top of page
  • bilorijournal

‘वैयक्तिक कथनातल्या सामूहिक सांस्कृतिक आठवणी – अनुक अरुदप्रगसम ह्यांचे द स्टोरी ऑफ अ ब्रीफ मॅरेज’

मूळ लेखिका – वेदिका कौशल

मराठी अनुवाद – आर्यायशोदा कुलकर्णीरेखाचित्र - सेफी जॉर्ज


श्रीलंकेच्या नागरी युद्धाच्या (1983-2009) शेवटच्या काही दिवसांमध्ये घडणारे, द स्टोरी ऑफ अ ब्रीफ मॅरेज हे अनुक अरुदप्रगसम ह्यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे युद्ध आणि हिंसेने वेढलेल्या आणि घडलेल्या मानवी परिस्थितीवरचे दुख:दायक भाष्य आहे. सुमारे चोवीस तासांपर्यंत विस्तारलेली, फक्त त्यांची कथा सांगायला म्हणून (एका अर्थाने) जिवंत राहिलेले दिनेश आणि गंगा ह्या दोघांची ही गोष्ट आहे. हजारो-लाखो लोकांच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीयत्वाच्या ओळखीची परिभाषा देणार्‍या आठवणी आणि घटनांना, एखाद्या उघड्या जखमेसारखे जगासमोर आणण्याचे काम हे पुस्तक करते. कथेतील घडामोडी निर्वासितांच्या एका छावणीच्या पार्श्वभूमीवर घडतात. परिस्थितीतून निर्माण झालेल्या, इतिहासावर बेतलेल्या दुर्दशा आणि मुलगी विवाहित असेल तर विजयी सैनिकांच्या हातून घडणार्‍या लैंगिक अत्याचारापासून तिची सुटका होईल ही एका म्हातार्‍या बापाची आशा, या घटकांमधून कथेतील 2 प्रमुख पात्र एकत्र येतात.


एका प्रकारे ही कथा एखाद्या कालातीत स्वगतासारखी आहे; दिनेशच्या मनातले विचार कथेमध्ये प्रामुख्याने येतात आणि त्याचवेळी वाचकांसाठी कथा उभीही करतात- काळ आणि स्थळ ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या मनाच्या नजरेतून पाहताना अमूर्तपणे अस्तित्वात येतात. निवेदक म्हणून तो स्वत:चे अस्तित्व सर्वत्र ठळकपणे नोंदवतो पण तरीही, आपल्या स्वत:च्या कथेचे मुख्य पात्र म्हणून जवळजवळ अदृश्य होतो.


“कथनाच्या आणि पुनःकथनाच्या क्षणातूनच कायम सगळ्याची सुरुवात होते; कथाकथन आणि स्मरण देणे/आठवण करून देणे या ‘संस्कृती’ ह्या एकाच गंडाच्या दोन बाजू आहेत” असे वुल्फगॅंग म्युलर-फंक, त्यांच्या ‘ऑन अ नरेटॉलॉजी ऑफ कल्चरल अँड कलेक्टिव मेमरी’ (सांस्कृतिक आणि सामूहिक स्मृतींच्या कथनाच्या अभ्यासवर) ह्या निबंधात म्हणतात. सामायिक मानसिक क्लेश आणि अनुभवलेल्या भयावह घटनांमधून (वसाहतवाद, हॉलोकॉस्ट, इत्यादी) तयार झालेल्या सामूहिक सांस्कृतिक जाणीवेशी संबंध साधून ‘आठवण’ ह्या संज्ञेची ते परिभाषा करतात. अशा समुदायांच्या भोवती आणि समुदायांमध्ये असलेल्या वैश्विक कथा ह्या, ‘आठवणीं’द्वारे तयार झालेल्या अनेक वैयक्तिक कथांना एकत्र विणून बनलेल्या असतात. त्यानंतर तयार होणार्‍या सांस्कृतिक ओळखीही अशाच कथन-पुनःकथनातून निर्माण झालेल्या इतिहासावर बेतलेल्या असतात. ह्या अर्थाने पाहता, या कथेतल्या वास्तवात आणि तिच्या शीर्षकामधून असेच काहीसे सुचवले गेले आहे. यामधील ‘ब्रीफ मॅरेज’ हे अनागोंदीच्या काळातील स्थैर्य आणि सुरक्षिततेचे लक्षण ठरते आणि त्यामध्ये युद्धापूर्वीच्या, एका शांत सामान्य काळाची आठवण करून देते. उदाहरणार्थ, गंगाला लग्नाची मागणी घालताना, अशा परिस्थितीत लग्न करण्याचा हेतू काय, हा विचार दिनेशच्या मनात येतो पण लगेच त्याला जाणवते की तसे करण्यामध्ये, त्या परिस्थितीतही त्याला हवेहवेसे वाटणारे समाधान आणि दिलासा आहे. “वस्तुस्थिती ही होती की तो लवकरच मरणार होता, आणि (लग्नाला) होकार देणे म्हणजे ते शेवटचे काही दिवस तो एका व्यक्ती बरोबर घालवू शकणार होता, नुसती व्यक्ती नाही तर एका मुलीबरोबर, बाईबरोबर, बायकोबरोबर.”


