top of page
  • bilorijournal

ट्रान्सजेंडर देहाची रेखाटणी: जॉर्डी रोसेनबर्ग ह्यांच्या कन्फेशन्स ऑफ द फॉक्स ची चर्चा

मूळ लेखिका – एफ्तिहिया सॅक्सोनी

मराठी अनुवाद – आर्यायशोदा कुलकर्णी


जॉर्डी रोसेनबर्ग ह्यांनी लिहिलेल्या कन्फेशन्स ऑफ द फॉक्स (2018) ह्या कादंबरीमधले पारलिंगी (ट्रान्सजेंडर) देहाचे त्यांनी केलेले वर्णन आणि मांडणी ह्या दोन्हीबद्दल, मी ह्या निबंधात चर्चा करणार आहे. कामना, भाषा आणि ऐतिहासिकता ह्या तीन संकल्पनांचे कथेतील मार्गक्रमण वापरून त्यांचा आणि कथेतील पात्रांच्या लिंगाबदलाच्या प्रवासाच्या भावनिक अनुभवाशी असलेला संबंध मी अधोरेखित करू इच्छिते.


कन्फेशन्स ऑफ द फॉक्स ही, १८व्या शतकात इंग्लंडमध्ये राहणार्‍या जॅक शेपर्ड ह्या चोराची पुन:कल्पित कथा आहे. जॅक शेपर्ड हा एक ट्रान्सजेंडर पुरुष होता असा उलगडा करणारे एक काल्पनिक हस्तलिखित सापडल्यावर त्याचे प्रतीत रूपांतर आणि समालोचन करणाऱ्या, स्वत: ट्रान्सजेंडर असलेल्या, डॉ. आर. वॉथ नावाच्या अभ्यासकाचे भाष्य आणि टिप्पणी असे ह्या कादंबरीचे स्वरूप आहे. डॉ. आर. वॉथलाच हे हस्तलिखित सापडलेले असल्यामुळे त्याचे प्रतीत रूपांतर करण्याची आणि जॅक शेपर्डची गोष्ट पुढे आणण्याची जबाबदारी ते उचलतात. हे रूपांतरण करत असताना वॉथने केलेली टिप्पणीही कादंबरीत समाविष्ट केलेली आहे. ह्या टिप्पणीतून १८व्या शतकातल्या इंग्लंडमधले सामाजिक-राजकीय संदर्भ, मूळ हस्तलिखितावरची निरीक्षणं आणि वॉथ ह्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती मिळते. एकाच कादंबरीत लेखकाने कथानकाच्या तीन वेगळ्या पातळ्या तयार केल्या आहेत. त्या म्हणजे:

  1. सगळ्यात बाह्य पातळी - काल्पनिक - अग्रलेखानंतर सुरू होणार्‍या कथेसाठीचा संदर्भ म्हणून काम करणारी. वाचकांच्या हातात असलेल्या ‘कन्फेशन्स ऑफ द फॉक्स’ ह्या पुस्तकाचे काल्पनिक संपादक डॉ. आर वॉथ इथे निवेदकाची भूमिका पार पाडतात.

  2. पहिली पातळी - मुख्य कथानक - १८व्या शतकात घडणारी जॅक शेपर्डची गोष्ट. ह्या पातळीचा निवेदक अनामिक आहे.

  3. दुसरी पातळी - तळटि‍पांच्या स्वरुपात समोर येणारी - मूळ हस्तलिखित वाचून, समजून आणि प्रतीत रूपांतरण करून झाल्यावर संपादकाच्या भूमिकेतून परत एकदा वाचताना केलेल्या टिपांमुळे इथे डॉ. आर वॉथ निवेदक म्हणून पुन्हा एकदा आहे. ह्या तळटि‍पांमुळे ही कथा खऱ्या अर्थाने ‘कन्फेशन्स’ अर्थात कबुलीजबाबासारखी बनते.

