top of page
  • bilorijournal

बालपणातल्या भारतीय वाचकाची विलक्षण गोष्ट

मूळ लेखिका – आयंतिका नाथ

मराठी अनुवाद – आर्यायशोदा कुलकर्णी



Illustration by Sefi George


अॅन फाडीमन, ‘एक्स लिबरीस्: कंफेशन्स ऑफ अ कॉमन रीडर’ ह्या पुस्तकात, त्यांच्या वाचकांना सांगतात “प्रत्येकाच्या पुस्तकांच्या कपाटात एक ‘विचित्र कप्पा’ असतो असा माझा विश्वास आहे. ह्या कप्प्यात काही गूढ आणि रहस्यमय पुस्तकांचा असा एक संग्रह असतो ज्याचा कपाटातल्या उरलेल्या पुस्तकांशी काही संबंध नसतो; पण, बारकाईने पहिले तर, हा संग्रह त्याच्या मालकाबद्दल बरंच काही सांगून जातो.” माझा विचित्र कप्पा बघितला तर, त्याची मालकीण एक तर एखादा उभरता, उत्साही ‘भक्त’ आहे असे वाटेल नाहीतर अतिशय गहन आणि गंभीर भावनांना सामोरी जाणारी एक किशोरवयीन व्यक्ति आहे असे वाटेल – अधलं-मधलं काहीही नाही. एका परीने हे जरा विचित्र प्रकरण आहे खरं, पण मी काय वाचेन हे ठरवणाऱ्या घटकांचा अभ्यास केला तर, सगळ्या प्रकरणाचा अर्थ लागतो.


'द प्रोव्हीनशियल रीडर' ह्या त्यांच्या निबंधात सुमना रॉय लिहितात, “समाजवादी भारताच्या छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये दिसणारा पुस्तकांचा दुष्काळ लक्षात यायला अवघड आहे, आणि त्यातून दोन पद्धतींची मंडळी तयार होतात: जे शाळा-कॉलेज संपल्यावर वाचन सोडून देतात, आणि जे- लहान मुलांसकट- मिळेल ते सगळं वाचतात. मी, रस्त्याच्या बाजूच्या पाट्या, रहस्य कथा उत्साहाने वाचायचे.” आपल्या घडणीच्या काळात आपण जे काही वाचतो ते सगळं शेवटी एका साध्या मुद्द्यावर अवलंबून असते – उपलब्धता. मी एका ‘मध्यमवर्गीय’ बंगाली घरात वाढले. मा‍झ्या आई-बाबांनी लग्न केलं तेव्हा त्यांच्या पुस्तक संग्रहांचही लग्न झालं. मा‍झ्या वडिलांच्या ‘ग्रे’स् अनॅटमी’ च्या पायावर, मा‍झ्या आईचे बुद्धदेब गुहा, शंकर आणि रबीन्द्रनाथ टागोरांचे कथासंग्रह स्थिरावले. त्यांच्या बऱ्याच दोस्त-मंडळींसारखंच त्यांनाही हे माहिती होतं की, प्रगतीची वाट मला इंग्रजी कॉन्व्हेंट शिक्षण देण्यात होती; पण मा‍झ्या पालकांनी इंग्रजी ही दुसरी भाषा म्हणूनच कायम वाचली होती. मी माझे नाव आधी इंग्रजीमध्ये लिहायला शिकले आणि बऱ्याच नंतर बंगालीमध्ये. लहानपणी वाढदिवसाला मिळालेल्या छोटोदेर पंचतंत्र, ठाकुमार झूली आणि खिरेर पुतुल यांमुळे वाचनाची टंचाई कधी नव्हती, पण तरीही मला सहज वाचता येणार्‍या आणि जवळच्या वाटणाऱ्या गोष्टी शोधण्यासाठी मी कायम प्रयत्न करत असे. फक्त इंग्रजीतली घरातली पुस्तकं होती ती ‘टेल मी व्हाय’ चे ५ खंड, आणि ४ वर्षाच्या बाळाच्या वाचन क्षमतेवर जरा जास्तच विश्वास असलेल्या नातेवाईकांनी दिलेली एनिड ब्ल्याटनची विशिंग चेअर ही मालिका.


