top of page
  • bilorijournal

लॉरेन हॅन्सबरींच्या 'अ रेसिन इन द सन' मधले चिरकालीन अमेरिकन ड्रीम

मूळ लेखक – ऑलिवर नेफ

मराठी अनुवाद – आर्यायशोदा कुलकर्णीरेखाचित्र - अलेक्सान्डर मॅकलेलन


आपली स्वप्नं आणि महत्वाकांक्षा या एखाद्या सजीव प्राण्यासारख्या असतात, जो जिवंत राहण्यासाठी आयुष्यात येणार्‍या समस्यांना अनुसरून स्वतः बदलतो; शेवटी, जी स्वप्नं आपला संकल्प टिकवून परिस्थितीनुसार बदलू शकतात तीच स्वप्न साकार होतात. अ रेसिन इन द सन (उन्हात असलेला बेदाणा) हे लॉरेन हॅन्सबरी यांनी लिहिलेले नाटक 1950च्या दशकात शिकागोच्या साऊथ साईड या भागामध्ये राहणार्‍या यंगर्स परिवाराच्या दैनंदिन आर्थिक खटाटोपाची गोष्ट सांगते. कृष्णवर्णीय नाटककार, लेखिका आणि नागरी हक्क चळवळीच्या कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या हॅन्सबरी यांच्या विपुल साहित्यातले एक म्हणजे 1959 मध्ये लिहिलेले हे प्रभावी नाटक. संपूर्ण नाटकातून हॅन्सबरी ‘अमेरिकन ड्रीम’ या संकल्पनेचा अर्थ बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकणारे आणि तग धरणारे एक सामायिक ध्येय असा प्रस्तुत करतात. सामुदायिक यशापेक्षा वैयक्तिक प्रगतीवर अधिक भर देणार्‍या ‘अमेरिकन ड्रीम’ च्या प्रचलित व्याख्येपेक्षा हा अर्थ फारच वेगळा आहे. यंगर्स कुटुंबाचे ‘अमेरिकन ड्रीम’ हे कुटुंबातल्या प्रत्येकाच्या कष्टांची फळं एकमेकांबरोबर वाटून, कौटुंबिक स्वाभिमान टिकवून आणि कायम आशा बाळगून, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते आणि जिवंत राहते. महत्त्वाचे म्हणजे, ह्या नाटकात, हॅन्सबरी वैयक्तिक ‘अमेरिकन ड्रीम’ या संकल्पनेवरचं लक्ष बाजूला सारून एका कुटुंबाच्या संदर्भातून ते समोर आणतात.


लॅंगस्टन ह्युज ह्यांनी लिहिलेली “हारलेम” ही कविता हॅन्सबरी आपल्या नाटकाचा मुद्रालेख म्हणून वापरतात. एखाद्याची स्वप्नं सतत लांबणीवर टाकली गेली की त्यांचे काय होते ह्याची चिकित्सा त्या कवितेत केलेली आहे. “ते सुकून जातं का उन्हातल्या बेदाण्यासारखं?” (ह्युज) ह्या ओळींवरून नाटकाचे शीर्षक घेतलेले आहे. कवितेच्या ह्या उल्लेखामुळे, त्या ओळींचा आणि नाटकाचा संबंध काय, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. नाटकाच्या सुरुवातीलाच, ज्या प्रतिकूल परिस्थितीमुळे यंगर्स परिवाराचे ‘अमेरिकन ड्रीम’ मागे सारले गेले त्याच्याबद्दल आपल्याला कळते. उन्हात पडलेला ‘बेदाणा’ म्हणजे जणू, कोणे एके काळी प्रचंड उमेदीनी जिवंत असलेले ‘अमेरिकन ड्रीम’ आहे, जे आता मात्र वाळक्या, निर्जीव टरफलासारखे झालेले आहे. वरवर पाहता, यंगर्स परिवाराची स्वप्न इतकी मागे सारली गेली आहेत की ती आता असाध्य वाटत आहेत. पण नाटकाच्या शेवटी, अभिमान आणि घट्ट नातेसंबंधांच्या सहाय्याने यंगर्स परिवार त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना आपल्याला दिसतो. ‘बेदाणा’ निर्जीव असला तरी त्यात नवनिर्मितीची क्षमता आहे. वेलीतून आलेला हा मृत ‘बेदाणा’ नवीन वेलीला जन्म देणारे बीज घेऊन येतो. शेवटी जेव्हा आपण यंगर्स कुटुंबाचा निरोप घेतो, तेव्हा त्या ‘बेदाण्या‘ ने हे नवीन रूप धारण केलेले असते. एक अमेरिकन ड्रीम सफल झाले नाही तरी ते दुसर्‍याची पायाभरणी करू शकते हे इथे हॅन्सबरी दाखवून देतात. वैयक्तिक पातळीवर अशक्य वाटणारे स्वप्नसुद्धा अशा तर्‍हेने परिस्थितीनुसार बदलून जिवंत राहू शकते.