‘शरीरा’च्या प्रचलित किंवा मानक संकल्पनेपेक्षा भिन्न असलेल्या व्याख्येचे प्रतिनिधित्व ही कथा करते. हे प्रतिनिधित्व गोष्टीच्या तिन्ही पातळ्यांवर दिसते, कारण ‘शरीरा’चा संदर्भ प्रेम किंवा कामनेशी जोडलेला आहे. “प्रेमाचे रहस्य मनातून उलगडत असले, तरी त्याचे खरे स्वरूप मात्र ‘तन’ हेच” असा हस्तलिखिताचा मुद्रालेख आहे, आणि संपादक पुन्हापुन्हा याच मुद्दयाशी परत येतो. कादंबरीच्या विश्वात येणारा प्रेमाचा अनुभव हा लिंगाच्या संकल्पनेच्या पलीकडचा आहे. कारण, हा अनुभव ऐतिहासिक आणि वैयक्तिक आघाताला सामोरे जात प्रत्येक पात्राच्या ‘लिंगा’च्या वैयक्तिक व्याख्येत एक परिपूर्णता असल्याची भावना निर्माण करतो.


हस्तलिखितात केलेल्या जॅकच्या लहानपणाच्या वर्णनातून असे लक्षात येते, की जॅकला जन्मत: मुलगी मानले गेले होते. “शहाण्या मुलीसारखी वाग.* सांगितलयं तसं कर. नीट वाग. [...] आणि बाईसारखी चाल! म्हशीसारखी धाड धाड नको” (रोसेनबर्ग 12). तारांकित शब्द वाचकाला डॉ. वॉथ ह्यांनी लिहिलेल्या तळटि‍पांकडे नेतो आणि तिथे कथानकाच्या सगळ्या पातळ्या जोडल्या जातात. डॉ. वॉथ तळटि‍पेत म्हणतात, “जॅकला जन्मत: मुलगी मानले गेले होते? शेपर्डबद्दलच्या तज्ञांच्या समजांपेक्षा हे फारच वेगळं आहे. शेपर्डबद्दलच्या जवळ जवळ सगळ्या लिखाणात तो ‘नाजूक’ किंवा बायकी होता – आणि त्याच्या ह्याच वैशिष्ट्यांच्या जोरावर तो आडगळ जागांमधून वाट काढत पळून जाऊ शकत असे- असं नोंदवलेलं असलं तरी ही नोंद मी पहिल्यांदाच पाहतो आहे” (रोसेनबर्ग 12).


श्रीहट्टा इथून आलेल्या बेस खान ह्या ‘लस्कर’ कुळातल्या बाईला भेटल्यानंतरच जॅक, त्याच्या लहानपणी अनुभवलेली आपल्या लिंगओळखीविषयीची अस्वस्थतेची भावना (जेंडर डिसफोरिया) आणि त्याचे मृत नाव (डेड नेम) झटकतो आणि स्वत:ची खरी लैंगिक ओळख हक्काने परत मिळवतो. सर्वेक्षकांनी त्यांच्यावर केलेल्या अत्याचाराला उत्तर देणार्‍या फेन-टायगरस् ह्या ‘स्वातंत्र्य सैनिकांच्या घटत्या चमू’ मधल्या शेवटच्या लोकांपैकी एक असलेली बेस आणि तिची दु:खद परिस्थिती, जॅकच्या कथेशी साधर्म्य असलेली आहे कारण ही दोन्ही पात्र ऐतिहासिकदृष्ट्या दडपल्या गेलेल्या पण विविधांगी असणार्‍या अस्तित्वाचा अनुभव जगतात (रोसेनबर्ग 183). शेपर्डच्या पारलिंगी/‘नॉन-सिस’ लैंगिक ओळखीचा आणि बेसच्या गैर श्वेतवर्णीयतेचा जॉर्डी रोसेनबर्ग ह्यांनी केलेला उल्लेख इथे खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन अर्थ किंवा द्वयार्थी असणार्‍या ओळखीचे संरक्षण होते. बहुत करून ‘सिस’ (Cis) आणि श्वेतवर्णीय असणार्‍या ऐतिहासिक कथानकांमधून असे द्वयार्थी अस्तित्व प्रामुख्याने वगळले गेले असल्यामुळे ह्या कथानकाचे महत्व अधोरेखित करणे गरजेचे आहे. ओळख/अभिमुखता आणि कामना ह्यांच्या एकमेकांशी असलेल्या नात्याचा वापर करून लेखकाने आपल्याला ज्ञात असलेल्या इतिहासात असणार्‍या दृश्यमानतेबद्दल मूलभूत प्रश्न प्रस्तुत केले आहेत: इतिहासाच्या मार्गक्रमणात कोणाचे आवाज पुसून टाकले जातात? कुठल्या पद्धतीच्या 'शरीरांना' प्रामुख्य दिलं जातं? कोणाला गप्प बसवलं जातं? जॅक आणि बेसच्या प्रेम कथेमधून, एका अर्थाने, तो दडपलेला देह अत्याचारी सत्य आणि प्रबळ कथानकांच्या ताब्यातून मुक्त केला गेलेला आहे.