शाळेचं ग्रंथालय आवाक्याबाहेर होतं कारण फक्त तिसरी आणि त्या पुढच्या वर्गातल्या दीदींना ती सुविधा उपलब्ध होती. अशा अधांतरी अवस्थेतून बाहेर पडायचा एकमेव मार्ग होता तो म्हणजे महिन्यातल्या दर दुसर्‍या शुक्रवारची योग्यदानची चक्कर. तिथे प्रत्येक लहान मुलाच्या नावडीचं सगळं करायला लागायचं – शांतता राखायची, तिथल्या सुंदर फुलांना हात लावायचा नाही, कारंज्यात पाय बुडवायचे नाहीत, बागेत धावपळ करायची नाही. मग असं असतानाही मला तिथे जायला का आवडायचं? कारण त्यांच्या मुख्य ऑफिसामध्ये एक छोटं पुस्तकांचं दुकान होतं. फार पुस्तक वैविध्य नसायचं तिथे – रामायण, महाभारत, आणि स्वामी विवेकानंद, रामकृष्ण आणि शारदा देवींच्या आयुष्यावरची पुस्तकं, पण मुद्दा हा होता की हे सगळं इंग्रजीमध्ये होते. प्रत्येक वेळी तिथले एखादे बारीक, चित्र असलेले पुस्तक उचलून मी ते वाचून काढायचे- फार उत्कृष्ट कथा होत्या म्हणून नाही, पण वाचायला तेव्हा तेवढंच उपलब्ध होतं म्हणून. त्या कथा वाचताना कधीकधी मला प्रश्न पडायचे- त्या बायका साड्यांबरोबर ब्लाऊज का घालत नाहीत? २३ वर्षांच्या रामकृष्णांनी, ५ वर्षांच्या शारदेशी लग्न का केलं? रामाची त्वचा निळी का होती? पण ह्या गोष्टींचे मुख्य कथानक साधे होते आणि ह्या गोष्टी त्यामुळे पटायच्या. धर्मनिष्ठ पुरुष त्यांच्या आयुष्यातले अडथळे पार करायचे, कधी राक्षसांबरोबर लढाया करायचे आणि त्यांच्या बायकांना आगीतून चालून स्वत:चे पावित्र्य सिद्ध करायला सांगायचे. रास्त मागण्या केल्या जायच्या आणि त्या पूर्णही केल्या जायच्या, चांगल्याचा वाईटावर विजय व्हायचा, आणि मी पंचबती जंगलाची किंवा जयरांबतीची टेक्निकलर स्वप्न बघत झोपी जायचे.


मग २००३ उजाडलं. आई-बाबांनी मला कोलकाता पुस्तक प्रदर्शनाला घेऊन जायचे पहिले वर्षं होते ते. नवनीत प्रकाशनचे “लहान मुलांसाठीच्या रंजक अभिनव कथा” असलेल्या कथा संग्रहातली सुमी आणि हिप्पो मी तिथून घेतली. गहुवर्णीय, हातात हात धरून ‘रिंगा-रिंगा-रोसेस’ म्हणणारा सुमीचा मित्र परिवार बघून मला अतिशय बरं वाटलं होतं. तो पर्यंत पुस्तकांमधून एखादी भारतीय आई किंवा भारतीय घर-परिवार मी बघिलाच नव्हता आणि हे मा‍झ्या लक्षातही आलं नव्हतं. १९९०च्या दशकाच्या शेवटी आणि २०००च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण, तिन्हीचे वारे जोरात वाहत होते. बऱ्याच शहरांमध्ये आणि निम्न-शहरी भागांमधले शालेय शिक्षण प्रामुख्याने ‘इंग्लिश मीडियम’ झाले होते आणि लहान मुलांसाठी भारतीय लेखकांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकांची टंचाई कमी करण्यासाठी स्कोलॅस्टिक आणि रत्न सागर सारख्या खाजगी प्रकाशन संस्था पुढे आल्या होत्या.