तग धरून राहणार्‍या अशा अमेरिकन ड्रीमच्या बीजाचे एक उदाहरण म्हणजे ‘बिग वॉल्टर’कडून यंगर्स परिवाराला वारसा म्हणून मिळालेली रक्कम. नाटकाची गोष्ट घडते त्या वेळेला, वॉल्टर सीनियर ह्यांचे निधन झालेले असते. ज्यामुळे त्यांची बायको, लिनाकडे (कुटुंबात ‘ममा’ म्हणून ओळखली जाणारी) बरेच पैसे आलेले असतात. ट्रॅविस, म्हणजे त्यांच्या नातवाला, त्या आलेल्या पैशांचा केलेला उपयोग समजावताना ममा सांगतात, की त्यांनी कुटुंबासाठी एक घर विकत घेतलं आहे जे पुढे जाऊन एक दिवस त्याच्या मालकीचं होणार आहे. ममा ट्रॅविसला सांगतात: “आता, रात्री प्रार्थना म्हणताना, आभार मानायचे देवाचे आणि तुझ्या आजोबांचे – कारण हे घर त्यांनी तुला दिलयं – त्यांच्या परीनं” (हॅन्सबरी 91). ममा ट्रॅविसला समजावून सांगतात, की बिग वॉल्टरचं स्वप्न त्यांच्या आयुष्यात साकार झालं नसलं तरी त्यांनी काढलेले कष्ट, ट्रॅविसला स्वत:चं अमेरिकन ड्रीम साकार करण्यासाठीचे साधन म्हणून उपयोगी पडतील. वारश्याच्या रुपातले हे अमेरिकन ड्रीम, एखाद्याच्या आयुष्यात आलेल्या संकटांमुळे न मोडणारे आणि पुढच्या पिढीला त्यांची स्वप्न साकार करता यावी यासाठी एक भक्कम पाया बनून राहणारे असे आहे.


पाहिलेले स्वप्न हे कुटुंबातल्या सगळ्यांचं मिळून असणं आणि कौटुंबिक वारश्याच्या भावनेतून निर्माण झालेलं असणं हेच यंगर्सच्या ‘अमेरिकन ड्रीम’च्या परिवर्तनशीलतेचे रहस्य आहे. समुदायातर्फे आलेला त्यांचे नवे घर खरेदी करण्याचा प्रस्ताव नाकारण्याचे कारण जेव्हा वॉल्टर लिंड्नरला समजावून सांगतो, तेव्हा संपूर्ण परिवार त्याच्या पाठीशी उभा राहतो. एकमेकांच्यातले मतभेद बाजूला ठेवून त्यांच्यात असलेली कौटुंबिक अभिमानाची भावना आणि एकत्र पाहिलेल्या ‘अमेरिकन ड्रीम’शी असलेले नाते ते दाखवून देतात. लिंड्नरशी बोलताना वॉल्टर खात्रीने म्हणतो, “...मा‍झ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की प्रचंड अभिमान बाळगणाऱ्या लोकांचा मी वारस आहे” (हॅन्सबरी 148). वॉल्टर लिंड्नरला सांगतो कशी त्याची बहीण डॉक्टर होणार आहे आणि कसा त्याचा मुलगा हा अमेरिकेत राहणारी यंगर्स कुटुंबाची सहावी पिढी आहे. यंगर्स परिवारातल्या प्रत्येकाची स्वत:ची वेगवेगळी स्वप्नं असतात, पण बिग वॉल्टर आणि ममा ह्या दोघांनी पाहीलेल्या ‘अमेरिकन ड्रीम’चा अभिमान बाळगून ते स्वप्न साकार करण्यासाठी ते सगळे एकत्र येतात. जरी त्यांची वैयक्तिक स्वप्न बदलत्या वास्तवामुळे मागे पडली किंवा बदलली तरी अख्ख्या कुटुंबाच्या प्रगतीचे हे स्वप्न मात्र आजूबाजूला घडणार्‍या बदलांमध्येही खंबीरपणे टिकून राहते. ह्या खंबीर पायावर, बदलत्या काळानुसार आपली स्वप्न बदलत आणि आशा न गमावता स्वत:चे भविष्य उभारण्याचे धाडस हे कुटुंब करते.


