top of page
  • bilorijournal

लीसा गाझींच्या 'हेलफायर' मधून स्त्रियांची दडपशाही आणि त्यांच्या कार्यकारी शक्तीचा शोध

मूळ लेखिका – स्नेहा भागवत

मराठी अनुवाद – आर्यायशोदा कुलकर्णी


खरं सांगायचं तर, ह्या पुस्तकाच्या सुंदर कव्हरने मला मोहिनी घातली म्हणून मी हेलफायर विकत घेतलं. हे कव्हर बघा ना... किती देखणं तरीही किती अस्वस्थ करणारं.


‘हेलफायर’ लेखिका- लीसा गाझी, इंग्रजी अनुवाद- शबनम नादिया; प्रकाशक एका. (2020)

कव्हरने मोहिनी घातलेली असली तरी ते पुस्तक शेवटी मा‍झ्या पॅन्डेमिक काळात वाचण्याच्या पुस्तकांच्या वाढत्या यादीत जाऊन पडणार ह्याची मला खात्री होती. पण लीसा गाझींची ही भेसूर कादंबरी माझा वर्षभराचा वाचनाचा दुष्काळ संपवेल ह्याची मला जराही कल्पना नव्हती. शबनम नादिया ह्यांनी मूळ बंगालीतून इंग्रजीत अनुवाद केलेली ही कादंबरी घडते ढाका, बांग्लादेश मध्ये. आईने निर्माण केलेल्या पितृसत्ताक, भीषण विश्वात कैद असलेल्या दोन मुलींच्या आयुष्यात घडणार्‍या एका दिवसाची ही गोष्ट आहे. पहिल्या ओळीपासूनच मी गोष्टीत पुरती अडकले:

सहजच, विनाकारण वेगवेगळ्या रस्त्यांवर भटकायला लव्हलीला मनापासून आवडायचं. घरातून बाहेर पडणं मात्र, पूलसीरत, म्हणजे मरणानंतरचा नरकाच्या ज्वाला ओलांडायला लागणारा तो शेवटचा पूल पार करण्याइतकच अवघड आणि जटिल होतं.

गाझी, लीसा. हेलफायर (पान 1). एका. किंडल आवृत्ती.



विनाकारण रस्त्यांवर भटकण्याची इच्छा आणि तसं न करता येण्याची सत्य परिस्थिती ह्या दोन्ही गोष्टी मला विलक्षण भावल्या. “लव्हली अगदी माझ्यासारखीच आहे”, मी मनातल्या मनात म्हणलं. पण पुढच्या एक-दोन पानात, अंगावर शहारे आणणाऱ्या एका क्षणात, ज्या दिवशी गोष्ट घडते त्या दिवशीच घरातली सगळ्यात थोरली मुलगी, लव्हली, ही चाळीस वर्षांची झालेली आहे हे गाझी उघड करतात. त्यांच्या स्पष्ट आणि धावत्या शैलीतून आपल्याला समजते की लव्हली आणि ब्युटी ह्या दोन बहीणींनी त्यांचं जवळजवळ संपूर्ण आयुष्य, आई फरीदा खानम हिच्या भीतीदायक आणि जुलूमी नजरेखाली दबून एक प्रकारच्या नजरकैदेत घालवलेलं आहे.


तिथून पुढे ह्या तिन्ही बायकांच्या असामान्य आयुष्यात घडणार्‍या एका असामान्य दिवसाचे बारकाईने केलेले वर्णन आहे. हा दिवस असामान्य असतो कारण लव्हलीचा चाळीसावा वाढदिवस असतो आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्या दिवशी फरीदा खानमने लव्हलीला स्वत:साठी कापड खरेदी करण्यासाठी एकटीने घराबाहेर पडण्याची परवानगी दिलेली असते. एका सर्वज्ञ अशा निवेदकाचा आवाज वापरून गाझी आपल्याला तिघींचे --लव्हली, ब्युटी आणि फरीदा खानम-- दृष्टिकोन दाखवतात. तसं करून ह्या बायकांच्या आयुष्यात अंतर्भूत असलेल्या रोजच्या पितृसत्ताक दडपशाहीचं त्रासदायक तरीही सहानुभूति निर्माण करणारं एक चित्र त्या रंगवतात. अतिवास्तव कल्पना आणि कथाकथनाच्या माध्यमातून गाझी आपल्याला वरवर परिपूर्ण दिसणार्‍या ह्या कुटुंबाच्या अंतरंगात डोकवून, त्यातल्या पात्रांच्या आयुष्यात असलेल्या हिंसेची आणि भयाची सत्य परिस्थिती दाखवतात.