हॉस्पिटलमधल्या (हो, हॉस्पिटलमधल्या) पुस्तकांच्या दुकानात घेतलेली ‘नॉडी’स् अॅडवेंचर’ ची २ पुस्तकं, टिंकल आणि अमर चित्र कथा चे थोडे खंड, फ्रांसेस बरनेटच्या अ लिटिल प्रिन्सेसची जुनी पण चित्रित आवृत्ती, चित्रित हायडी, आमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानदाराने दिलेली द लिटिल प्रिन्सची एक फाटकी प्रत, अशा थोड्याथोडक्या यादीवर मी ३री पर्यंत वेळ निभावून नेली. टिंकल हे मा‍झ्या माहितीतलं पहिलं इंग्रजी मासिक होतं ज्यात स्वत: सोडवायची भरपूर प्रश्नमंजुषा आणि कोडी होती जी नंतर कापून, पत्राने त्यांच्या मुख्य ऑफिसला पाठवायची असायची. आता गंमतीशीर वाटतं पण तेव्हा हे सगळं अगदी सामान्य होतं. माझे आई-बाबा, ती सगळी कात्रणं पोस्ट न करता, मला सापडू नये म्हणून कपाटात वरती ठेवून द्यायचे, हे मला बऱ्याच काळानंतर कळलं. पण, त्या असंख्य कोड्यांमधल्या एखाद्या कोड्याचं बक्षीस मिळवण्याच्या आशेत, माझ्यासारखेच अनेक वाचक भारतभरात पसरलेले आहेत ह्या जाणि‍वेत एक वेगळीच आपलेपणाची भावना होती, जी मी आधी कधीच अनुभवलेली नव्हती. ऑनलाईन खरेदीच्या उगमाच्या आधी, माझ्याकडे असलेल्या प्रत्येक पुस्तकाला एक गोष्ट होती. जुलै मधल्या रथ-मेळयात मला 'अ लिटिल प्रिन्सेस' सापडलं होतं. अनपेक्षितपणे, तिथे एक दुकान सापडलं, जे सगळी पुस्तकं 30 रूपयांना विकत होतं. मिल्स अँड बूनच्या जराश्या अश्लील पुस्तकांमधून हळूच डोकावणारं, पांढर्‍या झग्यातल्या, निळे डोळे असलेल्या गहुवर्णीय मुलीचं ते चित्र होतं. चित्रित, संक्षिप्त गोष्ट होती ती, दूर वरच्या बोर्डिंग स्कूलमध्ये राहणार्‍या एक तरुण मुलीची. एक दुष्ट शाळाप्रमुख, एक छानशी मैत्रीण आणि ती खरं तर खूप श्रीमंत आणि प्रेमळ आहे हा महत्त्वाचा शोध, असं सगळं जोडून तयार होणारी अगदी परिपूर्णशी परीकथा होती ती! आईने मला दिलेलं पहिलं पुस्तक होतं 'हायडी'. आईचं इंग्रजी वाचन फारसं नव्हतं पण तिला हायडीची गोष्ट तोंडपाठ होती. माझं डोंगरांबद्दलचं प्रेम त्या पुस्तकातून आलं आहे असा माझा अंदाज आहे, कारण त्या हिरव्यागार शेतांची आणि गुलाबी फुलांची, गरमागरम पावाची आणि मेंढ्यांची चित्र काढण्यात मी तासंतास घालवले होते. कोपर्‍यावरच्या पुस्तकांच्या दुकानाच्या मालकाने, दुकान कायमचं बंद करताना भेट म्हणून मला 'द लिटिल प्रिन्स' दिलं होतं. किती समर्पक भेट होती ती! त्या पुस्तकाने माझा पहिला प्रेमभंग केला, पण त्या दु:खातून बाहेर येताना मला साथही दिली.


लीला गांधी, त्यांच्या १९९८ मधल्या 'पोस्टकलोनीयल थियरी' ह्या पुस्तकात लिहितात की वसाहतवादानंतरच्या काळातल्या विचारसरणीचे वर्णन करताना हिंदीतला ‘जुगाड’ हा शब्द वापरता येईल. ‘जुगाड’ म्हणजे हाताशी असलेल्या सीमित संसाधनांतून वेळ निभावून नेणे. अशा पद्धतीच्या काटकसरी उपाय योजनेतून एकत्र आलेल्या वस्तू कदाचित योग्य नसतीलही, पण त्यांचा एकत्रित वापर हा प्रभावी आणि अतिशय नाविन्यपूर्ण असतो. वय वर्ष ४ ते १४ मध्ये मी वाचलेल्या सगळ्या साहित्याचं वर्णनही त्याच एका शब्दात करता येईल. जे मिळेल ते सगळं मी वाचून काढलं.