जॅकच्या स्वत:च्या ट्रान्झिशनच्या भावनिक अनुभवाबद्दल बोलायचं झालं, तर तो स्वत:ला पुरुष मानतो आणि इतरांनी त्याला पुरुष मानण्याचा त्याला अभिमानही वाटतो पण त्याच्या ह्या लिंग ओळखीला तो “दैत्य” किंवा “वस्तू” (Something) असे संबोधतो आणि त्यामुळे त्याचं, एखाद्याचं स्वत:च्या देहाशी असणारं नातं निर्माण होणं जवळ जवळ अशक्य होतं (रोसेनबर्ग 33)2. त्याच्या पारलिंगी असण्याला परिपूर्णता तेव्हाच येते जेव्हा बेससाठी असणार्‍या त्याच्या प्रेमाला मूर्त स्वरूप हवं असतं, तिच्या उपस्थितित, “ती आजूबाजूला असताना एक शरीर असण्याची” ओढ त्याला लागते तेव्हा (रोसेनबर्ग)3. एखाद्याच्या लैंगिक अभिव्यक्तीत आणि भावनिक आकर्षणात असणार्‍या नात्याला हाताळताना जॉर्डी रोसेनबर्ग ना निष्काळजीपणा दर्शवतात ना त्यापैकी एकाचा दुसर्‍यावर प्रभाव पडतो असं गृहीत धरतात. खरंतर कामना एखाद्या “देहावर आपला छाप सोडून जाते” तेव्हा एक ओळख नेमून देत नाही तर समाजाने ठरवून दिलेल्या मानकांमधून त्या देहाला मुक्ती प्रदान करते (रोसेनबर्ग xii). एखाद्याच्या इतिहासातली दरी पार करणारा पूल बनून एकसंधपणाची जाणीव निर्माण करते आणि सरते शेवटी, सामाजिक-राजकीय एकतेतून आलेल्या सदस्यत्वाची भावना निर्माण करते (रोसेनबर्ग 111, 114)4.


“दैत्य, स्फिनक्स, हायब्रिड, स्कीथा, मॅन-हॉर्स, समुद्री क्रॅकन, मॉनस्टर-फ्लॉवर” (रोसेनबर्ग 109) असे अनैसर्गिकतेचे वर्णन करण्यासाठी वाईट अर्थाने वापरले जाणारे शब्द वापरून, बेस जॅकच्या शरीराचे वर्णन करते आणि त्यातून ह्या शब्दांना नवा संदर्भ देते. लेखकाने अशा अपायकारक आणि स्तोम माजवण्याच्या अर्थाने वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा वापर प्रणयकारक आणि कामुक अर्थाने वापरण्याचा निर्णय घेऊन, ऐतिहासिकदृष्ट्या चालत आलेल्या भाषेच्या वापराला एक प्रकारचा प्रतिकार केला आहे. जॅकची लिंगबदलाची छातीची शस्त्रक्रिया (टॉप सर्जरी) हा कादंबरीतला एक महत्त्वाचा प्रसंग आहे. ही सर्जरी बेसच्या हातून घडते आणि एखाद्याच्या प्रियकर/प्रेयसीच्या हातून त्या व्यक्तीच्या लैंगिक अभिव्यक्तीची पुष्टि होण्यात जी ताकद आहे त्याचे महत्व ह्या प्रसंगातून प्रकट होते. एखाद्या व्यक्तीच्या वैद्यकीय ट्रान्झिशन/लिंगाबादलाच्या प्रक्रियेदरम्यान त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तीने, आतून आणि बाहेरून दोन्ही, खरोखर पाहण्यातून मिळणारा विलक्षण मोकळेपणा इथे दाखवला गेला आहे. “कारण बेसने त्याच्या छातीवर असलेलं एक असं ओझं काढून टाकलं होतं, ज्याचं खरं वजन ते गळून पडेपर्यंत त्याला कळलंच नव्हतं. [...] बेसने त्याची छाती शिवता शिवता ती दरीही शिवून टाकली होती” (रोसेनबर्ग 151).