वॉल्टरने लिंड्नरला दिलेला नकार म्हणजे यंगर्स कुटुंबाच्या एकत्रित ‘अमेरिकन ड्रीम’ची अभिव्यक्ति असली तरीही ममांचे कुंडीतले छोटे रोप हे त्याचे मूर्त स्वरूप आहे. अवघड प्रसंगातूनही मार्ग काढणार्‍या ह्या कुटुंबाच्या चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे ममांचे ते रोप आहे. आपली मुलं कशी करारी आहेत हे रूथला सांगताना रोपाचे वर्णन करत त्या म्हणतात “.. छोटसं रोपटं ज्याला कधी ना पुरेसं ऊन मिळालं ना काही..” (हॅन्सबरी 52). मामांसाठी ते रोप हेच “.. गावच्या घरामागच्या बागेसारखं” (हॅन्सबरी 53) होतं. हे “गावचं घर” म्हणजे (अमेरिकेच्या) दक्षिण भागात असलेलं त्यांचं आणि त्यांच्या नवऱ्याचं घर, जे सोडून त्यांनीही उज्ज्वल भविष्याच्या शोधार्थ इतर अनेक कृष्णवर्णीय लोकांप्रमाणे उत्तरेला स्थलांतर केलं. ह्या स्थलांतराला ‘ग्रेट मायग्रेशन’ म्हणतात. कुंडीतले ते रोप हे ममांच्या घडून गेलेल्या भूतकाळाचे प्रतिक आहे आणि त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याचेही. जी चिकाटी ममांमध्ये आहे, ती त्यांच्या मुलांमध्येही उदंड आहे. तीच चिकाटी त्यांना त्या रोपात दिसते. कुटुंबातल्या प्रत्येकाची त्या रोपाकडून वेगळी अपेक्षा असली तरी त्याचं मूळ, त्याचा उगम सगळ्यांना स्पष्टपणे ठाऊक आहे. नाटकाच्या शेवटच्या प्रसंगात, वॉल्टरने नव्या घरी आम्ही नकोसे असलो तरी आम्ही राहायला येणारच असे लिंड्नरला सांगितल्यानंतर यंगर्स कुटुंब एकत्र येते. सामान हलवणारे येतात आणि नव्या घरी जायचा त्यांचा प्रवास अखेर सुरू होतो. जुन्या घराला निरोप देताना ममा सर्वात शेवटी बाहेर पडतात. पण कुंडीत लावलेले त्यांचे रोप त्या विसरत नाहीत. एकट्याच, ममा “... बाहेर जातात.. दार उघडतं आणि त्या पुन्हा आत येतात, पटकन रोपटं घेतात, आणि कायमच्या घराबाहेर पडतात” (हॅन्सबरी 151). ते रोप हे ममांचा वारसा आहे, आणि कुटुंब जाईल तिथे त्यांच्या मागे तेही जाईल ह्यावर जोर देण्यासाठी हॅन्सबरी नाटकाचा शेवट अशा प्रकारे करतात. कुटुंबासमोर येणार्‍या कुठल्याही परिस्थितीतून ते रोप जगणं गरजेचं आहे. ममांचे रोप हे कौटुंबिक नाती, चिकाटी आणि अभिमान यांनी संयुक्त अशा यंगर्स कुटुंबाच्या ‘अमेरिकन ड्रीम’चे प्रतीक आहे.


