top of page
  • bilorijournal

समीक्षेची समीक्षा

विवेक गोखले




सामान्यतः मतैक्य असेल तर ‘मतैक्य कां?’ असे कोणी विचारत नाही पण मतैक्य नसेल, मतभिन्नता असेल तर मात्र लगेच त्याचे कारण हवे असते. इतकेच नव्हे तर ते पुरेसे, पटणारे किंवा समर्थनीय असावे अशी अपेक्षा असते. ते तसे नसेल तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळेच, असहमतीची कारण-मीमांसा खोलात जाऊन करायला लागलो की (१) मी काय म्हटले, (२) माझ्या म्हणण्याचा अर्थ काय होतो, (३) तुझ्या समजण्यात काय चूक झाली, (४) ती कशी झाली, हे प्रश्न पुढे येतात. त्यांची मतभिन्नता दूर होईल अशी उत्तरे शोधणे हे अनुषंगाने येतेच. समीक्षा म्हणजे तरी दुसरे काय असते! म्हणजे विचार करणाऱ्यासाठी समीक्षा स्वाभाविक असते असे म्हणायला हरकत नाही.

मी बी.ए. होईपर्यंत परीक्षा पास होण्याखेरीज माझ्या शिकण्याला काही अर्थ होता असे मला आता तरी वाटत नाही. मात्र एम.ए.ला नीतिशास्त्र शिकताना, जी. ई. मूर यांनी त्यांच्या ‘प्रिन्सिपिया एथिका’च्या प्रस्तावनेत, ‘शुभ म्हणजे काय?’ या प्रश्नाचे दोन अर्थ होतात: (१) ‘शुभ’ या शब्दाचा अर्थ काय आहे? आणि (२) काय काय शुभ असते? लोकांनी, अगदी विचारवंतांनीही पहिल्याचा विचार न करताच दुसऱ्याचे उत्तर दिल्याने (अन् तेही ठामपणे) नैतिक विचारात किती गोंधळ माजला हे म्हणून आपल्या या मताच्या जणू स्पष्टीकरणासाठी लिहिलेला प्रस्तुत ग्रंथ जेव्हां विद्वान प्राध्यापकांकडून शिकायला मिळाला तेव्हां शिक्षण म्हणजे काय हे उमजून मला शिकण्यात गोडी वाटायला लागली. अद्वैत वेदांतातील अध्यास प्रकरणात शंकराचार्यांच्या सूक्ष्म विश्लेषणाने, मूळ तत्त्व नीट म्हणजे स्पष्ट अन् स्वच्छ कळले असेल तर त्याचे मंडन आणि विरुद्ध मताचे खंडन सोपे कसे होते हे अनुभवले. आता माझे शिक्षण सार्थ होत होते. पुढे मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक झालो.

मराठीच्या एका ज्येष्ठ अन् साक्षेपी प्राध्यापिकेला मर्ढेकरांचे, ‘सौंदर्य आणि साहित्य’ (Kuḷakarṇī, 1982) वाचून दाखवताना मला त्यांची शुद्ध कलावादी भूमिका पटत असल्याचे लक्षात आले. पुढे साहित्य व तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात त्यांचे अनेक टीकाकार असल्याचे पाहून मजा वाटली. त्याचबरोबर मर्ढेकर महत्वाचे असल्याचे जाणवले. या टीकाकारांना उत्तर देता आले तर ते आपल्याला मर्ढेकर कळले असल्याचे लक्षण मानता येईल असे समजून मर्ढेकरांच्या अभ्यासाला सुरुवात होऊन, ‘मर्ढेकरांची सौंदर्य मीमांसा’ या प्रबंधाने त्याला पूर्णता मिळाली. अनुषंगाने, कलावाद, जीवनवाद यावर लेख लिहिले. हे सर्व करताना रा. भा. पाटणकर, विंदा करंदीकर, गंगाधर गाडगीळ आदींच्या विचारांची दखल घ्यावीच लागली. त्यात असे आढळून आले की यांचा कलाविचार साहित्यापुरता सीमित आहे. तर मर्ढेकर कलेचा तात्विक विचार करून त्यातील माध्यम-अंगाच्या उपयोजनाने साहित्याचा विचार मांडतात. त्यामुळे माध्यमभिन्नता लक्षात घेतली तर तो संगीत व चित्रकलेलादेखील लागू होतो. त्यामुळे मर्ढेकर आणि इतर विचारवंत यांच्या विचारात एका पायरीचा फरक राहतोच. या सर्व अभ्यासात मला जाणवलेले समीक्षेचे स्वरूप खालील टिपणामधून स्पष्ट व्हावे. कलासमीक्षेला किंवा अगदी समीक्षेच्या समीक्षेलाही ते उपयोगी होते असे मला वाटते. माझ्या या एकूण भूमिकेची समीक्षा करून मला कळवली तर तिचे स्वागत असेल. प्रस्तुत विषयाचा विचार करण्यासाठी केलेल्या नोंदी अशा:

०. समीक्षेची पूर्व तयारी म्हणजे ‘समीक्ष्या’चा म्हणजे ज्या गोष्टीची समीक्षा करायची आहे तिचा अनुभव. (इथे संदर्भ मुख्यतः कलेचा, कलाकृतीचा, अभिरुचीचा आहे. पण हे विवेचन नैतिक, अस्तित्व या अन्य मूल्यांना लागू करता येऊ शकेल.)

१. अनुभाव्य वस्तूतून प्रकट-अभिव्यक्त होणारे अभिरौचिक (aesthetic ) मूल्य एक स्वयंभू, स्वतंत्र आणि स्वायत्त, तसेच अव्याख्येय पण ज्ञेय असे मूल्य आहे. नैसर्गिकऐवजी मनुष्यनिर्मित वस्तू असल्या तर म्हणजेच कलेच्या संदर्भात, त्यालाच कलात्मक मूल्य म्हणतात. ‘ सौंदर्य’ हा त्यासाठी चपखल नसणारा, अत्यंत स्थूल अर्थाचा शब्द त्यासाठी व्यवहारातील रूढ आहे. अलौकिक प्रत्यक्ष (apperception), अनुमान नव्हे, हे त्याचे प्रमाण असते.

२. ‘कारण’ म्हणजे आवश्यक व पर्याप्त अटी.

३. ‘साधन’ म्हणजे ज्याला पर्याय संभवतो अशी पर्याप्त अट.

४. अभिरौचिक मूल्य स्वयंभू असल्याने ते निर्माण करण्याचा किंवा त्याचे कारण सांगण्याचा प्रश्नच उद्भवायला नको पण ह्याकडे काहींचे दुर्लक्ष होते आणि ते ‘असे असे असल्यामुळे/झाल्यामुळे ही गोष्ट सुंदर आहे किंवा कलात्मक (झाली) आहे’ अशी कार्य-कारणात्मक भाषा वापरत असतात. त्या ऐवजी ‘ही कलाकृती अशी अशी आहे’ अशी वर्णनात्मक भाषा वापरणे योग्य ठरावे.

