top of page
  • bilorijournal

नॉर्थहॅटम्प्टनमध्ये दुर ए अझीझ आमना यांची ‘अमेरिकन फीवर’ कादंबरी वाचताना

मूळ लेखिका - विका मुजुमदार

मराठी अनुवाद - आर्यायशोदा कुलकर्णी


दुर ए अझीझ आमना यांच्या ‘अमेरिकन फिव्हर’ या पहिल्या कादंबरीतल्या सुरुवातीच्या प्रकरणाच्या शेवटी (जिथे हिरा पाकिस्तान सोडत असते) आमना लिहितात : “उद्याचं काय? कदाचित एखाद्या क्षणाची आपण पुरेशी कल्पना केली, तर तो क्षण काळाबाहेर अस्तित्वात येऊ लागतो. कुठेतरी अंतहीन धारेतून चहा ओतला जात आहे. तिथल्या झाडाला कायम नवी पालवी फुटलेली असते. पाऊस रोज झिरपत आहे” (आमना, ४६). आणि कदाचित माझ्या वाचनातला हाच तो क्षण होता, जिथे मी स्वतःला हिरामध्ये पाहू लागले, या कादंबरीत स्वतःची जागा शोधू शकले. या कादंबरीद्वारे मला स्वतःची नव्याने ओळख होण्याचा सर्वात खोल क्षण खूप नंतर येणार होता. पण हा काळाच्या लयीतला बदल, हा अतूटपणाचा एक एकल क्षण, हिराच्या सरळ रेषेत पुढे सरकणार्‍या आयुष्यापासून वेगळी होत जाणारी कादंबरीतली ही काळाची कल्पना, हे सर्व मला अधांतरी असणार्‍या काळाच्या ओघाकडे पाहायला लावत होतं. ज्याने माझ्या स्वत:च्या बालपणाला इतका खोलवर आकार दिला आहे त्या‘अधांतरी काळप्रवाहा’ची कल्पना ही बालसाहित्याचे महत्वाचे साधन आहे. या कल्पनेमुळे मी माझे स्वतःचे घर सोडण्याच्या क्रियेचा अर्थ मला समजाऊन घेता आला. हे पुस्तक वाचताना मला एनीड ब्लायटनच्या लिखाणात दिसणार्‍या उत्तर-वसाहतवादी बालपण आणि लहान मुलींचे विचारविश्व असलेल्या अत्भुत तटस्थ जागेची आठवण आली. हिरा ही एका रहस्यमय नवीन जगात आलेली, तिच्या आजूबाजूला असलेल्या मैत्रिणी, झाहरा आणि राबिया आणि एमी आणि सॅम आणि अ‍ॅलिसिया ज्यांच्यावर ती प्रेम आणि तितक्याच प्रमाणात मस्ती (judge) करते, आणि या नव्या जगाचा अर्थ लावते, ही मुलांच्या रहस्यांचा शोध घेणारी आणि बोर्डिंग-स्कूल कादंबरीत वयात येणारी एक तरुण मुलगी आहे.


अधांतरी काळाचा प्रवाह हा एक सलग वर्तमानकाळ आहे, ज्याला एक अविरतपणा आणि अनंतपणा आहे. या प्रवाहात भूतकाळाची ओढ किंवा त्याबद्दलची तळमळ नाही. बहुदा याच कारणामुळे घराची ओढ आणि तळमळ या गोष्टी माझ्या आयुष्यात आल्यानंतरच मला अधांतरी काळप्रवाहाची आठवण आली. ब्रिटीश बालसाहित्यातील गुप्तचर कादंबर्‍यांचे वैशिष्ट्य असलेला तो मायावी, अशक्य असा मुख्य भाग जिथे रहस्य उलगडते त्या अधांतरी काळप्रवाहात मी मोठी झाले. मी पाच वर्षांची असताना न्यू जर्सीहून पुण्याला आले, त्यानंतर मध्यंतरी थोड्याशा अंतराने, मी माझ्या आजी आजोबांसोबत मुंबईत राहिले (मला विश्वासाने आठवते की आम्ही पाच महिने तिथे राहिलो, पण माझे वडील मला सांगतात की ते फक्त दोन आठवडे होते). माझ्या आठवणीची ती पहिली अविश्वसनीयता - माझा पहिला अधांतरी काळप्रवाह (फ्लोटिंग टाइमलाइन): पाच वर्षांची मालविका नेहमीच मुंबईत असते, नेहमी हरवलेली असते, नेहमी प्रवासात असते.