इयत्ता ३ री दोन कारणांसाठी खास होती. पहिलं म्हणजे, ३रीत गेल्यागेल्या मी पहिलं काय बघितलं तर मा‍झ्या डायरीमध्ये असलेलं ‘लायब्ररी रेकॉर्ड’ चं पान. मिसेस फ्रीझल आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या अंतराळातल्या किंवा खोल समुद्रातल्या सफरींच्या कथांनी भरलेल्या ‘मॅजिक स्कूल बस’ च्या पुस्तकांनी ते पान पटकन भरलं. आपण लहान असतो तेव्हा कशावरही पटकन विश्वास ठेवतो, पण वयात येताना आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन किती चटकन बदलतो हे आपल्या लक्षातही येत नाही. ‘सेंट क्लेर’ आणि ‘मॅलरी टॉवर्स’ वाचताना मजा यायची, स्कॉन आणि जिंजर एलची मजा अनुभवणारे ‘सीक्रेट सेव्हन’ मोहक वाटायचे आणि ‘फेमस फाइव’ कोणाच्याही देखरेखीशीवाय ट्रीपला जायचे ते तर काय! – पण ह्या गोष्टी वाचताना एक प्रश्न नक्की पडायचा: त्यांच्या आई-बाबांनी त्यांना परवानगी कशी दिली? कितीही वाईट दिसला तरी सर्दी होईल म्हणून जॉर्जिनाची आई स्कार्फ बांधायला तिच्या मागे कशी लागायची नाही? त्यांच्या ट्रीपमध्ये केळी आणि घरचा खाऊचा डबा का नसायचा? बसमध्ये बॉलीवुडच्या गाण्यांची अंताक्षरी कशी नव्हती? मा‍झ्या रोजच्या आयुष्याशी, अनुभवांशी त्या गोष्टींमध्ये असलेल्या घटनांचे साधर्म्य नव्हतं, पण तरीही त्या गोष्टी समजून घ्यायला मला अवघड गेलं नाही. किंबहुना त्या गोष्टींनी, विशिष्ट अनुभवांपेक्षा सार्वत्रिक अनुभवांशी संबंध शोधायला मला भाग पाडलं.

३रीतच मला माझी पहिली मासिक पाळीही आली. आईला रडू आलं होतं, आणि आता दर महिन्यातले काही दिवस असं होणार हे तिनी मला सांगीतलं. तोपर्यंत मा‍झ्या वाचनात आलेल्या कशातच ह्या परिस्थितीशी सामोरं जाण्याचं ज्ञान नव्हतं. मग मैत्रिणी आणि वरच्या वर्गातल्या मुलींकडून कुजबुजलेल्या स्वरात मला महत्त्वाचे सल्ले मिळाले: लायब्ररी मधून घ्यायच्या काही खास पुस्तकांची नावं. ती पुस्तकं मिळवणं सोपं नव्हतं. स्कोलॅस्टिकने प्रकाशित केलेल्या पथदर्शी, एका प्रश्नमंजूषेतून तुमचे सारे भविष्य सांगणार्‍या, पिंक पेजेस नंतर कायम प्रचारात असणारं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक होतं 'चिकन सूप फॉर द टीनेज सोल'. हे पुस्तक, आपल्या उबदार पांघरुणात गुरफटून वाचायला नेण्यासाठी तयार असणार्‍यांची भली मोठी रांग होती. पण, माझी पाळी आली म्हणून मला सगळ्यात पहिल्यांदा ते पुस्तक मिळावं, असं एकमताने ठरवलं गेलं. थंडीतल्या एखाद्या दिवशी मिळालेल्या उबदार मिठीसारखं होतं ‘चिकन सूप’. त्या पानांमध्ये मा‍झ्या वयाचे लोकं होते, ट्रेनिंग ब्रा घालायला आईला विनवणं किती अवघड असतं हे आणि पाळीमगचं शास्त्रीय कारण समजावून सांगताना अवघडलेल्या बाबांबद्दल लिहिणारे. त्या क्षणी मा‍झ्या लक्षात आलं की (‘सेंट क्लेर’ आणि ‘मॅलरी टॉवर्स’ मधल्या) इसाबेल आणि पॅट्रीशिया मधल्या शालेय कुरघोडी बद्दल वाचून मन विचलित करण्यापेक्षा ह्या गोष्टी वाचण्यात मला जास्त रस होता.