प्रथमदर्शी ‘चांगल्या’ आणि ‘परिपूर्ण’ वाटणाऱ्या ह्या मायलेकींचा एकमेकींशी वागताना मात्र एक हिंसक कल दिसतो. ह्या लेखातून मी, हेलफायर मध्ये वापरलेल्या दडपशाही आणि कार्यकारी शक्तीच्या संकल्पनांचा त्या पात्रांच्या समृद्ध पण बदलत्या आयुष्यांच्या माध्यमातून शोध घेऊ इच्छिते.


पुढचे काही तास तिच्या मालकीचे होते : अपरिचितीकरणातून दडपशाहीचे दर्शन

भारतीय गृहिणींच्या आत्महत्यांच्या संदर्भात बीबीसीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका लेखात म्हणले आहे की, “स्त्रिया खूप संवेदनक्षम असतात मात्र त्या सहनशीलतेलाही मर्यादा असते.” पितृसत्ताक दडपशाहीतून महिला कशा वाट काढतात आणि ह्या दडपशाहीने त्यांच्या सहनशीलतेची सीमा पार केल्यावर काय होते -- हेलफायर ही कादंबरी ह्याचा एक अभ्यास आहे. पुस्तकाच्या सुरुवातीच्या काही ओळींमधून, मनासारखं फिरणं किंवा निर्णय घेणं हे मूलभूत अधिकार असूनही तसं करणं हे जवळजवळ अशक्य असणं अधोरेखित केलेलं आहे. भर पॅन्डेमिकमध्ये घरच्यांसोबत आयसोलेशन (विलगीकरण) मध्ये राहत असताना, मला एक क्वीयर (Queer) स्त्री म्हणून ह्या दोन्ही गोष्टी जास्त पटल्या. लव्हली आणि ब्युटीचा संघर्ष मला दोन पातळ्यांवर जवळचा वाटला.


एक म्हणजे, त्या दोघींची गतीशीलता आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य यांकडे त्यांच्या आईने केलेले दुर्लक्ष. ह्या दोघी भगिनींपैकी एकीलाही एकट्याने घराबाहेर पडायची परवानगी नाही. त्यांच्या इच्छा साध्या व्यक्त करायला परवानगी नाही ना त्या साध्य करण्याची. ही गोष्ट जरी एका अतिशय जुलूमी, पितृसत्ताक कुटुंबाची असली तरी त्यातली काही वाक्य मला ओळखीची वाटली आणि म्हणूनच अस्वस्थ करणारीही. त्या ओळींमधले कित्येक संवाद आपल्या मुलांना हवं ते करू देण्याची ‘परवानगी’ देणार्‍या मा‍झ्या आणि मा‍झ्या मित्र-मैत्रिणींच्या ‘उदारमतवादी’ पालक-मुलांमध्ये घडून गेलेले आहेत हे माझ्या लक्षात आलं. उदाहरण म्हणून ह्या सुरुवातीच्या काही ओळी:

आत्ता वाजले होते दहा, (दुपारच्या) जेवणाच्या वेळेपर्यंत तिला घरी पोचायचे होते. तिला हायसे वाटले. अम्माने आज पहिल्यांदाच तिला घरी यायची ठराविक वेळ दिलेली नव्हती. जेवायच्या वेळेपर्यंत परत ये, एवढंच ती म्हणली होती. त्याचा अर्थ असा होता की पुढचे काही तास, दोन वाजेपर्यंत, तिच्या मालकीचे होते.

गाझी, लीसा. हेलफायर (पान 4). एका. किंडल आवृत्ती.