माझा जन्म न्यू जर्सीमध्ये दक्षिण आशियातील स्थलांतरित कुटुंबात झाला — माझे पालक पुण्यात भेटले, माझे वडील जिथून आहेत आणि माझी आई तिच्या पदवी शिक्षणासाठी जिथे राहायला गेली होती — आणि मग आम्ही माझ्या शाळेसाठी परत पुण्याला गेलो, जिथे मी वसाहतीकरणाची (पोस्ट कॉलोनियलची) आणखी एक आठवण असणाऱ्या ICSE बोर्डाच्या शाळेत गेले. पण या सगळ्याचा मला काही अर्थ लागण्याआधी, डायस्पोरामध्ये असलेली, मातृभूमी नाही तर जन्मभूमी (homeland) गमावलेली मालविका पाच वर्षांची होण्यापूर्वीच, माझ्या पालकांनी मला पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील ‘क्रॉसवर्ड’ नावाच्या पुस्तकांच्या दुकानात नेले. तिथून मी एनिड ब्लायटनची दोन नॉडी पुस्तके निवडली. माझ्या आई-वडिलांनी, माझ्यासाठी ती पुस्तके विकत घेतल्याच्या क्षणी, माझ्या जीवनातील्या साहित्यिक परिदृश्याच्या मार्गाने कायमचा आकार घेतला. पण कदाचित हे मोठ्या प्रमाणात अपरिहार्य होते, मला कधी कधी वाटतं; खासकरून जेव्हा मला माझ्या आजी-आजोबांच्या घरात हार्डी बॉईजच्या कादंबऱ्या सापडल्याचं आठवतं. आणि मग, माझ्या बालपणीच्या वाचनाच्या पार्श्वभूमीचा विचार करताना मला सतावणारा कायमचा प्रश्न: अधांतरी काळप्रवाह/फ्लोटिंग टाइमलाइन कोणाकडे आहे?

*

अमेरिकन फीव्हरचे कथानक असे आहे: हिरा, एक तरुण पाकिस्तानी शाळकरी मुलगी, एका एक्सचेंज प्रोग्राममध्ये ग्रामीण ओरेगॉनला जाण्यासाठी रावळपिंडी सोडते आणि तिथे तिला क्षयरोग होतो. पण अमेरिकन फिव्हर ही कादंबरी हिराच्या बाह्य जीवनामुळे उत्तेजक आणि आकर्षक होत नाही – या कथेला हीराची आंतरिकता सर्वात आकर्षक बनवते. माझ्या वाचनात, अमेरिकन फिव्हर ही मुलीच्या बालपणाची, डायस्पोरा आणि उत्कटतेबद्दलची कादंबरी आहे, त्यापेक्षाही ती एका एक्सचेंज प्रोग्राममधील पाकिस्तानी मुलीच्या स्थलांतरिताबद्दलची कादंबरी आहे.


क्रिएट डेंजरसली: द इमिग्रंट आर्टिस्ट अॅट वर्क या पुस्तकात एडविग डँटिकॅट लिहितात, “स्थलांतर केलेल्या व्यक्ति ज्या कोणत्याही विषयात विद्वत्ता कमवू इच्छितात त्यांनी नेहमी प्रवास आणि हालचालींचा विचार केला पाहिजे, जसा शोकाकरी व्यक्तीला मृत्यूचा अपरिहार्यपणे विचार करावा लागतो” (डँटिकॅट, १६). मार्चमध्ये कोविड महामारीच्या काळात माझे कॉलेज कॅम्पस बंद झाले तेव्हा,तेव्हा मी पहिल्यांदा डँटिकॅट वाचले कारण माझे भारताचे परदेशी नागरिकत्व असल्याने मी माझ्या पालकांकडे घरी परत जाऊ शकले नाही. त्याऐवजी, मी पुढचे सहा महिने मी लहानपणापासून ओळखत असलेल्या कौटुंबिक मित्रांसह, माझ्या पालकांच्या मित्रांसोबत घालवले. आठवी-नववी आणि दहावीच्या उन्हाळ्यात आम्ही जात असलेल्या हिमालयाच्या ट्रेकमध्ये भेटलेल्या एका मुलीशीही मी पुन्हा संपर्क साधला. त्या ट्रेकमध्ये आम्ही दिल्लीला जाणारी ट्रेन पकडायचो, आणि मग डेहराडूनसारख्या हिल-स्टेशन शहराला जाऊन पोचायचो. माझ्या बालपणाला आकार देणार्‍या त्या रस्किन बाँडच्या कादंबर्‍यासारख्या साहित्यात असणारी अशी रसिक अँग्लो-इंडियन हिल स्टेशन्स नेहमी अमूर्त, राष्ट्रापासून विभक्त आणि काळाच्या बाहेरची वाटायची. पुढे आम्ही बस पकडून डोंगरातल्या गावांना जायचो. आयोजक संस्थेने आमची राहण्याची व्यवस्था जिथे केलेली असायची त्या गावी पोचायच्या आधी पूर्ण दिवस चढ चढायचो, डम शराडसारखे खेळ खेळायचो आणि मॅगी खायचो. डॅन्टिकॅट वाचताना, आयुष्यातल्या जागा आणि क्षण कायम मागे सोडून पुढे जाण्याच्या आपल्या जगण्याच्या पद्धतीचे वर्णन पाहून मी चाचपले. आजही मी अशा जगण्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करत आहे, एक अनंत शोधण्याचा प्रयत्न करत आहे ज्यामध्ये फक्त तुकडे नाही तर माझे सर्व स्वत्व असू शकेल.

