top of page
  • bilorijournal

‘डब’ आणि बोलीभाषेची उत्तेजक ताकद

मूळ लेखिका – पूजा बासू

मराठी अनुवाद – आर्यायशोदा कुलकर्णी



रेखाचित्र - सेफी जॉर्ज


वसाहतवादानंतरच्या काळात ‘ओळख’ म्हणजे एक प्रकारचे पुनर्हस्तलिखित आहे असे म्हणता येईल: असे हस्तलिखित ज्यावर वसाहतवादापूर्वीच्या पुरातनतेचे, नव्याने आलेल्या आधुनिकतावादाचे आणि त्यानंतर जाणवणाऱ्या रोजच्या वास्तवाचे, तिन्हीचे ठसे उमटलेले आहेत. अनेक वसाहतींसाठी, उदा. कॅरिबियनमध्ये - जिथे सामाजिक वैविध्य आहे अश्या - नव्याने येणाऱ्या काळाचा, जुन्या काळावर पडणारा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रभाव ह्या ‘ओळखी’च्या संकल्पनेला अधिक क्लिष्ट बनवतो. कॅरिबियनमध्ये युरोपीय शक्तींच्या आगमनाची सुरुवात १४९२मध्ये कोलंबसने केली आणि स्पॅनिश आणि पोर्तुगीसांनी ती पुढे नेली. १६व्या शतकापर्यंत अनेक वसाहती ह्या द्वीपसमूहात तयार झाल्या. परिणामी, ह्या बेटांवर राहणाऱ्या मूळ जमाती नष्ट होऊन ट्रान्स-अटलांटिक गुलाम-व्यापारातून आणलेले आफ्रिकन वंशाचे लोक आणि त्यांचे वंशज असा एक नवीन समाज त्या ठिकाणी निर्माण झाला.

गुलामगिरी नष्ट झाल्यानंतर देशांतराची दुसरी लाट आली. ह्यावेळी भारत आणि चीन (व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया)सारख्या वसाहतींमधून बाहेर पडलेले लोक कामाच्या शोधात कॅरिबियनमध्ये (त्रिनिदाद आणि टोबॅगो, जमईका) येऊन वसले1. अश्याप्रकारे कॅरिबियनची एक नवीन संकरीत अशी ओळख निर्माण झाली: क्लिष्ट आणि अनेक पैलू असलेली. देशांतराचे अनुभव आणि वसहातवादातून निर्माण झालेल्या दाहक इतिहासामुळे एकत्र आलेल्या इथल्या नागरिकांची संमिश्र संस्कृती आणि भाषा हीच त्यांची ओळख बनली. विशेषतः ही संमिश्र भाषा, कॅरिबियन वाङ्ग्मयाचा एक अनोखा आणि महत्वाचा गुणधर्म मानली जाते. आत्ता कॅरिबियनमधे राहणाऱ्या अनेकांचे वंशमूळ विभिन्न संस्कृतीतून सापडते (सामान्यतः युरोपीय, आफ्रिकन आणि आशियाई) आणि ह्या भिन्नतेमधून आलेल्या विविध भाषा आणि बोलीभाषा (क्रिओल किंवा पीजीन) तिथे सगळीकडे सापडतात. एका माजी ब्रिटिश वासाहतीचा भाग म्हणून आणि इंग्रजी वाङ्ग्मयाची विद्यार्थिनी म्हणूनही मला ब्रिटिश कॅरिबियनमधली – जमईका आणि त्रिनिदाद – इंग्रजीची भाषा म्हणून उत्क्रांती आणि स्थानिक भाषांमध्ये मिसळून तयार झालेली मिश्र इंग्रजी ह्या दोन्हीचा अभ्यास करण्यात रस आहे.