बहुसंख्य दक्षिण आशियाई मुलं-मुलींना त्यांच्या मित्रांसोबत किंवा जोडीदारासोबत किती वेळ घालवता येईल ह्याचा विचार करायला लावणारी संचारबंदी ही सवयीची असते. त्यातूनही एक क्वीयर स्त्री म्हणून, मला काय नव्हे कोण आवडतं हे कायमच दंडनीय ठरवलं गेलेलं आहे. लव्हलीला तिच्या चुलत भाऊ रियाझबद्दल वाटणारं प्रेम फरीदा खानम अगदी तसंच, अतिशय क्रूर पद्धतीने चिरडून टाकते. स्त्रियांच्या दडपशाहीचे ओळखीचे रूप घेऊन गाझी त्याचा संदर्भ किंचित बदलतात आणि तसं करून त्या दडपशाहीला अनोळखी, विचित्र आणि भीतीदायक बनवतात. पंचवीस वर्षीय मुलीला तीचं आयुष्य तिने कसं जगावं हे सांगणार्‍या आईऐवजी चाळीस वर्षीय बाईला तेच सांगणारी आई आपल्यासमोर येते. चाळीसाव्या वर्षीही आईवडीलांच्या घरी राहणं कसं असेल, विचार करा. अशा नरकापेक्षा अजून वाईट काय असावं?

दडपशाही आणि जुलूमाच्या प्रचलित पण अदृश्य रूपाच्या खऱ्या व्याप्तीला कथेच्या पात्रांच्या वयांमद्धे केलेल्या त्या छोट्याश्या बदलाद्वारे अचानकपणे स्पष्ट करणे ह्यात गाझींचं कौशल्य आहे.


फरीदा खानमच्या जुलूमी मातृत्वाचे त्रासदायक पण ओळखीचे असे आणखी एक लक्षण म्हणजे लव्हली आणि ब्युटीच्या स्व‍त्वाला तिने दिलेला निष्ठुर नकार. लव्हली आणि ब्युटी ह्या तिच्याच विस्तृत आवृत्त्या आहेत असे ती मानते. त्यांचं स्वत्व शोधण्यासाठी गरजेची असणारी मैत्रीची आणि प्रेमाची नाती इतर गोष्टींमधले स्वारस्य निर्माण करायला आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवायला मुद्दामहून अडथळे निर्माण करते. तिच्यावर अवलंबून असलेल्या, तिच्याशिवाय बाहेरच्या जगात जगू न शकणार्‍या, असहाय्य मुली फरीदा खानम मुद्दामहून वाढवते.

त्या दोघीही तिच्याशिवाय किती निरूपयोगी आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न फरीदा खानम सतत करत असे. लव्हलीला ओरना विकत न घेता येणं हा त्याच निरुपयोगीपणाचा पुरावा होता.

गाझी, लीसा. हेलफायर (पान 7). एका. किंडल आवृत्ती.


मा‍झ्या स्व‍त्वाचा मोठा भाग, विशेषतः माझी कार्यकारी शक्ती आणि स्वत:बद्दलचा अभिमान, हे मा‍झ्या कुटुंब आणि घराव्यतिरिक्त इतर लोकांबरोबर आणि इतर ठिकाणी घडणार्‍या संवादांमधून तयार झालेले आहे. उत्तम मुलगी ह्या भूमिकेच्या पलीकडे गेल्यानंतर मला मा‍झ्या स्व‍त्वाची, लैंगिकतेची ओळख अधिक चांगल्या पद्धतीने झाली. त्या भगिनींना ही संधी न देऊन, फरीदा त्यांना त्यांचं बदलतं स्व‍त्व अनुभवण्यापासून वंचित करते.


मा‍झ्या परिवारातल्या अनेक स्त्रियांना ह्याच प्रकारे उत्तम पत्नी आणि आई होण्याच्या बदल्यात, त्यांचे स्वत्व त्याग करावे लागले आहे. त्यांना अद्वितीय बनवणाऱ्या--- कला, काव्य, बागकाम, आणि त्यापलिकडे मैत्रीची नाती, एकतर्फी प्रेम आणि लैंगिकता --अशा अनेक गोष्टींपासून त्यांना वंचित केले गेले आहे.


पुन्हा एकदा, स्व‍त्वाच्या जाणि‍वेपासून फरीदा खानम तिच्या मुलींना जितका वेळ आणि ज्या पद्धतीने वंचित ठेवते त्यातून ओळखीच्या असलेल्या ह्या दडपशाहीला एक अनोळखी आणि भीतीदायक रूप येते. ह्या जुलूमातून बाहेर न पडता येण्याची अपरिहार्यताच त्या मुलींच्या कथेला जास्त भीतीदायक आणि अस्वस्थ करणारी बनवते.