*


मी माझ्या आयुष्यातील पाच वर्षे न्यू जर्सीमध्ये घालवली आणि त्यानंतर माझ्या आईवडिलांच्या पहिल्या घरी पुण्याला परत आले, जिथे मी माझ्या आयुष्याची पुढची बारा वर्षे घालवली. आणि मग मी कॉलेजच्या तीन वर्षांसाठी पुन्हा मिडवेस्टला गेले. पण लवकरच साथीच्या आजाराने मला पुन्हा एकदा माझ्या आईवडिलांकडे घरी आणले. मी पुन्हा घर सोडले ते २०२१ मध्ये, ग्रॅज्युएट स्कूलसाठी, यावेळी ईशान्येत, जिथे मी मातृत्वावरचा सिद्धांत वाचण्यात आणि डायस्पोरिक साहित्यात लिहिल्या गेलेल्या मातृत्वाच्या संकल्पनेबद्दल लिहिण्यासाठी दोन सत्रे घालवली. या अनुभावातून मी माझ्या आईचे स्वतंत्र स्वत्व आणि तिचे माझ्याशिवायचे आयुष्य स्वीकारायला शिकले. अमेरिकन फीव्हर हे मी त्या सत्रात वाचलेले शेवटचे पुस्तक होते; जे मी उन्हाळ्यात माझ्या आई-वडिलांच्या घरी - आमच्या पहिल्या घरी - माझे स्वत्व जिथे आकाराला आले त्या ठिकाणी जाण्यापूर्वी वाचले.


हिराच्‍या मित्रमैत्रिणींबद्दल आमना लिहिते: "मला तेव्हा माहीत नव्हते, पण मी मागे सोडलेल्या राबिया आणि इतर मुलींसारखे जगात कोणीही भेटणार नव्हते" (१७). वयाच्या पाचव्या वर्षी मी पुण्याला कायमची रहायला गेले. तेव्हापासून मी सलग फार काळ पुण्यातल्या घरापासून कधी दूर राहिले नाही. त्या उन्हाळ्यात, पुण्यापासून आणि घरापासून पहिल्यांदाच इतका जास्त काळ दूर राहून परत आल्यानंतर, मी माझ्या लहानपणीच्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवला. ही मित्रामंडळी मला माझ्या लहानपणात अनेक वर्ष ओळखत होती, माझी माझ्या आईपासून आणि घरापासून स्वतंत्र ओळख निर्माण व्हायच्या आधीच्या काळापासून. त्यांच्या सोबतीत मला एक नवा आनंद, सुख आणि कृतज्ञता अनुभवायला मिळाली, कारण त्यांच्या आठवणीत असलेली मी, त्यांनी समजून घेतलेली माझी ओळख ही माझ्या अमेरिकेच्या भूखंडात विखुरलेल्या इतर मित्रमैत्रिणींपेक्षा खूप वेगळी होती. इथेही, बालपणात अडकलेल्या त्या सर्वसमावेशक मैत्रीमध्ये मला अधांतरी काळप्रवाह दिसला.