कॅरिबियनमध्ये येऊन वसलेल्या ह्या विविध संस्कृतींमध्ये एक गोष्ट समान होती: मौखिक परंपरा. जगभरातल्या वसाहतवादात एक प्रकारची बौद्धिक हिंसा दडली होती. मौखिकापेक्षा वाचिक परंपरा वरचढ, नैसर्गिकापेक्षा संस्कृतिक वरचढ आणि स्त्रीलिंगापेक्षा पुल्लिंग वरचढ अश्या गृहितकांवर ही हिंसा बेतलेली होती. वसवलेल्या वसाहतींमध्ये पाठवलेल्या मूळच्या अमेरिकन किंवा आफ्रिकन लोकांची संस्कृती ही गाणी आणि लोककथांची, प्रामुख्याने मौखिक परंपरेची होती, आणि हीच मौखिक संस्कृती पुढे जाऊन निषेधाचे एक शक्तिशाली अवजार म्हणून पुढे आली.2

कॅरिबियनमधल्या कलाकारांनी आणि लेखकांनी त्याही पुढे जाऊन केलेला इंग्रजीचा वापर हा वसाहतकाराला त्याच्याच भाषेत दिलेले सडेतोड उत्तर होते, कॅलिबानने त्याच्या मालकाला, प्रोसपेरोला, त्याचीच भाषा वापरुन दिलेल्या शापासारखे.

मिश्र इंग्रजीच्या ह्या वापराची सगळ्यात रंजक उदाहरणे कॅरिबियन कवी आणि कवयत्रींच्या ‘डब’ काव्यकलाकृतींमध्ये दिसतात. ताल आणि गेयता असलेल्या ह्या कवितांमधून कवीची कलात्मकता दिसून येते. ब्रिटिश कवी बेंजामिन झेफनिया त्यांच्या ‘दिस पोएटरी’ ह्या कवितेतून हीच कल्पना प्रस्तुत करतात,

“Still dis poetry need ears fe hear an eyes de hav a look

Dis poetry is Verbal Riddim, no big words involved.

- बेंजामिन झेफनिया, दिस पोएटरी, 19923

(आणि ह्या कवितेला लागतात कान ऐकायला आणि एक विशेष नजर,

ह्या कवितेतच आहे ताल शब्दांचा, भल्या थोरल्या शब्दांची नाही इथे गरज.”)


ह्या दोन ओळींमधून झेफनिया त्यांच्या काव्यात्मक दृष्टिकोनाची झलक देतात आणि ह्या काव्यप्रकाराचा गाभा प्रस्तुत करतात. डब काव्याचा हा गाभा ह्या लोककलेला डेरेक वॉलकॉट आणि एडवर्ड कामाऊ ब्रेथवेट ह्यासारख्या प्रचलित लेखकांच्या पठडीत नेऊन ठेवतो. अश्याप्रकारे वसाहतकाराची भाषा घेऊन तिला कॅरिबियनच्या संदर्भात नव्याने घडवून, वसाहतवादाच्या माध्यमातून ज्यांच्यावर राज्य केलं गेलं त्यांची सांस्कृतिक ओळख नष्ट करण्याच्या उपक्रमाला, हा एक प्रकारचा कलात्मक प्रतिकार होता. पण तरीही ह्या सगळ्या प्रकारात वसाहतीतल्या कॅरिबियन स्त्रीची ओळख मात्र बाकी जगातल्या वसहतीतल्या स्त्रियांसारखीच पुसली जाण्याचा धोका होता.

चंद्रा तळपदे मोहंती म्हणतात तशी ‘सर्वोत्कृष्ट पीडित’ वसाहतीतली स्त्री, पितृसत्तेची आणि वसाहतवादाची, दोन्हीची पीडिता असते म्हणून फ्रांसेस एम बील ह्यांची ‘डबल जेपरडी’ ही संज्ञा तिला विशेष लागू पडते. अनेक सिद्धांतवाद्यांच्या मते, वसाहतवादविरोधी राजकारण विरुद्ध पाश्चिमात्य स्त्रीवाद ह्या वादाच्या पलीकडे जाऊन वसाहतीतली स्त्री, तिची ओळख आणि तिचा आवाज शोधणे जास्त गरजेचे आहे. आणि हा आवाज प्रामुख्याने समोर येतो तो तिच्या विविध कला आणि कलाकृतींमधून.