जॅकला बेसबद्दल वाटणारी ‘एकसंध’पणाची भावना आणि सर्जरी नंतर निघून गेलेली स्वत:च्या शरीराबद्दल वाटणारी अस्वस्थता, ह्या दोन्ही गोष्टींची तुलना निवेदक बऱ्याच काळानंतर घरी परतल्याच्या भावनेशी करतो. स्ट्रेंज एनकाऊंटर्स: एमबॉडीड अदर्स इन पोस्ट कोलोनियालिटी (2000) ह्या पुस्तकाच्या लेखिका सारा अहमद ह्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, “घरी असल्याची भावना ही एक असा अनुभव असते ज्यात त्या व्यक्तिच्या आजूबाजूची जागा त्या व्यक्तिपेक्षा वेगळी नसते, त्या दोन्ही एकमेकांमध्ये मिसळतात, एकमेकांचा भाग बनून जातात. जणू दुसरं कातडं अंगावर चढवण्यासारखा हा अनुभव, त्या व्यक्तीला व्यापून टाकतो आणि आजूबाजूच्या जगाशी त्याला आणि त्या, अनोळखी तरीही ओळखीच्या अशा जागेला, त्याच्याशी संपर्क साधायची संधी देतो” (अहमद 89). एकमेकांना स्पर्श करणे आणि एकमेकांच्या उपस्थितित व्यास करण्याचा, ‘घरी असण्याचा’, अहमद ह्यांनी दिलेला संदर्भ कादंबरीतल्या ‘कामनेने देहावर छाप सोडून जाणे’ आणि ‘प्रिय व्यक्तीच्या उपस्थितित एक देह असण्याची ओढ लागणे’ ह्या दोन्ही संकल्पनांना चपखलपणे लावता येतो. म्हणून, जॅकच्या दृष्टीने ‘घर’ ह्या संकल्पनेला दोन अर्थ मिळतात: बेस बरोबर असणे आणि स्वत:च्या पुष्टि मिळवलेल्या शरीरात वास करणे.


पारलिंगी शरीराची मांडणी करताना लेखकाने वापरलेल्या भाषेने ह्या कादंबरीत महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. काही ठिकाणी शब्द अपुरे पडतात, कारण काही अनुभव हे शब्दांपालिकडचे असतात. ज्या ठिकाणी भाषा अपुरी पडते तिथे मादक, शारीरिक संभाषण पुरेसे ठरते. “शब्दांच्या पलीकडच्या असणार्‍या गोष्टींना मी बोलून दाखवत नाही”, (रोसेनबर्ग 93) असं बेस जॅकला शारीरिक सुखाच्या प्रसंगानंतर म्हणते. शरीर सुखाच्या प्रसंगाचे वर्णन करताना लेखकाने वापरलेली भाषा अतिशय खरी, उदार आणि भावपूर्ण आहे:

“त्याने तिच्या स्तनांचं – ओठांचं - मानेचं चुंबन घेतलं. त्याच्या बोटांना जाणवणाऱ्या तिच्या पायांमधल्या जागेतल्या स्पंदनांना प्रोत्साहन दिलं. [...] पण त्याला तो वास आवडायचा, ती चव सगळ्यात जास्त. गोड मार्शमॅलो आणि उबदार श्वास; खाऱ्यापाण्यात माळलेली जांभळी फूलं. असे सगळे पुष्पगुछ - आणि अजून -अजून बरंच काही. त्याच्या कवेतलं तीचं शरीर थरारून उठेपर्यंत तो तिच्या मांड्यांमध्ये खेळ करत राहिला.” (रोसेनबर्ग 92-93)