लॉरेन हॅन्सबरींची अ रेसिन इन द सन (उन्हातला बेदाणा) ही कथा संघर्षाची तर आहेच, पण चिकाटी आणि परिवर्तनशीलता यांचीही आहे. आयुष्यात येणार्‍या वळणांना सामोरं जाताना लोकांच्या ‘अमेरिकन ड्रीम’ला बदलावे लागले तरी, हे बदल सहन करण्याची क्षमता आणि समुदाय यांसोबत एका व्यक्तीच्या अमेरिकन ड्रीमचा गाभा पिढ्यांपिढ्या टिकून राहू शकतो. नाटकाच्या सुरुवातीपासून ‘उन्हातल्या त्या बेदाण्याचे’ प्रतीक हॅन्सबरी आपल्या डोळ्यासमोर ठेवतात आणि नाटक पुढे सरकतं तसतसं त्याचा अर्थ बदलत जातो-- वाळक्या, निर्जीव टरफलासारख्या त्या स्वप्नाचे ताज्या मातीत पेरलेल्या बीजामधे रूपांतर होते. ममांनी ट्रॅविसला वारसा म्हणून दिलेले घर म्हणजे बिग वॉल्टरच्या निधनाने निकामी न झालेल्या, वारशात मिळालेल्या ‘अमेरिकन ड्रीम’चे, हॅन्सबरींनी दिलेले उदाहरण आहे. लिंड्नरविरुद्ध उभे राहण्याच्या वॉल्टरच्या निश्चयातून यंगर्स कुटुंबाच्या चिकाटीचे मूळ त्या आपल्याला दाखवतात. शेवटी, लेखिका शीर्षकातून त्या स्वप्नाचे बीज घेतात, आणि ममा कुटुंबाचे मूळ नव्या मातीत रुजवत असल्याने यंगर्स कुटुंबाच्या अमेरिकन ड्रीमची मूळं खोल आहेत हे दाखवतात. वॉल्ट व्हिटमन हे त्यांच्या ‘अमेरिका’ ह्या कवितेमध्ये ‘अमेरिकन ड्रीम’चे वर्णन “ पृथ्वीसह, स्वातंत्र्य, कायदा आणि प्रेमासह चिरकालीन” (व्हिटमन) असे करतात. त्याच पद्धतीने हॅन्सबरीही 'अमेरिकन ड्रीम'ला आयुष्याच्या आणि परिवर्तनाच्या चक्राशी जोडतात आणि यांमुळे प्रतिकूल परिस्थितीतही अमेरिकन ड्रीम कसे जिवंत राहू शकते हे दाखवतात. यंगर्स परिवाराच्या अमेरिकन ड्रीमप्रमाणेच, अ रेसिन इन द सन हे नाटक अमेरिकन संस्कृतीमध्ये, विशेषतः कृष्णवर्णीय अमेरिकन संस्कृतीमध्ये टिकून राहिलेले आहे. ब्रॉडवेवर पहिल्यांदा सादर झाल्यापासून विषय आणि कलाकारांना मिळणाऱ्या बदलत्या स्वीकृतीप्रमाणे ह्या नाटकाच्या अनेक आवृत्या सादर केल्या गेल्या आहेत. नाटकाला बहुतेक सकारात्मक प्रतिसाद मिळाले आहेत, परंतु नाटकाच्या लावलेल्या अर्थाबद्दल काही मतभेद आहेत. काहींना ते सर्व अमेरिकन कामगार वर्गाला उद्देशून असलेला संदेश म्हणून दिसते, तर काहींना त्याचा हा अर्थ अमेरिकेतील कृष्णवर्णीय कुटुंबांचे विशिष्ट अनुभव आणि संघर्ष यांना मर्यादित करणारा वाटतो.


ग्रंथकोष

हॅन्सबरी, लॉरेन. अ रेसिन इन द सन. विनटेज बुक्स, 1994.


ह्युज, लॅंगस्टन. “हारलेम बाय लॅंगस्टन ह्युज.” पोएट्री फाऊंडेशन, पोएट्री फाऊंडेशन, 2002, www.poetryfoundation.org/poems/46548/harlem


व्हिटमॅन, वॅाल्ट. “अमेरिका बाय वॅाल्ट व्हिटमॅन- पोएम्स | अकॅडेमी ऑफ अमेरिकन पोएटस्.” Poets.org, अकॅडेमी ऑफ अमेरिकन पोएटस्, 1891, poets.org/poem/america-1.


 

ओलिवर नेफ सध्या अमेरिकेतल्या केंब्रिज, मॅसेच्युसेट्स येथे राहतो. नॉर्थ शोर कम्यूनिटी कॉलेज मार्फत वेलस्प्रिंग हाऊस मधून त्याने गणित आणि इंग्रजी कॉम्पोझीशन ह्या विषयांचे अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत. येत्या भविष्यात पुढील शिक्षण चालू ठेवण्याची त्याला आशा आहे.

Comments


bottom of page