जमईकामधून आलेल्या लुइस बेनेटसारख्या कलाकारांनी डब काव्यातून संस्कृतीचे राजकारण आणि ओळख ह्यावर भाष्य केलं. त्यांच्या ‘कॉलॉनायझेशन इन रीवर्स’ ह्या सुप्रसिद्ध कवितेत त्या माजी ब्रिटिश वसाहतींच्या दृष्टिकोनातून ‘(ब्रिटिश) साम्राज्याच्या घर वापसी’ बद्दल सांगतात.

What a joyful news, Miss Mattie,

I feel like my heart gwine burs

Jamaica people colonizing

Englan in reverse

- लुइस बेनेट, कॉलॉनायझेशन इन रीवर्स, १९६६4

(केवढी आनंदाची ही बातमी, मिस मॅटी, माझं हृदय भरून आलं,

जमईकाच्या लोकांनी साऱ्या, इंग्लंड पुन्हन्याने वसवलं”)


ह्या कवितेत, ‘मिस लू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेनेट उज्ज्वल भविष्याच्या आशेने ब्रिटिश वसाहतींमधून इंग्लंडला जाणाऱ्या लोकांबद्दल बोलतात. अश्या घडणाऱ्या प्रवासाला त्या ‘उलट वसाहतवाद’ (reverse colonization) म्हणतात आणि बेनेट स्वतः एक भाग असलेल्या, देशोदेशी पसरलेल्या कॅरिबियनमधल्या नागरिकांना, एक अनन्यसाधारण सामर्थ्य देऊ करतात. त्यांची डब काव्यशैली जमईकामध्ये प्रसिद्ध झाली होती आणि ह्या शैलीत सादरीकरण हे मजुकराएवढेच महत्वाचे होते.

लौकरच इंग्लंड आणि कॅनडासारख्या कॅरिबियन समुदाय असलेल्या देशांमध्ये हा कलाप्रकार प्रसिद्ध झाला. जहालमतवादी कवींनी तत्कालीन राजकारणावर भाष्य करण्यासाठी ह्या काव्यप्रकाराचा वापर केला. उदाहरण पुन्हा बेंजामिन झेफनिया ह्यांचे: त्यांनी विशेषतः साम्राज्यवाद, आर्थिक असमानता आणि सरकारी लाचखोरीवर सखोल लिखाण केले.

The coconuts have got the jobs.

The race industry is a growth industry.

We despairing, they careering.

We want more peace they want more police.

The Uncle Toms are getting paid.

The race industry is a growth industry.

- बेंजामिन झेफनिया, द रेस इंडस्ट्री, १९९१5

(त्या नमक हरामांना मिळतात नोकऱ्या.

जातीचा धंदा म्हणजे वाढता धंदा.

आम्ही निराश, ते वेगात.

आम्हाला हवी शांती त्यांना हवे पोलिस.

ते नमक हराम कमावतात बक्कळ.

जातीचा धंदा म्हणजे वाढता धंदा.”)

‘कोकोनट’: गोऱ्या लोकांचे अनुकरण करून समाजातले स्वतःचे स्थान उंचावणारी गहुवर्णीय व्यक्ती

‘अंकल टॉम’: गोऱ्या लोकांचे अनुकरण करून समाजातले स्वतःचे स्थान उंचावणारी कृष्णवर्णीय व्यक्ती)


सोप्या तरी जिव्हारी लागणाऱ्या पद्धतीने झेफनिया, वसाहतवादानंतरच्या इंग्लंडचे वर्णन करतात जिथे जात हा एक धंदा आहे ज्यातून काही जातींचे समाज आर्थिकदृष्ट्या सबल होतात आणि उरलेले मात्र दारिद्र्यात जखडून राहतात.

कॅरिबियन डब कवयित्रींच्या कविता मात्र फक्त सरकारी लाचखोरी किंवा गोऱ्या माजी वसाहतकारांपुरत्या मर्यादित नव्हत्या. त्यांच्या अस्तित्वाचे, आणि पर्यायाने त्यांच्या कलेतले राजकारण धोकादायक अश्या पितृसत्तेशी जोडले गेले होते.

I’m a third world girl,

When you brought me to your world,

You said you educated me.

You said I brought no traditions,

No history, no culture, no religion,

No language with me.