पुस्तकाची कथाकथनाची शैली ही शरीर आणि रोजच्या जगण्यातील हालचाली - चालणे, प्रातःविधी, आंघोळ करणे, झोपणे किंवा नुसते समोर घडणार्‍या गोष्टी बघणे- यांचा वापर करत एक आभासी चित्र रंगवते. निवेदक जरी तो स्वतः फक्त एक अलिप्त आणि असहाय्य बघ्या आहे असे स्पष्ट करत असला, तरी ह्यामधून निवेदकाची गोष्टीतील उपस्थिती अधोरेखित केली जाते. अनुक लिहितात, “शेवटी, आयुष्यात अशा काही घटना घडतात, ज्या घडून गेल्यानंतर आपल्या भावना आणि विचार अनाकलनीय होतात. अशा घटना, ज्या कितीही काळ किंवा कितीही जवळून अनुभवलेल्या असल्या, कितीही बारकाईने स्वत:च्या अनुभवातून, कल्पनेतून समजून घ्यायचा प्रयत्न केलेला असला, तरी शेवटी, त्रस्तपणे लांबून अंधळ्यासारख्या बघाव्या लागतात.” असे असताना मात्र तो (निवेदक) भावनाशून्य नाही. श्रीलंकेतल्या युद्ध आणि हिंसेला बळी पडलेल्या अनेकांचे अनुभव आणि इतिहास ह्या पुस्तकातून एकत्र येतात. पण तिथेच न थांबता, कुठल्याही आणि प्रत्येक युद्धाचे अनुभवही इथे दिसतात; जगाच्या विविध कोपर्‍यांमध्ये वर्षानुवर्ष सुरू असलेल्या अनेक नागरी युद्धांचा, स्वत:च्या देशातच निशाण/बळी झालेल्या अनेकांचा हा युद्धाचा अनुभव. युद्धामुळे राज्यविहीन आणि निर्वासित झालेल्या अशा अनेकांच्या अनुभवांमध्ये एक समान गोष्ट दडलेली दिसते; जगभरात झालेल्या वैयक्तिक कथांच्या पुनःकथनातून उपसंस्कृती निर्माण होतात. पणिकर के. अय्यपा ‘अंतर्गतिकरण’ ह्या कथाकथनाच्या शैलीबद्दल बोलताना म्हणतात, “बऱ्याचदा लिखाण म्हणजे आशयाचे लेपलेले थरावर थर (असतात)..”. एखाद्या लेखात मुद्दाम तयार केलेले थर वाचकाला मुख्य कथानक शोधायला भाग पाडतात आणि ह्या लेखनशैलीला ‘अंतर्गतिकरण’ म्हणतात. दिनेश आणि गंगा ह्यांचे लग्न समोर ठेवून, अनुक अरुदप्रगसम एक असे अनेक थर असलेले कथानक तयार करायचा प्रयत्न करतात, ज्यातून ह्या मीलनाची क्षणभंगुरता त्या अनेक थरांमधून वाचकासमोर येते.