रेखाचित्र - अलेक्सान्डर मॅकलेलन


तो कावळा काय म्हणतोय : अतिवास्तववादाचा वापर करून पिढीजात आघात शब्दबद्ध करताना

लव्हलीच्या दृष्टिकोनातून सांगितलेल्या कथेच्या पूर्वार्धात, फरीदा खानमचे एक क्रूर आणि भीतीदायक चित्र वाचकांसमोर रंगवलेले आहे ज्यातून तिने स्वत:च्या मुलींवर केलेले अत्याचार, त्यांच्या मनात निर्माण केलेली शंका आणि परावलंबनाची भावना समोर येते. ह्या मुली चौदा वर्षांच्या असताना घडलेल्या एका छोट्याश्या चुकीची शिक्षा म्हणून फरीदा खानम त्यांना गावापासून लांब असलेल्या एका घरात राहायला नेते, सगळीकडे त्यांच्या सोबत जाते आणि त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यासाठी जराशीही जागा ठेवत नाही. त्या मुलींच्या ‘भल्या’साठी चाललेलं हे सगळं पितृसत्ताक समाजाच्या संदर्भातून बघायचं झालं तर ‘प्रतिष्ठा’ आणि ‘पावित्र्य’ टिकवण्याचा प्रयत्न असतो.


पुस्तकाच्या उत्तरार्धात, जुलूमशहा म्हणून समोर आलेल्या फरीदा खानमच्या लहानपणाची आणि संसारिक जीवनाची माहिती समोर आणून, गाझी तिची एक वेगळी बाजू उलगडून दाखवतात. त्यामुळे लव्हली आणि ब्युटीबद्दलच्या तिच्या अतिरेकी अधिकारवजा वागण्याला थोडा संदर्भ मिळतो. ‘परिपूर्ण घर’ चालवण्यासाठी वापरले जाणारे फरीदाचे भीतीदायक, नियंत्रक वागणे हे तिला तिच्या तितक्याच भीतीदायक आईकडून मिळालेले देणं असते. आपल्या पुराणमतवादी, पितृसत्ताक संकल्पना आणि मूल्य स्वत:च्या मुलीकडे सोपवायची ही तिची पद्धत होती. आपला जावई नपुंसक आहे हे लक्षात आल्यावर फरीदाची आई तिला सांगते की:

चांगल्या बाईचे काम शोषून घेण्याचे असते. तूही तेच करणारेस. जे काही घडले ते नशीब म्हणायचे. लोकांना तुझ्यावर हसू देऊ नकोस- तुझ्यावर हसण्याची संधी त्यांना कधीही देऊ नकोस. तुझ्या नवऱ्याचा अपमान हा तुझा अपमान आहे. आता, ते घर तुझे आहे, तो माणूस- कसा का असेना- तुझा नवरा आहे.

गाझी, लीसा. हेलफायर (पान ९६). एका. किंडल आवृत्ती. (अधोरेखित ओळी मला महत्त्वाच्या वाटतात)


स्व‍त्वाची जाणीव, स्वत:च्या आयुष्याचा थोडासा ताबा आणि तिच्या आईचा पाठिंबा मिळवण्याचा फरीदासमोर एकमेव पर्याय असतो. तो म्हणजे, तिच्यात बाणवलेल्या पितृसत्ताक दृष्टिकोनातून बघताना दिसणारे तिच्या नवऱ्याचे आणि मुलींचे ‘दोष’ स्वत:त शोषून घेणे. उत्तम पत्नी आणि आई म्हणून समोर येण्याचा फरीदा खानमने आयुष्यभर केलेला प्रयत्न हा तिने सोसलेल्या पिढीजात आघाताचा प्रतिनिधी आहे. त्यातून येणारी चिंता आणि ताण समजण्यासाठी किंवा शब्दबद्ध करण्यासाठी गरजेची साधनं फरीदा खानमकडे नाहीत.


फरीदाच्या मनातली ही घालमेल दाखवण्यासाठी गाझी, वारंवार आढळणाऱ्या कावळ्याची अतिवास्तव आकृती आणि त्यामुळे फरीदाच्या मनात निर्माण होणार्‍या भीतीचा वापर करतात.