ह्या कादंबरीचे कथानक कामना आणि वासनेच्या समृद्ध वर्णनांनी संपन्न असले तरी त्यातून कुठेही स्त्री अथवा पारलिंगी शरीराबद्दल वाईट नजरेतून बघणारे किंवा प्रतिमात्मक दर्शन घडत नाही. तिथे वापरलेली मादक भाषा जितकी कायमस्वरूपी उदार आहे तितकीच ती गूढही आहे. अशी उदार तरीही गूढ असणारी, रुपकांनी भरलेली आणि अलंकारिक भाषा शेवटी खाजगी आणि भावनिक बनते:

“त्या दोघांच्या मधल्या जागेत तिने तिचा हात नेला आणि त्याच्यावरनं बोट फिरवलं. जॅकच्या पायांमध्ये असलेलं ते भरून वाढलं. “सिनामोली.” बेसने ते तिच्या मुठीत घेत त्याला तिच्या अजून जवळ ओढलं, त्याच्या टोकानी स्वत:ला स्पर्श करून घेतला. “पुरुष आणि कुत्रं, कुत्रं आणि-“ बेस चटकन फिरली आणि त्याच्या मांड्यांवर चढली. भरून वाढलेला तो तिच्या उष्णतेने घेरला गेला.” (रोसेनबर्ग 109-110)


ह्या कादंबरीत ट्रान्सजेंडर देह ना “वेगळा” समजला गेला आहे ना त्याला वैद्यकीय संदर्भ दिले गेले आहेत. किंबहुना, नियमबाह्य आणि मुक्त करणाऱ्या भाषेतून, अभिव्यक्तीचे फक्त दोनच प्रकारांमध्ये वर्गीकरण करणाऱ्या पद्धतीला प्रतिकार केला गेला आहे.

कथानकाच्या दुसर्‍या पातळीवर, डॉ. वॉथ त्यांच्या तळटि‍पांच्या आधारे मूळ हस्तलिखिताचा प्रवास मांडतात. ते शिकवत असलेल्या विद्यापीठाच्या डीन ऑफ सरव्हेलन्सने हे हस्तलिखित विकून पैसे मिळवण्याच्या हेतूने स्वत:कडे ठेवलेले असते आणि नंतर ते वॉथने त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून पळवलेले असते. ते हस्तलिखित एका महत्त्वपूर्ण, ऐतिहासिक घटनेचा भाग कसे असते हेही कादंबरीच्या अगदी शेवटी आपल्याला समजते. सरतेशेवटी, डॉ. वॉथ, संपादक, त्यांचे निष्कर्ष वाचकांसमोर मांडतात: जॅक शेपर्डची “कन्फेशन्स” ही एका व्यक्तीची नसून, “एक सामूहिक नोंद-वही”, “एका रेखाटणीची नोंद” (आहे) (रोसेनबर्ग 259-260). संपादकाच्या लक्षात येतं, की ते हस्तलिखित अनेक वर्षांच्या कालावधीत केलेल्या नोंदी आणि लेखांना एकत्र जमवून तयार केलेलं आहे आणि त्याचा मुख्य हेतु संग्रहित इतिहासाला निर्वसाहित/डीकॉलॉनाईझ करणे हा आहे आणि समाजाच्या एका समूहाने स्वत:च्या अस्तित्वाचे जतन करण्याची ताकद त्या हस्तलिखितातून टिकवून ठेवली आहे. ते हस्तलिखित, खरंतर, ट्रान्सजेंडर जॅक शेपर्डचे जीवनचरित्र नसून, कित्येक अनामिक व्यक्तींच्या समूहांनी तयार केलेले आणि काळजीपूर्वक संपादन केलेले एक छद्म-जीवनचरित्र आहे. प्रामुख्याने समोर येणार्‍या इतिहासाच्या रुपाला आणि वापरलेल्या भाषेला आशा पद्धतीने केलेल्या संपादनातून प्रतिकार केला गेला आहे:

“(इथे) पारलिंगी देह नाहीये, देहच नाहीये- ना कुठल्या आठवणी, ना कुठली कबुली, “तुझी” किंवा अजून दुसर्‍या कोणाचीही गोष्ट नाहीये- ह्या व्यापक आणि घाणेरड्या वारश्याव्यतिरिक्त. म्हणूनच, जेव्हा ते आपली गोष्ट मागतील -जेव्हा त्यांना ती विकायची असेल- तेव्हा आपण त्यांना विसर् पडू द्यायचा नाही.” (रोसेनबर्ग 315)


ऐतिहासिकदृष्ट्या ज्या ज्या लोकांना दडपले गेले आहे अशा सगळ्या लोकांनी, त्या लोकांसाठी हे हस्तलिखित लिहिलेले, संपादन केलेले आहे आणि त्यांच्या कथानकाला नवीन संदर्भ दिलेला आहे, “जे आपल्या आधी येऊन गेले, जे पोलीसांच्या विरुद्ध लढले; ज्यांची नावं आपल्याला ज्ञात आहेत आणि असे ज्यांची नावं कधीच माहिती होणार नाहीत (त्यांच्यासाठी). आपल्या नंतर येणार्‍यांसाठी, ज्यांना आपली नावं कधीच माहिती होणार नाहीत अशांसाठी” (रोसेनबर्ग 316). आणि अशाप्रकारे, स्वत: पारलिंगी असलेल्या, जॉर्डी रोसेनबर्ग ह्यांनी ज्ञात आणि लिखित इतिहासाला क्वीयर बाजू देऊन पारलिंगी शरिराला सामाजिक-राजकीय नियमबाह्यतेचे प्रतीक बनवले आहे. तसं करताना त्यांनी लिंगबदलाच्या भावनिक अनुभवाचा हिस्सा असलेल्या एका व्यापक समूहाला सामाजिक स्थानही प्रदान केले आहे.


“प्रेमामुळे देहाचे रूपांतर होते,” (रोसेनबर्ग xii) असं डॉ. वॉथ त्यांच्या संपादकीयाच्या सुरुवातीला लिहितात, आणि कादंबरीच्या शेवटाला त्याच मुद्द्यावर फिरून परत येतात. एका तळटि‍पेत ते म्हणतात की प्रेम लाभणे म्हणजे एखाद्याच्या “देहाला नव्याने घडवून” स्वत:च्या इतिहासात कोरण्यासारखे आहे (रोसेनबर्ग 169). हा नव्याने घडवलेला इतिहास वैयक्तिक आणि सामूहिक दोन्ही असतो, कारण तो त्या व्यक्तीचाही असतो आणि ती व्यक्ति ज्या ऐतिहासिकदृष्ट्या दडपलेल्या, त्या अत्याचाराविरूद्ध लढलेल्या आणि वर आलेल्या सामाजिक समूहाचा भाग आहे, त्या समूहाचाही असतो. हस्तलिखितातल्या पात्रांच्या गोष्टींना लक्षात ठेवून, वॉथ म्हणतात की प्रेमाने देहावर सोडलेला छाप हा त्या देहाचा दुसरा इतिहास असतो. श्वेतवर्णीयांचे आधिपत्य आणि त्यांनी केलेल्या अत्याचाराला सामोरे जाण्यासाठी तयार झालेल्या वेगवेगळ्या लोकांच्या एकजिनसीपणाला त्या देहाचा पहिला इतिहास मानलेलं आहे आणि त्यातून आलेल्या अपेक्षा आणि गृहितकांमधून मुक्त होऊन; “अवांछित” होण्याच्या भावनिक अनुभवातून तो दुसरा इतिहास निर्माण होतो (रोसेनबर्ग 315).