मी या उन्हाळ्याचा उल्लेख माझा योगायोगाचा उन्हाळा म्हणून करते. एका दूरच्या मित्राशी माझी जवळीक वाढली, ती मैत्री जी आता माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान मैत्री आहे. स्टारबक्स, वारी बुक कॅफे आणि थर्ड वेव्ह कॉफी मध्ये कॉफी पित, ‘लाँग वे अप’ पाहत आणि त्यावर टीका करणे, नवीन ‘ओबी वान केनोबी’ शो दोघी एकत्र पाहत, आणि मी अनेक वर्षांपासून ओळख असलेल्या मित्रांसोबत वेळ घालवला आणि गोंधळलेले, उत्स्फूर्त भटकंतीचे कार्यक्रम बनवले. आम्ही नेहमी जातो त्याच ठिकाणी पुन्हापुन्हा गेलो, शाळेत एकत्र असलेल्या दोस्तांना भेटलो आणि एकमेकांकडे शाळेबद्दल तक्रारी केल्या. आणि अशाप्रकारे मी माझा उन्हाळा २०१६च्या मालविका ला या जागांमध्ये शोधण्यात घालवला. मी माझ्या २०१६च्या आयुष्याकडून घरी जाताना, नॉर्थहॅम्प्टन सोडण्यापूर्वी अमेरिकन फिव्हर वाचले आणि पुणे सोडून नॉर्थहॅम्प्टनमध्ये परत येताना मी ते पुन्हा वाचले. अमेरिकन फिव्हरने मला माझ्या वयात येण्याच्या पहिल्या अनुभवाला (त्यावेळी मनात असलेल्या स्वतःला बदलण्याच्या इच्छा वगळून) पुन्हा एकदा मनसोक्तपणे जगण्याची संधी दिली.


लहानपणी, दर आठवड्यात माझे आईवडील माझ्या भावाला आणि मला फर्ग्युसन कॉलेज रोडवरील ब्रिटीश लायब्ररीत घेऊन जायचे. तिथे मी रॉल्ड डहलची पुस्तके वाचण्यापासून ते जॅकलिन विल्सनची पुस्तके वाचण्यापर्यंत प्रगती केली. शाळेत दर आठवड्याला मी दुसरा पुस्तक संच वाचायला घेत असे - एकतर ‘सेंट क्लेअर्स’ आणि ‘मॅलरी टॉवर्स’ किंवा एलिनॉर एम. ब्रेंट डायर यांची ‘शॅलेट स्कूल’ मालिका. परंतु त्या पुस्तकांमध्ये कोणताही अधांतरी काळप्रवाह (फ्लोटिंग टाइमलाइन) नसायचा - बालपणातील कादंबर्‍यांमध्ये, मुलांनी मोठे व्हायचे असायचे, त्यांची स्वतःची ओळख बनवायला शिकायचे असायचे. परंतु तरीही, त्यांचे जीवन त्यांच्या बोर्डिंग स्कूलमध्ये देश आणि इतिहासापासून विभक्त/अमूर्त केले जाऊ शकायचे. ही पुस्तके वाचताना बाहेरचे जग एका अर्थी थांबायचे. पण या सगळ्यांआधी, माझ्या साहित्यिक विचारधारेला आकार देणारी अधांतरी कालप्रवाहबद्दल सांगणारी जी पुस्तके होती, ते पहिले मजकूर होते ज्यांनी मला जग कसे वाचायचे हे शिकवले – ह्या पुस्तकांमधली ती मुले रहस्ये सोडवणारी, वेडसर, एकल मनाने त्यांच्या उत्तरांच्या शोधात असायची. फ्लोटिंग टाइमलाइन/अधांतरी काळप्रवाहाने त्या बालपणाच्या साहित्याबद्दल माझ्या समजूतदारपणाला आकार दिला आणि म्हणूनच माझ्या साहित्यिक विचारप्रवाहामध्ये ते दोघे कायमचे जोडलेले आहेत, त्यांना एकमेकांपासून दूर करणे अशक्य आहे.

*

कादंबरीच्या शेवटी, हिरा तिच्या आईबद्दल म्हणते:


“त्या आठवड्याच्या शेवटी, मी रागाने तिच्याकडे पुन्हा एकदा तो विषय काढेन. तेव्हा तिचे डोळे चकाकतील आणि तिचे तोंड जवळजवळ क्रूर होईल - जवळजवळ कारण माझी आई खूप काही आहे परंतु कधीही, कधीही क्रूर नाही - आणि ती विचारेल, "मग तुम्हाला वाटते की फक्त तुम्हीच निघून जाऊ शकता?" आणि मी तिची भूक माझी स्वतःची म्हणून ओळखेन कारण, मला ती अजून कुठून मिळाली असू शकते? आणि मी विचार करेन, अरे देवा, आपण सर्वच निघून जाणारे लोक आहोत. (२४४)