You admitted I could sing and dance,

But without logic, so you couldn’t

Take a chance, to empower me

with managing the money.- जीन बिंटा ब्रीझ, थर्ड वर्ल्ड गर्ल, २०११6 (मी आहे तिसऱ्या जगातली मुलगी,

तुमच्या जगात मला आणलत तेव्हा म्हणालात,

तुम्ही शिकवलत मला.

म्हणलात की माझ्याकडे नाहीत परंपरा,

ना इतिहास, ना संस्कृति, नाही धर्म, ना भाषा.

फक्त स्व‍च्छंद नाच-गाणं येत तेवढं मान्य केलत

आणि म्हणूनच मला माझे पैसे कमवू द्यायचा प्रयत्नही केला नाहीत)


लीला गांधी, त्यांच्या ‘इंट्रोडक्शन टू पोस्ट-कॉलॉनियल थियरी’ ह्या पुस्तकात म्हणतात, ‘सभ्यतेची विपुलता असणारे ठिकाण म्हणून युरोपचा उगम होण्यासाठी, उरलेले जग अर्थशून्य होणे भाग होते.’ जीन बिंटा ब्रीझ ह्यांची ‘थर्ड वर्ल्ड गर्ल’ ही कविता, वसाहतवादातून ‘सभ्यता बाणवण्याच्या’ मोहिमेतून केलेल्या ह्या इतिहासाच्या नाशाबद्दल बोलते आणि तिसऱ्या जगातल्या पितृसत्तेने दाबलेल्या ह्या मुलीवर भर देते. त्यातूनही मुली किंवा स्त्रिया सामूहिक प्रतिष्ठेच्या रक्षणकर्त्या मानल्या जातात आणि त्यामुळे वासहतीतल्या ह्या मुलीवर शारीरिक आणि इतर प्रकारची हिंसा सहन करण्याची वेळ येते. स्त्रीवादी आणि वसाहतवादाविरोधी राष्ट्रवाद्यांच्या मारमारीत, ह्या स्त्रीला एक बाजू निवडावी लागते आणि बऱ्याचदा दोन्ही बाजूंकडून हिरमोड सहन करावा लागतो. हा हिरमोड बिंटा ब्रीझ आपल्या कवितेतून दाखवू पाहतात. ब्रिटिश सरकारवर टिकात्मक लेखनही त्यांनी केलं आहे. ‘टु द लेबर पार्टी’ ह्या कवितेत त्या म्हणतात,

You promised us a government of vision

You promised you would hear our voice

It didn’t take you long to listening

And take away our choice

- जीन बिंटा ब्रीझ, टु द लेबर पार्टी, २०१५7

(दूरदृष्टिचं सरकार तुम्ही देणार म्हणलात, आमचं म्हणणं ऐकाल असं म्हणलात,

ना आमचं ऐकणं बंद करायला फार वेळ लागला तुम्हाला, ना आमचे हक्क काढून घ्यायला)


इंग्लंडच्या लेबर पार्टी सारख्या तथाकथित उदारमतवादी सरकारी यंत्रणांमधील दांभिकता ही कविता दाखवते. आर्थिक असमानतेकडे केलेले दुर्लक्ष आणि त्यातून होणारे मतभेद कसे दाबून टाकले जातात ह्यावर भाष्य करणारी ही कविता आहे. आजच्या स्वघोषित लोकशाहयांमध्ये, जिथे जनतेला सरकार निवडून देण्याचा अधिकार असणे हे जबाबदार सरकार आणि प्रगतीचे समानार्थी नाही, तिथे हीच परिस्थिती आहे.


पण झेफनिया किंवा बेनेट ह्यांच्या कवितांप्रमाणेच बिंटा ब्रीझ ह्यांच्या कवितेचे सौंदर्य फक्त शब्दांमध्ये नाही. ‘डब’ काव्याचा खरा स्वाद त्याच्या प्रस्तुतीत आहे. बोली भाषेतला कलाप्रकार असल्यामुळे, प्रेक्षक किंवा वाचकांशी थेट बोलणारे हे काव्य राजकीय घडामोडींवर टीका-टिप्पणीचे सशक्त माध्यम आहे. राजकीय सभांमध्ये दिलेल्या भाषणांप्रमाणे, ‘डब’ ऐकणाऱ्याला उत्तेजित करते आणि जवळीक साधून एक तातडीची जाणीव निर्माण करते. ह्या जाणीवेला दिलेली ज्वलंत माजकुराची साथ ‘डब’ काव्याला राजकारणातील आणि सामाजिक सक्रियतेतील महत्वाचे साधन बनवते. सामाजिक आणि शैक्षणिक स्थरांचे अडथळे ओलांडून बोलीभाषेतले ही काव्य जास्त लोकांपर्यंत पोचू शकते आणि हीच त्याची खरी ताकद आहे.