मुक्त होण्याच्या संकल्पनेला अजून पुढे नेण्यात कन्फेशन्स ऑफ द फॉक्सला दिलेले मेटाफिक्शन/ काल्पनिक साहित्याचे स्वरूप अतिशय महत्त्वाचे आहे. “मेटा” (“नंतर/पलीकडचे”), “पार करणे” अशा हिशोबाने मांडलेले कथानक असल्यामुळे, त्यातून एखादी गोष्ट सोडून त्या पलीकडे जाण्याच्या; हस्तलिखिताचा एकच लेखक आहे ह्या कल्पनेच्या पलीकडे जाण्याच्या, शरीर ह्या संकल्पनेला एकच व्याख्या आहे ह्या कल्पनेच्या पलीकडे जाण्याच्या भावनिक अनुभवाला मूर्त स्वरूप मिळते. मेटाफिक्शनमध्ये आत्मभान आणि त्यातून आलेला संदर्भ गृहीत धरलेला असतो. ह्या दोन गोष्टींमुळे, लेखकाला कथेकडे लांबून बघणारा, तिऱ्हाईताचा एक दृष्टिकोन तयार करता येतो. ह्या वेगळ्या दृष्टिकोनाचा वापर करून लेखक पुढे जाऊन कथेला वेगळे वळण देतो. सुरुवातीला, कादंबरीचा मुख्य हेतु हा पारलिंगी शरीर आणि लिंगबदल/ट्रान्झिशनच्या भावनिक अनुभवावर लक्ष केंद्रित करणे असतो पण हळू हळू तो रूंदावत जातो आणि पारलिंगी शरीराला तशा अनेक अभिव्यक्ती असलेल्या व्यापक समाजाचा एक भाग म्हणून ओळखायला लागतो. हा व्यापक, लांब वरून बघणार दृष्टिकोन, पारलिंगी ओळख असलेल्या समाजाला त्याच्यासारख्याच दडपलेल्या अनेक समाज घटकांचे प्रतीक म्हणून समोर आणतो.


सरतेशेवटी, मेटाफिक्शनच्या माध्यमातून कन्फेशन्स ऑफ द फॉक्स (2018) ही कादंबरी (पार) लैंगिक अभिव्यक्ति, क्वीअरपणा आणि निरवसहतवाद ह्या विषयांवर घडणार्‍या चर्चेत महत्त्वाचा सहभाग घेते. जॉर्डी रोसेनबर्ग त्यांच्या कादंबरीतून इतिहासातून खोडून टाकलेल्या अनेकांगी व्यक्तींच्या अनुभवांबद्दलचे महत्त्वाचे प्रश्न प्रस्तुत करतात. मात्र तसं करताना ते वायफळपणे त्या प्रश्नांना उत्तरं देण्याच्या नादात अडकत नाहीत. नियमबाह्य असलेल्या, समाजमान्य नसलेल्या देहांबद्दल बोलताना ते आदर आणि जाणीव असलेली, ताकद देणारी भाषा वापरतात. जिथे वैषयिकता आणि प्रतिकार एकमेकांसमोर येतील तिथे कन्फेशन्स ऑफ द फॉक्स मधली पात्र कायमच आपल्यासाठी सरस आणि जास्त न्याय्य ठिकाणी जाण्याचा मार्ग “नकाशाच्शिवाय” (रोसेनबर्ग 316) शोधात राहतील.


उद्धृत लेखन

अहमद, सारा. स्ट्रेंज एनकाऊंटर्स: एमबॉडीड अदर्स इन पोस्ट कोलोनियालिटी. रटलज, 2000.

रोसेनबर्ग, जॉर्डी. कन्फेशन्स ऑफ द फॉक्स. अॅटलांटिक बुक्स, 2018.


 

एफ्तिहिया सॅक्सोनीही एडिनबर्ग विद्यापीठातील इंग्रजी साहित्याची पीएचडीची विद्यार्थिनी आहे आणि तिची प्राथमिक संशोधनाची आवड कथनशास्त्र आणि लिंग अभ्यासात आहे. तिने अथेन्सच्या नॅशनल कपोडिस्ट्रियन युनिव्हर्सिटीमध्ये पदवीपूर्व विद्यार्थी म्हणून ग्रीक भाषाशास्त्राचा अभ्यास केला. तिने एडिनबर्ग विद्यापीठात तुलनात्मक साहित्य पदव्युत्तर पदवी घेतली, जिथे ती तिच्या डॉक्टरेट अभ्यासासाठी राहिली.

bottom of page