आणि बहुतेक हीच ती ओळ आहे जी मला सर्वात प्रकर्षाने जाणवली, जिथे ह्या साहित्यात मी स्वतःला दिसले, जिथे मला माझा अनुभव सर्वात जास्त समजला गेला असे वाटले. माझ्या आईशी माझे नाते काही गुंतागुंतीचे नाही - आम्ही इतर आई आणि मुलींप्रमाणे भांडतो, पण मी तिच्यावर मनापासून प्रेम करते. पण आता कदाचित, किंवा नक्कीच, पाच वर्षांपूर्वी, मी किशोरवयीन असताना, आई आणि माझ्यामध्ये वाढलेल्या तणावात मी तिच्याकडून या मोठेपणाचा आग्रह धरला नसता. पण तिच्यापासून दूर, डायस्पोरामध्ये, मी तिच्या व्यक्तिमत्त्वासाठी, माझ्या आई म्हणून असलेल्या ओळखीच्या पलीकडे असलेल्या तिच्या स्वत्वासाठी जागा ठेवते, जी मी पुण्यात तिच्यासाठी ठेवत नाही. आणि त्यानंतर, मला पुस्तकाच्या या ओळीत माझी ओळख अधिक स्पष्टपणे दिसून येताना असे वाटते की मी हे कबूल करायला तयार नाही. मी पुणे सोडण्यापूर्वी अनेक वर्षे, पुणे सोडण्याच्या शक्यतेबद्दल उत्सुक होते, ज्या दिवशी मी परत येईन अमेरिकेत त्या दिवसाची वाट पाहत होतो. या वेळी कॉलेजला जाणारी प्रौढ व्यक्ती म्हणून अमेरिकेत जाणार होते, जिथे मी जॅकलीन विल्सनच्या त्या पुस्तकांमध्ये ज्या प्रकारची मैत्री वाचली होती तशी मैत्री शोधणार होते. आणि साथीच्या आजाराने भाग पडून मी स्प्रिंगफील्ड सोडण्यापूर्वी, उच्च शिक्षणासाठी मीपुढे कधी एकदा नवीन ठिकाणी जाईन याची आधीच वाट पाहत होते. आणि मग साथीच्या रोगाने मला घरी परत जाण्यास भाग पाडले, अखेरीस मी भारतात परत आले, जिथे मी आल्याल्याच मला परत जायची इच्छा होती. जेव्हा मी दर चार महिन्यांनी घरी जात असे, तेव्हा मी कधीच घरासाठी आसुसलेले नसायचे, पण आता, जेव्हा मी हिवाळ्याच्या सुट्टीत घरी जात नाही, तेव्हा मला कायम घराची आठवण येत राहते.


अमेरिकन फिव्हरच्या सुरुवातीला, आमना घराबद्दल लिहिते:

“आणि कदाचित हे अनुभव खोटे नसून फक्त वगळलेले आहेत जिथे हे कायमचे घर म्हणजे ते दुसरे ठिकाण असते, जे तुम्हाला निराशेकडे ढकलत, जगाची कृत्ये स्वतःपासून दूर करायला शिकण्यापूर्वी तुम्ही घेतलेल्या प्रियकरासारखे असते. हा स्वप्नांचा एक असा भूप्रदेश आहे, एकमेव ठिकाण आहे जे तुम्हाला खात्री पटवून देईल की त्याचे अपयश, त्याचे दान, त्याचे अतिरेक आणि प्रेमळपणा हे सर्व तुमचेच आहेत. सरतेशेवटी, ते कुठे संपते आणि आपण कुठे सुरू होते?" (५)

या एका ओळीत - जिथे अधांतरी काळप्रवाह/फ्लोटिंग टाइमलाइन आणि एका मुलीचे अनुभव आणि स्थलांतर एकत्र आले आहेत, जिथे माझ्या बालपणीच्या त्या अधांतरी काळप्रवाहाच्या पुस्तकांमध्ये माझे स्वत्व पूर्णपणे पाहण्यापासून मला जे प्रतिबंधित करते ते सारं आहे. आमनाच्या लिखाणात, आई आणि मातृभूमी एकत्र होतात आणि या कादंबरीत हिरासाठी घर हा एक देश नसून एक काळ आणि निसर्गचित्र आहे—तिच्या आठवणीतलं रावळपिंडी, उन्हाळ्यातील सहली, सर्व मातृभूमी आहे, ती ओरेगॉन मध्ये ज्यासाऱ्यापासून लांब आहे त्या सगळ्यापासून ती बनते. मातृभूमी विशिष्ट आहे, राष्ट्र राज्याचा विस्तृत, विशाल भूगोल नाही. आणि ती संकल्पना हिराची आई आणि मातृभूमी यांना एकत्र येण्याची शक्यता निर्माण करते – दोन गोष्टी एक बनवू शकते - डायस्पोरामध्ये वेगळ्या असलेल्या गोष्टी, त्यांच्या उत्कटतेत एकत्र गुंफल्या जातात. हिराची तिच्या घराच्या भूमीची तळमळ कुटुंबापासून वेगळी करणे अशक्य आहे.