शांत, स्तब्ध तळ्यासारख्या त्या दुपारी कावळ्याचा तो कर्कश्य आवाज, फक्त आणि फक्त चेतावणी देणारा, जणू काही दुसर्‍या जगातूनच येत होता...तिच्या मनातली भीती नव्या जोमाने परतली.

गाझी, लीसा. हेलफायर (पान ११८). एका. किंडल आवृत्ती.


फरीदाने प्रयत्नपूर्वक प्रस्तुत केलेल्या कौटुंबिक ‘सौख्याचा’ मुखवटा घसरायला लागला की प्रत्येक वेळेला तिला- दक्षिण आशियात सर्रास दिसणारा- कावळा भीती दाखवतो किंवा तिच्या अंगावर थेट हल्ला करतो. ह्या कावळ्याची तिला प्रचंड भीती वाटते आणि कावळ्याला अपशकुनाचे लक्षण मानणाऱ्या स्थानिक अंधश्रद्धा तिच्या ह्या भीतीला एक अतिवास्तव, अद्भुत रूप देतात. सदोष पत्नी आणि आई असण्याबद्दलच्या फरीदाच्या खऱ्याखुऱ्या चिंतांना, आणि त्या चिंतांना जन्म देणार्‍या पिढीजात आघाताला, कावळ्याचा वापर करून गाझी एक अलौकिक दर्जा देतात. लेखिका कारमेन मारिया माचादो अतिवास्तववादाबद्दल (ज्याला त्या नॉन-रीयलिझम म्हणतात) एका मुलाखतीत बोलताना सांगतात, “..स्त्री असण्याच्या काही अतिवास्तव किंवा बदलत्या पैलूंकडे पाहण्याची ती एक पद्धत आहे- काही अनुभव जाणवणारे असतात, अगदी भीतीसारखे. ठराविक विषयांना अनोळखी बनवण्याची संधी (अतिवास्तववादातून) मिळते..”


पुस्तकाच्या शेवटी, लव्हली आणि ब्युटीच्या नात्यात असलेला ताण टोकाला पोचतो तेव्हा ह्या घरातल्या दिसणार्‍या आणि असणार्‍या परिस्थितीतली तफावत शि‍गेला पोचते. लव्हली आणि रियाझच्या प्रेमप्रकरणामुळे ब्युटीचा लव्हलीवरचा राग आणि नाराजी समोर येते आणि त्यातून ह्या दोन भगिनींमध्ये असणारे फरक अधिक ठळकपणे दिसू लागतात. आईनी ठरवलेल्या नियमांना लव्हली शांतपणे मोडत राहते, पण ब्युटी मात्र त्याच नियमांचा वापर करून स्वत:च्या कार्यकारी शक्तीचा शक्य असेल तितका प्रयोग करते.

आज सगळ्यांनी स्वत:सारखं न वागण्याचा दिवस होता, किंबहुना खर्‍या अर्थाने स्वत:सारखं वागण्याचा (दिवस होता).

गाझी, लीसा. हेलफायर (पान १९२). एका. किंडल आवृत्ती.


ह्या ओळीत पुस्तकाच्या थरारक शेवटाची नांदी आहे. शेवटी लव्हलीच्या हातून एक विनाकारण हिंसक कृत्य घडते आणि ती अगदी सहजपणे त्या कृत्याला आपल्या आयुष्याचा एक सर्वसाधारण भाग म्हणून स्वीकारते. बहिणी-बहिणींमध्ये होणार्‍या छोट्यामोठ्या भांडणांना गाझी अपरिचित स्वरूप देतात आणि त्यांच्या ओळखीच्या एकमेव पुरुषाच्या- रियाझच्या- प्रेमासाठी एकमेकींशी स्पर्धा करायला भाग पाडलेल्या ह्या दोन बहि‍णींमध्ये असलेल्या तणावाची पूर्ण व्याप्ती, एका अत्यंत विध्वंसक क्षणातून समोर आणतात.


लव्हली आणि ब्युटीमध्ये मुळात असलेले फरक आणि त्यांच्यात झालेल्या अनेक नेहमीच्या पण निरूपद्रवी वाटणाऱ्या भांडणांमध्ये दडलेली हिंसा ह्या दोन्ही गोष्टी पुस्तकाच्या शेवटी घडणार्‍या झगड्यातून जास्त स्पष्टपणे समोर येतात.