स्त्रीवादी दृष्टिकोनातून राजकारणावर काव्य करणाऱ्या कवींपेकी लीलीयन ॲलेन ह्या आणखी एक महत्वाच्या ‘डब’ कवयित्री आहेत. मूळच्या जमईकन असलेल्या ॲलेन आधी कॅनडा आणि मग अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यांनी त्यांच्या बऱ्याच कवितांना चाली लावल्या. उदा. ‘कंडीशन्स क्रिटीकल’ :

People tek to the streets

It’s no negotiation stance

When do you want freedom? Yesterday!

And how do you propose you’ll get it?

By the people’s way.’”

- लीलीयन ॲलेन, कंडीशन्स क्रिटीकल, 8

(लोक उतरले रस्त्यांवर, आता नाही चर्चा करणार, स्वातंत्र्य कधी हवं? काल!

आणि ते मिळवणार कसं? धरून जनतेची वाट.”)

प्रेक्षकांना कार्यक्रमाचा भाग बनवणाऱ्या आणि उत्तेजित करणाऱ्या कॅलिपसोनियन गाण्यांप्रमाणे ह्या कवितेत साद आणि प्रतिसादाचा वापर केलेला दिसतो. इथे कवितेची प्रस्तुती ही फक्त कवीचीच नाही तर प्रेक्षकांचीही जबाबदारी असते. ह्या पुढच्या कडव्यात, वसहातवादाच्या समाप्तीनंतरही माजी वसाहतींमधल्या लोकांच्या आयुष्यात फारसा फरक पडला नाही हे ॲलेन सांगतात. झेफनिया त्यांच्या ‘द रेस इंडस्ट्री’ मध्येही हाच मुद्दा मांडतात.

Conditions critical

Freedom has been mythical

Every few years a new deliverer come

Say: Better must come, let me lead the

way my people

Seems better get delayed and some

where hiding.

- कंडीशन्स क्रिटीकल (contd)

(परिस्थिति भयंकर, स्वातंत्र्य दंतकथेपर,

दर एक-दोन वर्षांनी येतो नवा तारणहार आणि म्हणतो:

सुदिन येतील, मी दाखवतो वाट तिथपर्यंतची,

सुदिन येणे मात्र लांबत जाते जणू ते कुठेतरी दडून बसले आहेत.)


ॲलेन जमईकामध्ये राहिल्या आणि उत्तर अमेरिकेतल्या जमईकन समुदायातही. त्यामुळे, वसाहतवादानंतरच्या काळात श्वेतवर्णीयेतर लोकांवर रंगीत कातड्याच्या लोकांवर जगभर होणारा वंशवादाचा आणि वसाहतवादाचा परिणाम त्यांनी जवळून बघितला. उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या अधू असलेल्या समाजघटकांना दिलेली सबलिकरणाची वचने पोकळ ठरली – स्वदेशी आणि परदेशातही. ही कविता असलेल्या यंत्रणेला बदलणारी नव्हे तर समूळ नष्ट करून नवीन यंत्रणा तयार करणाऱ्या सामाजिक क्रांतीसाठीची ॲलेनने केलेली रणगर्जना आहे.


ॲलेन आणि बाकीच्या ‘डब’ कवींसाठी ‘प्रतिकार’ आणि ‘प्रस्तुती’ ह्या दोन्ही कृती एकमेकांशी घट्ट जोडलेल्या होत्या. ‘प्रस्तुती’ ही ‘प्रतिकरा’ची एक पद्धत होती आणि रोज जगलेल्या आयुष्यातून दर्शवलेला ‘प्रतिकार’ ही एकप्रकारची ‘प्रस्तुती’ होती.