*

‘’द इरोटिक वतन अॅज बिलवेड अँड मदर: टु लव, टु प्रोटेक्ट. टु प्रोसेस (प्रियकरसारखे कामुक वतन: प्रेम, रक्षा आणि ताबा) या पुस्तकात अफसानेह नजमाबादी पर्शियन साहित्यात (४४२-४६७) देश आणि आई या संकल्पनांच्या अभिसरणाबद्दल लिहितात. याचा आमना यांच्या कादंबरीच्या संदर्भात विचार न करणे अशक्य आहे. ही गोष्ट आई आणि मातृभूमीपासून दूर स्वतःची ओळख बनवण्याच्या दरम्यान अधांतरी कालप्रवाहकडे परत जाण्याची आहेच - पण मैत्री आणि पहिले प्रेम अनुभवत एका तरुण मुलीच्या वयात येण्याचीही आहे. आणि पहिल्या प्रेमाची कल्पना ही आमनाच्या मातृभूमी आणि निर्वसनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात महत्त्वाची आहे. —हिरा, रावळपिंडीत असताना, घराच्या आठवणीत, एनवाययूमधील अली या कौटुंबिक मित्राशी फेसबुकवर संपर्क साधते. आणि त्यानंतर, फेसबुक मेसेंजरद्वारे प्रेमळ गप्पागोष्टी केल्यानंतर, हिरा हिवाळ्याच्या सुट्टीत न्यूयॉर्क ला जाते तेव्हा तिची मैत्रीण झाहरा आणि तिच्या कुटुंबाला भेटायला म्हणून न्यू जर्सी शहरात जाते आणि शेवटी अलीला भेटते.


आणि हिरा शहर सोडतानाचे वर्णन करताना, आमना लिहिते:

“आम्ही किती वेळ एकमेकांना चिकटून होतो, मी अजूनही सांगू शकत नाही, त्याने त्याचे गुलाबी ओठ मागे घेतल्यावर आम्ही वेगळे झालो, आणि मी भुकेल्या हाताने त्याचे केस मागे केले. त्याने टॅक्सी बोलावली, गाडीचा दरवाजा बंद केला आणि छतावर थापटी मारली. ड्रायव्हरने वेस्ट साइड हायवेवर वेग पकडायला सुरुवात केल्यावर मी सीटमध्ये कोसळले आणि माझे तापलेले कपाळ समोरच्या सीटच्या चामड्याला लावले. मला माहित होते की माझा एक भाग – माझ आकार आणि माझे केस असलेल्या एका व्यक्तीची सावली - कायमची मागे राहिली होती, त्या रेलिंगला टेकून, प्रियकराच्या शहरात. (१७७)

या निबंधाच्या सुरूवातीला असलेल्या आमनाच्या चहाबद्दलच्या ओळीप्रमाणेच, इथेही पुन्हा अधांतरी कालप्रवाहाचे प्रतिध्वनी आहेत, परंतु या वेळी ते देशापासून विभक्त न होऊ शकणार्‍या एका अधांतरी कालप्रवाहामध्ये गुंडाळलेले आहेत. पश्चिम महामार्गाचा तपशील, टॅक्सीचे वर्णन, आणि शेवटी हिरा एक पाहुणी म्हणून या शहरात आहे – हे तिचे घर नाही हे सर्व वाचकाला नेहमी आठवण करून देते की अनंत/अमूर्त काळात जगण्याची आकांक्षा बाळगणारी हिरा, ते मिळवू शकत नाही; हिराला स्वतःचे काही तुकडे मागे सोडावेच लागणार आणि डायस्पोरिक बनत असताना, ती आता विविध लोक आणि जगांना माहीत असलेल्या तिच्या अनेक स्वत्वांमध्ये कायमची अडकली आहे. आमनाच्या अधांतरी कालप्रवाहाच्या प्रतिध्वनींच्या कल्पनेमध्ये प्रियकर आणि अनंत/अमूर्त जन्मभूमी एकत्र होतात.


अधांतरी कालप्रवाह आणि देश हे हिरासाठी अलीच्या रूपात एकत्र येतात. अधांतरी कालप्रवाह त्यांना देशापासून दूर नेतो अशा ब्रिटिश बोर्डिंग स्कूल रहस्यकथांमधल्या मुलांसारखी हिरा नाही; अधांतरी कालप्रवाह तिला राष्ट्राशी जोडून ठेवतो. हिरासाठी मातृभूमी ही आई आणि प्रियकर दोन्ही आहे आणि तिच्या निर्वसनात हे अभिसरण कथनाला जोम देते. पण ऊया गोष्टीत काही फरक आहेत जे महत्त्वाचे आहेत - अली पाकिस्तानचा आहे पण रावळपिंडीचा नाही – घरचा असून घरातला नाही. अली कथेत येतो कारण हिरा घरासाठी आसुसलेली असते, आणि प्रियकरामध्ये, हिराला घराचे प्रतिध्वनी दिसतात. कदाचित इथे नजमाबादीच्या पर्शियन साहित्याच्या मीमांसेचा उलटा अर्थ लावता येऊ शकतो, जिथे प्रियकर मातृभूमीत सापडतो.