५. सौंदर्य म्हणजे अभिरौचिक मूल्य निसर्गातून, काही ठिकाणी व्यक्त होतच असते. म्हणजे काही नैसर्गिक वस्तू सुंदर असतात. मग (१) कलाकृतीतून ते प्रकट करण्यात कलाकाराचे कर्तृत्व ते काय? किंवा (२) ते कलाकृतीतून व्यक्त करण्याचा अट्टाहास कशाला? किंवा (३) निसर्गात, अभिरौचिक मूल्याची सांगड नैसर्गिक वस्तूंशी कशी घातली जाते हे माहिती नाही पण कलाकृतीत तरी ती मनुष्य कशी घालतो, कशी घालू शकतो? कलाकाराची कलाकृती संबंधात काय भूमिका असते? तो काय करतो किंवा त्याला करण्यासारखे काय उरते? असा प्रश्न निर्माण व्हायला हवा. सुदैवाने कलाकारही कलानिर्मितीचे कर्तृत्व स्वतःकडे न घेता स्वतःला निमित्त म्हणवत असतो. पण कर्तृत्व आणि निमित्त यात काय फरक असतो? इत्यादी प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत. असे प्रश्न पडू शकतात, नव्हे पडायला हवेत. कारण असे वेगवेगळे प्रश्न पडले नाहीत व त्यांतला फरक स्पष्ट नसला तर विवक्षित प्रश्न बाजूला राहून भलत्याच प्रश्नाचे उत्तर देऊन आम्ही आमचे लटके समाधान करून घेऊन कलेच्या क्षेत्रात नकळत अनाकलनीय असा गोंधळ बाकी घालून ठेवू. काय सांगावे! कारण, ‘शुभ म्हणजे काय?’ या प्रश्नाचे, त्या प्रश्नाची भाषा नीट समजून घेऊ न शकल्याने म्हणजे (अ) ‘शुभ’चा अर्थ किंवा व्याख्या काय आहे, आणि (ब) कोणत्या गोष्टी शुभ असतात असे दोन वेगवेगळे अर्थ असताना ते तसे राखू न शकल्याने ‘(ब)’चे एक उत्तर जे ‘सूख’ आहे ते ‘(अ)’चेच उत्तर समजलो आणि जे. एस. मिल चा सुखवाद जन्माला घातला गेला, लोकप्रिय ठरला आणि मूळ नैतिकता बाजूला राहून उपभोगितावाद , चंगळवाद अशा ज्यांना अनिष्ट म्हणावे अशा गोष्टींनी जीवनाला भलतीच दिशा मिळाली. साहित्याच्या क्षेत्रात कलात्मक मूल्याबाबतही काहीसे असेच घडले आहे की काय असे गंगाधर गाडगीळांनी त्यांच्या ‘खडक आणि पाणी’(Gāḍagīḷa, 1966) या ग्रंथात ‘नव कथेचे स्वरूप’ या लेखात केलेली फडके, खांडेकरांची समीक्षा वाचून, तसेच ‘काव्याचा अर्थ: एक उलट तपासणी’ या लेखात जे योग्य विवेचन केले आहे त्यावरून वाटते.५.१ कलाकारही कलानिर्मितीचे कर्तृत्व स्वतःकडे न घेता स्वतःला निमित्त म्हणवत असतो. मग कलाकृतीच्या निर्मितीतील कलामूल्यसंबंधातील कलाकाराच्या विवक्षेचे (intention) स्वरूप कसे असेल? तें समजण्यासाठी, कलावस्तू (artefact) आणि कलाकृती (work of art) यांत फरक करून याचा या लेखात बराच आणि चांगला उहापोह केलेला आढळतो); आणि यासाठीच सौंदर्यभावनेची , सौंदर्यसंवेदनक्षमतेची गरज असते. लक्षात ठेवू की सौंदर्यभावना स्वयंभू असणारे कलात्मक मूल्य निर्माण करत नसते, केवळ जाणत असते. तसेच, कलात्मक मूल्याच्या अभिव्यक्तीची विवक्षा असणारी कलावस्तू निर्माण न करता केवळ ऐन्द्रीय वस्तूच निर्माण करायची तर त्यासाठी सौंदर्यभावना, सौंदर्यसंवेदनक्षमता यांची गरज कशाला असेल? ती नसतेच. वस्तूचा किंवा कलावस्तूच्या गुणांचा, तिच्या कलाकृती असण्याला जबाबदार असणाऱ्या कलात्मक मूल्यांशी असणारा संबंध कसा असतो? तो माध्यमात्मक असतो, कारणात्मक नसतो. तो कारणात्मक असता तर कलाकृती संबंधी वस्तुनिष्ठपणे बोलणे शक्य झाले असते. पण त्या दोहोत असा संबंध नाही म्हणूनच अभिरौचिक विवक्षेने निर्माण केलेली माध्यमाची (कलावस्तूची) सफल अशी रचना म्हणजे कलाकृती असे म्हणायचे. कलाकृतीची ही व्याख्या मान्य असली आणि कलाकृती निर्मितीचा राजमार्ग म्हणजे कलाकृतीच्या विषय-आशयाशी निर्मितीपूर्व व निर्मितीगर्भ तादात्म्य जपणे हा वाटत असेल तर मग दोन कलाकृतींची तुलना करणारा समीक्षक हा स्वतः त्या कलाकृतींचा निर्माता असावा हे वांच्छनीय ठरते. एखाद्या गोष्टीचा प्रयोग करणाऱ्याला तिचे शास्त्रीय रूप माहिती असावे हे वान्छनीय असले तरी तसे असतेच असे नाही. पण माहिती असेल तर त्याचा प्रयोगाच्या दर्जावर परिणाम होतो. समीक्षकाला मात्र याची जाण असायलाच हवी असते पण ती अनेकांना नसते. इतकेच नव्हे तर ते त्याविषयी बेपर्वाही असतात.