ही पुस्तकं शोधणं म्हणजे खरंच एक आव्हान होतं. तरुण मंडळींसाठी लिहिलेलं साहित्य भरपूर होतं पण भारतीय लेखिकांनी इंग्रजीतून लिहिलेलं फार कमी होतं. तेव्हा ना गुडरीडस्च्या पुस्तकांच्या याद्या होत्या, ना ऑनलाईन पुस्तकं विकत घ्यायची सोय होती, ना www.literature-map.com होतं. घरचा कम्प्युटर होता तो फक्त एमएस पेंट पुरताच मर्यादित होता, आणि बाबांचा नोकीयाचा फोन होता पण त्याला हात लावायची मला परवानगी नव्हती. ह्या दरम्यान, शाळेच्या बास्केटबॉलच्या कोर्टवर पुस्तक प्रदर्शनं व्हायची. स्कोलॅस्टिक किंवा इनसाइट बूक्स चे छोटे स्टॉल लागायचे, एक दिवस आधी आम्हाला माहिती मिळायची आणि मग मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर आम्ही तिथे जाऊन पुस्तकं बघायचो. मा‍झ्या शालेय शिक्षणातली प्रगती तिथे मिळणाऱ्या पुस्तकांवर अवलंबून आहे हे आईला अतिशय आर्तपणे पट‍वून शेवटी मी, माया एस. अचर ह्यांचे ऑन अ हॉलिडे ट्रीप, सुभद्रा सेनगुप्ता ह्यांचे हिस्टरी, मिस्टरी, डाल अँड बिर्याणी आणि क्रिस्टीन गोमेझ ह्यांचे माय फेव्हरेट स्टोरीस् ही तीन पुस्तकं घेतली.


फेव्हरेट स्टोरीस् खरंच नावाला जागलं. त्यातली एक गोष्ट मी पुन्हापुन्हा वाचली होती- गोष्ट फार वेगळी होती म्हणून नाही पण मी अनुभवलेल्या त्या भावना इतक्या चपखलपणे कोणीतरी शब्दात मांडल्या होत्या म्हणून. गोष्टीचं नाव होतं ‘पहिलं प्रेम’. 13 वर्षाचा सुधीर, मिस मृणालिनी नावाच्या त्याच्या शिक्षिकेच्या प्रेमात पडतो. जेव्हा त्या शाळा सोडून दुसर्‍या शहरात जाणार आहेत असं सांगतात तेव्हा तो आपल्या भावना त्यांना सांगतो. मिस मृणालिनी त्याला शांतपणे समजावून सांगतात की त्याला वाटणाऱ्या भावना ह्या प्रेम नसून मनापासून वाटणारी आपुलकी आहे. एकमेकांचा भावपूर्ण निरोप घेत मिस मृणालिनी निघतात पण जाता जाता सुधीरला ‘माझा चांगला विद्यार्थी म्हणून तुला नक्की लक्षात ठेवीन’ असं सांगून जातात. बाकीची दोन पुस्तकं होती साध्या सोप्या रहस्यकथांची, लहान मुलांना सोडवता येतील अशी. देशी एनिड ब्ल्याटन वाचायची माझी हौस ह्या पुस्तकांनी भागवली पण माझा एकटेपणा कमी करणाऱ्या गोष्टींच्या शोधात मी कायम असायचे.


ह्या मा‍झ्या शोधात मला तशा दोन गोष्टी सापडल्या. पहिली होती चिल्ड्रेन’स् बूक ट्रस्ट, नवी दिल्ली प्रकाशित देविका रंगचरी ह्यांनी लिहिलेली 'व्हेन अम्मा वेंट अवे' ही. पुस्तकातल्या नलिनीचं आणि तिच्या पट्टीचं नातं माझं आणि मा‍झ्या आजीसारखचं होतं. मा‍झ्या आजीनी मला दिलेला काळा, केशरी आणि हिरव्या रंगाचा, टिकल्या असलेला स्कर्ट घालायला मला लाज वाटायची आणि तसंच नलिनीच्या आजीनी तिला आणलेलं, तिला न आवडलेलं नावडीचं ‘पावदाई’ होतं. आम्हा दोघींच्या आज्या काय खावं, केव्हा खावं, कोणाबरोबर फिरावं आणि केसांची लांबी किती असावी ह्या बाबतीत अनाहूत सल्ले द्यायच्या. आजीच्या हातचा चविष्ट स्वयंपाक खायला मिळतो एवढंच मा‍झ्या मित्रमैत्रिणींना दिसायचं, पण वाया गेलेलं मूल म्हणून बोलणी खाल्यानंतर तक्रार करायला कोणीच नसायचं. नलिनी, हो, मला कळतयं तुझं दुख! हळू हळू वरच्या पिढीशी असलेलं गुंतागुंतीचं नातं निभावायची कला अवगत झाली आणि मग आजीच्या कणखरतेचं, चिवटपणाचं कौतुक वाटायला लागलं.