ते सगळं आपल्या मनात असतं : हेलफायर मधल्या कार्यकारी शक्तीचा शोध

इथपर्यंत वाचताना, हेलफायर म्हणजे दडपशाही खाली दबून गेलेल्या बायकांची कथा आहे असं वाटत असेल. ते अगदी खरंही आहे. पण त्यापेक्षाही, कथेतल्या पात्रांसमोर येणार्‍या असाध्य अशा अडथळ्यांना सामोरं जाताना त्यांनी दाखवलेली बंडखोर वृत्ती मला जास्त प्रभावी वाटली. आशेच्या छोट्या छोट्या किरणांनी ही कथा गच्च भरलेली आहे आणि स्वत:च्या कार्यकारी शक्तीवर दावा मिळवण्याचा प्रयत्न ही पात्र पुन्हा पुन्हा करत राहतात. उदाहरण म्हणून, लव्हलीच्या डोक्यातला हा विचार :

म्हणजे, लव्हलीने कधी आईचे म्हणणे पाळले नाही, अगदी चुकूनही, असे कोणालाही म्हणता येणार नव्हते. पण, तिच्या आत (डोक्यात) काय चालू आहे ह्याचा विचार केला तर मात्र गोष्ट निराळीच होती.

गाझी, लीसा. हेलफायर (पान १५). एका. किंडल आवृत्ती. (अधोरेखित ओळी मला महत्त्वाच्या वाटतात)


ही कथा ज्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात घडते त्याचा विचार करून गाझी त्यांच्या पात्रांची कार्यकारी शक्ती शारीरिक ऐवजी मानसिक स्वरुपात प्रस्तुत करतात.


लव्हलीच्या मनात राहणारा माणूस हा तिचा काल्पनिक साथीदार असतो ज्याचा खट्याळ, मनमोकळा आवाज तिला एकटेपणाच्या आणि अनिश्चितीच्या क्षणांमध्ये मोलाची साथ देतो. हा माणूस लव्हलीला तिच्या इच्छा-आकांक्षा स्वीकारायला आणि आईच्या कठोरतेला सामोरं जाण्यासाठीचे प्रोत्साहनही देतो. चाळीस वर्षात पहिल्यांदाच स्वत:हून बाहेरचे जग अनुभवताना, लव्हलीच्या डोक्यातला माणूस तिला स्वत:ची कार्यकारी शक्ती वापरण्यासाठी आधार देतो आणि मार्गही सुचवतो :

आता गडबड केली आहेसच ना, मग एक तास उशीर झालाय का तीन तास ह्यानी काही फरक पडत नाही. एवढी काळजी करण्यात काय अर्थ आहे? कधी नव्हे ते एकटीनी बाहेर पडलीयेस. जरा हवा खा, मजा कर, लोकांशी गप्पा मार, आणि मग घरी जा. घरी परत नाही गेलीस तरी काही नुकसान नाही.

गाझी, लीसा. हेलफायर (पान ३५-३६). एका. किंडल आवृत्ती. (अधोरेखित ओळी मला महत्त्वाच्या वाटतात)


एका एकटेपणाच्या आणि नाजूक क्षणात लव्हली तिच्या मनातल्या माणसाशी सगळ्यात पहिल्यांदा बोलते. एका मुलाखतीत, लव्हलीच्या मनातल्या माणसाबद्दल बोलताना गाझी म्हणल्या की, “त्याच्याबरोबर असताना ती (लव्हली) खरंच जशी आहे तशी वागू शकते”. फरीदा खानमने लव्हलीला ज्या साथीदारापासून वंचित ठेवलेलं आहे तो साथीदार म्हणजे हा माणूस आहे.

गंमत म्हणजे, लव्हलीच्या डोक्यातला आवाज पुरुषाचा बनवून, गाझी सत्य आणि कल्पनेमधली सीमा पुसून टाकतात. असं करून त्या हे अधोरेखित करतात की लव्हलीच्या मनातल्या माणसाकडे असणारी कार्यकारी शक्ती तिच्या मनातल्या काल्पनिक जगातही एका बाईला द्यायची कल्पनाही तिला करवत नाही.