६.० कलाकृतीच्या समीक्षकाला खालील गोष्टी माहिती हव्यात

६.१ कलाकृतीचा स्वानुभव असायलाच हवा. तो सर्वात महत्वाचा.

६.२ कलाकृती म्हणजे कला-वस्तू आणि कला-मूल्य यांचा मेळ.

६.३ कलावस्तू म्हणजे कला-माध्यम असणाऱ्या द्रव्याची रचना. ते ऐन्द्रीय, लौकिक असते.

६.४ कला-मूल्याची निर्मिती करण्याचा प्रश्नच नसतो. तें स्वयंभू असते. ते अलौकिक, निरैन्द्रीय असते; पण असे असले तरी ते अनुभाव्य ठरण्यासाठी त्याला लौकिक, ऐन्द्रीय गोष्टींचा आधार घ्यावाच लागतो. जसा प्राण्यातील प्राणाला अभिव्यक्त होऊन अनुभाव्य ठरण्यासाठी, जड अशा शरीराचा घ्यावा लागतो.

६.५ कथा, कविता किंवा ख्याल, ठुमरी, भजन इत्यादी कलाप्रकारांचे परस्परांशी काय साम्य-भेद असतात आणि कलामूल्याशी असणारा त्यांचा संबंध कसा असतो हे समजण्यासाठी यासाठी, विभाजन होताना विभागात, विभाज्याचे गुण कायम राहून विभागाची स्वतःची वैशिष्टये जोडली गेली असतात या तर्कशास्त्रातील सूत्राची चांगली मदत होऊ शकते. म्हणजे ख्याल-ठुमरीत ते संगीताचे विभाग असल्याने त्यांच्यात संगीतत्व तर असतेच पण ख्यालात, त्याला ठुमरी इत्यादी अन्य संगीत प्रकारांपासून वेगळे करणारे (व्यावर्तक ), स्वतःचे असे वैशिष्टय असावे लागते. तसेच साहित्यातील कथा कविता या प्रकारांबाबत असते.

६.६ कलाविषयक स्वानुभवाचा फायदा, कलाकृतीचे स्वरूप आणि तिच्या निर्मितीसाठीच्या कलाकाराच्या प्रयत्नांचे स्वरुप समजून घेण्यासाठी करायचा असतो पण स्वानुभवाचा वापर समीक्षेत मूल्यमापनाचा दंड म्हणून करायचा नसतो याकडे सजगपणे लक्ष द्यायचे असते. हे घडत नाही तेव्हां मतभिन्नता व चूक किंवा अयोग्य यातील फरक दुर्लक्षिला जाऊन गोंधळ निर्माण होतो.

६.७ सापेक्षता-निरपेक्षता , वस्तुगतता-आत्मगतता यांचे नेमके असे शास्त्रीय अर्थ माहिती असण्याने वैचारिक गोंधळ कमी करण्यास मदतच होते.