ज्या काळात ‘डब’ची बोलीभाषेतील कलाप्रकार म्हणून उत्क्रांती घडली त्या काळात जागतिक पातळीवर जबरी राजकीय उलथापालथ घडली. त्याचा परिणाम ‘डब’च्या उत्क्रांतीवर पडला. दुसऱ्या महायुद्धानंतर, जगात सगळीकडे ‘डीकॉलॉनायझेशन’ ची चळवळ सुरू झाली.9 ह्या चळवळीत सिएरा लिओनच्या सिल चेनी-कोकर आणि दक्षिण आफ्रिकेच्या मेशे मापोन्यासारख्या कवी आणि नाटककारांनी प्रतिकारात्मक काव्य लिहायला सुरुवात केली होती. त्याचवेळी अमेरिकेत व्हिएतनाम युद्धाविरोधी निषेध आणि नागरी हक्क चळवळ जोरात होते. ह्या चळवळींच्या पार्श्वभूमीवर ‘पंक’ आणि ‘हिप-हॉप’सारख्या राजकीय विषयांवर भाष्य करणाऱ्या संगीताच्या प्रकारांचा उदय झाला. त्यामुळे ‘डब’ ह्या कलाप्रकाराची वाढ पूर्णपणे एकाकी नसून एका जागतिक, सांस्कृतिक मोहिमेचा भाग म्हणून झाली. अधिकाराने वागणाऱ्या यंत्रणेला कलात्मकतेने सत्यपरिस्थितीचे दर्शन घडवणे हे ह्या सांस्कृतिक मोहिमेचे उद्दिष्ट होते आणि त्यातूनच एक नव्या पर्वाची सुरुवात झाली.



ग्रंथकोष

  1. कॉनवे, डी 1992, “मायग्रेशन इन द कॅरिबियन”, कॉनफरन्स ऑफ लॅटिन अमेरिकन गियोग्राफिसटस् ईयरबूक, पा 91-98. यूनिवर्सिटी ऑफ टेक्सस प्रेस: ऑस्टिन

  2. ट्यूटन, क्रिस्टोफर बी, 2014, “इंडिजीनस ओरॅलिटी अँड ओरल लिटरेचरस्”, द ऑक्सफोर्ड हँडबूक ऑफ इंडिजीनस अमेरिकन लिटरेचरस्. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस: ऑक्सफोर्ड

  3. झेफनिया, बेंजामिन, दिस पोएटरी

  1. बेनेट, लुइस, कॉलॉनायझेशन इन रीवर्स

  1. झेफनिया, बेंजामिन, द रेस इंडस्ट्री

https://benjaminzephaniah.com/rhymin/talking-turkeys-2/?doing_wp_cron=1607590203. 7177209854125976562500

  1. बिंटा ब्रीझ, जीन, थर्ड वर्ल्ड गर्ल

  1. बिंटा ब्रीझ, जीन, टु द लेबर पार्टी

  1. अॅलेन, लीलीयन, कंडीशन्स क्रिटीकल

  1. लोव, नॉर्मन, 1982, मास्टरिंग वर्ल्ड हिस्टरी. मॅकमिलन: लंडन

  • गांधी, लीला, 1998, पोस्टकोलोनियल थियरी: अ क्रिटीकल इंट्रोडक्शन. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस: नवी दिल्ली

  • मोहंती, चंद्रा तळपदे, 1995, “अंडर वेस्टर्न आइज: फेमीनिस्ट स्कॉलरशिप अँड कोलोनियल डीसकोर्स”, इन बी. अॅशक्रॉफ्ट, जी. ग्रीफीथ्स्, एच. टीफीन (एडी.) पोस्टकोलोनियल स्टडीज रीडर. सायकॉलॉजी प्रेस, पा 278.

पूजा बोस जादवपूर विद्यापीठातून इंग्रजी साहित्याचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. संगीत, माध्यमे आणि संस्कृतींचा अभ्यास आणि डायस्पोरिक साहित्य हे तिचे आवडीचे विषय आहेत.



bottom of page