आईच्या परवानगीशिवाय बाहेर राहण्यापासून कॉलेजमध्ये असताना रियाझ बरोबर शारीरिक संबंध ठेवण्यापर्यंत लव्हलीचं बंडखोर आणि साहसी बाह्य जीवन हे तिच्या ह्या समृद्ध आंतरिक जीवनातून आलेले आहे.

ह्या पार्श्वभूमीवर ब्युटीचं आयुष्य हे बंदिस्त आहे आणि त्यात इतकी गुंतागुंती नसते. पण, त्यांच्या घराच्या चार भिंतींमध्ये मात्र ब्युटीचं राज्य असतं-- त्रागा, आदळआपट, आरडाओरडा करून स्त्री सौंदर्याच्या मासिकांपासून ते गांजापर्यंत तिला हवं ते सगळं ती हक्काने मागते आणि मिळवतेही :

गांजा प्यायला सुरुवात करून आता तिला जवळजवळ वर्ष झाले होते. त्या मुलाने तिला त्याची सवय लावली होती.

गाझी, लीसा. हेलफायर (पान १३१). एका. किंडल आवृत्ती.


खरंतर, बाथरूममध्ये लपून गांजा पिणे हे ब्युटीचे एकमेव बंडखोर कृत्य आहे हे एका करूण क्षणी गाझी सांगतात. तेवढंही तिनी एकटीने केलेलं नसतं, घरी वरकाम करायला येणार्‍या एका मुलाने तिला ती सवय लावलेली असते. आईच्या जुलूमी नजर कैदेतून येणारा एकटेपणा ब्युटीने मान्य केलेला असतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न न करणचं ती जास्त पसंत करते. घरात असताना इतकं धाडसीपणे ती कसं वागू शकते असं लव्हली तिला विचारते तेव्हा ब्युटी तिला हे बोलूनही दाखवते.

‘धाडसीपणे म्हणजे? अगदी साधं गणित आहे. मी तीचं ऐकलं म्हणजे ती माझी काळजी घेईल. तू घरात असताना कायम असं बिथरलेल्या उंदरासारखं का वागतेस, आपा? ऐक, ह्या चार भिंतींच्या आत, आपल्याला हवं तसं आपण वागायचं- समजलं का?’

गाझी, लीसा. हेलफायर (पान ५९). एका. किंडल आवृत्ती.


जिथे लव्हली तिच्या कल्पना विश्वातून स्वत:च्या इच्छा-आकांक्षा शांतपणे अनुभवते तिथे ब्युटी मात्र तिचे स्वातंत्र्य दाबून टाकते आणि कुठलेही प्रभावी परिणाम होणार नाहीत अशी खात्री असलेल्या जागेत-- तिच्या घरात --स्वत:ची थोडीशी काय ती कार्यकारी शक्ती जोमाने वापरते. हुकूमशहा असलेल्या तिच्या आईलाही ब्युटीच्या ह्या वागण्याची काळजी असते.

ब्युटीच्या ह्या वागण्याची फरीदालाही भीती वाटे. तिने सांगितलेले सगळे ब्युटी ऐकत असे पण फरीदाला हे माहिती होते की जर ब्युटीने ठरवले तर ती तितक्याच सहजपणे अवज्ञाही करू शकते. लव्हलीत तसे करण्याची क्षमता नव्हती.

गाझी, लीसा. हेलफायर (पान १०६). एका. किंडल आवृत्ती.


ब्युटीच्या हातात ही शक्तिशाली वाटणारी ताकद असली तरीसुद्धा संपूर्ण कथेत, बाजारपेठेत एकटीने जाणं असो किंवा रियाझ सोबत वेळ घालवणं असो-- तिला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी मिळणाऱ्या संधी मात्र गमवाव्या लागतात. लव्हली तिच्या मनातल्या माणसाच्या मदतीने ह्या दोन्ही गोष्टी करू शकते.