६.८ माध्यमाचे स्वरूप व कार्य, आणि त्यांचा कलेशी व कलाकृतीशी असणारा संबंध.

६.९ सहेतुक व अनुषंगिक परिणाम यातील फरक.

६.१० कला-वस्तूचे स्वरूप आणि कला-कृतीचे मूल्य यातील शक्य संबंधांचे स्वरूप..

६.११ सौंदर्यवाचक विधानाचा अर्थ: (अ) काय करतो, (ब) काय असतो, किंवा (क) काय करायला हवा असतो, आणि (ड ) काय नसतो.

६.१२ ‘सु-संगठीत (well-formed) रचना (formulae)’ याचा अर्थ.

६.१३ साध्य-साधन या अर्थाने विविध मूल्यांमधील संबंध.

६.१४ मतभिन्नता आणि चूक यातील फरक.

६.१५ ‘कलेचे, धर्माचे किंवा विज्ञानाचे…चे तर्कशास्त्र’, ‘logic of....(art/science/religion etc.) असल्या वाक्प्रयोगांचा अर्थ काय होतो.

६.१६ समीक्षा आणि शेरा यातील फरक. दोन्हीत मतप्रदर्शन असते पण समीक्षेत त्याचे समर्थनही दिलेले असते तसे शेऱ्यात नसते. (‘सौंदर्यशास्त्र हा एक भाकड खटाटोप आहे ’ हा गंगाधर गाडगीळांचा केवळ शेरा होता. तो वैध युक्तिवादाचा निष्कर्ष नव्हता.)कोणत्याही कलेच्या क्षेत्रातील किती समीक्षकांना या प्रकारची जाणीव असते याचे सर्वेक्षण करून पाहण्यासारखे आहे.

७.० वरील पार्श्वभूमीवर म्हणजे वरील गोष्टींच्या जोडीला ‘समीक्षेची समीक्षा’ करणाऱ्या समीक्षकाला कोणत्या गोष्टींचे भान असायला हवे ते पाहू.

७.१ (अ) समीक्षकाने जे करायला हवे असते ते त्याने कसे केले आहे, (चांगले, योग्य, समर्थनासह) केले आहे की नाही, केले असल्यास त्याचे काही वैशिष्टय आहे का, किंवा त्यात काही उणीव राहिली असल्यास ती कां राहिली असावी याची मीमांसा करणे इत्यादी गोष्टींचा उहापोह करणे म्हणजे समीक्षेची समीक्षा करणे होय. यासाठी काही वेळा समीक्षा आणि संबंधित गोष्टींबाबतची मूलभूत भूमिका तपासावी लागते.

(ब) कलाकृतीची समीक्षा करताना जसा कलाकृतीचा अनुभव, आणि समीक्षेविषयीची कलावादी, जीवनवादी, मार्क्सवादी या प्रकारची एखादी भूमिका असावी लागते तशी समीक्षेची समीक्षा करताना कलाकृती, तिची समीक्षा यांचा अनुभव आणि कलावाद, जीवनवाद इ. समीक्षाविषयक भूमिकांचा आधार असणाऱ्या, कलामूल्याच्या स्वरूप विषयीची भूमिका असावी लागते. उदा. कलामूल्य स्वतंत्र, स्वायत्त, साध्य, साधन इ. कशा प्रकारचे आहे, किंवा विवध मूल्यातील संबंध कसे असतात, असावेत, यासंबंधी एक युक्तिसंगत आणि निश्चित भूमिका असावी लागते.