*

आणि रावळपिंडी हेच शेवटी मातृभूमीला कथनात मुख्य भूमिका पार पडण्यास हातभार लावते - घराच्या पार्श्वभूमीची विशिष्टता ही मातृभूमीच्या संकल्पनेला कथानकात आपली मूळं रोवण्यास, उत्तर-वसाहतवाद आणि डायस्पोराच्या त्या अमर्यादित व्यापकतेला अवकाश देते, जिथे वयात येण्याचे विविध अनुभव एकत्र येतात. रावळपिंडी इथे हिराला एक अतूट स्वत्व मिळू शकते, जिथे अधांतरी कालप्रवाहला तिच्याभोवती केंद्रीत केले जाऊ शकते, जसे ब्रिटीश मुलांच्या रहस्यकथांमधली मुले-पीटर आणि जेनेट आणि जॅक आणि जॉर्ज आणि कॉलिन आणि बार्बरा आणि पाम, आणि जॉर्ज आणि ज्युलियन आणि अॅन आणि डिक, आणि फॅटी आणि लॅरी आणि डेझी आणि पिप आणि बेट्स— यांची व्यक्तिचित्र ब्रिटिश ग्रामीण भागातील लहान शहरांमध्ये रुजलेली आहेत.


हिराप्रमाणेच मला स्वतःला भारतापेक्षा पुण्यात जास्त आपललसं वाटते. मी डायस्पोरामधली आहे, पण मी ज्या जागेमध्ये लहानाची मोठी झाले, ज्या जागेने मला आकार दिला, ज्या जागेने माझ्यात घरापासून दूर राहण्याची आकांक्षा निर्माण केली, जिचा मी दरवेळी परतताना तिरस्कार केला असतानाही मी या जागेला माझ्या स्वत्वाचे मूळ मानते. मी अधांतरी काळप्रवाहात मोठी झाले, पण थोडक्यात, जसजशी मी मोठी होत गेले, तसतसे मला माझ्या साहित्यिक वंशावलीवर हक्क सांगायला, माझ्या साहित्याच्या समजुतीला याने आकार दिला हे मान्य करायला संकोच वाटू लागला. पण ते न करणे अशक्य होते, कारण डायस्पोरामध्ये, ही एकमेव गोष्ट आहे जी मला आशा करू देते की कुठेतरी, माझी बहुविध स्वत्वे ज्यामध्ये वेळ आणि स्थान आणि साहित्य आणि भाषा या सर्वांमध्ये स्थिर एक अतूट स्वत्व बनू शकतात.


अॅलिसन स्टोन लिहितात: “मातृ शरीराची व्याख्या ही वारंवार पार्श्वभूमी, वातावरण, पहिले घर आणि साचा अशी केली गेली आहे, जी प्रत्येकाने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व बनवण्यासाठी मागे सोडली पाहिजे" (17). आणि मी नेहमी आई आणि घराची कल्पना एकत्र केली आहे. माझ्या लहानपणी, उन्हाळ्याच्या सहली नेहमीच मुंबईला असायच्या. मुंबई, माझ्या आईचे पहिले घर, मला माझे घर वाटायचे, जे मला कधीही पुणे, माझ्या वडिलांचे पहिले घर, वाटले नाही. माझ्या मते अधांतरी कालप्रवाहाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते माझ्यासाठी मूलभूतपणे एकाकी आहे. माझ्याकडे अतूट बालपण, ब्रिटीशांच्या ग्रामीण भागात रुजलेल्या अतूट स्वार्थाचा विलास नाही. पाच वर्षे न्यू जर्सीमध्ये, बारा पुण्यात, तीन इलेनोयामधल्या स्प्रिंगफील्डमध्ये, एक वर्ष फिरते, परत पुण्यात एक वर्ष, आणि नॉर्थम्प्टनमध्ये एक वर्ष, यांमध्ये विखुरलेला अधांतरी काळप्रवाह माझ्यासाठी तोटा आणि एकाकीपणाची जागा आहे; आणि तरीही ती जागा माझ्या आठवणीत नेहमीच आनंददायी असते, कारण मी तिची त्या रहस्यकथांमधल्या मित्रांसोबत रहस्ये सोडवणार्‍या, कायम आनंदी असणार्‍या आणि नवीन गोष्टींचा वेध घेणार्‍या त्या शाळकरी मुलांपासून वेगळी कल्पना करू शकत नाही. मी नॉर्थहॅम्प्टनमध्येदेखील आनंदी आणि माझ्या आवडीच्या गोष्टींमद्धे व्यस्त राहू शकते, परंतु मी तेव्हा एका बाजूला घरची आठवण काढत आणि निराश असते. पण पुन्हा, जन्मभूमी, मातृभूमी आणि घर समजून घेताना, हिराचा अधांतरी कालप्रवाह आणि माझ्या बालपणाला आकार देणार्‍या साहित्याच्या अधांतरी कालप्रवाहामध्ये एक वियोग आहे - एकटेपणा आणि आनंदाचा वियोग. हिराचा अधांतरी कालप्रवाह एकाकीपणा आणि तोट्यातून बाहेर पडतो आणि ब्रिटिश ग्रामीण भागाचा अधांतरी कालप्रवाह सुख आणि आनंदातून बाहेर येतो.