दुसरं होतं बुबला बासुंचं अप टू द नाईनस्, एक छोटसं पुस्तक ज्याच्यावर माझा डोळा आठवडाभर होता. पुस्तकावर लिहिलं होतं “एनिड ब्ल्याटनच्या शाळेच्या गोष्टींसमोर टिकणारे फारसे लिखाण नाही, पण बूबला बासु हे आव्हान सहज पेलतात” आणि हे वर्णन अगदी बरोबर आहे असं माझं मत आहे. तारुण्यातली ती अस्वस्थता आणि संताप नवीन नव्हता, पण असं शब्दरूपात ते समोर आल्यामुळे त्या भावनांना एक प्रकारची वैधता, कदाचित प्रतिष्ठाही मिळाली.


मा‍झ्या आजी-आजोबांसारखा, मी वसाहतवाद अनुभवलेला नाही. शालेय अभ्यासक्रमातून दडलेल्या वसाहतवादाचा, मा‍झ्या कल्पनाशक्तीवर होणारा परिणाम न जाणताच मी मोठी झाले, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. तीन वर्षाची असताना ‘हमटी-डमटी’ म्हणण्यापासून ते वरच्या वर्गात गेल्यावर शेक्सपियर चे ‘शाल आय कम्पेर दी टू अ समर’स् डे’ शिकण्यापर्यंत, साहित्याचं हे विस्कळीत रूपच मा‍झ्या ओळखीचं होतं. मे महिन्यातल्या रणरणत्या उन्हात खेळायला जाणं (कधीकधी इतकं ऊन असायचं की मा‍झ्या वर्गातल्या एक-दोन जणांना उष्माघाताचा त्रास झाला) आणि शेक्सपियरने त्याच्या प्रेमिकेला ‘उन्हाळ्यातला दिवस’ असे का संबोधले ह्याचं परीक्षेत विस्तृत उत्तर लिहिणं अगदी सोपं होतं. मला हा विस्कळीतपणा एका परीनं बरोबर वाटायचा कारण मोठी होताना मी प्रामुख्याने पाश्चिमात्य माध्यमं आणि कथा अनुभवल्या होत्या. ‘शिलिंग’ काय असतं ही मला माहिती होतं, मा‍झ्या आजोबांना शेक्सपियर पाठ होता. हा सगळा मा‍झ्या आयुष्याचा एक भाग होता.


‘डीकॉलोनायझिंग अवर बूकशेल्वस्’ च्या वादाला दोन बाजू आहेत. एक बाजू म्हणते की खरं साहित्य सार्वत्रिक असतं- राष्ट्रीयत्वाच्या मर्यादा पार करून ते मानवी भावनांना भिडतं. पण दुसरी बाजू अशी आहे की ज्या जगात रोज 25,000 लोकं भुकेनी मरतात, जिथे एक देश दुसर्‍या देशावर कित्येक वर्ष आधिपत्य गाजवतो, त्या जगात ‘सार्वत्रिक’ असा कुठला अनुभव आहे? प्रगत राष्ट्रांमधल्या आणि प्रगतीशील राष्ट्रांमधल्या मुलांच्या रोज अनुभवलेल्या आयुष्यातला फरक दुर्लक्षून चालणार नाही. म्हणूनच ‘डीकॉलोनायझिंग अवर बूकशेल्वस्’ ही मोहीम फक्त साम्राज्यवादी संस्था बंद पडून किंवा एखाद्या ब्रिटिश लेखकाच्या ऐवजी भारतीय लेखक तयार करण्यात नाहीये. ती एक प्रक्रिया आहे ज्यातून सगळ्या प्रकारच्या ज्ञानाची समूळ पुनर्रचना करणं गरजेचं आहे ज्याची सुरवात शालेय शिक्षणातून होणं महत्त्वाचं आहे.