इथे लग्न हे एक प्रतीक आहे; युद्धासारख्या अत्यंत वाईट परिस्थितीतही संस्कृती आणि परंपरांचे स्थान अबाधित राहते ह्याचे उदाहरण ह्या लग्नाच्या निर्मिती, कालावधी आणि अंमलबजावणी मधून दिसते आणि त्या मीलनाची समाप्ती म्हणजे ह्या परिस्थितीत, स्थैर्य मिळवण्याच्या किंवा एकटेपणा दूर करण्याच्या हेतूने तयार झालेल्या नात्यांच्या वरवरचेपणावर केलेली टीका आहे. पुस्तकाच्या सुरुवातीपासूनच युद्धाची सावली संपूर्ण कथेवर पडलेली आहे; छावण्यांमधे राहून आजूबाजूला असलेल्या भग्नावशेषांमध्ये लपून जिवंत राहण्याची धडपड करणारे लोक अगदी ठळकपणे दिसतात आणि त्या परिस्थितीचे अपरिहार्य परिणाम भडकपणे डोळ्यासमोर येतात. निवेदक त्याच्या आयुष्याचे बारीकसारीक तपशील आठवणीने सांगतो, आणि त्याच्या व छावण्यांमध्ये राहणार्‍या बाकीच्या लोकांच्या आयुष्यात असलेले साम्य दाखवतो. ह्या आठवणींमध्ये त्याचे युद्धापूर्वीचे आयुष्यही येते, हळूहळू त्याचे आयुष्य कसे कोलमडून पडले हे त्याला आठवते, आणि शेवटी त्याच्या आजूबाजूचे लोक ज्याप्रकारे आपले प्रियजन गमावतात त्याचप्रकारे तो त्याची आई गमावतो. तसे बघता, आपल्यासारख्याच विदारक परिस्थितीमधून जाणाऱ्या दुसर्‍या व्यक्तीशी लग्न करून एक नाते तयार करणे ह्यात शहाणपणा वाटत नाही. पण, अशा नाजूकपणे पेरलेल्या विरोधाभासातून पुस्तकाची मूळ कल्पना समोर येते आणि एखाद्या संस्कृतीमध्ये, इथे ‘युद्धाच्या संस्कृती’मध्ये, असलेले ‘सामायिक अनुभव’ आणि ‘खऱ्या मानवी नात्यांचे’ महत्व मांडते. ह्या विरोधाभासाच्या परिणामांचे एक मार्मिक उदाहरण म्हणजे, नव्या नात्याच्या पार्श्वभूमीवर दिनेशला वाटणाऱ्या चिंतेचे आहे, “कदाचित (ह्या चिंतेचा) त्यांच्या घरांपासून, नातेवाईकांपासून लांब असण्याशी... काही कारण नसताना, आजूबाजूला बॉम्ब पडत असताना एकत्र येण्याशी काही संबंध नव्हता...कदाचित त्याच्या मनातली ही भावना म्हणजे एक मुलगा एका मुलीला भेटताना होणारी नैसर्गिक, सामान्यशी घालमेल होती.”


दिनेशच्या आठवणी, शारीरिक आणि मानसिक दोन्ही, कथानकाला एकत्र आणायला आणि धरून ठेवायला मदत करतात. कथेत दिनेश व्यतिरिक्त बाकी कोणाचेही अनुभव नाहीत, पण छावणीत राहणार्‍या बाकी सगळ्यांच्या आठवणी आणि अनुभव यांचे पडसाद आपोआपच दिनेशच्या आठवणींमधून पडतात. वुल्फगॅंग म्युलर-फंकच्या याआधी नमूद केलेल्या निबंधामध्ये ते सांगतात, “स्वत:ची ओळख समजण्यासाठी आठवणी आणि स्मरण करणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात कारण प्रत्येक ओळख एक असाध्य गोष्ट करते: स्मरण] करून दिलेल्या आणि आठवलेल्या घटना, भावना आणि प्रभाव यांना जोडणारा पूल होते.” आठवणीतून कथानक तयार करणे (जसे ह्या पुस्तकात केलेले आहे) हे मूळातच अवघड असते कारण त्यासाठी व्यक्तीविशिष्ट सत्य आणि सामूहिक संस्कृतीची सामायिक तथ्य दोन्हीची पारख असावी लागते. अशा अनेक कथानकांना घेऊन हे पुस्तक तयार होते आणि हिंसेच्या, दु:खाच्या, मृत्यूच्या, नाशाच्या आणि तसेच सख्याच्या विविध अनुभवांना एकत्र आणते. ह्या प्रत्येक भावनेत गोष्टीरूप महत्व प्राप्त करण्याची ताकद आहे तसेच एखाद्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करण्याची ताकदही आहे. “प्रत्येक संस्कृती एक असा समाज असतो ज्यात गतकाळाची आठवण ही त्यातल्या मृतांमध्ये असते आणि पुन्हा पुन्हा निर्माण होणार्‍या, दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यांमध्ये वर्तमानकाळाची आठवण असते” (वुल्फगॅंग म्युलर-फंक). ह्या पुस्तकातल्या कथानकामध्ये गतकाळातल्या सामायिक व्यथेत, वर्तमानकाळातली दिनेश आणि गंगाच्या लग्नाची गोष्टी अलगद बसवलेली आहे. ह्या जोडीच्या आजूबाजूला असलेले मृत्यू आणि विनाशाचे अस्तित्व त्यांच्या नात्याच्या संक्षिप्ततेचे अशुभ लक्षण आहे आणि दिनेशच्या आठवणीला दिलेले महत्व वाचकाला तो शेवटापर्यंत, आणि त्यानंतरही, जिवंत राहावा असे वाटायला प्रेरणा देत राहते कारण त्याच्या आठवणी ह्या कथानकासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.


