचितच भेटले. कित्येक लोक जन्माला येतात आणि स्वत:ला न जाणताच आयुष्य पार पाडतात. एक दिवस तुम्ही तळ्याकाठी चक्कर मारताना, हळूच पाण्यात डोकावून बघाल तेव्हा त्या काही नशीबवान लोकांमधले तुम्हीही एक असाल एवढीच प्रार्थना करा”(माचादो 218). सरतेशेवटी, माझ्या शेवटच्या शिफ्टमधे बाहेर जाण्याच्या दारावर लावलेली पाटी खाली पडली. त्या पाटीवर लिहिलं होतं----कृपया हा दरवाजा काळजीपूर्वक उघडा आणि बंद करा.
ग्रंथकोष

मचादो, मारिया कार्मेन. ‘द रेसिडेंट’. हर बॉडी अँड अदर पार्टीज्: स्टोरीस्, ग्रे वुल्फ प्रेस, एस.1.,2017.


 

कॉर्नेल विद्यापीठातून जीवशास्त्र आणि समाज ह्या विषयांची पदवी घेऊन एलिस नुकतीच बाहेर पडलेली आहे. मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य ह्या क्षेत्रात तिचे काम सुरू असले तरी वाचन आणि लेखनाची आवड तिला लहानपणापासूनच आहे. सध्या ती ब्रायटन, मॅसॅच्युसेटस् मध्ये तिच्या तीन उत्तम रूममेटस् आणि गोड मांजराबरोबर राहते.


Comments


bottom of page