लेखनातलं राजकारण हे ओळखीच्या राजकारणाशी निगडीत आहे. लहान मुलं जेव्हा त्यांच्या आई-बाबांसारखी दिसणारी, त्यांच्यासारखी दिसणारी पात्र पुस्तकांमध्ये पाहतात, तेव्हा त्यांच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि बाकीच्या जगात आपली एक ओळख आहे हे त्यांना कळतं. स्टूअर्ट हॉल हे सांस्कृतिक अभ्यासाचे प्रख्यात अभ्यासक आहेत ज्यांनी राष्ट्रीयत्व, भूमिका आणि आत्मसन्मानासारख्या गोष्टींचा ओळख आणि प्रतिनिधित्वाशी असलेला संबंध बारकाईने अभ्यासला आहे. स्वत:ची ओळख ही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक संदर्भांमधून निर्माण होते हे स्टीफन मेनेल ह्यांचे मत आहे. ते म्हणतात, “प्रत्येक व्यक्तीचे स्वत:बद्दलचे मत हे उरलेल्यांचे आपल्याबद्दलचे मत काय आहे ह्यावर ठरते. ती एक प्रतिक्षिप्त क्रिया असते, ज्यात ‘स्व-रूप’ आणि ‘एक-रूप’ हयात काही फरक नसतो.” म्हणूनच स्वत:चं स्थान लक्षात येण्यासाठी समाजातलं प्रतिनिधित्व असणं आणि दिसणं दोन्ही महत्त्वाचं असतं. जेफ मालपास ह्यांच्या प्लेस अँड एक्सपीरियन्स ह्या पुस्तकाच्या सुरुवातीला लिहताना एडवर्ड केसी म्हणतात: “माणूस म्हणवून घेणे - विचार करणे, व्यक्त होणे आणि अनुभवणे – म्हणजे स्वत:ची जागा स्थापन करणे.”


वसाहतवादानंतरच्या भारतात वाढणाऱ्या लहान मुलांचे ऐकणारे आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारे प्रकाशक, क्षेत्रीय आणि राष्ट्रीय पातळ्यांवर, समोर येत आहेत. कथा (दिल्ली, स्थापना 1989), तारा (चेन्नई, स्थापना 1994), तूलिका (चेन्नई, स्थापना 1996) आणि प्रथम (बेंगळुरू, स्थापना 2004) सारखे प्रकाशक त्यांच्या पुस्तकांमधून आजच्या भारतीय मुलांसाठी एक आपलेपणाची आणि परिपूर्णतेची भावना निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. वसाहतवादातून आलेले पूर्वग्रह दूर करण्यासाठी हे प्रकाशक लोक कला आणि लोककथांचा वापर करून, भारतीय मुलं, कुटुंब आणि समाजाची चित्र असलेल्या पुस्तकांमध्ये बोली भाषेतले शब्दही वापरत आहेत.


मला वाटलेली, इंग्रजीमधून वाचलेली, प्रत्येक भावना बंगाली साहित्यातून लिहिली गेली आहे ह्याचा शोध मला किशोरावस्था पार केल्यावर, बऱ्याच काळानंतर लागला. पी. जी वुडहाऊससाठी शिबराम चक्रबोर्ती होते, रसकिन बॉन्डसाठी बुद्धदेब गुहा होते, साकी आणि ओ. हेनरीसाठी बोनोफूल आणि परशुराम होते, एनिड ब्ल्याटनसाठी लीला मुजुमदार, आशापूर्णा देवी आणि महाश्वेता देवी होत्या, हार्डी बॉइजसाठी सत्यजित रेंचा फेलुदा होता. अॅलिसन वॉलरचं मत आहे की आपण लहानपणी वाचलेल्या पुस्तकांचा परिणाम आपल्यावर आयुष्यभर राहतो. अशा वाचनाचा परिणाम दोन पद्धतींनी होतो, एक म्हणजे काळाच्या संदर्भात (जेव्हा वाचन केलं जातं, लक्षात ठेवलं जातं आणि पुन्हा पुन्हा वाचलं जातं) आणि दुसरं म्हणजे जागेच्या संदर्भात (वाचलेल्या गोष्टींमधल्या जागा आणि जिथे वाचन घडतं ती खरी जागा). मी लहान असताना जी पुस्तकं वाचली ती जर वाचली नसती तर माझी कल्पनाशक्ती (आणि इंग्रजी शब्दसंग्रहही) फारच थोटके राहले असते असा माझा अंदाज आहे.


सुमना रॉय लिहितात, “युरोप आणि अमेरिकेच्या नायकांची भाषा बोलता बोलता, ते स्वत:ची भाषा विसरले. आणि असंच, हळूहळू एक विचारधारा आणि अनुभव लोप पावले. सालस व्यक्तींची नियती हीच असते – त्यांच्या निर्मितीच्या इतिहासाची नोंद पुसून टाकणे आणि मग त्याचे दु:ख करणे, एक असे उपरोधक चक्र ज्याचे लेखक ते असतात आणि बळीही तेच असतात.” अगदी खरं वाक्य आहे हे, पण सगळं इथेच संपत नाही. स्वत:ला पुन्हा एकदा शोधण्याची प्रक्रिया आहे ही असं मला वाटतं. आज मला बंगाली साहित्य शोधून वाचता येतं ह्याचं समाधान आहे आणि मी बंगाली लिपीतली जुक्ताखोर (जोडाक्षर) हळूहळू सर करते आहे. थोड्या दिवसांपूर्वीच मी धुळीनी माखलेल्या बीभूतीभूषणच्या प्रती बाहेर काढल्या आणि आम ऑंटिर भेपू सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचून काढलं, नाही का?