कथाकथनाच्या रुपातले हे समालोचन युद्धाच्या संस्कृतीभोवती फिरते. प्रचंड दु:खाच्या, मृत्यूच्या आणि विरहाच्या प्रसंगांतही मानवी नात्यांची ओढ आणि महत्व टिकून राहते आणि हेच सत्य गोष्टीतून ओसंडून वाहते. पण त्या भावना, एका राष्ट्राच्या संस्कृतीचे वास्तव म्हणून समोर ठेऊन, श्रीलंकेमध्ये घडलेल्या ह्या युद्धाच्या आठवणी एका अल्पसंख्याक समाजातल्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून व्यक्त करून त्या समाजाची सांस्कृतिक ओळख युद्धामुळे कशी घडली हे दाखवण्यात लेखकाची हातोटी आहे. युद्ध आणि हिंसेतून निर्माण झालेल्या अनेकांच्या वास्तवाचे विविध वृत्तांत जगभरातल्या साहित्यात सापडतात. पण माझ्यासाठी, द स्टोरी ऑफ अ ब्रीफ मॅरेज ही कथा ह्या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, कारण इथे व्यक्तिगत दु:खाच्या प्रत्येक पैलूचे कष्टपूर्वक केलेले वर्णन आहे; पण त्या सोबतच अशा विदारक प्रदीर्घ संकटातही वाटणारी शारीरिक आणि भावनिक जवळीकीची गरजही दाखवून दिलेली आहे.


भयंकर अन्यायाच्या आणि दु:खाच्या प्रसंगाच्या, दिनेशने कथन केलेल्या त्याच्या स्वत:च्या आठवणी, त्याची सांस्कृतिक ओळख तयार करणाऱ्या एका प्रगल्भ सामायिक स्मृतीचा भाग आहेत. मोठ्या प्रमाणावर घडणाऱ्या युद्धाच्या आणि राजकीय हिंसेच्या परिणामांशी झगडणाऱ्या अनेकांच्या रोजच्या लढ्याचे ह्या छोट्याश्या गोष्टीतून कथन केले आहे.ग्रंथकोष

  • म्युलर-फंक, वुल्फगॅंग. ऑन अ नरेटॉलॉजी ऑफ कल्चरल अँड कलेक्टिव मेमरी. जे-स्टोर; पीडीएफ

  • अय्यपा, पणिकर के. द थियरी अँड प्रॅक्टीस ऑफ नरेटीव्ह इन इंडिया. पीडीएफ

  • अरुदप्रगसम, अनुक. द स्टोरी ऑफ अ ब्रीफ मॅरेज. 2018. हारपर कॉलीन्स, भारत. प्रिंट


स्वतंत्र लेखिका म्हणून सध्या काम करणाऱ्या वेदिका कौशलला, अभ्यास पद्धती आणि सांस्कृतिक अभ्यासात रस आहे. विविध कथानकांचे वाचन आणि अभ्यास करणे आणि साहित्याचा इतर कला प्रकारांशी असलेला संबंध शोधणे तिला आवडते.


Commentaires


bottom of page