(क) ‘समीक्षेच्या समीक्षेचा’ (meta-criticism) बहुतांश भाग हा तत्त्वज्ञानात मोडणारा आहे त्यामुळे तत्त्वज्ञानातील संबंधित भागाची ओळख असल्याशिवाय समीक्षेची योग्य समीक्षा करता येणे हे एकतर अशक्य किंवा मग ज्याला आश्चर्यच म्हणायला हवे असे त्याचे उपजत, अबोध म्हणावे असे ज्ञान तरी हवे. मराठीतील बहुतेक समीक्षकांना वरीलपैकी ‘(ब)’चा विचार करण्याचे सुचलेलेच नाही त्यामुळे मर्ढेकरांच्या ‘मे. पुं. रेगे’ वगळता बहुतेक सगळ्या समीक्षकांची समीक्षा यामुळेच फसली; तर रेग्यांना मर्ढेकरांची भूमिकाच कळली नाही आणि तर्कशास्त्राच्या तंत्राच्या उपयोजनेतही चूक झाली/राहिली. असाच प्रकार नव-कविता आणि नव-कथा यावर आक्षेप घेणाऱ्या समीक्षकांचा झाला असावा असे गंगाधर गाडगीळांनी त्या प्रकारांची ‘खडक आणि पाणी’मध्ये केलेली पाठराखण वाचता वाटते.

७.२ कलेचे क्षेत्र स्वायत्त असायचे तर कलाकृतींच्या समीक्षेचा मापदंड कलामूल्यात्मकच असला पाहिजे तो नैतिक, सामाजिक, सत्यतात्मक इ. अन्य प्रकारचा नको. ही मूल्ये अनुषंगिक परिणाम म्हणून असायला हरकत नाही. हे लक्षात न ठेवता किंवा राहता ‘अधिकस्याधिकं फलम्’ या न्यायाने या अनुषंगिक मूल्यांच्या आधारे एखाद्या कमी दर्जाच्या कलाकृतीला उच्च दर्जाच्या कलाकृतीपेक्षा वरीय किंवा वरिष्ठ ठरवणार असाल तर ते अयोग्य ठरायला हवे.

(ज्ञानपीठ पुरस्कार देताना कलामूल्यांखेरीज असणाऱ्या जीवनमूल्यांसाठीचा आग्रह हा कितपत समर्थनीय असू शकतो हे पाहायला हवे. कारण, त्यात कलाकृती म्हणजे कलामूल्य हे या अनुषंगिक मूल्यांचे साधन ठरते या गोष्टीकडे लक्ष गेलेले आढळत नाही; म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार हा विशुद्ध कलापुरस्कार असतो हा समज (रूढ) असला तरी, तो एक गैरसमज आहे याकडे लक्ष वेधले जायला हवे.)

७.३ कलात्मक मूल्याचे ‘१’मध्ये सांगितलेले स्वरूप लक्षात असावे व त्याला सदैव व सर्वोपरी असे साध्याचे स्थान असावे.

७.४ साध्य किंवा उद्दिष्ट, आणि अनुषंगिक प्रमाण यांची गल्लत होऊ न द्यावी. ही गल्लत दोन प्रकारे होऊ शकते: (१) कलाकृतीच्या/च सामाजिक, धार्मिक, नैतिक आशय असणाऱ्या गोष्टींशी तादात्म्य असणे वेगळे आणि कलाकृतीचा हेतूच सामाजिक, धार्मिक, नैतिक इ. असणे वेगळे. जिथे दुसरी गोष्ट कलेच्या स्वातंत्र्यावर आणि स्वायत्ततेवर घाला घालणारी असल्याने वर्ज्य ठरते तिथे पहिली गोष्ट त्या आशयाला त्याचा स्वाभाविक आकार मिळवून देण्यास (म्हणजेच त्याला कलात्मक बनवण्यास) सहायक होत असल्याने, वान्छनीय ठरते.

७.५ कलाकृती म्हणजे कलामूल्य धारण करण्यात स्पष्ट किंवा व्यंजित स्वरुपात यशस्वी ठरलेली कलावस्तू असावी असे मराठीतील अनेकांच्या कलाविषयक लिखाणातून वाटत नाही. (मर्ढेकर वजा कोणीही, अगदी रा. भा. पाटणकर किंवा विंदा करंदीकरही अपवाद नाहीत.)