अधांतरी कालप्रवाहाची संकल्पना अमेरिकन फीव्हरला, आणि माझ्या आयुष्याला पछाडते आणि कदाचित अमेरिकन फीव्हरमध्ये सापडलेल्या माझ्या भावनांमध्ये, अमेरिकन फीव्हर वाचतानाच्या माझ्या आध्यात्मिक अनुभवात, मी कादंबरीच्या अनंततेकडे आकर्षित होते. कादंबरीत, हिरा क्षयरोगाने आजारी असताना, तिला फैजच्या कवितेचे वेड लागते. आणि तिच्या ध्यासात, हिराला फैजमध्ये कायमस्वरूपी काळाचे प्रतिध्वनी सापडतात. पण कदाचित हिरामध्ये मला मी बालपणात वेड्यासारखे वाचलेल्या माझ्या पुस्तकांमधल्या, आमनाच्या लिखाणामधल्या, माझ्या स्वतःच्या वाचंनामधल्या अधांतरी कालप्रवाहाच्या कल्पनेचा शोध घ्यायचा आहे; अधांतरी कालप्रवाह किंवा फ्लोटिंग टाइमलाइन - ब्रिटीश बालसाहित्याचा तो मायावी, अशक्य भाग ज्याने माझ्या साहित्यिक विचारविश्वाला आकार दिला, त्यापासून मी माझे स्वत्व दूर करू शकत नाही. जो माझ्या सर्व स्वत्वांना धरून ठेवू शकतो असा अधांतरी कालप्रवाह कदाचित मला कधीच सापडणार नाही. परंतु अमेरिकन फीव्हरमध्ये मला अशा जागेचे प्रतिध्वनी सापडतात जे माझ्या सर्व जागा आणि काळातली माझी सर्व स्वत्वे सामावू शकतात.संदर्भसूची:


आमना, दुर ए अझीझ. अमेरिकन ताप. आर्केड, २०२२.


डँटिकॅट, एडविज. क्रिएट डेंजरसली : आर्टिस्ट अॅट वर्क. विंटेज बुक्स, 2010.


नजमाबादी, अफसानेह. 'एरोटिक वतन (होमलँड) अॅज बिलव्हेड अँड मदर : टु लव, टु प्रोटेक्ट, टु पसेस" कम्पॅरटिव स्टडीज इन सोसायटी अँड हिस्टरी(समाज आणि इतिहासातील तुलनात्मक अभ्यास), खंड. 39, क्र. ३, १९९७, पृ. ४४२–६७. JSTOR, http://www.jstor.org/stable/179155.


स्टोन, अॅलिसन. फेमीनिस्म, सायकोअनॅलिसिस अँड मेटर्नल सब्जेक्टिविटी (स्त्रीवाद, मनोविश्लेषण आणि मातृ विषय).रूटलेज, 2012.

 

विका मुजुमदारचा जन्म न्यू जर्सी येथे झाला आणि ती भारतातील पुणे येथे लहनाची मोठी झाली. तिने यूएमएएसएस आमहर्स्टमधून तुलनात्मक साहित्यात एमएची पदवी घेतली आहे आणि ती लिमिनल ट्रांसीट रिव्यूची संपादक आहे. तिचे पुनरावलोकन निबंध मॅसॅच्युसेट्स रिव्यूआणि एएनएमएलवायमध्ये दिसली आहेत.


Comments


bottom of page