लव्हली आणि ब्युटी दोघींच्या आयुष्याचे आणि ह्या एका असामान्य दिवसाचे मार्गक्रमण एकत्र समोर ठेवून, अतिवास्तव आणि काल्पनिक विश्वाचे महत्व नक्की काय असते हे गाझी सांगतात. तिच्या मनातल्या माणसाच्या माध्यमातून लव्हलीने स्वत:शी जोडलेलं नातं तिला त्या दडपशाहीतून जिवंत राहायला मदत करतं. कारमेन मारिया माचादो ह्यांनी त्यांच्या मुलाखतीत म्हणल्याप्रमाणे, लव्हलीच्या मनातल्या माणसासारख्या अतिवास्तव आकृत्या ह्या, “आठवण करून देतात, आपल्याला स्वत:चे कल्पनाविश्व तयार करण्याची परवानगी असते ह्याची. आपण सगळे असं करण्यासाठी लायक आहोत आणि आपण त्याचा आग्रह धरला पाहिजे. जरी इतरांनी आपल्याला सांगीतलं की ह्या काल्पनिक गोष्टी अतिशय अवास्तव, आगाऊ, परवानगी नसलेल्या किंवा मूर्ख असल्या तरीसुद्धा मला हे हवंय, असं म्हणणं चुकीचं नाही.”


एका बाजूने, फरीदा, लव्हली आणि ब्युटीच्या पात्रांमार्फत गाझी आपल्याला शक्तीहीनता, कार्यकारी शक्तीचा अभाव, स्व‍त्वाची भावना, पिढीजात आघात आणि पितृसत्ताक समाजात राहताना सहन करावी लागणारी हिंसा ह्या सगळ्याची खरी व्याप्ती दाखवतात. दुसर्‍या बाजूला, लव्हलीच्या पात्रामार्फत अशा पितृसत्ताक समाजात जिवंत राहण्यासाठी स्त्रियांनी तयार करून वापरलेल्या कार्यकारी शक्तीच्या काल्पनिक, अतिवास्तव आणि बदलत्या अशा विविध स्वरुपांना त्यांनी वंदन केलेले आहे. जुलूम आणि दडपशाहीच्या अंधारात गुरफटलेलं असलं तरीही, माझ्यासाठी, हेलफायर हे पुस्तक म्हणजे एक खणखणीत, गरजेची आणि आशादायक आठवण आहे की पितृसत्ताक समाजाच्या ह्या नरकात जिवंत राहण्यासाठी लागणारा हा पूलसीरत पार करता येऊ शकतो-- जोपर्यंत आपण आपल्या डोक्यात चालू असलेल्या गोष्टी त्याला गिळू देत नाही तोपर्यंत.

ग्रंथकोष

फासलर, जो. 2017. “हाऊ सरीयलिसम एनरीचेस स्टोरीटेलिंग अबाऊट वूमेन.” द अटलांटिक, अटलांटिक मीडिया ग्रुप. https://www.theatlantic.com/entertainment/archive/2017/10/how-surrealism-enriches-storytelling-about-women/542496/.


गाझी, लीसा. 2020. हेलफायर. अनुवाद शबनम नादिया, चेन्नई: इका. https://champaca.in/products/hellfire?variant=32375840899107


ऋषिकेश, शरण्या. 2020. “लीसा गाझी ऑन ‘हेलफायर’: वन्स अ वुमन रियलायझेस व्हॉट इट’स् लाइक टू फील फ्री, शी कांट विलिंगली गो बॅक.” हफपोस्ट, हफपोस्ट. https://www.huffpost.com/archive/in/entry/hellfire-book-leesa-gazi-interview_in_5f903bf9c5b62333b240fc0e.


पांडे, गीता. 2021. “व्हॉट’स् बिहाइंड सुईसाइड्स बाय थोउसंडस् ऑफ इंडियन हौसवाईव्स?” बीबीसी न्यूज, बीबीसी.

https://www.bbc.com/news/world-asia-india-59634393


 

पूर्ण वेळ संपादक म्हणून काम करणारी स्नेहा भागवत क्वचित प्रसंगी लेखनही करते. हिंदी चित्रपट आणि दक्षिण आशियाई स्त्रियांच्या साहित्याकडे क्वीयर स्त्रीवादी नजरेतून बघण्यात तिला रस आहे. मित्र-मैत्रिणी आणि तिच्या मांजराबरोबर वेळ घालवणे, गझल आणि जुनी हिंदी गाणी ऐकणे आणि समुद्राकाठी बसणे ह्या तिच्या आवडीच्या गोष्टी आहेत.


bottom of page