७.६ वरील कारणाने समीक्षा आणि कलाव्यवहारासंबंधित संकल्पनांचा एक सुसंगत आणि पूर्ण असा व्यूह समीक्षकांना रचता आलेला नाही. असा व्यूह रचता आल्याचे लक्षण म्हणजे अगदी कोणत्याही गोष्टीचे, म्हणूनच समीक्ष्य वस्तूचेही वर्गीकरण, एखादा वर्ग उदा. ‘प;’ त्याचा व्यावर्तक असणारा वर्ग उदा. ‘निषेध प,’ आणि या दोहोन्मिळून बनणाऱ्या वर्गाखेरीजचा वर्ग, ‘न-प’ यापैकी एका वर्गात स्वच्छ आणि स्पष्ट करता आले पाहिजे. समीक्ष्य वस्तूला यापैकी कोणत्या तरी एका वर्गात व्याघाताविना समाविष्ट करता आले पाहिजे. (One should be able to classify anything in the world into one of the three classes namely p, negation p (~p) and un- p, (which is exclusive of p a

nd not-p together) without contradiction.) कलेच्या संदर्भात, ‘प’=कलामूल्य असणे; ‘~प’=कलामूल्य नसणे आणि ‘न-प’= कलामूल्याखेरीज नैतिक,धार्मिक इ. मूल्य असणे/नसणे असा अर्थ घ्यायचा.

७.७ कलावाद, रूपवाद, जीवनवाद इ. वादांमध्ये काय फरक आहे आणि तो नेमका कशामुळे व कशासाठी आहे हे माहिती हवे.

७.८ समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र (चपखल शब्द अभिरौचिकी) यापैकी कशाला कशाचा आधार असावा म्हणजे समीक्षा अभिरौचिकीवर आधारित असावी की अभिरौचिकीचे स्वरूप समीक्षेच्या स्वरूपावर अवलंबून असावे, याबाबतचे सयुक्तिक/साधार मत असायला हवे.

७.९ कोणत्याही भूमिकेची बलस्थाने व तिच्या मर्यादा यांची जाणीव हवी.

७.१० ‘एखादे मत आपल्या मतापेक्षा भिन्न आहे एवढ्यासाठी त्याला चूक मानणे’ हे अयोग्य आहे याची जाणीव नसणे . अनेकदा हे विधानांच्या (वियोगी, संयोगी, औपाधिक इ.) प्रकारांची तार्किक जाणीव नसण्याने घडते.

८. (१) समीक्षा म्हणजे काय, (२) ती कशी असावी, आणि (३) ती तशीच कां असावी/असायला हवी यापैकी (१) व (२) विषयी बोलले जाते पण (३) दुर्लक्षितच राहते. असे कां होत असावे? एक कारण असे संभवते की त्याची गरजच जाणवत नसावी किंवा साहित्यशास्त्राचा आंतरशाखीय, (म्हणजे साहित्य आणि तत्त्वज्ञान यांचा) असा अभ्यास मागे पडला असावा. तो पुढील लेखात करेन. त्यासाठी Aristotleचे कारणविषयक मत सहायक ठरावे.