उद्धृत लेखन

  • केसी एडवर्ड एस. (2018). फोरवर्ड. जेफ मालपास. प्लेस अँड एक्सपिरीयन्स: अ फिलॉसॉफिकल टोपोग्राफी (द्वितीय आवृत्ती, पान viii-xiv). लंडन: रटलज.

  • फाडीमन, अॅनी. (1998). एक्स लिबरीस: कंफेशन्स ऑफ अ कॉमन रीडर. पेंगविन युके.

  • गांधी, लीला. (1998). पोस्टकलोनीयल थियरी: अ क्रिटीकल इंट्रोडक्शन. रटलज.

  • हॉल, एस. (एडिटेड). (1997). कल्चर, मीडिया अँड आयडेंटिटीस् रिप्रेसेन्टेशन्स: कल्चरल रिप्रेसेन्टेशन्स अँड सिगनिफायींग प्रॅक्टिसेस. सेज प्रकाशन; ओपन यूनिवर्सिटी प्रेस

  • मेनेल, स्टीफन. (1994) ‘द फॉर्मेशन ऑफ वी-इमेजेस: अ प्रोसेस थियरी’, इन सी. कॅलहून (एडिटेड) सोशल थियरी अँड द पॉलिटिक्स ऑफ आयडेंटिटी, लंडन: ब्लॅकवेल

  • रॉय, सुमना. (एप्रिल, 2020). ‘द प्रोव्हीनशियल रीडर’ लॉस एंजिलिस रिव्यू ऑफ बूक्स. वापर 15 मे, 2021. https://lareviewofbooks.org/article/the-provincial-reader/

  • सरकार, सूचित्रा. (2014) ‘री-डिस्कवरी ऑफ इंडियास्: कॉनटेंपररी रायटींग फॉर चिल्ड्रन’. डी-टेरीटोरियलायझिंग डायव्हरसिटीस्: लिटरेचरस् ऑफ द इनडीजीनस अँड द मारजिनलाईज्ड. नवी दिल्ली: ऑथरस्प्रेस. पान 170-186. वापर 16 मे, 2021.




शब्दसंग्रह

भक्त – संस्कृत ‘भक्ति’ पासून आलेला शब्द. ‘भक्ति’ चा अर्थ प्रामुख्याने हिंदू दैवतांसाठी वाटणारी ओढ, आदरांजली, विश्वास, प्रेम, पूजा, आदर, ई. ची भावना. भारतीय राजकीय संदर्भात, ‘भक्त’ ही संज्ञा भारतीय जनता पार्टीच्या अश्या अनुयायांसाठी वापरली जाते जे हिंदुत्वाच्या श्रेष्ठत्ववार आंधळा विश्वास ठेवतात.

छोटोदेर पंचतंत्र – लहान मुलांसाठीचे पंचतंत्र

ठाकुमार झूली – ‘आजीची गोष्टींची पोटली’, 1907 मध्ये प्रकाशित, दक्षिणरंजन मित्र मुजुमदार ह्यांनी एकत्र केलेल्या बंगाली लोककथा आणि परीकथांचा संग्रह.

खिरेर पुतुल – ‘खिरीची बाहुली’, 1896 मध्ये अबनिंद्रनाथ टागोरांनी लिहिलेली लहान मुलांसाठीची कल्पनात्मक कादंबरी

रथ मेला – ओडिशा इथे होणाऱ्या श्री जगन्नाथासाठीच्या ‘रथयात्रा’ ह्या हिंदू सणानिमित्त आयोजित केलेली जत्रा.

आयंतिका नाथ सध्या जादवपूर विद्यापीठातून इंग्रजीचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. स्त्रीवादी इतिहास, सांस्कृतिक अभ्यास आणि लहान मुलांचे साहित्य ह्या विषयांवर अभ्यास करण्याचा तिचा हेतु आहे. विविध कलाकृती तयार करणे आणि गोष्टी सांगणे ह्या तिच्या आवडींशी ह्या विषयांचा मेळ घालण्याची तिची इच्छा आहे.

bottom of page