समीक्षा करणे म्हणजे समीक्ष्याचे (ज्याची समीक्षा करायची त्याचे) स्वरूप उलगडून, स्पष्ट करून दाखवणे; आणि असे करून दाखवण्यात समीक्ष्याचा निर्माता कसा आणि किती यशस्वी झाला आहे हे त्याच्या समर्थनासह, कारण-मीमांसेसह सांगणे. समीक्षेचे अर्थ कोशात असे दिलेले आहेत: 1. investigation, 2. search, 3. close/thorough inspection, 4. essential nature or truth, 5. essential nature, 6. essential principle, deep reflection, inquiry असाही दिला आहेच. समीक्षा करतो तो समीक्षक. समीक्ष्य हे काहीही असू शकेल, उदा. नदी, टेबल, रांगोळी, चित्र, कविता, चित्रपटातील एखादे गीत, डावीकडून चालावे सारखा रहदारीचा नियम इ. इ.; त्यामुळे यांची समीक्षा करायची तर यांच्या स्वभावाची दखल घेऊ शकण्याची क्षमता त्या त्या समीक्षकाजवळ असावी लागेल. पण स्वभाव म्हणजे काय? वस्तूचे स्वरूप, तिची घडण, तिचे असणे, तिचे घटक आणि त्यांची रचना. अरीस्तोतलने वस्तूचे स्वरूप तिची चार प्रकारची कारणे सांगून स्पष्ट केले आहे: १. द्रव्य कारण, २. हेतू कारण, ३. आकारिक कारण, ४. उपदान कारण (क्रमशः 1. material, 2. final, 3. formal, 4. efficiant). टेबलाची कारणे: १. लाकूड इ., २. साधन (लिहिणे, जेवणे इ.साठी), ३. त्याचा आकार किंवा रचना, ४. सुतार व त्याची करवत हातोडी इ. साधने. संगीताचे उदाहरण घेतले तर १. स्वर-लय, २. साध्यात्मक असा सांगीतिक आनंद, ३. ख्याल,भावगीत अशा रचना, ४.एखादे वाद्य किंवा सुरेल कंठ; साहित्याचे उदा. घेतले तर १. शब्द, अर्थ, २. वैचारिक,भावात्मक अभिव्यक्ती, ३. निबंध, कविता, ४. भाषा व तिच्या अभिधा, लक्षणा, व्यंजनादी शक्ती.

‘अभिरौचिकीची भाषा’ (Language of Aesthetics) हा विषय मला R. M. Hare’s ‘Language of Morals’ हे पुस्तक एम.ए.च्या तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांना शिकवताना डी. लिटसाठी सुचला.

संदर्भग्रंथसूची

कुलकर्णी, दा. भि. मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुनःस्थापना. भारत, अमेय प्रकाशन, 1982.

मूर, जी. ई., आणि मूर, तत्वज्ञानाचे प्राध्यापक आणि अभ्यासक जी. ई. प्रिन्सिपिया एथिका. एनपी. स्वतंत्र प्रकाशित, 2018.

गाडगीळ, गंगाधर गोपाळ. खडक आणि पाणी. भारत, पॉप्युलर प्रकाशन, 1966.

मिल, जॉन स्टुअर्ट. यूटिलीटेरियनिसम, यूनायटेड किंगडम, एफबी&सी लिमिटेड, 2017.

हरे, आर. एम. द लॅंगवेज ऑफ मोरल्स. यूनायटेड किंगडम, ओयूपपी ऑक्सफोर्ड, 1963.

प्रा.विवेक गोखले १९६७ पासून २००२ पर्यंत अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात ‘रीडर’ होते. २०२० मध्ये त्यांनी ‘द इंपॅारटंस् ॲाफ प्रोडक्शन ॲंड टेस्ट प्रोसेसेस् इन द क्रिटिसिझम ॲाफ म्यझिक’ या विषयावर त्यांची तिसरी डॉक्टरेट मिळवली. प्रा. गोखलेंनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी ‘मर्ढेकर ॲंड क्रिटिक्स: हू इस डिल्युजन?’ ह्या पुस्तकाला कवी अनिल स्मृती समीक्षा पुरस्कार आणि ‘इन द म्युझिकल ॲाफ क्युरिॲासिटी’ ह्या पुस्तकाला ग.त्रि. देशपांडे जन्मशताब्दी विशेष पुरस्कार मिळाला आहे तसेच ‘टू स्पीकर्स ॲान द आर्ट फॅार्म ॲाफ लिटरेचर: मर्ढेकर ॲंड विंदा करंदीकर’ हे त्यांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. त्यांच्या एम.ए तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांना आर. एम हेअर यांचे ‘लॅंग्वेज ॲाफ मॅारलस्’ शिकवता शिकवता त्यांना डि. लिटसाठी ‘लॅंग्वेज ॲाफ एस्थेटिक्स’ हा विचार सुचला. ते सध्या ह्याच विषयावर अभ्यास करत आहेत

bottom of page